Monday, August 31, 2020

गीतकार शैलेंद्र

 मनोगत या मराठी संकेतस्थळावर विनायक गोरे ( माझा नवरा) यांचा लेख प्रकाशित झाला होता. तो मी इथे माझ्या ब्लॉगवर सेव्ह केला आहे.

आज ३० ऑगस्ट. गीतकार शैलेंद्रची ८६वी जयंती. शैलेंद्र फक्त ४३ वर्षांचे आयुष्य जगला आणि या वर्षी १४ डिसेंबरला त्याचे निधन होऊन आणखी ४३ वर्षे होतील. त्यानिमित्ताने मला आवडलेल्या काही गाण्यांबद्दल अगदी थोडक्यात काही लिहावे असे वाटल्याने हा लेख. प्रा. माधव मोहोळकरांनी शैलेंद्रवर अप्रतिम लेख लिहिला आहेच. त्यामुळे त्यापेक्षा काही थोडेसे वेगळे सांगण्याचा प्रयत्न करेन.

"कवी होता कसा आनने?"अशी उत्सुकता सर्वांनाच असते. त्यासाठी चली कौनसे देश हे गीत ऐका आणि पहा. यामधला हाताने बुलबुलतरंग (की जलतरंग? ) वाजवीत तल्लीन होऊन गाणे म्हणणारा पुरूष म्हणजेच शैलेंद्र.

आता काही गाण्यांबद्दल लिहितो. राज कपूरच्या चित्रपटांसाठी शैलेंद्रने लिहिलेल्या गाण्यांबद्दल बरेच लिहिले गेले आहे त्यामानाने संगीतकार शंकर - जयकिशनबरोबरची इतर गाणी थोडीशी उपेक्षित राहिली. त्यापैकी मला सर्वात आवडणारी गाणी "बसंत बहार" चित्रपटातली. पहिले गाणे भयभंजना सुन हमारी . यातल्या "भयभंजना" शब्दाने लक्ष वेधून घेतले. दुसरे म्हणजे हे गाणे हे देवीची प्रार्थना आहे आणि त्याचे आपल्या "दुर्गे दुर्घट भारी" या देवीशी थोडेसे साम्य आहे. खासकरून दुसऱ्या कडव्यातल्या

"आजा मधुर स्वप्नसी मुस्कराती
मन के बुझे दीप हंसकर जलाती" या ओळींचे

"प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदासा
क्लेषापासूनी तोडी तोडी भवपाशा" या ओळींशी साम्य वाटते.

याच "बसंत बहार"मधले दुसरे गाणे आहे बडी देर भई. बऱ्याच वेळा शैलेंद्रच्या गाण्यांचे मुखडे साधे असतात पण खऱ्या चमकदार ओळी अंतऱ्यात असतात, उदा. "मेरा जूता है जापानी"सारख्या साध्या मुखड्याने सुरूवात होऊन हे गाणे
मुखड्यात "चलना जीवनकी कहानी रुकना मौत की निशानी" असे तत्त्वज्ञान सांगते. तीच स्थिती "बडी देर भई" या गाण्याची आहे. कडव्यामधल्या या ओळी बघा


"कहते है तुम हो दया हे सागर फिर क्यूं मेरी गागर
झूमे झुके कभी ना बरसे कैसे हो तुम "घन" श्याम"

दुसऱ्या ओळीत घनश्याम शब्दाची "कधीही न बरसणारा घन असा श्याम" अशी फोड करून सुंदर श्लेष साधला आहे.

 शंकर - जयकिशन १९५० - ५५ या काळात अतिशय सुरेल गाणी द्यायचे त्याचा पुरावा म्हणजे "शिकस्त" चित्रपटातले कारे बदरा तू न जा हे लताने गायलेले अप्रतिम गीत. यातल्या मला विशेष आवडणाऱ्या ओळी तिसऱ्या कडव्यात आहेत.

"चौरस्तेपे जैसे मुसाफिर पथ पूछे घबराए
कौन देस  किस ओर जाऊँ मैं मन मेरा समझ न पाए"

खरे तर या लेखात राज कपूरच्या चित्रपटातली आणि अतिप्रसिद्ध गीते घ्यायची नाहीत असे ठरवले होते, तरीही ये रात भीगी भीगी या गाण्याचा अपवाद करावा लागला. कारण या गाण्यातल्या दुसऱ्या कडव्यातल्या अंतर्मुख करणाऱ्या पुढील ओळी

"जो दिन के उजाले में न मिला
दिल ढूंढे ऐसे सपने को
इक रात की जगमग में डूबी
मैं ढूंढ रही हूं अपनेको"

या ओळी ऐकल्यावर गीतकार गुलजारचे शब्द आठवतात "गीतकार शैलेंद्र ही अमच्या गीतकारांच्या दुनियेत घडलेली सगळ्यात चांगली गोष्ट होती. चित्रपटगीतांना शैलेंद्रने साहित्याची उंची गाठून दिली."

शंकर - जयकिशन यांच्यानंतर शैलेंद्रची जोडी जमली ती संगीतकार सलील चौधरींबरोबर. दोघांच्या शैलीत जमीन अस्मानाचा फरक होता. शंकर - जयकिशन गीताच्या नैसर्गिक चालीशी मिळतीजुळती, साधीसोपी चाल लावायचे. सलील चौधरी भारतीय संगीतावरोबरच अभिजात पाश्चात्य संगीताचे बेमालून मिश्रण करायचे. त्यांच्या बहुतेक सर्व चाली आधीच तयार असायच्या आणि त्यात त्यांनी (स्वतःच लिहिलेली) बंगाली गाणीही बांधलेली असायची. त्यामुळे अशा काटेकोर बांधलेल्या चालीत अक्षरश" "गाळलेल्या जागा भरा" प्रकारचे गाणे लिहायचे म्हणजे कमालीचे मुष्किल काम. त्यामुळे हे गाणे काव्य म्हणूनही सरस असावे अशी अपेक्षा करणे कठीण. अर्थात इतक्या मर्यादा पाळूनही शैलेंद्रने सुंदर गाणी लिहिली आहेत. त्यातले पहिले गाणे म्हणजे हरियाला सावन ढोल बजाता आया. यातल्या दुसऱ्या कडव्यात

"ऐसे बीज बिछो रे सुख चैन उगे दुख दर्द मिटे
नैनोंमें नाचे रे सपनोंका धान हरा"

अशा पसायदानाची आठवण करून देणाऱ्या ओळी लिहिल्या आहेत.

दुसरे  "परख" चित्रपटातले  मिला है किसी का झुमका हे गीत स्वतंत्र लेखाचा विषय आहे. बागेत गेलेल्या मुलीला तिच्या मैत्रिणीचा झुमका मिळतो. मैत्रीण प्रियकराबरोबर निघून गेली आहे, मुलगी आणि झुमका दोघांनाही मागे सोडून. त्यामुळे मुलगी स्वतःच्या मनातले विचार झुमक्याच्या माध्यमातून "सुनो क्या कहता है झुमका" म्हणून व्यक्त करते ते अतिशय तरल आहे.

अर्थात गाण्याचे चित्रीकरण अर्थाशी पूर्णपणे विसंगत आहे. झुमक्याऐवजी जास्वंदीचे फूल आहे, साधना मैत्रिणीच्या आठवणीने व्याकुळ दिसायच्या ऐवजी आनंदी दिसते आहे आणि चित्रपट पाहिलेल्यांकडून समजले की त्यात साधनाच्या मैत्रिणीचे (जिचा झुमका हरवतो) पात्रच नाही.

शैलेंद्र - सलील चौधरी जोडीचे माझे आणखी एक आवडते गाणे म्हणजे "हनीमून" चित्रपटातले मेरे ख्वाबोंमें खयालों में छिपे हे गीत. यातल्या पुढील ओळी बघा

"मेरे गीतोंके मचलते हुए स्वर
उनके आंगन में उतर
उनको मेरे पास खींच लाएंगे"

संगीतकार रोशन म्हटल्यावर गीतकार शैलेंद्रचे नाव सहसा समोर येत नाही. साहिर - मजरूहची नावे येतात. पण संगीतकार रोशनबरोबर सर्वाधिक १२ चित्रपटात गाणी लिहिली आहेत शैलेंद्रने. साहिरने ८ तर मजरूहने ६. रोशनने आपल्या संगीताची शैली तीन वेळा बदलली. १९४९ ते १९५५ वर्षे अत्यंत अभिजात, दर्जेदार संगीत दिले, १९५६ ते १९५९ मध्ये हलके फुलके संगीत दिले तर १९६० ते १९६८ साधारण मुसलमानी छापाचे म्हणजे गझला, कव्वाल्या, मुजरे याप्रकारचे संगीत दिले. तिन्ही टप्प्यात रोशनबरोबर शैलेंद्रने गाणी लिहिली आहेत.

त्यातले पहिले गाणे  "चांदनी चौक" मधले दिल की शिकायत नजर के शिकवे. रोशनकडे अनेक वेळा "हेही आहे आणि तेही आहे" किंवा हेही कठीण तेही कठीण" अशा अर्थाची गाणी दिसतात. तीन गाणी सहज आठवतात. एक "अनहोनी" मधले "दिल शाद भी है नाशाद भी है" दुसरे "नौबहार" मधले शैलेंद्रनेच लिहिलेले "उनके बुलावेसे डोले मेरा दिले जाऊँ तो मुष्किल न जाऊँ तो मुष्किल" आणि तिसरे वर दिलेल शैलेंद्रचेच "दिल की शिकायत नजर के शिकवे एक जुबाँ और लाख बयाँ छिपा सकूं ना दिखा सकूं दिल के दर्द मेरे हुए जवां". यातल्या मला खास  आवडणाऱ्या ओळी तिसऱ्या कडव्यात आहेत.

थोडे लिखे को बहुत समझना नये नहीं ये अफसाने
दिल मजबूर भरा आता है छलक उठे है पैमाने
खत में जहाँ आँसू टपका है लिहा है मैंने प्यार वहाँ

तसेच "संस्कार" चित्रपटातली हँसे टिम टिम टिम छोटे छोटे तारे ही लोरीही माझी फार आवडती आहे.

शैलेंद्रने अनेक लोकगीते आणि त्यांच्यावर आधारित गीते लिहिली. लोकगीतावर आधारित एक प्रसिद्ध गीत म्हणजे "बंदिनी" चित्रपटाले अब के बरस भेज भय्या को बाबुल. या गाण्याच्या बाबतीत एक किस्सा खूप वर्षांपूर्वी "कोहिनूर गीतगुंजार" या कार्यक्रमात अजित सेठ यांनी सांगितला होता. एका प्रेम नावाच्या माणसाकडून त्यांना समजला होता. प्रेम (धवन? ) म्हणाले "एक दिवस मी आणि गीतकार शैलेंद्र पोवई उद्यानात फिरायला गेलो. एका झाडाखाली बसलो आणि मी माझ्या भसाड्या आवाजात एक लोकगीत ऐकवले. ते ऐकून शैलेंद्रच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. पुढे अनेक दिवसांनी शैलेंद्रच्या घरी गेलो तर त्याच्या टेबलावर त्या लोकगीतावर आधारित गीत लिहिलेले दिसले. त्यावेळी 'तीसरी कसम" ची तयारी जोरात चालू होती त्यामुळे ते "तीसरी कसम" साठी असावे असा माझा समज होता पण ते पुढे 'बंदिनी' चित्रपटात आले. "

१९६२ मध्ये पहिला भोजपुरी चित्रपट निघाला "गंगा मैया तोहे पियरी चढइबो" त्यातली गाणी शैलेंद्रने लिहिली होती आणि संगीतकार होते चित्रगुप्त. त्यातली दोन गाणी फार प्रसिद्ध झाली. पहिले हे गंगा मैया तोहे पियरी चढइबो. यामध्ये लग्नानंतर नवऱ्याला कसे सामोरे जायचे, आपल्याजवळ रूप, गुण, कर्तृत्व, दागिने काहीच नाही अशी खंत मुलीने व्यक्त केली आहे.

"ना मेरे गुण ढंग ना मेरे करनी ना मेरे एको गहनवा हो राम
खोले घुंघट जब पिया मोको देखी है कर बैनी कौनो बहनवा हो राम"

यातले "बहनवा" चा संबंध "बहन" शब्दाशी नसून "बहाना" शब्दाशी आहे हे समजायला थोडा वेळ लागला. अर्थात् हे गाणे मूळ शैलेंद्रचे आहे की नाही याबद्दल शंका आहे, कारण याच गाण्याची सोप्या हिंदीतली आवृत्ती  बेगम अख्तरच्या आवाजही ऐकली आहे आणि त्यावेळी तिचा उल्लेख "पारंपरिक रचना" असा केला होता. याच चित्रपटाले दुसरे बिदाईगीत सोनवा के पिंजरा में बंद भईल हाय राम हे ही अतिशय सुरेख आहे.

संगीतकार अनिल बिस्वास यांच्याबरोबर गीतकार शैलेंद्रने "सौतेला भाई" आणि अगदी शेवटचा "छोटी छोटी बाते" या दोनच चित्रपटात गीते लिहिली. त्यापैकी "छोटी छोटी बातें" मधले कुछ और जमाना कहता है हे माझे अतिशय आवडते.

"ये बस्ती है इन्सानोंकी इन्सान मगर भूले ना मिला
पत्थत की बुतों से क्या कीजे फरियाद भला टूटे दिल की"

या मला विशेष भावलेल्या ओळी. या गाण्याबाबत एक जाणावणारी गोष्ट म्हणजे कमालीचा कडवटपणा जो यापूर्वीच्या गाण्यांमध्ये कधीही दिसला नाही. "तीसरी कसम" तयार करताना झालेला मनस्ताप आणि या गाण्यातला कडवटपणा याचा काही संबंध आहे का समजत नाही.

गाण्यातून एखादी गोष्ट (कथा या अर्थाने) सांगणे हेही शैलेंद्रने अनेक वेळा केले आहे त्यातले दिल का हाल सुने दिलवाला हे विशेष. भुरट्या चोरासारखे दिसणाऱ्या तरूणाला पोलीस पकडून नेतात, तिथे दरोगासाहेब त्याला "ठानेदार का साला" असल्याचे ओळखून सोडून देतात अशी साधी गोष्ट पण बरीच खुलवून सांगितली आहेत.

 त्यातल्या स्वतःबद्दलच्या

"छोटेसे घर में गरीब का बेटा मैं भी हूं मां के नसीब का बेटा
रंजो गम बचपन के साथी आंधियों में जले जीवनबाती
भूख ने है बडे प्यार से पाला"

या ओळी तर आवडल्याच पण

"सुनो मगर ये किसी न कहना तिनके का लेके सहारा ना बहना
बेमौसम मल्हार ना गाना आधी रात को मत चिल्लाना
वरना पकड लेगा पुलिसवाला"

असा थोडासा मजेशीर समारोपही आवडला. 

लहान मुलांकरता गाणी लिहिणे सोपे नाही असे एकदा गुलजार म्हणाले होते. शैलेंद्रने लिहिलेले नानी तेरी मोरनी हे गाणे अजूनही लोकप्रिय आहे. त्यातल्या या ओळी पहा.

"खाके पीके मोटे होके चोर बैठे रेलमें
चोरोंवाला डब्बा कटके सीधा पहुंचा जेल में"

आयुष्यात अनेक वेळा दुःखाचे, निराशेचे प्रसंग येतात. अनेक वेळा आपल्याला कोणी मित्र नाही आपण असहाय्य आहोत अशे भावना होते अशा वेळी शैलेंद्रच्या गाण्यांचा आधार वाटतो. उदा. मैं आशिक हूं बहारोंका या गाण्यातल्या

चला गर सफर को कोई बेसहारा
तो मैं हो लिया संग लिये एकतारा
गाता हुआ दुख भुलाता हुआ

या ओळी, किंवा दो दिन की जिंदगी में या गाण्यातल्या

मरनेको सौ बहाने जीनेको सिर्फ एक
उम्मीदके सुरोंमें बजते है दिल के तार

या ओळी. कमी शब्दात प्रभावीपणे विचार व्यक्त करण्याची शैलेंद्रची ताकद साधारण असाच विचार सांगणाऱ्या साहिरच्या

"मौत कभीभी मिल सकती है ये जीवन फिर न मिलेगा
मरनेवाले सोच समझ ले तुझ को ये पल फिर न मिलेगा"

या "रात भर का है मेहमां अंधेरा" या गाण्याच्या सुरूवातीच्या ओळींशी केली तर लक्षात येते.

माझ्या यादीतले  गाणे वहाँ कौन है तेरा. बर्मनदादांच्या आवाजाच्या माध्यमातून शैलेंद्र अजूनही आपल्या संपर्कात आहे असे वाटते. कदाचित हे सगळे स्वप्नाळू भास आहेत असेही कोणी म्हणेल.

गीतकार शैलेंद्रच्या ३२ कवितांचा संग्रह "न्यौता और चुनौती" १९५५ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यातल्या १६ कविता हिंदी कविता जालावर (कविताकोश डॉट ऑर्ग) इथे वाचता येतात त्याही शैलेंद्रच्या कवित्वशक्तीची साक्ष देणाऱ्या आहेत.

विनायक

No comments: