Sunday, June 14, 2020

रस्ते (२)

विल्मिंग्टन मध्ये मी जेव्हा अपार्टमेंटच्या बाहेर फिरायला जायचे तो रस्ता वाहता होता. वाहता म्हणजे त्या रस्त्यावरून कार्स जायच्याच, शिवाय चालणारी मंडळी, धावणारे युवक युवती आणि हो या रस्त्यावर बदके आणि त्यांची पिले पण चालायची बर का! या रस्त्यावर घरे होती. काही कंपन्या होत्या. कमी स्पीड लिमीट असले तरी काही कार वाली मंडळी उगाचच जोरात जायची त्यामुळे जरा जपूनच चालावे लागायचे. चालण्याचा आनंद या रस्त्याने कधीच दिला नाही. रमतगरम चालायचे मी या रस्त्यावर. या रस्त्यावर दोन तळी होती. या दोन्ही तळ्यांवर मि बदकांना पहायला थांबायचे. चालताना आकाशात काही वेळा छान रंग जमून यायचे. सूूर्यास्तही दिसायचे. काही वेळा उगवलेला चंद्रही दिसायचा. होळी पौर्णिमेचा मोठाच्या मोठा चंद्र दिसला होता मला एकदा ! पाऊस पडला की मोठेच्या मोठे इंद्रधनूही दिसायचे. या अपार्टमेंटच्या आवारात जो रस्ता होता. तिथेही बदके, त्यांची पिले आणि सीगल्स पक्षी खूप यायचे. संध्याकाळच्या सुमारास चालायला गेले की अनेक पक्षी दिसायचे वेगवेगळे. सारखे इकडून तिकडे जात असायचे. संध्याकाळी चालण्यापेक्षा बाकीची मजा जास्त असायची.


या रस्त्याच्या विरूद्ध दोन्हीही दिशेला दोन रस्ते समांतर होते. एका रस्यावर खूपच शुकशुकाट होता. तिथे कोणीही जायचे नाही. एक्दोन वेळा गेले होते मी पण निर्मनुष्य रस्ता. आणि दुसरा समांतर रस्ता होता तो महामार्ग ४० ला पोहोचणारा होता त्यामुळे त्या रस्त्यावर वाहने खूप जोरात जायची. याच रस्त्यावर एक बस स्टॉप होता. तो बस स्टॉप म्हणजे एक लोखंडी खांब जमिनीत रोवलेला होता आणि त्यावर किती नंबरची बस थांबते तो आकडा लिहिला होता. या बस स्टॉप वरच मी उभी रहायचे जेव्हा लायब्ररीत काम करायला जायचे तेव्हा. या बस स्टॉप वर बसायला बाकडे नव्हते. या रस्त्याच्या पुढचा चोक होता त्याच्या उजवीकडे कम्युनिटी कॉलेज होते तिथे मी २ सेमेस्टर केल्या होत्या पॅरालीगल डिप्लोमाच्या. त्यामुळे हे दोन रस्ते खूप जास्त आठवणीतले नाहीत.जिथे बस स्टॉप होता तो रस्त्याच्या पलीकडे होता त्यामुळे हा रस्ता क्रॉस करताना खूप भीती वाटायची. जोरात वाहने धावायची या रस्त्यावरून ! डेंटन टेक्साज मध्ये रस्त्याशी संबंध आले पण आठवणीत राहिले नाहीत. त्यांच्याशी नातं निर्माण झाले नाही. माझ्या मैत्रीणीकडे ज्या रस्त्याने मी चालत जायचे तो खूप भकास वाटायचा मला. रस्त्यावर मैलो न मैल कोणीही नाही. आम्ही दोघेही शनिवार रविवार खूप चालायचो पण रस्त्यावर शुकशुकाट असायचा. आनंद नाही. एक चालण्याचा व्यायाम होत होता इतकेच. इथे मी रोजच्या रोज विद्यापीठात जायचे. तो रस्ता असा नव्हता. अपार्टमेंटच्या समोरचा रस्ता क्रॉस करून गेले की एक चढण होते. नंतर परत सपाट रस्ता. नंतर थोड्या पायऱ्या, नंतर परत सपाट रस्ता असे करत मी लायबरीत जायचे. पोस्टात पत्र टाकायला जायचे. विद्यापीठातचेच आवार होते हे खरे तर रस्त्यापेक्षाही !


विल्मिंग्टनच्या रस्त्यावर फिरताना मला एम आय डी सी मध्ये फिरल्यासारखे वाटायचे. कारण की थोड्या कंपन्या होत्या. थोडी घरे होती. एक डे केअर होते. एक ग्रोसरी स्टोअर होते. हँडरसनविलचा डाऊन टाऊनचा रस्ता आणि फूटपाथ खूप छान होते. फूटपाथ वरून आरामात चालायचे. चालताना आजुबाजूची दुकाने बघायची. शिवाय इथे बरीच उपहारगृहे पण होती. बाजूच्या रस्त्यावर वाहने सावकाश जायची. या रस्त्यावरच पार्कींग पण होते. हा रस्ता मला पुण्याच्या लक्ष्मी रोडची आठवण करून द्यायचा. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चक्कर मारली की चालणेही होत असे. आणि आनंदही मिळत असे. इथे एक प्राचीन खडकांचे म्युझियम पण होते. आयस्क्रीम पार्लर होते. या फूटपाथ वर बाकडेही होती आणि डुलणाऱ्या खुर्च्याही होत्या. त्यावर पण बसता येत होते. या रस्त्याशी आठवणी अश्या जास्त नाहीत. कारण की नंतर मला नोकरी लागली. नोकरीवर जाताना रस्ता होता तो म्हणजे असाच की फूटपाथवरून चाला आणि बाजूला वाहने असायची. नंतर जेव्हा अपार्टमेंट बदलले तेव्हा कामावरून निघून १० मिनिटात मी चालत घरी येत असे.



या नवीन अपार्टमेंटच्या आवारातले उंचसखल रस्त्यांवरून चालणे होत असे पण जास्त नाही. चालताना मात्र खूप छान वाटायचे. हे अपार्टमेंट डोंगरावर असल्याने. चालताना आजुबाजूचे डोंगर दिसायचे. आणि फ्रेश वाटायचे. इथे तर चालताना आकाशातले रंग कितीतरी पाहिले आहेत. सर्वच्या सर्व रंग कॅमेरात बंदीस्त केले आहेत. या आधीच्या अपार्टमेंट मध्ये जेव्हा रहायचो तेव्हा ज्या फूटपाथवरून चालत घरी यायचे तेव्हा या फूटपाथवरून चालताना सर्व ऋतूमध्ये निरनिराळे क्षण अनुभवले आहेत. पावसात चालत जाताना, रखरखित उन्हात चालताना, बोचरे वार अंगावर घेताना, आणि शून्य डिग्री सेल्सियस मध्ये चालताना.हँडरसनविलच्या डाऊन टाऊनच्या रस्त्यावर ऍपल फेस्टीवल भरायचा. तेव्हा रस्त्यावर भरपूर विक्रेते, चालणारी माणसे, त्यात म्हातारी, तरुण व लहान मुले घोळक्याने चालायची. बरेच स्टॉल लावलेले असायचे. ही जत्रा खूप आवडून गेली आणि म्हणूनच या डाऊन टाऊनच्या रस्त्याची विशेष आठवण आहे.


कारने आम्ही लांबच्या प्रवासाला जायचो , गावातल्या गावात ग्रोसरी स्टोसर्स ला जायचो , समुद्रावर, तळ्यावर, नदीवर जायचो. या रस्त्यांच्या पण काही आठवणी आहेतच. महामार्गावरच्या काही आठवणी रस्ता चुकल्याच्या आहेत. तर काही वळणावळाच्या रस्त्यावर जाताना डोळ्यासमोर सूर्य येत होता. काही डोंगरघाटावरच्या उंचसखल रस्त्याच्या आहेत तर काही मैलो न मैल एकही झाड नाही. रसळसोट रस्ते .काही महामार्गांवर शुकशुकाट केव्हाही जा !


अमेरिकेत राहून १९ वर्षे झाली पण आमच्या गाठीभेटी रस्त्यांशी आल्या, माणसांशी नाहीत, अगदी नाही म्हणायला काही फ्रेंड सर्कल तातपुरत्या काळासाठी जमा झाले होते आणि तेही विद्यापीठातल्या दिवसात. डोळे मिटले की रस्ते दिसतात. काही वेळेला काही रस्त्यांची प्रखरतेने आठवण होते, डोळ्यासमोरून हालत नाहीत आणि खूप गलबलून येते ! ऋणानुबंधाच्या गाठीच म्हणायच्या !! Rohini Gore

No comments: