ध्यानीमनी जे असे ते स्वप्नी दिसे असे म्हणतात. अगदी खरे आहे ते !
गेल्या आठवड्यात मला कॉलेज ऍव्हेन्यू रस्ता दिसला होता. नुसता दिसला नाही
तर मला बोलावत होता. स्वप्नामध्ये त्या रस्त्यातला गजबजलेला चौक मला
स्पषटपणे दिसत होता.
आयुष्याला जशी सुरवात होते तशी आपली रस्त्याशी
गाठ पडायला लागते. आधी शाळेत जाताना व नंतर क्रमाक्रमाने कॉलेज, नोकरी,
राहते घर सोडून दुसऱ्या शहरात, किंवा दुसऱ्या देशात गेलो तर तेथील रस्ते,
असे हे चक्र चालूच असते. यामध्ये काही रस्त्यांचे तर आपल्याशी एक नाते बनून
जाते. नातेसंबंधासारखेच रस्त्यांशी गाठ पडणे, त्या रस्त्याचा सहवास घडणे,
नातं जडणे आणि त्यात सुद्धा काही रस्त्यांशी घट्ट मैत्री तर काहींच्या
नुसत्याच आठवणी बनून रहातात.
तर या रस्त्यांमध्ये काही रस्ते असे
असतात की ज्यावर सदा न कदा धावणारी वाहने असतात तर काही रस्त्यांवर एकही
चिटपाखरू नसते. काही रस्त्यांवर खड्डेच खड्डे तर काही रस्ते इस्त्री
केलेल्या कपड्यांसारखे सदैव गुळगुळीत व फॅशनेबल असतात. काही रस्ते
गल्लीबोळातून जातात त्यामुळे खूप घाई असेल आणि लवकर पोहोचायचे असेल तर हे
गल्लीबोळातले शॉर्ट कट रस्ते किती उपयोगाचे असतात ना ! हे रस्ते म्हणजे पायवाटेने तयार झालेले रस्ते असतात आणि ओबडधोबड असतात. काही ठिकाणी फरशा तर काही ठिकाणी माती. काही दुकानांसोबतचे रस्ते, असे करत करत माणसाने बनवलेले हे शॉर्टकटचे रस्ते ! इच्छीत स्थळी काही मिनिटात पोहोचवतात. अशा रस्त्यांचे मला खूप कौतुक वाटते. काही रस्ते नेहमी दुभंगलेले असतात
बिचारे. सतत खोदकाम चालू असते. या रस्त्यांनी मागच्या जन्मी कोणते पाप केले
असेल कोण जाणे ! सतत आपला फावडे कुंदळांचा मारा ! जेव्हा बघावे तेव्हा
चिखल माती, आजुबाजूला पाणी, वाहनांना अडथळा.
पुण्याला गणेश खिंड रस्ता हा असाच आठवणींचा बनून राहिला आहे. खिंडीच्या
उजवीकडे चालत गेले तर या रस्त्यावरून कमला नेहरू पार्कपर्यंत हा रस्ता मे
महिन्याच्या सुट्टीतला झाला होता. या रस्त्यांवरून शाळा कॉलेजमधल्या एप्रिल
मे महिन्यांच्या सुट्टीत यावरून चालणे व्हायचे. खिंडीतून खाली उतरलो की
डाव्या बाजूला समोरासमोर सिमेंटचे दोन कट्टे होते त्या कट्यावरून आम्ही
त्या रस्त्यातल्या चौकाला सिक्स पेंशनर चौक असे नाव दिले होते. कमला नेहरू
पार्कमध्ये चालत चालत त्या खिंडीतल्या रस्त्यावरून जायचो. डावीकडे बघितले
तर त्या कट्ट्यावर ५-६ पेंशनर लोक येऊन बसलेले असायचे. खिंडीच्या डावीकडे
चालत जाऊन चतुर्श्रींगिच्या देवीचे दर्शन घेऊन पुढे एका गणपतीचे देऊळ आहे
तिथेही जायचो.
चालताना खूप उत्साह असायचा. त्यावेळेला गर्दी नव्हती.
भरपूर वारे व शुद्ध हवा होती. काही वेळेला हनुमान टेकडीवर बसून खालच्या
गजबजलेल्या रस्त्यांवर जात असलेल्या वाहनांकडे बघताना कसा व किती वेळ जायचा
हे कळायचे सुद्धा नाही. वेळेचे भानच उरायचे नाही. वाहनांचे पिवळे लाल लाईट
एकापाठोपाठ एक सुंदर दिसायचे जणू काही दिव्यांची माळ रस्ताभर पसरून ठेवली
आहे. आईबाबांच्या घरासमोरचा जो रस्ता होता त्याच्याशी तर खूपच घट्ट
नाते आहे. प्रत्येक घरी समोरच्या अंगणात पाण्याचा सडा घातला जायचाच, शिवाय
घरासमोरच्या रस्त्यावरही वेगळा सडा घालायचे प्रत्येक जण ! त्यामुळे या
टोकापासून ते त्या टोकापर्यंत रस्ता ओलाचिंब व्हायचा. त्यातूनही कोणी सडा
घालायला विसरले असेल तर रस्त्याचा तो भाग कोरडा दिसायचा. या रस्त्यावरच
सर्व घराची मिळून होळीपौर्णिमेला होळी पेटायची. आमचे घर त्या रस्त्याच्या
टोकाला होते. तिथे हा रस्ता संपायचा. आम्ही जेव्हा शाळा कॉलेजात जायचो
तेव्हा आई त्या रस्त्यावर येऊन आम्हाला टाटा करायला उभी रहायची. आम्ही दोघी
बहिणी चालत चालत जाऊन रस्त्याच्या शेवटी पोहोचलो की तिथून आम्हाला उजव्या
बाजूला वळायला लागायचे व तिथून पुढे बस स्टॉप होता. उजव्या बाजूला वळायच्या
आधी आईला फायनल टाटा केला की मग आईला आम्ही दिसेनासे व्हायचो. आमच्याकडे
कुणी पाहुणे आले की त्यांनाही टाटा बाय बाय करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उभे
! त्यांनाही आमच्या फायनल टाटा बद्दल माहीती झाले होते ! या रस्त्याबद्दल
अजून एक खासियत अशी होती की रिक्शाचा, स्कूटरचा आवाज आला की कोणीतरी आले
आहे असे आम्हाला घरातच कळायचे.
या रस्त्यावर सर्व विक्रेते यायचे.
कुल्फीची गाडी घंटा वाजवत यायची. ढकलगाडीवरून बर्फाचा गोळा, शिवाय
कांदेबटाटे वाले यायचे. सायकलवरून टोपल्यातून पेरू व हरबऱ्याच्या गड्ड्या
सायकलीच्या मागच्या कॅरिअरला लावून विक्रेते यायचे. रोजच्या रोज बसने शाळा
कॉलेजात जायचो तो रस्ताही असाच आठवणीतला. या रस्त्यावरून बस जेव्हा आत
वळायची तेव्हा बसच्या खिडकीतून आमचे घर दिसायचे आणि तसेच जातानाही. या
रस्त्यावर दोन स्टॉप होते. एक शेवटचा आणि एक मधला. शेवटच्या स्टॉपला बस
लागलेली दिसायची. तीन बसेल होत्या त्यावेळेला. एक गोखले नगर ते डेक्कन ९०
नंबर, एक होती ती मंडईला जाणारी ५८ नंबर आणि एक होती ती पुणे स्टेशनला
जाणारी १४६ नंबर. आम्ही शक्यतोवर शेवटच्या बस स्टॉपला बसायला जायचो. लग्नानंतर रस्त्याची गाठ पडली ती आयायटीमध्ये. इथे खूपच चालणे व्हायचे.
आम्हाला भाजी घेण्यासाठी आयायटी कॅॅपस मधून बाहेरच्या वाहत्या रस्त्यावर
यायला लागायचे किराणामालाची यादी टाकायला आणि भाजी घ्यायला. तिथे एक
लक्ष्मी नावाचे उपहारगृह होते. तिथे कुल्फी चांगली मिळायची.
आयायटीचे आवारच एकूण अवाढव्य आहे. त्यातला एक रस्ता मार्केट गेट म्हणून
ओळखला जायचा. या रस्त्याने गेले आणि क्रॉस केला की थेट वाण्याचे दुकान
लागायचे आणि त्याच लायनीमध्ये थोडे चालत गेले की तिथे भाजी मिळायची. हा
रस्ता भाजी आणण्याकरता पयोगी पडायचा. विनायकचे लॅब मध्ये जाण्या
येण्याकरता खूप चालणे होत असे. नंतर आयायटी ते घाटकोपर अशी एक बस सुरू
झाली. त्या बसने मग आम्ही घाटकोपरला भाजी आणायला व वाण सामान आणण्यासाठी
जात असू. त्यावेळेला बसने जाता येता थोडा उंचसखल पणा होता. आम्ही
डोंबिवलीला जाण्यासाठी विक्रोळी स्टेशनवर रिक्षाने यायचो आणि लोकल पकडायचो.
तसेच पुण्याला जाताना एक एक्सप्रेस रेल्वे विकोरळीला थांबायची अगदी
थोड्यावेळारता असे पुसटते आठवते. आयायटीतून खाली उतरल्यावर कांजूरमार्ग आणि
विकोळी ही स्टेशने आठवतात.
अमेरिकेतील क्लेम्सन या छोट्या टुमदार
शहरामध्ये दोन रस्ते एकमेकांना छेदून जाणारे होते आणि खूप रहदारीचे होते.
त्यातला कॉलेज ऍव्हेन्युचा रस्ता होता तो खूप छान होता. या रस्त्यावरून
आम्ही दोघे चालत गेलो नाही असा एकही दिवस नाही. या रस्त्यावरून आम्ही बसने व
कारनेही गेलो आहोत पण चालत जायला हा रस्ता खूपच रमणीय आहे. एक तर या
रस्त्याच्या दोन्ही बाजूने फुटपाथ आहेत. दुसरे म्हणजे हा रस्ता उंचसखल आहे
त्यामुळे चालताना व्यायामही होते. दम लागला तर मध्ये बसायला बाकडीही आहेत.
या रस्त्याच्या फूटपाथवरून चालताना रस्त्यावरून धावणारी वाहनेही दिसतात.
चालणारी दिसतात. या रस्त्यावरून जो काही आनंद मिळायचा ना त्याचे वर्णन
शब्दात करता येणार नाही !
आमच्या अपार्टमेंटच्या बाहेर पडले की
लगेचच एक फूटपाथ चालू व्हायचा तो थेट विद्यापीठात पोहोचायचा. फूटपाथच्या
बाजूने वाहनांची वर्दळ असायची. या रस्त्यावरून चालणेही व्हायचे आणि नंतर
कार घेतल्यावर कारने जाणेही होत असे. या रस्त्यावर क्लेम्सन मध्ये फिरणारी
बसही असायची. घरातून निघताना शेंदरी व जांभळ्या एकत्रित रंगाची बस दिसली की
बाहेर येऊन स्टॉपवर उभे रहायचे मी. ती बस पुढे जाऊन एका अपार्टमेंटला वळसा
घालून यायची. हा जो वाहता रस्ता होता त्याच्या पुढच्या चौकात क्रॉस करून
गेल्यानंतर कपडे धुण्याचे दुकान होते. तिथे आम्ही दोन मोठाल्या बॅगातून
आठवड्याचे कपडे धुवून आणायचो. स्टुडियो अपार्टमेंट मध्ये धुण्याचे मशीन
नव्हते. धुण्याच्या दुकानाच्या समोर एकार्ड होते. धुणे धुवून होईस्तोवर
एकर्ड मध्ये जाऊन टाईमपास करायचो. हा जो वाहता रस्ता होता त्याच्या दुसऱ्या
बाजूला आतमध्ये एक रस्ता लांबवर जायचा त्याच्या टोकाला एक अपार्टमेंट होते
तिथे आम्ही ३ महिन्यांकरता राहिलो. घर ३ बेडरूमचे होते पण तिथे
विद्यार्थी राहत असत. आम्हाला कशीबशी यातली एक रूम ३ महिन्यांकरता मिळाली होती.
या जागेत जेव्हा रहायचो तेव्हा विनायक लॅब मध्ये सकाळी ८ ला जायचा तेर
रात्री ८ वाजता यायचा. या आतल्या रस्त्यावरून बाहेर मुख्य रस्त्याला
लागायला जवळ जवळ अर्था तास चालायला लागायचे. मग उजवीकडे वळून मोठ्या रस्ता
क्रॉस करून एकार्ड मधून मी दुधाचे कॅन वाहून घरी आणायचे. सुरवातीला जेव्हा
कार नसते तेव्हा असेच करावे लागते. एकार्डच्या बाजूला पोस्ट ऑफीस होते तिथे
मी पत्र टाकायला जायचे. काही वेळा एकर्ड मध्ये ग्रीटींग बघायला जायचे.
जेव्हा मला चर्च मध्ये नोकरी लागली तेव्हा कॉलेज ऍव्हेन्यूवरून मी सकाळी ७
ला चालत चर्च मध्ये जायचे. अर्धा तास लागायचा. थंडी मध्ये मायनस ५ अंश
सेल्सियस मध्ये चालताना खूप छान वाटायचे. सर्व काही लपेटूनच निघायचे. अगदी
हातमोजेही घालायचे. चालताना तोंड उघडले की तोंडातून वाफा यायच्या. सूर्याची
कोवळी किरणे रस्त्यावर पडलेली असायची. रस्त्यावर चालणारे कोणीच नसायचे.
फक्त मी एकटीच ! नंतर बसने व नंतर कारने या कॉलेज अव्हेन्युवर कितीतरी वेळा
जाणे झाले आहे आणि त्यामुळेच हा रस्ता जास्त स्मरणात राहिला आहे.
या खूप दूरवर आत जाणाऱ्या रस्त्यावर रात्री चालताना खूप खूप भीती वाटायची.
खूप घनदाट झाडी होती. काळाकुट्ट अंधार. रस्त्यावर एकच मिणमिणता दिवा.
काजव्यांची पानातून सळसळ असायची. जेव्हा अपार्टमेंट कॉप्लेक्सचे दिवे
दिसायचे तेव्हा हायसे वाटायचे. माझी एक मैत्रिण क्लेम्सन मध्येच दूरवरच्या
डोंगरावर राहायची. त्या रस्त्यावरून मी आठवड्यातून एकदा तिच्या घरी जायचे.
पूर्ण डोंगरावरचा हा रस्ता होता. आणि मैत्रिणीचे घर डोंगराच्या टोकाला
होते. जाताना खूप दमछाक व्हायची पण येताना तितकेच चांगले वाटायचे. कारण की
घसरण असायची. तिच्या घरी जाण्याकरता आधी बसने यायला लागायचे आणि स्टॉपवरून
वरती चढायला सुरवात असायची.
ती पण इतक्या लांब एकटी मी पण खूप लांब
घरी एकटी. आमच्या दोघींचे नवरे लॅब मध्ये १२ तास कामावर ! ती कंटाळून जायची
तिचा मुलगा आणि ती माझी खूप वाट बघायचे. मुख्य वाहत्या रस्त्याला छेदून
जाणारा अजून एक रस्ता होता. त्याच्या उजव्या बाजूला डॉलर जनरलचे दुकान
होते. तिथे मी चालत जायचे. अर्थात बाजूला फूटपाथ होतेच. या रस्त्याच्या
डाव्या बाजूने बरेच लांब गेले की बायलो दुकान लागायचे. एकदा आम्ही दोघे
अगदी सुरवातीला ग्रोसरी आणण्यासाठी इतक्या लांबवर भर रस्त्याने जीव मुठीत
धरून चालत जाऊन चालत आलो आहोत. हा एक खूप त्रासदायक अनुभव होता. अगदी
जरूरीपुरत्याच भाज्या घेतल्या होत्या. जावेच लागले
होते. उन्हाळ्याच्या
सुट्या लागल्या होत्या. बसेस शनिवार रविवार रात्री ८ वाजता होत्या.
वेळापत्रकही होते. पण बस थांबा कुठे आहे ते माहीत नव्हते. नुकतेच
क्लेम्सनला आलो होतो. मी ज्या मैत्रिणीकडे जायचे तिथे ८ दिवस राहिलो होतो
आणि कशीबशी आम्हाला एक रूम ३ महिन्यांकरता मिळाली होती. त्यामुळेच या
रस्त्याची आठवण कायम आहे.या कॉलेज ऍव्हेन्युवर रोज एकदा फिरायला म्हणून
जायला चालणे व्हायचेच. शिवाय नोकरी वर चालत जाण्यासाठी व बसने जाण्यासाठी
पण जाणे व्हायचे.
शिवाय शुक्रवारी रात्री ८ वाजता ग्रोसरी
आणण्याकरता या रस्त्याच्या बस स्टॉप वर उभे रहायचो. क्लेम्सन मध्ये सर्व
रस्ते उंच सखल त्यामुळे बसने जाताना रात्रीच्या वेळी बाहेरचा काळोख
पाहण्यात पण मजा यायची. काही वेळ अंधार तर दुकाने जवळ आली की दिव्यांचा
झगमगाट ! Rohini Gore.
क्रमश : ....
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment