Wednesday, January 09, 2019

बाजारहाट (३)

बाजारहाटचे २ भाग मी माझ्या ब्लॉगवर लिहिले आहेत. या दोन भागात मी पुणे आणि डोंबिवलीमधल्या आठवणी लिहिल्या आहेत. आयायटी पवई मधला बाजारहाट जरा वेगळा होता. आयायटीचा भला मोठा कॅपस पार करून मुख्य रस्त्याला यायला लागायचे. तो रस्ता क्रॉस केला की एक दुकान होते तिथे बऱ्याच भाज्या ठेवलेल्या असायच्या. मी आणि भैरवी एक दिवस आड १ ते २ मैल चालत जाऊन भाजी आणायचो. वसतिगृहात आम्ही सर्व मॅरीड कपल राहत असल्याने कुणाकडे फ्रीज नव्हता. ते जे दुकान होते तिथला काम करणारा एक मुलगा वसतिगृहात रात्री यायचा. त्याच्या हातात मोठमोठाल्या २ जाड्या पिशव्या असायच्या. त्यात बिस्कीटे, चिवडा, फरसाण , अंडी. ब्रेड असायचे. त्यातले काही आम्ही विकत घ्यायचो. त्या मुलाला आम्ही सर्व बायकांनी पटवले की आम्हांला रोज इतक्या लांब चालत यायला लागते तर तू आम्हाला रोजच्या रोज भाजी घेऊन येशील का? तर तो लगेचच हो म्हणाला. रात्री तो आमच्याकडून भाज्यांची यादी घेऊन जायचा आणि सकाळी १० च्या सुमारास रोजच्या रोज भाजी घेऊन यायचा. त्यामुळे आमचे चालायचे कष्टीही वाचले आणि भाजीही घरपोच येऊ लागली. बाजारहाट मध्ये आपण भाज्यांबरोबर इतरही काही सामान आणतो पण वाण्याचे सामान आणत नाही.अर्थात काही अपवाद आहेत. वाण्याची यादी म्हणजे डाळ तांदुळ, साबुदाणा, पोहे साखर, मीठ तेल, साबण इ. इ. वाण्याच्या दुकानात जाऊन सामानाची यादी द्यायची व तो दुकानदार सर्व सामान घरपोच करतो. किंवा फोनवरून यादी सांगितली तरी चालते. किंवा महिन्याची यादी सांगूनही काही सामान महिन्याच्या आधीच संपले तरीही जाता जाता वाण्याच्या दुकानात काय हवे नको ते सांगता येते. सामान घरपोच असते. भाजीपाला आपण रोजच्या रोज किंवा २ ते ३ दिवसाच्या आणू शकतो. सहज बाहेर पडले पाय मोकळे करायला की अगदी कोपऱ्यावरच्य्या भाजीवाल्याकडूनही भाजी आणता येते. कधी कधी घरासमोर असलेल्या वाण्याच्या दुकानातूनही भाजी नाहीतर आयत्या वेळेला कांदे बटाटे किंवा मोड आलेली कडधान्ये आणता येतात. पण अमेरिकेतला बाजारहाट खूपच वेगळा आहे.




अमेरिकेतला बाजारहाट मध्ये, वाण्याची यादी, त्यातही भारतीय सामानाची यादी वेगळी, भाज्या, भारतीय भाज्या उदा. तोंडली, कारली, गवार, ह्या भारतीय दुकानातच मिळतात. आणि ही भारतीय दुकाने अगदी जवळ नसतात. मोठमोठ्या शहरात असतात पण छोट्या शहरात नसतात. त्याकरता दूरदूर कार घेऊन जावे लागते. भारतीय किराणा आणि भाजी आणण्याकरता ३ तासांच्या कार ड्राईव्ह वर जावे लागते ते सुद्धा वन वे. किंवा तासाभराच्या कार ड्राईव्ह वर. सहज उपलब्ध सर्व ठिकाणी असतेच असे नाही. आमचा अमेरिकेतला बाजारहाट १७ वर्षापूर्वी टेक्साज राज्यातून सुरू झाला. आमचे पहिलेवहिले ग्रोसरी स्टोअर्स म्हणजे सॅक अँड सेव्ह. हे दुकान आम्ही राहत असलेल्या घरापासून चालत १० मिनिटाच्या अंतरावर होते. अंतरावर होते म्हणजे आम्ही असेच घर निवडले होते. या अपार्टमेंट पासून ग्रोसरी स्टोअर्स, लाँड्रोमॅट आणि युनिव्हरसिटी, सर्व ठिकाणी चालत जाता येईल.अगदी सुरवातीला डॉक्टर मर्चंड (विनू यांच्याकडे पोस्डॉक करत होता) यांनी आम्हाला कॉस्टको मध्ये नेले होते. तिथे आम्ही ऑल पर्पज फ्लोअर आणि लाँग ग्रेन राईसचे पोते घेतले होते. नंतर नंतर बरीच दुकाने माहिती झाली. १७ वर्षात तीन स्थलांतरे झाली. त्यामुळे सामान आणि भाजीपाला आणण्याकरता बरीच दुकाने माहिती झाली. त्यामध्ये वालमार्ट, सॅक अँड सेव्ह, लोएस फूड, सॅम्स क्लब, कॉस्टको, बायलो, विंडिक्सी, हॅरिस्टीटर, आणि आता इंगल्स, पूढील भागात सविस्तर वर्णन.


क्रमश : ----

No comments: