Friday, June 23, 2017

H 4 Dependent Visa (5)

पॅरालीगलचे शिक्षण प्रत्यक्ष कॉलेजमधे जाऊन घेण्याचा विचार केला तेव्हा परत गुगलशोध घेतला. आम्ही राहतो त्या शहरात कम्युनिटी कॉलेज होते. या कॉलेजचा मुख्य कँपस डाऊनटाऊनला होता. तिथे ये-जा करायला बसही सोयीची होती. नेमके त्याच वेळेला वेदर चॅनल वर कॉलेजची जाहीरात आली ती अशी की फॉल सेमेस्टरला रजिस्टर करा अमुक तारखेच्या आत. या कॉलेजचा नॉर्थ कँपस आमच्या अपार्टमेंटच्या जवळ होता. तिथे जाऊन प्रत्यक्ष कॉलेज पाहिले. हे कॉलेज आम्ही राहत असलेल्या अपार्टमेंटच्या दुसऱ्या चोकात होते पण तरीही चालण्याच्या अंतरावर नव्हते. फॉल सेमेस्टर साठी रजिस्ट्रेशन केले. माझी एक दूरवर राहणारी डॉक्टर मैत्रिण नोषवी हिने मला कॉलेजबद्दल सर्व माहीती सांगितली. मी विचारले होते त्याबद्दल तिला म्हणजे तिने पण माझ्यासारखाच शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला होता. ती पण डिपेंडंट विसावर होती.पॅरालीगलमध्ये ३ कोर्सेस होते. पहिला सर्टिफिकेट कोर्स, दुसरा डिप्लोमा आणि तिसरा डिग्री कोर्स. त्यात मी सर्टिफिकेट कोर्स करायचा ठरवला.
रजिस्ट्रेशन केल्यावर कॉलेजचे पत्र आले ते म्हणजे "तुम्ही दोन्ही प्रकारचे टॅक्सेस भरले आहेत का? आणि तुम्ही किती वर्ष या राज्यात राहत आहात? " या दोन्ही नियमांमध्ये मी बसत होते म्हणून मला इन-स्टेट फी लागू झाली, नाहीतर मला तिपट्ट फी भरावी लागली असती. कॉलेजच्या वेबसाईट वर माहीती वाचली. प्रत्येक विषयाला किती क्रेडीट आहेत ते कळाले. कॉलेजचे वेळापत्रक पाहिले. कोणत्या वर्गात बसायचे तेही पाहिले आणि माझे कॉलेज जीवन सुरू झाले. विनायक मला रोज कॉलेजला न्यायला-आणायला येत होता. आमच्या अपार्टमेंटच्या पुढच्या चौकात विनायकचे ऑफीस होते तर त्यापुढील चौकात माझे कॉलेज होते. कारने अवघी ५ मिनिटे.





ज्या दिवशी कॉलेज सुरू झाले त्यादिवशी गणपती फेस्टिवलचा पहिला दिवस होता. मी घरातल्या घरात गणपतीच्या मूर्तीची पूजा करते आणि मोदकांचा स्वयंपाक करते पण मला काहीही करता आले नाही. आईने मला एक सुपारीत कोरलेला चांदीचा गणपती दिला होता. त्याची गंध, हळद कुंकू, लावून आणि अक्षता वाहून पूजा केली. नैवेद्यासाठी वाटीमध्ये साखर ठेवली. नमस्कार केला आणि कॉलेजला गेले. पहिला दिवस छान होता. वर्गात काही तरूण तरूणी आणि काही मध्यमवयीन माझ्यासारख्या बायकाही होत्या. सर्वांच्याच हातात जाडे पुस्तक होते. तोषवीने सांगितले होते की इथे पुस्तके रेंटने घेतात. म्हणजे रेंटने पुस्तके घ्यायची आणि सेमेस्टर झाली की परत करायची. मी विचारले असता तिने सांगितले होते. कारण कि नेमलेले पुस्तक साधारण २०० डॉलर्स होते. मी तिला म्हणाले की अशी प्रत्येक विषयाची पुस्तके विकत घेतली तर दिवाळेच निघेल. तेव्हा तिने पुस्तके रेंट करतात असे सांगितले होते.




आम्ही विचार केला की आधी कॉलेजच्या लायब्ररीत पुस्तके असतील तर कशाला रेंट करायची. पण तसे नव्हते. लायब्ररीत पुस्तके नव्हती. कॉलेजमध्येही पुस्तके विकत घ्या नाहीतर रेंटने घ्या अशीच पाटी होती. तिथे जाऊन विचारले तर रेंटने घ्यायची पुस्तके पण महाग होती. कॉलेजमधून घरी आल्या आल्या ऍमेझॉनच्या साईट वर पुस्तक रेंट केले. पुस्तक घरी आल्यावर खूप धीर आला. Currin सरांनी पहिल्या दिवशी आम्हाला सर्वांना प्रिंट केलेला कागद दिला. त्यावर सर्व सिलॅबस मधले चॅप्टर, त्याच्या तारखा, त्यावर असाईनमेंटच्या आणि परीक्षेच्या तारखा असे सर्व काही होते. कारभार खूपच पद्दतशीर होता. Currin सर Clarke बाई कसे होते, त्यांची शिकवण्याची पद्दत कशी होती, असाईनमेंट आणि परीक्षा यांचा ताळमेळ कसा साधत होते ते सर्व पूढील लेखात!

2 comments:

मनोज said...

मी तुमचा ब्लॉग नियमीत वाचतो.लेख छान आहेत.फक्त एक सुचना कराविशी वाटते - ब्लॉगवरील एकूण लेखांची संख्या खूप जास्त असल्यामुळे आधीचा लेख शोधण्यासाठी खूप स्क्रोल करावे लागते. त्यामुळे ब्लॉग अर्काईव्ह विभाग अगदी सुरुवातीला, फुलांच्या फोटोच्या वर असावा असे वाटते.

rohinivinayak said...

हाय मनोज, तुम्ही माझा ब्लॉग नियमितपणे वाचत आहात हे पाहून खूप छान वाटले. उस्ताह आला. तुमच्या सूचनेनुसार बदल करीन. अनेक धन्यवाद !!