Wednesday, June 28, 2017

Dependent visa (5)

सर्टिफिकेट कोर्स मध्ये दोन कोर्सेस होते. पहिला Civil Litigation Track Certificate आणि दुसरा Real Property Track Certificate मी पहिला करायचा ठरवला. यामध्ये प्रत्येकी ६ विषय असतात आणि क्रेडिट
१८ होते. डिप्लोमा कोर्स ला १३ विषय आणि ३९ क्रेडिट होते तर डिग्री कोर्सला २५ विषय आणि ७५ क्रेडिट होते. सर्टिफिकेट कोर्सच्या विषयाला prerequisite नव्हते. डिप्लोमा मध्ये १३ पैकी दोन विषय होते ते म्हणजे गणित आणि इंग्लिश. या दोन्ही विषयाला prerequisite होते. अजून एक विषय होता तो म्हणजे Public Speaking मी जेव्हा फॉल सेमेस्टरला ऍडमिशन घेतली तेव्हा २ विषय घेतले ते म्हणजे Introduction to Paralegal studies आणि Business Law कॉलेजमधधे घेतल्या जाणाऱ्या असाईनमेंट आणि परीक्षा या दर ८ दिवसांनी असायच्या. कधी कधी दर ८ दिवसांनी परीक्षा आणि दर १५ दिवसांनी असाईनमेंट. यामध्ये १०० पैकी ७५ मार्क्स मिळाले की C grade असते. आणि ९० च्या पुढे मार्क मिळाले की A grade असते. या grades असाईनमेंट आणि परीक्षा यात मिळालेल्या मार्कांचे Average असते. डिग्री आणि डिप्लोमाला जे विषय होते ते काही जणांनी प्रत्येक सेमेस्टर ला ५ किंवा काहींनी ३ घेतले होते. मी मात्र दोनच विषय घेतले होते आणि ते पूर्णपणे A grade मध्ये यशस्वी करायचे हे माझ्या आवाक्यातले होते. अर्थात विनायकची मदत मला असाईनमेंट मध्ये खूपच झाली. तसे तर इथले
विद्यार्थी असाईनमेंट ग्रूपने करतात. मी जेव्हा कॉलेज मध्ये जायचे तेव्हा एक चक्कर मी लायब्ररीत मारायचे तेव्हा तिथे काही विद्यार्थी घोळका करून अभ्यास करताना दिसायची. त्यांच्या बाजूला पुस्तके आणि आणि नाकासमोर लॅपटॉप असायचे. लॅपटॉप गुगलींग करण्यासाठी आणि असाइन्मेंट वर्ड फाईल मध्ये टाईप करण्यासाठी. अगदी असेच चित्र आमच्या घरी पण असायचे.





विनायक कामावरून घरी आला की आम्ही दोघे Assignment करण्यासाठी बसायचो. विनायक घरी यायच्या आधी मी असाईनमेंट मधला काही भाग पूर्ण करून Word file टाईप करून ठेवलेला असायचा व काहींसाठी गुगलींग करून ठेवलेले असायचे. गुगलींग मध्ये सापडलेल्या लिंक्स मी ब्राऊज करून वाचून ठेवायचे व त्या ब्राऊज केलेल्या खिडक्या बारीक करून ठेवायचे. जेवणासाठी आणि भांडी घासण्यासाठी अधून मधून ब्रेक घ्यायचो. असाईनमेंट टाईप करून गुगल केलेल्या लिंक्स पण कॉपी पेस्ट करून द्यायच्या असतात. लिंक्स मधला काही भाग कॉपी पेस्ट केला तरी चालतो. नंतर असाईनमेंटची प्रिंट काढायची आणि ती प्राध्यापकांना द्यायची.
आम्हाला जे शिकवणारे प्राध्यापक होते ते सर्व वकील होते. Mr. Currin सरांची एक लॉ फर्म होती तर Mrs. Clarke बाई अधून मधून कोर्टात ज्युरी म्हणून जायच्या. एकादी न्युज अभ्यासा संदर्भात असली तर ती न्युज युट्युबवर बघायला सांगायच्या. विनायक मला म्हणाला " तू चांगला कोर्स निवडला आहेस. तुझ्यामुळे मलाही लॉबद्दल माहीती होत आहे. "






"टॉक टॉक टॉक" असा आवाज आला की समजावे की Clarke बाई आल्या ! खूप उंच टाचेच्या चपला, केस मोकळे, पेहराव नेहमी वन पीस, गळ्यात मोठाल्या माळा, उजव्या हातात घड्याळ, डाव्या हाताने फळ्यावर लिहीणार. १० वाजून १० मिनिटे होत आली तरी सुद्धा अजून Mr. Currin कसे आले नाहीत? आम्ही सर्वजणी माना वेळावून भिंतीवरच्या घड्याळाकडे बघतो न बघतो तोच करीन यांचा वर्गात प्रवेश! सतत हसतमुख, प्लेन शर्ट व नेहमी टाय लावणारच ! शुक्रवारी मात्र Jeans आणि टी शर्ट. दोघांची रोल कॉल घ्यायची पद्धत वेगळी आहे. Mr. currin वही उघडून प्रत्येकाचे नाव वाचणार व आम्ही " here" असे म्हणले की "where" असे म्हणून त्या विद्यार्थ्याकडे बघूनच हजेरी लावणार. मी आधी येस म्हणायचे मग हीयर असे म्हणायला लागले. Mrs Clarke बाईंनी पहिल्यांदाच रोल कॉल घेताना सगळ्यांचे चेहरे पाहून लक्षात ठेवले आणि नंतर प्रत्येक वेळी हजेरी लावताना बारीक डोळे करून पाहणार कोण कोण आलयं ? आणि मग त्यानुसार हजेरी लावणार.
Clarke बाईंची शिकवण्याची पद्धत मला आवडली. धड्यातले मुद्दे फळ्यावर लिहून नंतर प्रत्येक मुद्दा विस्ताराने सांगणार. Mr. Currin फळ्यावर एकही अक्षर लिहिणार नाही. धड्यातली २ - ४ वाक्ये वाचून दाखवणार व आमच्याकडून त्यांना चर्चा अपेक्षित असे. काही Interesting assignments परीक्षा घेण्याची पद्धत आणि एक - दोन लक्षात राहिलेल्या परीक्षा याचे सविस्तर वर्णन पुढील भागात. फॉल सेमेस्टर चांगल्या प्रकाराने ( A grade) यशस्वी झाल्यानंतर मी डिप्लोमा करण्यासाठी रजिस्टर केले.

No comments: