Thursday, October 27, 2016

रंगोत्सव

















फॉल ऋतू सुरू झाला की पानगळतीला सुरवात होते. पानगळतीच्या आधी झाडांवरची पाने त्यांचे रंग बदलायला सुरवात करतात. प्रत्येक झाडावरचे रंग वेगवेगळे ! पिवळा, लाल, तपकिरी, नारिंगी अश्या विविध रंगांमध्ये सर्व झाडे नटून जातात. पानांचे रंग बदलले की ती वाळतात व पडून जातात. झाडांच्या बुंद्याखाली पानांचा पसारा झालेला दिसतो. काही वेळेला मात्र पानांचे रंग तर बदलतात पण ते तितके आकर्षक दिसत नाहीत. पानांनी रंग बदलला आणि पाऊस पडून गेला तर पाने गळून तर पडतातच , शिवाय रंगांचा ताजेपणाही नाहीसा होतो.

हे झाडांचे रंग दिवसादिवसाला बदलत राहतात. आज आकर्षक दिसणारे झाड हवामान थोडे बदलले की फिकट दिसायला लागते. रंगांचा बहर एका विशिष्ट प्रकारच्या तापमानात येतो.  हवा थंड तर लागतेच पण खूप नाही. थोडी आर्द्रताही लागते.  हवेच्या या  विशिष्ट प्रकारच्या तापमानात रासायनिक प्रक्रिया होते आणि  रंग  बदलतात.  काही झाडांची पाने मात्र हिरवीच्या हिरवीच रहातात.

हा रंगांचा बहर इतका काही सुंदर दिसतो की अगदी बघत बसावेसे वाटते. एखादे डेरेदार झाड पूर्णपणे नारिंगी होऊन जाते तर एखादे लालचुटूक ! काही झुडुपांमध्ये सगळे रंग एकत्र आलेले असतात एखादी नवीन नवरी नटावी तसे ! काही झाडे ओळीने पिवळ्या रंगाची झालेली दिसतात. ही झाडे समोरासमोर असतील तर मंडप घातल्यासारखे द्रुष्य दिसते.  हिरव्यागार गवतावर रंगीबेरंगी पानांचा सडा तर खूपच खुलून दिसतो. फक्त पिवळ्या पानांचा सडा तर खूपच छान दिसतो. रंगांची बहार संंपून गेली की पाने पूर्णपणे सुकतात आणि गळून पडतात. झाडांवर फक्त काटक्या दिसतात.


छोटे दिवस आणि मोठाल्या रात्री सुरू होतात.  थंडीचा कडाका चांगलाच वाढतो. अमेरिकेत चार ऋतू आहेत. स्प्रिंग, समर, फॉल  आणि विंटर. त्यापैकी फॉलचे महिने आहेत सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर. डोंगराळ भागात आणि पर्वत रांगामध्ये पानगळतीचे रंग  जास्त छान दिसतात म्हणून पर्यटक रंगांची बहार पाहायला जास्त संख्येने हजेरी लावतात.

असा हा निसर्गाचा चमत्कार  मनाला खूप आनंद देवून जातो.
 

2 comments:

मन कस्तुरी रे.. said...

रोहिणी ताई,
खूपच छान फोटोग्राफी. विशेषत: पहिला फोटो. फक्त पिवळ्या रंगाचा. खूपच मस्त!
तुम्ही भाग्यवान आहात की हा रंग सोहोळा तुम्हाला प्रत्यक्ष पहायला मिळतो. वाळलेल्या, चुरचुरीत पानांवरुन चालत जाणे मला फार आवडते. एखाद्या प्रशांत, नीरव दुपारी असं पिवळ्या पानांच्या सड्यावरुन चालणं किती सुखद आणि मनोहारी असेल! दिवाळी नंतरही तुमचे सगळेच दिवस असेच सोनेरी आणि उज्ज्वल राहोत, या पाना फुलांच्या संगतीत.!


rohinivinayak said...

Thanks a lot for your lovely comment !! happy diwali !