अपार्टमेंट नंबर सी सेव्हन हे पाहताच क्षणी मला खूप आवडून गेले. एक मात्र तोटा होता की अपार्टमेंटमध्ये पाऊल ठेवताक्षणीच स्वयंपाकघर होते, पण तरीही बाकीच्या खोल्या व त्यांची रचना आम्हाला दोघांनाही आवडली. हॉल व दोन बेडरूम यांना सीलींग फॅन होते आणि ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचे होते. डोक्यावर फॅन फिरल्याशिवाय आम्हाला दोघांनाही झोप लागत नाही. थंडीमध्ये हीटर लावलेला असला तरीही डोक्यावरती फिरता पंखा हवाच हवा ! हॉलच्या दोन्ही बाजूने बाल्कन्या होत्या. हॉलच्या एका बाजूला मुख्य दार व दुसरी बाजू सरकत्या दाराची होती. ही दोन्ही दार उघडी ठेवली की हवा खेळती रहायची. खेळत्या हवेचा झुळूका जेव्हा अंगावरून जायच्या ना, तेव्हा खूप छान वाटायचे. या दोन दारांच्या मध्ये आम्ही सोफ्याच्या स्टाईलची आरामदायी खुर्ची ठेवली होती. त्या खुर्चीवर बसले की खेळती हवा अंगावर यायची. या खुर्चीवर मी मांडी घालून जेवायला बसायचे. याच खूर्चीत बसून मी फोनवरून बोलायचे. याच खुर्चीत बसून विनायक पोथी वाचायचा.
ही खूर्ची खास रेसिपींच्या फोटोसाठीही होती. त्यावर मॅट ठेवून त्यावर डीश ठेवायचे. त्यात तयार केलेला पदार्थ असायचा. शिवाय सणावारी विविध पदार्थांनी तयार केलेली ताटेही या फोटोत असायची. ही खूर्ची आमच्या कायम लक्षात राहील इतकी छान होती. जेव्हा या अपार्टमेंटमध्ये आलो तेव्हा सर्व खोल्या रिकाम्या होत्या. आमच्याकडे भारतावरून आणलेल्या ४ बॅगा, एक डेस्कटॉप व एक टिल्लू टीव्ही होता. ज्या दिवशी या अपार्टमेंटमध्ये रहायला आलो तेव्हा काहीही करावेसे वाटत नव्हते. मन पूर्णपणे क्लेम्सनमध्येच अडकलेले होते. संपूर्ण एक दिवस आम्ही आमच्या फर्निचर खरेदीसाठी घालवला. एका बेडरूम मध्ये एका टेबलावर आमचा डेस्कटॉप विराजमान झाला. त्याच्या बाजूला एक कॉटही बसली. तिथेच फोन व इंटरनेट कनेक्शनही आले ! ही खोली पुढे पुढे माझीच होऊन गेली होती.
स्वयंपाकघरात स्वयंपाक करायला जायचे व परत त्याच बेडरूम मध्ये येऊन बसायचे. १० वर्षात आमच्या दोघांचे सर्व बोलणे याच खोलीत झाले आहे. एक तर फोनवरून बोलायला तिथल्या कॉटवर बसून बोलायचो. सर्वात मुख्य म्हणजे डेस्कटॉपवरून अनेक मित्रमैत्रिणींशी बोललेलो आहोत. त्यावेळेला याहू मेसेंजर होते. मनोगत ही साईटही नवीनच होती. मनोगतावरून अनेक मराठी मित्रमैत्रिणी जमा झाले होते. याहू मेसेंजरच्या मित्रमंडळींच्या यादीत ७० ते ८० जण जमा झाले होते. मी संध्याकाळी जे काही खायला करायचे ते मनोगतावर पाककृती विभागात टंकत होते. नंतर एकेक करत मागच्या आठवणी व अनुभव लिहीत गेले. आत्तापर्यंतचे सर्व आयुष्यच लिहून काढले म्हणा ना ! माझ्या दोन ब्लॉगचा जन्मही याच अपार्टमेंट मध्ये झाला. डिजिटल कॅमेरातून रेसिपींचे आणि इतर अनेक निसर्गाचे फोटो काढायचा मुहूर्त याच अपार्टमेंटमधून झाला. नंतर आर्कुटवरच्या मैत्रीणीही याहूमध्ये ऍड झाल्या.
सकाळी उठल्यावर डेस्कटॉप ऑन केल्या केल्या याहू मेसेंजरही आपोआप उघडायचा. लगेचच खिंडक्यातून निरोप यायचे. "काय गं रोहिणी, उठलीस का? " " काका कसे आहात? " "ए रोहिणी आज अंताक्षरी आहे ते माहीत आहे ना तुला? " "आज दुपारी कॉंफर्न्स करू या का? तुला वेळ झाला की मेसेज टाक" काही ऑफ लाईन मेसेजही असायचे. आम्ही डेस्कटॉप ठेवलेल्या बेडरूम मध्ये बसून इतके काही बोलले आहोत की आम्ही
साधे बाहेर फिरायलाही कधी बाहेर पडलो नाही. आम्हाला एकटेपणा कधीच आला
नाही! याच खोलीत मला झोप येत नसेल तर मेसेंजर ऑन करून जो कोणी असेल तिच्याशी मी बोलत बसायचे.काही वेळा जे काही लिहायचे जे मनात घोळत असेल तर मध्यरात्री उठून मी वहीत लिहिलेले आहे. माझ्या आठवणीतली दिवाळी हा लेख तर मी मध्यरात्रीत उठून मनोगतावर टंकला आहे.
आमचे घर वरच्या मजल्यावर होते. दोन घरांना मिळून एक मोठी बाल्कनी होती व त्याच्या मधोमध जिना होता. दुपारचा चहा मी काहीवेळा जिन्यात बसून प्यायला आहे. बाल्कनीच्या कठड्यावर येऊन काही पक्षी बसायचे. मुसळधार पाऊस झाला की अपार्टमेंटच्या आवारात असलेले तळे तुडुंब भरायचे. ते बघायचा मोह मी कधी टाळलेला नाही. बाल्कनीत उभे राहिले की उजव्या बाजूला सूर्योदय दिसायचा तर डाव्या बाजूला सूर्यास्त! हॉलच्या दुसऱ्या बाजूला जी बाल्कनी होती त्याला लागूनच एक झाड होते. या झाडाचे फोटो मी प्रत्येक ऋतूमध्ये घेतलेले आहेत. आकाशातील बदलते रंग या झाडाच्या पार्श्वभूमीवर खूप खुलून दिसायचे त्यामुळे फोटोही छान यायचा. एका वर्षी ऐक दिवाळीच्या पहाटे आकाशात खूप छान रंग जमा झाले होते. लगेचच दिवाळीची आठवण म्हणून त्या झाडाचा फोटी घेतला. या अपार्टमेंटच्या आवारातील काही झाडांचे फोटो कायम लक्षात राहतील असे आहेत. स्प्रिंगमधले गुलाबी रंगाने डवरलेले झाड, फॉलमधले नारिंगी रंगाने डवरलेले झाड तर एक झाड बर्फाने आच्छादलेले होते. त्याच्या पर्णहीन फांद्या बर्फाच्या वजनाने झुकल्या होत्या.
क्रमश : .....
No comments:
Post a Comment