Thursday, June 04, 2015

पूर्वेपासून पश्चिमेकडे ...(5)



सॅन फ्रँन्सिस्कोचे दर्शन तर खूप छान झाले होते. उपासमार झाली तरीही दिवसभर कुठेही जास्त पळापळी न करता एकेक ठिकाण निवांतपणे बघणे झाले होते. आमचा आता या ट्रीपचा शेवटचा दिवस येऊन ठेपला होता आणि त्याकरता आम्हाला पहाटे ५ लाच उठून तयार व्हायला लागणार होते. शेवटच्या दिवशीच्या आदल्या दिवशी रात्री दमणूक झाली असली तरीही बॅगांची आवरा आवर करायलाच लागणार होती आणि ती केलीही. काहीही विसरले नाही ना, याची खात्री करत मी बेडवर आडवी झाले होते. ७ दिवसांचे फिरणे डोळ्यासमोर येत होते आणि आता आपण उद्या आपल्या घरी पोहोचणार याचाही आनंद होत होता.




भल्या पहाटे बरोबर ५ वाजता आम्ही लॉबीमध्ये आलो आणि थोड्याच वेळात बसमध्ये बसलो. योसेमिटीला खूप थंडी असणार हे माहीत असल्याने मफलर , टोपी, स्वेटर सर्व जय्यत तयारी केली होती. योसेमिटी जवळ जवळ येऊ लागले तसा उत्साह वाढत गेला. वळणावळणाच्या रस्त्यावर बाजूला उंच उंच झाडे आणि पर्वत लागत होते. सूर्य एका वळणावर दिसत होता तर दुसऱ्या वळणावर गायब होत होता. तिथे नुकतेच बर्फ पडून गेलेले दिसत होते. बस थांबली आणि आम्ही कुडकुडतच बाहेर पडलो. उंच उंच झाडे बघायला छानच वाटत होते आणि चालता चालता समोरच धबधबा दिसला. धबधबा पर्वतावरच गोठला होता. अगदी थोडे पाणी वाहत होते. तिथे फोटो काढण्यात सर्व गर्क होऊन गेले होते. धबधब्यातील वाहून खाली आलेले पाणी गोठळे होते तर मधूनच थोडे पाणी डोके वर काढत होते. अगदी थोडा खळखळ असा आवाज येत होता. धबधब्यातील गोठलेला बर्फ गरम हवेने फुटायचा आणि खाली पडायचा. असे वाटत होते की इथेच राहावे सबंध दिवस ! इथे कोणीतरी गरम गरम सामोसे आणून दिले तर किती छान होईल असेही वाटून गेले.





नंतर अजून एके ठिकाणी दरी पहायला गेलो. विस्तीर्ण पसरलेली दरी खूप छान दिसत होती. दरी आणि धबधबा पाहून आमची बस आता परतीच्या वाटेवर निघाली. जेवण्याच्या वेळी एका एशियन बफेट मध्ये जेवणासाठी आमची बस थांबली. भूक तर प्रचंड लागली होती. थकवाही जाणवत होता. नुडल्स, फळे, आणि इतर बरेच काही काही खात पोटभर जेवण झाले आणि थोडी तरतरीही आली. बसमध्ये बसल्यावर केव्हा एकदा लॉस ऍंजलिसचा विमानतळ येतोय असे होऊन गेले होते. अगदी वेळेत विमानतळावर आम्ही आलो तेव्हा रात्रीचे ११ वाजले होते. एकेक केळे आणि केक खाल्ल्ला आणि विमानात बसलो. मी तर ठरवलेच होते की विमानात बसले रे बसले की डोळे मिटून शांत पडून रहायचे . झोप लागली तर चांगलेच, नाही तर कोणताची विचार न करता शांत पडून रहायचे. कारण की आता कोणतीच घाई गडबड नव्हती. शिवाय शार्लोटपर्यंत थेट उड्डाण होते. विमानात बसल्यावर डोळे मिटले मात्र, इतकी छान झोप लागून गेली की मला शार्लोट कधी आले ते कळालेच नाही. वि म्हणाला उठ आता, तुला छान झोप लागली होती. मला तितकीशी नाही लागली झोप. तरीही मला उठवत नव्हते. शार्लोट ते विल्मिंग्टन विमानात बसल्यावर खुप हायसे वाटले.




घरी आल्यावर चहा प्यायला. गेले ८ दिवस चहा मिळालेला नव्हता. नंतर धुण्याचे कपडे वॉशिंग मशीन मध्ये धुण्याकरता गरम पाण्यात भिजत घातले. नंतर गरम गरम तिखट तिखट, खोबरे कोथिंबीर घालून पोहे केले. ते खाताना खूपच समाधान होत होते. अंघोळी पांगोळी तर आल्या आल्याच उरकल्या होत्या. जेवणासाठी काय करावे बरे? असा विचार करून खास मुगाच्या डाळीच्या खिचडीचा बेत ठरवला. मुडाखि, त्यावर साजूक तूप घेतले. शिवाय टोमॅटोची कोशिंबीर केली होती. पापडही तळले होते. लोणच्याच्या फोडीबरोबर जेवणाला छान चव येऊन गेली. आत्मा तृप्त होऊन गेला. जेवळ्यावर मात्र आम्ही दोघांनी पलंगावर अंग टाकले. वि ला गाढ झोप लागली. माझी झोप विमानात झाली असल्याने मी मात्र थोडावेळ आराम करून घरातले पसारे आवरायला सुरवात केली. कायमची स्मरणात राहील अशी खूप छान ट्रीप झाल्याने खूपच बरे वाटत होते!

 प्रवासवर्णन संपले. कसे काय वाटले वर्णन? अभिप्राय जरूर लिहा.

5 comments:

मन कस्तुरी रे.. said...

खूपच छान प्रवास वर्णन..उगीच शब्दांचा बडेजाव अथवा फार अवडंबर न करता लिहिलेले. म्हणाजे आपण नॉर्मली असेच पाहू - फिरु- वागू!
उगिच नाही नाही ती धाडसं करणे, प्रचंड महाग असलेले स्पाज, कॅसिनोज आणि इतर गोष्टी घेणे, अतिशय खर्चीक वस्तू खरेदी करणे...यापैकी तुम्ही काहीही केले नाही.
शेवटचा परिच्छेद तर एकदम मस्तच. घरी आल्याचे खास फिलींग देणारा!
सो.....कीप इट अप. !

इंद्रधनु said...

खूप छान झालंय प्रवासवर्णन , घरी बसून फिरून आले :)

rohinivinayak said...

Aambat goad aani Indradanu,, tumhala pravas varnan aavadale he vachun khup chhan vatle !! utsah aala, ! Thank you so very much !!! :)

संपदा कोल्हटकर said...

मला आवडलं प्रवासवर्णनसाधं सोपं असल्यानेच जास्त भावलं आणि सोबत प्रवास करता आला वाचताना :)
Dhanyawaad

rohinivinayak said...

thanks so much Sampada !! abhipray vachun utsah aalaa :)