Thursday, May 28, 2015
अटलांटा
अटलांटा म्हणले की आम्हाला धडकीच भरते. पहिल्यांदा खूप लांबच्या प्रवासाला निघालो तेव्हा अटलांटा ओलांडून जायचे होते. अटलांटा आले मात्र ! मोकळ्या आकाशात ढग जमा झाले आणि रपारप पावसाला सुरवात झाली. नुसता पाऊस नाही, तर त्यात भर म्हणजे गारा पडायला सुरवात झाली. कारच्या काचेवर टणाटण गारा पडत होत्या. काच फुटणार तर नाही ना ! अशी भीतीही वाटत होती. पुढचा रस्ता नीट दिसत नव्हता. ५ ते ६ लेन सूरू झाल्या होत्या. पेट्रोल संपायला आले होते. ते भरण्याकरता उजवीकडची एक्झीट घ्यावी तर सर्व लेन वाहतूक मुरंब्याने भरल्या होत्या. काही वेळाने हळुहळू करत गॅस एक्झीट घेतली आणि हायसे वाटले.
साधारण वर्षापूर्वी अटलांटाला गेलो. अटलांटामधली ५ आकर्षणे बघण्याकरता ऑनलाईन पास घेतले आणि सर्व तयारीनिशी निघालो. हवामानाचा अंदाज घेतला होता. ढगाळ वातावरण आणि त्यात पाऊसाची शक्यता १००% वर्तविणारे हवामान बघूनच निघालो होतो. पाऊस होता पण वादळ नव्हते. पावसाची शक्यता दुसऱ्या दिवशी अटलांटा मध्ये होती. निघण्याचा वाटेत पाऊस लागणार नाहीच हे माहीती होते आणि अटलांटा मध्ये पाऊस असला तरी तो सुद्धा अगदी दिवसभर पडतोच असे तर नाही होत ना ! आमच्या बाबतीत मात्र "पावसाने आम्हाला गाठले होते" असे म्हणता येईल.
कधी नव्हे ते वि ने निघताना मला आठवण करून दिली. छत्री घेतली आहेस ना? मी म्हणाले "तू आणि चक्क छत्रिची आठवण करून देतो आहेस? " वि म्हणाला हो ना ! तुझ्या जय्यत तयारीत सर्व काही बसते ना ! पाऊस आला तर छत्री, उन पडले तर टोपी, थंडी पडली तर कोट आणि मफलर ! हाहाहा , मी जोराने हसले आणि म्हणाले , उपयोग होता ना पण या जय्यत तयारीचा, कधी कुठे काही अडत नाही ! अटलांटापर्त्यंतचा प्रवास छान झाला. अधुनमधून थोडे ढगाळी वातावरण होते इतकेच ! हॉटेलवर सुखरूप पोहोचलो. पिझ्झा खायला बाहेर गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि हॉटेल रूमच्या खिडकीचा पडदा बाजूला केला मात्र ! बाहेर रपारप पाऊस पडत होता. सीएनएन, कोकाकोला शोरूम, मत्सालय पाहण्याकरता साधारण अर्धा ते एक तासाचा ड्राईव्ह असेल. कारमध्ये बसलो. अर्थातच जीपीएस सुरू केले पण तिथे काहीच दाखवत नव्हते. मार्ग दाखवण्यात अडथळे निर्माण झाले होते. आमच्याकडे गुगल मॅप होताच त्यामुळे तिथे जाण्याकरता कोणती एक्झीट घ्यायची ते माहीत होते. पाऊस इतका काही प्रचंड होता की काचेवरचे वायपर अति जलद गतीने सुरू करूनही काही नीट दिसत नव्हते. सर्व वाहने हळूहळू जात होती. जिपीएस काम करत नाहीये, पुढचे नीट काही दिसत नाहीये अश्या अवस्थेत कार हळूहळू पुढे जात होती. काही वेळाने जिपीएसने मार्ग दाखवायला सुरवात केली आणि व्यवस्थित एक्झीट घेऊन आम्ही सीएन एअ सेंटर्ला पोहोचलो.
पाऊस थांबला होता. सीएनएन सेंटरच्या इथे विशेष गर्दी नव्हती. डाऊन टाऊन होते आणि रस्ते सर्व वनवे होते. तिथले कार पार्किंग नक्की कुठे आहे ते कळत नव्हते. शेवटी एकदाचे सापडले. कार पार्क करून बाहेर पडलो तो परत पाऊस सुरू झाला. छत्री होती ती मी डोक्यावर घेतली. वि ने साधे कॉटनचे जाकीट घातले होते व त्याला लागूनच टोपी असल्याने डोके भिजत नव्हते. चालत चालत सीएनएनला पोहोचलो. छानच होते हे सेंटर. माहीती ही छान सांगत होते. नंतर त्याच आवारात आम्हाला चांगले जेवण मिळाले. "ये मुँ और मसूर की डाल" छानच मिळून गेली. तिथून बाहेर पडल्यावर बाहेरच्या सीएन एन पाटीचा फोटो घेतला. बाहेर पडलो तर पाऊस थोडा थांबला होता. कारमध्ये बसून बाहेर रस्त्याला लागलो तर परत धो धो पाऊस सुरू झाला. कोकाकोलाची शोरूम आणि मत्सालय पाहण्याकरता निघालो होतो. वनवे रस्ते भिरभिर करत पार पडले आणि पार्किंगसाठी जागा शोधू लागलो तर एक ठिकाणी ते मिळाले. पण तिथला मीटर बिघडला होता. डेबिट कार्ड काम करत नव्हते आणि बरोबर सुटे पैसेच टाका असे तिथे लिहिले होते. ५ डॉलर्स सुटे नव्हते. पर्समध्ये शोधून शोधून कसेबसे निघाले पण फक्त ३ डॉलर्स ! पाऊस होताच. छत्रीचा काहीही उपयोग होत नव्हता. वारा असल्याने छत्री अनेकदा उलटी होत होती आणि डोके भिजत होते.
विनुचा धीर सुटत चालला आणि चिडचिड वाढली. पार्किंगसाठी सुटे पैसे नाही का घ्यायचे? हीच का तुझी जय्यत तयारी. मी ५० च्या दोन नोटा घेतल्या होत्या. पार्किंगसाठी सुटे पैसे लागतील हे माझ्या डोक्यातच आले नव्हते ! वि म्हणाला चल आपण परत हॉटेल मध्ये जाऊ. मी म्हणाले, थांब ना, इतके आलो तर अजून दुसरे पार्कींग बघू. दुसरे पार्किंग मिळाले पण तिथेही बोंबाबोंबच होती. डेबित कार्ड चालत नव्हते. मी म्हणाले आता शेवटचा ट्राय करू. लांबवर एक पेट्रोल पंप आहे तिथे जाऊन बघू सुटे पैसे मिळतात का ते, नाहीतर मग जाऊ परत हॉटेलमध्ये. तिथे गेलो तर तिथले सर्व सुटे पैसे संपलेले. बरेच जण तिथे सुटे पैसे घेऊन बाहेर पडताना दिसत होते. म्हणजे फक्त आपलीच नाही तर सर्वांचीच पंचाईत झाली होती तर ! पेट्रोल पंपावरून बाहेर पडल्यावर अचानक आम्हाला मस्तालयाच्या पाट्य दिसल्या आणि तिथल्या पार्किंगमध्ये घुसलो. हे पार्किंगही आम्हाला अगदी शेवटच्या मजल्यावरचे मिळाले. तिथे एकच जागा शिल्लक होती. ती जणू काही आमच्या कारसाठी रिजर्व करून ठेवली होती असेच आम्हाला वाटून गेले. आणि लगेचच तिथे कार पार्क केली. चला. निदान कमीत कमी मत्सालय तरी पाहून होईल असा आम्हाला दोघांनाही धीर आला. मत्सालय पाहिले आणि चक्क त्याच आवारातच पलीकडे कोकची शोरून दिसली. इतके काही हायसे वाटले !
आवारात शिरताच क्षणी परत जोरदार पावसाला सुरवात झाली आणि आम्ही चिंब भिजून गेलो. छत्री कारमध्येच विसरून आलो होतो ! पावसाने साठलेल्या पाण्यात फदक फदक पाय मारत निघालो आणि उरले सुरले पायही पूर्णपणे भीजून गेले. गारठायला झाले. कोकची शोरूम आवडून गेली. तिथे सर्व देशातले कोकचे रंगीबेरंगी नमुन्यांच्या टाक्या भरलेल्या होत्या. बाजूला छोटे प्लॅस्टिकचे ग्लास होते. ते घेऊन मनसोक्त कोक प्यायलो. कितीही प्या असे म्हणल्यावर काय विचारता ! तिथे बरीच गर्दी जमा झाली होती आणि सर्वजण कोकचा मनमुराद आनंद लूटत होते. आम्हाला दोघांनाही पेप्सीपेक्षा कोक खूपच आवडतो. कोक पिऊन पिऊन पोट टम्म फुगले होते ! तिथून निघताना डॉलफिनचा शो पाहिला. खूपच सुंदर शो होता ! तिथून बाहेर पडलो तर जवळजवळ अंधार पडतच आला होता. आणि एकापाठोपाठ एक कार जात होत्या. रस्त्याला लागतो न लागतोच परत धो धो पावसाला सुरवात ! असे काय चाललय काय? कहर केलाय या पावसाने. संपूर्ण दिवस पाऊसच पाऊस ! म्हणून म्हणले ना की पावसाने चक्क्क आम्हाला गाठले होते ! दिवसभर पावसात ओलेचिंब भिजून अंगावरच कपडे वाळायला सुरवात झाली होती तर परत पाऊस. अर्थात आता आम्ही कारमध्ये बसलो होतो !
बाहेर हायवे वर ही तोबा गर्दी. हायवे वर मर्ज व्हायला आणि रपारप पावसाची परत एकदा सुरवात. मर्ज झालो आणि परत आमची एक्झीट आली असे वाटले, पण ती आमची नव्हती. जिपीएस परत चालेनासे झाले. जी एक्झीट दिसली ती दुसऱ्याच कोणत्यातरी हायवेला जाणार होती आणि आम्हाला एक्झीट ओन्ली लेन सोडून दुसऱ्या हायवे ला लागायचे होते. पण तिथे जाताच येईना. अतिजलत वायपर असूनही नीट पुढचा आणि मागचा रस्ता दिसेना. डोळे फाडून रस्ता पाहावा तर येणारी वाहने भराभर पुढे निघून जात होती. वाहने वेगात होती. मी वि ला म्हणले की तू कारचा वेग अतिमंद कर आणि सिग्नल दे. मी तुला मागे वळून पाहून सांगते कधी घुसायचे ते. पटकन कसेबसे घुसलो आणि एक दीर्घ निः श्वास टाकला. माझा तर घसाच कोरडा पडला होता. एरवी ही एक्झीट चुकली असती तर काही बिघडले नसते. परत लांब लांब जाऊन येता आले असते. पण गर्दीच इतकी काही होती की चुकीच्या एक्झीटा जाऊन परवडण्यासारखे नव्हते. जोराचा पाऊस, अंधार पडलेला आणि हायवे वर गर्दी असे चित्र आम्ही यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. शेवटी एकदाचे हॉटेलवर येऊन पडलो. कारमधून बाहेर पडताना सुद्धा छत्री लागत होती इतका पाऊस होता.
हॉटेल रूमवर येऊन पडलो. पाय आणि डोके प्रचंड दुखत होते. दिवसभर भिजलेले कपडे बदलले. मी तर गरम पाण्यात पाय सोडून थोडावेळ बसले होते. कपडे बदलल्यावर जरा बरे वाटले. जेवणासाठी बाहेर पडायच खूप कंटाळा आला होता पण जावे तर लागणारच होते. प्रचंड भूक लागली होती. नशिबाने पाऊस बराच कमी झाला होता. झिमझिमत होता. आदल्यादिवशी आलो तेव्हा रात्री पिझ्झा खाल्ल्ला होता म्हणून मेक्सिकन उपहारगृहात गेलो तर ते फास्टफूड असल्याने व्हेज काही मिळाले नाही. तिथून बाहेर पडलो तर दूरवर एक टाको बेल ची पाटी दिसली. नशीब कि त्याच रस्त्यावर लेन न बदलता होती आणि तिथे एकूणच रस्त्यावर तुरळक वाहतूक होती. टाको बेल मध्ये निवांतपणे बसून जेवण केले. सेव्हन लेअर बरिटोला छान चव लागत होती. निदान या दिवशीची सांगता तरी चांगली झाली होती. शिवाय दुपारची मसूराची डाळ आणि सँडविच पण चांगले होते. हॉटेल मध्ये परतल्यावर छान झोप लागली.
दुसऱ्या दिवशी चेक आऊत केले व फर्नबँक म्युझिअम आणि प्राणी संग्रहालय बघायला गेलो. दुसऱ्या दिवशी हवा ढगाळ होती पण पाऊस अजिबात नव्हता. त्यामुळे खूप बरे वाटत होते. जिपीएसने पण चांगली साथ दिली. तिथे दुपारच्या जेवणाला व्हेज पिझ्झाही छान मिळून गेला.
अटलांटामधली ५ आकर्षणे बघून आम्ही परतीच्या वाटेला लागलो. लांब पल्ल्याचा प्रवास आणि निघायलाही ३ वाजले होते त्यामुळे घरी परतायला चांगलाच उशीर झाला होता. एक वेगळाच अनुभव गाठीशी जमा झाला होता !!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment