कौनसी सब्जी बना रहे है आप? माधवीने विचारले. एगप्लॉंंट असे उच्चारल्यावर
ती नि मी दोघीही हसायला लागलो. मला माधवी १४ वर्षानंतर फेबुवर सापडली. खूप
बोललो आणि बऱ्याच आठवणी निघाल्या की ज्या विसरणे शक्य नाही. आम्ही दोघींनी
मिळून घालवलेला वेळ खूप सुंदर होता. डेंटन टेक्साज मध्ये तिची नि माझी ओळख
झाली. आमच्यातला एक कॉमन फक्टर म्हणजे आम्हाला दोघीनाही बोलायला हवे असते
आणि ते सुद्धा रोजच्या रोज आणि म्हणूनच ती मला म्हणायची अगर आप नही होते तो
मेरा क्या हो जाता था ! आणि मी पण तिला हेच म्हणायचे. आमचे दोघींचे संभाषण
हिंदीतून व्हायचे. ती तेलगू आहे. ती भारतात आहे तरीही फोन केल्यावर
मागच्या पानावरून पुढे असे आमचे संभाषण चालू होते. मध्ये इतक्या वर्षांची गॅप गेली आहे हे जाणवतही नाही.
युनिव्हरसिटीची लायब्ररी, तिथले पोस्ट ऑफीस, सॅक अँड सेव्ह, जॉब हंटिंग,
मॉल्स आणि फोटोज काढणे अशा एकेक करून वर्षभरातल्या इतक्या काही आठवणी आहेत
की त्या अजूनही आठवतात. डेंटनमध्ये लोकल कॉल्स फुकट होते ते म्हणजे लँड
लाईनवर म्हणून आम्ही दोघीही केव्हाही आणि कधीही एकमेकींना फोन करायचो.
अर्थात हा लँडलाईनचा जमाना खूपच मागे पडला आहे. पण त्यावेळी लँडलाईनचे
महत्त्व आणि ते सुद्धा अमेरिकेत लोकल कॉल्स फ्री असतात आणि ते किती उपयुक्त
असतात आणि त्याचा किती आधार असतो हे ज्याचे त्यालाच माहीत. आणि ज्यांना
बोलण्याची आवड आहे त्यांना अमेरिकेत आल्यावर कुणीही बोलायला नाही आणि त्यात
भर म्हणजे इथली भयाण शांतता ज्यांनी अनुभवली आहे त्यांनाच या लँडलाईनवरून
बोलण्याची मजा कळेल.
एगप्लाँट म्हणल्यावर ती नि मी हसायला लागलो आणि आम्हाला हसू आवरेना.
ठराविक भाज्याच इथल्या अमेरिकन टोअर्समधे मिळतात. इंडियन स्टोअर्स मध्ये
बाकीच्या खास भारतीय भाज्या म्हणजे तोंडली, कार्ली, गवार या भाज्या मिळतात
आणि हे स्टोअर खूप लांब म्हणजे कमीतकमी तासाभराच्या अंतरावर असते आणि तिथे
जायचे म्हणजे कार हवी आणि कार असली तरी नुसत्या भाज्या आणण्याकरता इतक्या
लांबवर वरचेवर जाणे होत नाही. कॅप्सिकम, एगप्लाँट, कॅबेज अशा ठराविक भाज्या
मिळतात म्हणल्यावर त्याच त्याच
भाज्या बघून आम्हाला दोघींना खूप बोअर झाले होते त्यावेळेला आणि जेव्हा
आम्ही फोन करायचो तेव्हा एकमेकींना विचारायचो कोनसी सब्जी है
आज? "वोही बोअर" असे म्हणायचो आणि हासायला लागायचो. अगदी तसेच हासणे आज झाले
आणि मन भूतकाळात गेले. तिला सांगितले मी की मी डेंटनच्या दिवसांबद्दल
लिहायला घेतले आहे पण आता वेळ होत नाही म्हणून लिखाण मागे पडले आहे.
सॅक
अँड सेव्ह हे अमेरिकेत पाहिलेले पहिले स्टोअर म्हणून याबद्दल जरा जास्तच
आपुलकी आहे. तिचे घर या दुकानापासून लांब होते आणि आमच्या घरापासून खूप जवळ
त्यामुळे मी सॅक अँड सेव्हला बरेच वेळा जायचे. सॅक अँड सेव्हच्या बाजूला एक बांगला देशी दुकान होते. एके दिवशी तिथे पॉकेट
ट्रान्सिस्टरचा सेल होता. ९९ सेंट ! तो माधवीला हवा होता आणि तिचे घर खूप
लांब होते म्हणून तिने मला तो रांग लावून घ्यायला सांगितला होता. मी सकाळी
७ ला तिथे गेले आणि तो घेतला. ती माझ्या घरी तो न्यायला आली तर मी
तिच्याकडून पैसे घेतले नाहीत. तिला म्हणाले हा माझ्याकडून तुला भेट ! तिला
खूप आनंद झाला. ही गोष्ट मी पूर्णपणे विसरून गेले होते. माधवीने याबद्दल मला फोनवरून सांगितल्यावर मला खूप आनंद झाला. अजूनही तो ट्राँझिस्टर तिने जपून ठेवला आहे ! डेंटन मधल्या आठवणी एकेक करून
सविस्तर लिहीनच वेळ मिळेल तसा पण तूर्तास इतकेच. कारण की मी माज माधवीला
फोन केल्यावर बोलले आणि मला राहवेना. मनातले उतरवले.
Thursday, March 19, 2015
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment