Friday, July 11, 2014

फोटोंच्या आठवणी ... (२)

आमच्या अपार्टमेंटच्या आवारात काही झाडे , तर काही फुलझाडे आहेत. त्यात गुलाबाची रोपटी पण आहेत. वसंत ऋतूमध्ये गुलाबाच्या रोपट्यांना खूप बहार येते. सर्वात आधी ही रोपटे जेव्हा लावली होती आणि जेव्हा पहिला बहर आला होता तेव्हा मी गुलाबाचे खूप फोटो घेतले होते. फोटो किती घेऊ न किती नाही असे झाले होते. त्यात सुंदर सुंदर कळ्याही होत्या. नंतर एकदा असाच खूप बहर आला होता तेव्हा तर पाऊस पडलेला होता आणि सर्व फुले पावसात ओलीचिंब भिजली होती. खूपच सुंदर दिसत होती. त्याचेही बरेच फोटोज घेतले होते. या सर्व फुलांमध्ये या फुलाचा फोटो आहे तो माझ्या मनात भरलेला आहे. या फुलाचा फोटो घेतला. नुसता फोटो चांगला दिसत होता पण तरीही तो इतका छान दिसत नव्हता. म्हणून मी या फुलाच्या फोटोची दिशा बदलली आणि हेच फूल इतके काही सुंदर दिसायला लागले की मनात भरले.  जेव्हा फेसबुकावर आले तेव्हा हे फूल मी फेसबुकावर प्रोफाईल फोटो म्हणून लावले. फेसबुकावर या फुलाचा फोटो बरेच दिवस होता. या फोटोकडे बघितले की खूप प्रसन्न वाटते आणि उत्साह येतो.




हे जे लव्हेंडर रंगाचे फूल दिसत आहे ते कर्दळीचे आहे. आमच्या घराच्या गॅलरीत उभे राहिले आणि खाली बघितले की हे कर्दळीचे झाड दिसते. ही वेगळीच आहे कर्दळ. याची पाने गोलाकार आहेत आणि याला जेव्हा खूप भर येतो तेव्हा ही पाने एकाला एक लागून खूपच येतात आणि झुबकेदार दिसतात. या पानांवर पावसाचे थेंब तर खूपच उठून दिसतात. या पानांचे फोटो तर घेतलेच पण या कर्दळीची जी फुले आहेत ना, ती तर खूपच नाजूक आहेत. याचा लव्हेंडर रंग खूपच फिकट आहे. पानांसोबत ही फुलेही खूप छान दिसतात. ही कर्दळ बहरते. काही वेळा खूप सुकते. तर काही वेळा याची पाने करपून जातात. पिवळी लाल होतात. ही कर्दळ अगदी जमीनदोस्त झालेली मी पाहिली आहेत. ही जी फुले आहेत त्यांचे फोटोज मी ५ ते ६ वेळा घेतले आहेत. पण प्रत्यक्षात दिसतात तशी ही फुले फोटोत उतरत नाहीत. पण एकदा ती उतरली. तरीही फोटोपेक्षाही प्रत्यक्षात ही फुले खूपच सुंदर दिसतात.  




या फोटोची आठवण तर मनाला स्पर्शून जाणारी आहे. त्या दिवशी मी तळ्यावर दुपारी चक्कर मारायला गेले होते आणि अचानक ही छोटी पिले आणि त्यांची आई मला दिसली. वातावरण ढगाळ होते. हलके वारे सुटले होते. आणि या वाऱ्यात हिरवळीवर बसावेसे वाटत होते. सोबत कॅमेरा होताच. ही पिले झोपली होती आणि त्यांची आई बाजूलाच तिचे पंख साफ करत होती. मी त्या पिलांच्या खूप जवळ बसले होते तरीही ती पिले तिथून अजिबात हलली नाहीत की त्यांच्या आईने गोंगाट केला नाही. त्या बदकांना आणि पिलाना माझी खूप सवय झाली होती. मी हे दृश्य डोळे भरून पाहत होते. नंतर त्याची एक विडिओ क्लिप पण घेतली. ती बदकीण तिचे पंख साफ करत असताना एका बदकीणीने तिला हुसकावून लावले आणि त्या त्या दोघी बदकीणी पाण्यात उतरून लांबवर गेल्या. त्यांची थोडी भांडणे झाली असावीत. या गोंधळात ती पिले कावरीबावरी झाली आणि आईला बघायला लागली. आई दिसेना तरी ती घाबरली नाहीत. तशीच परत एकमेकांना चिकटून पेंगत होती. काही सेकंदातच त्या पिलांची आई आली. मला या गोष्टीचे नवल वाटते कि त्या बदकीणीचा माझ्यावर किती विश्वास होता ते ! कारण की मी बघितले आहे की नवीन पिले झाली की बदकीणी खूप सावध असतात. त्यांच्या पिलांच्या जवळ त्या कोणालाही फिरकू देत नाहीत.

क्रमशः ...


No comments: