Monday, June 09, 2014
९ जून २०१४
आज पहाटे सुमारे ६ च्या दरम्यान सूर्योदयाच्या वेळी जाग आली. सूर्योदय पाहिला आणि परत झोपले. ढगाळलेले वातावरण व अगदी पुण्यासारखा रिमझिमणारा पाऊस आहे आज. दुलईतून उठावेसे वाटत नाहीये. असे वाटत आहे की असेच झोपून राहावे. आजचे ढगाळी व पावसाचे वातावरण थेट पुण्याची आठवण करून देणारे आहे आणि फीलही तसेच आहे.
"पूर्वी पहाटे ६ पासून पुणे स्टेशनवर रेडिओवर लागणारी गाणी, पाऊस, आणि शाळा कॉलेजला जायला उठायचे आहे पण उठवत नाहीये. गाणी ऐकत असेच झोपुन् राहावेसे वाटत आहे." एक गाणे आठवले ते लागायचे पूर्वी. युट्युबवर शोधले आणि सापडले. गाण्याचे बोल आहेत "देव माझा विठू सावळा"
हे गाणे ऐकले आणि मन व्याकूळ झाले. आईबाबांचे पूर्वीचे घर आठवले. आजचे वातावरण की जे ढगाळ होते आणि पाऊस पडत होता. मला हे गाणे कसे काय एकदम आठवले ते कळतच नाहीये. म्हणजे असे की ते पूर्वी कधी पाहिले, किंवा काही काही गाणी कशी आपण परत परत ऐकत राहतो, किंवा काही वेळेला फक्त मराठी गाणी ऐकाचाच मूड येतो. यापैकी काहीच झाले नव्हते. आजचा सगळा दिवस खूपच कंटाळवाणा गेला. एक तर कालच्या साफसफाईने आणि आधीच्या आठवड्यात जरा चालणे नेहमीपेक्षा खूप जास्त झाल्याने दमायला झालेच होते आणि त्यात भर म्हणजे ही हवा. आज काहीही केले नाही. पडून राहिले. जेवायच्या वेळेला कणिक भिजलेली होती. पटकन होणारी भेंडीची भाजी केली. दुपारी पण भूक लागली नाही. नाहीतर काहीतरी चमचमीत गरमागरम खायला करते. काल रात्रीचे थोडे भाजणीचे थालिपीठ उरले होते तेच खाल्ले. रात्रीचे जेवायला पण काही वेगळे असे केले नाही. दुपारचीच पोळी भाजी खाल्ली.
जरा काही अगदीच वेगळे म्हणजे एका म्युझिक ग्रुप मध्ये रोज थीमा बदलतात त्यात आजची थीम होती गीतकार साहिर यांची रोमॅटीक गाणी. त्यामुळे माझे नेहमीचे आवडते गाणी निगाहे मिलाने को जी चाहता है टाकले. शिवाय एका ब्लॉग वर जरा वेगळे वाचायला मिळाले. ते वाचूनही छान वाटले. पण नेहमी कसा अगदी उत्साह असतो, आठवणी येतात, गाणी ऐकली तर त्यातले एखादे गाणे दिवसभर रेंगाळत राहते तसे काहीच झाले नाही. डोळ्यावर सतत झापड आहे. सारखी झोप येत होती आज पण झोप लागत नव्हती. आषाढासारखे डल्ल्ल वातावरण भरून राहिले होते आज दिवसभर. कालचा दिवस मात्र निरानिपटी कामाचा गेला आणि त्यामानाने काल बऱ्यापैकी उत्साह होता.
या दिवसाचे कंटाळवाणे रूप लिहावे म्हणून रोजनिशी लिहिली इतकेच.
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 comments:
aga ithe tar pahate 5 la ch ujed padayla suru zala ahe. mhanje mag suryoday 4 45 la ch hot asava. mala hi billkul duparche jevan gele nahi. work from home kele. kharab havemule ghasa pan dukhat ahe. sakali garawa asato so pangharunatun uthavese watle nahi khare
Pallai
tikde pan asech vatavaran ka :) kalji ghe ga, khup divsat aaple bolne jhale nahi, phone kar.
kahi vicharu nakos 2 divas zopun hote. ghasa dukhat hota, sardi hi khup zali hoti. saral sick day takle. padu ajari mauj hi ch wate bhari ;) aj ata bare ahe. work from home karavat nahiye khara tar pan salag 3 ra divas sutti takavat nahiye. phone ghasa bara jhalyawar karen. madhe jamla tar chat karu. fb var kadhi yeshil tu online? CST sang
ho chalel,, tu rest ghe aadhi, purNa bari ho,, nantar bolu aapan,
Post a Comment