Sunday, April 20, 2014

२० एप्रिल २०१४

आजची रोजनिशी लिहायची म्हणजे मला तीन दिवसाची भर घालायला लागेल. गेले तीन ते चार दिवस झाले इथे पाऊस एके पाऊस, पाऊस दुणे पाऊस आणि पाऊस त्रिक पाऊसच पडत आहे. हाहा. सूर्याने ढगांचा घुंघट ओढून घेतला आहे. तो म्हणतोय नाही दाखवणार मुखडा जा! काय करायचे ते करा. काळेनिळे ढग आकाशात अजूनही खूप भरून राहिले आहेत. भरपूर प्रचंड आणि बोचरा वारा आहे त्यामुळे घरी बसून भजन करणे हाच एक उद्योग लाँग विकेंडचा होऊन बसला आहे. अर्थात असे वातावरणही पथ्यावर पडले आहे घरीच बसून विश्रांती घ्यायला कारण की या हवेमुळेच ठणठण डोके दुखत आहे. सर्दी खोकला आणि सोबत अंगदुखीही आहे. त्यात विनायकला पोलनचाही त्रास होतोय. पण या हवेत सुद्धा त्यातल्या त्यात वेगळेपणा करायचा असे ठरवले त्यामुळे दिवस तसे बरे गेले म्हणायला हरकत नाही. शुक्रवारची सुट्टी असली तरी विनायकला कामावर जायचे होते म्हणजे ठराविक वेळेत नाही. आपल्या सोयीनुसार जाऊन यायचे. आम्ही अजूनपर्यंत चायनीज उपहारगृहाला भेट दिली नाहीये. तर ठरवले जाऊ. गुगलिंग केले आणि मेनू मध्ये बघितले तर काही शाकाहारी डिशेस होत्या. पण आमचा पोपट झाला. गेलो तर तिथे फक्त एकच डिश होती आणि वेबसाईटवर तर चार ते पाच शाकाहारी डिशेस दिसत होत्या. त्यामुळे उठलो आणि बाहेर पडलो आणि नेहमीप्रमाणे मेक्सिकन उपहाराकडे धाव घेतली आणि रात्री वन डिश डिनर म्हणजे भाजणीचे थालिपीठ केले.



तब्येत जास्त ठीक नसल्याने शनिवारचा बेत होता ईडली आणि सांबार. घरी बसून बसून खूपच कंटाळा आला होता. पाऊस पडत असल्याने बाहेर चालणे तर शक्यच नव्हते म्हणून मग ठरवले की दुपारचा चहा प्यायल्यावर निदान मॉलमध्ये तरी फेरफटका मारू. मला काही खरेदी करायचे होते तेही नव्यानेच म्हणजे लाँग स्कर्ट आणि टॉप खरेदी करण्यासाठी मॉल मध्ये हिंडायचे ठरवले. आधी बघू आणि नंतर कसे ते ठरवू. कारण की इथे कपडे शोधणे हाच एक मोठा कार्यक्रम असतो कारण की इथे राहणाऱ्या बायका लांबी, रुंदी आणि उंचीनेही चांगल्या भरभक्कम असतात. विनायक म्हणाला की तु मॉलमध्ये फिर तोवर मी लॅबमध्ये काम करून तुला घ्यायला येतो. मग मी दोन तास एक दोन दुकाने हिंडले आणि सीअर्स मध्ये माझ्यामनासारखे स्कर्ट पाहिले आणि ते आवडले. अर्थात घेतले नाहीत. मग चालून मला दमायलही झाले आणि थोडी भूक लागली तर मग मी स्मुदी प्यायली.  पाऊस वारा अगदी थोड्या वेळेकरता विश्रांती म्हणून थांबत होता.   परत जोर लावून पडायला सुरवात याची !  घरी येऊन मग परत वन डिश डिनर उसळ केली . डिनर झाले. म्हणजे २ दिवस भांडी कमी पडली. आज जरा दोघांच्याही तब्येती बऱ्या आहेत. आज सकाळी घराची साफसफाई आणि हेअर कलर केला आणि डोक्यावरून अंघोळ केली. आजकाल ना अंघोळीचे पण एक काम वाटते. अंजलीचे आणि माझे याबाबतीत अगदी एकमत आहे.


आजचे लंच परत मेक्सिकन उपहारगृहात. हे नवीन उघडले आहे. तिथे निराशा होता होता वाचली. कारण की तिथे शाकाहारी डिश एकही नव्हती. तिथले लोक म्हणाले आम्ही तुम्हाला पाहिजे तशी शाकाहारी डिश बनवून देतो. आणि ती एकदम छान बनवली होती. नेहमीपेक्षा जरा वेगळ्या भाज्याही घातल्या होत्या. त्यामुळे छान वाटले. एका चायनीज दुकानात गेलो. तिथे काही काही इंडियन ग्रोसरी ठेवली असते. काही घ्यायचे होते पण तिथे ते नव्हते. काल पाहिलेले स्कर्ट  व टॉप परत मॉलला गेलो तर आज मॉल ईस्टर संडे मुळे बंद.  लक्षातच आले नाही. खूप दुकाने आणि उपहागृहे पण बंद होती. 


आज आता संध्याकाळी मी चुरमुऱ्यांचे भडंग करून खात आहे. सोबत चहाही आहे आणि एकीकडे रोजनिशी लिहीत आहे.    आणि कालच्या उरलेल्या ईडली पीठाचे उत्तपे करून झोपणार. एकूणच यावेळचा लाँग विकेंड खूपच वेगळा गेला. पाऊस , वारे, आणि सूर्यप्रकाश नाही यामुळे चांगलाच वैताग आलेला आहेॅ. आणि तब्येतही तशी बेताचीच आहे.  आता उद्यापासून सूर्यप्रकाश आहे त्यामुळे थोडातरी उत्साह येईल असे वाटते.

6 comments:

Anonymous said...

रोहिणी ताई,
आता बरी आहे का तब्येत? तुमचे हे वन डिश डिनर तुमच्या पतीराजांना चालते म्हणून बरंय नाहीतर आम्हाला तर सगळे करायलाच लागते. कितीही कंटाळा आला तरी......! आणि मला अजिबात न आवडणारे काम म्हणजे दुस‍याच्या उष्ट्या कपबश्या विसळणे..तेही करायला लागते.
स्क्र्ट्स नक्की घ्या व फोटो टाका....लॊंग स्क्र्ट्स मलाही खूप आव्डतात...मी घालत नसले तरी..पहायला! :-)
- विद्या

rohinivinayak said...

विद्या, तुझा सविस्तर अभिप्राय आवडला. :)) अगं मी पण पहिल्यांदाच स्कर्टची ट्रायल घेणार आहे. आम्हाला दोघांनाही पूर्ण जेवण आवडते. पण हल्ली आम्ही भात सोडून दिला आहे त्यामुळे फक्त पोळी भाजी आणि कोशिंबीर. माझ्या नवऱ्याला चालतात अशा वन डिश वेगळेपणा म्हणून. लाँग वीकेंडचे काहीतरी वेगळे म्हणून. नाहीतर मग तेच तेच कंटाळा येतो आणि मुख्य म्हणजे भांडी कमी पडतात ना ! असेच वाचत राहा आणि अभिप्राय पण लिही. छान वाटते. अगदी भेटल्यासारखेच वाटते ! अनेक धन्यवाद विद्या !

Anonymous said...

रोहिणी ताई,

:-). स्कर्ट शब्द लिहायला चुकल्याबद्दल सॉरी!
भांडी कमी पडण्यासाठी विविध क्लॄप्त्या लढवाव्या लागतात....इथे पुण्यात बाई असल्याने आम्हाला हा अनुभव कमी पडतो ना! - भेटत राहू तुमच्या लेखनातून!....
विद्या

rohinivinayak said...

kahi harkat nahi ga, mazyahi lekhanat baryach chuka astat, nantar tya durustta karnyasathi kantala yeto, :) tu punyachi ka? mastach, nakkich bhetat rahu !

Anonymous said...

तुमचा लेख आवडला.
अमेरिकेत भांडी घासणे, तसेच स्वयंपाकात मदत, पोळ्यांना बाई असल्या सुविधा नसल्यामुळे काही वेळा स्वयंपाकाचा खरंच कंटाळा येतो.
अशावेळी वन डिश मिल आणि भांडी कमी घासायला टाकणे महत्त्वाचे असते- मलाही असंच वाटतं.

rohinivinayak said...

agadi khare aahe,, aani aata ekunach bhandi aani kontich kame hoat nahit. pratisadabaddal anek dhanyawaad ! :)