Friday, May 03, 2013

३ मे २०१३

गेल्या आठवड्यापासून सकाळी उठल्यावर दार उघडून पाहावे तर पावसाळी हवा आणि कमी जास्त जोराचा पाऊस असतो. मान्सूनचा पाऊस वाटतोय इतका रोजच्या रोज पडतोय, पुढच्या आठवड्यातही आहेच. मधूनच एखादी उन्हाची तिरीप येते आणि निघून जाते. अर्थात पाऊस मला आवडतोच पण तरीही स्वच्छ सूर्यप्रकाश पडला की जास्त हुरूप येतो हेही तितकेच खरे!







आज सकाळी विविधभारतीवर एका कार्यक्रमात नर्गीसची गाणी लागली होती तर छायागीतमध्ये स्वप्नांवर आधारीत गाणी होती. त्यातली काही पहिल्यांदाच ऐकली. आता माझे वेळापत्रक पूर्णपणे बदलले आहे. ग्रंथालयात जात नाही. आता आठवड्यातून दोनदा शॉपिंग मॉल व वॉल मार्टला जायचे ठरवले आहे. आज कंटाळा आला होता आणि पायही दुखत होते तरीही गेले. गेले म्हणजे पाउले घराबाहेर पडायलाच मुहूर्त साधायला लागतो. एकदा का ती बाहेर पडली की आपोआप जाणे होते आणि मग उत्साह येतो. इथल्या बसेस म्हणजे काय नुसत्या गोल गोल फिरणाऱ्याच असतात. आणि त्यातूनही काही लिंका असतात. म्हणजे एका थांब्यापासून दुसरी बस पकडायची त्यात मध्ये अर्धा नाहीतर एक तास बाकड्यावर वाट बघत बसायला लागते.





अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर गणेश खिंडीमधून निघून जर डेक्कन जिमखान्याला जायचे असेल तर आधी शनिपाराला जावे लागते आणि मग तिथून दुसरी बस पकडून डेक्कनला यावे लागते. किंवा जर एकच बस गोल गोल फिरणारी असेल तर गणेश खिंडीत बसमध्ये बसायचे आणि मग ती बस आधी शनिपाराला जाऊन मग डेक्कनला येणार आणि मग परत गणेश खिंड आणि मग अशीच गोल गोल फिरत राहणार. पण आपल्याला काय बाहेर पडून वेळ घालवायचा आहे मग कशा का जात ना बसेस !





एका बसमधून उतरून अर्ध्या तासाने येणारी दुसरी बस थांब्यावर आली. सगळे जण एकेक करत चढत होते. त्यात एक चढणारी महिला होती. तिचे वजन इतके होते की तिचे तिलाच पेलवत नव्हते. डाव्या कडेवर एक मूल होते. एक मूल चालणारे होते. त्याच्या पाठी एक बॅकपॅक व शिवाय हातात एक छोटी बॅग. ती छोटी असली तरी त्या मुलीला ती जडच होती. त्या बाईच्या डाव्या कडेवर मूल आणि उजव्या हातात स्ट्रोलर आणि गंमत म्हणजे ती एकीकडे फोनवर बोलतही होती. उजव्या कानाजवळ फोन आणि तो तिने खांद्याचा आधार देवून धरला होता. ते सर्व पाहून मला खूप म्हणजे खूपच हसू येत होते. मुले खूपच शांत होती याचे कारण त्या दोघांच्या हातात लालीपॉप होते. चालणारी मुलगी होती ती बसमध्ये चढली व सीटवर बसली. ती दोघे मुले लालीपॉप खाण्यामध्ये इतकी काही गुंगली होती ते पाहून मस्त वाटत होते. बाईचे एकीकडे फोनवर बोलणे चालूच होते.

दुकानात खरेदी अशी काही केलीच नाही. चालून चालून भूक लागली. इथे स्टोअर्स इतकी काही मोठी असतात की चालून पाय दुखायला लागतात.  जे काही खरेदी करायचे योजले होते ते आता मॉलमध्ये जाऊनही बघेन आणि मग घेईन असे म्हणत्ये. आजचा रात्रीचा जेवणाचा बेत गुंडाळला. फक्त तिखटमीठाचा शिरा केला. चिप्स खाऊन पोट भरले होते. आजचा दिवस चांगला गेला.

No comments: