मला काही वेळा खूप मागचे आठवते. माझे माहेर पूरग्रस्त चाळीत होते गोखले नगरला. आम्हाला जी भाड्याची जागा मिळाली होती ती कडेला आणि त्यासोबत थोडी जमीन होती. पुढचे मागचे अंगण होते. पुढचे मागचे अंगण तर सर्व भाडेकरूंना होते. जाईचा वेल होता. फुलांची आणि फळांची लयलूट होती. जाईने तर अगणित हा शब्द पण कमी पडेल इतकी फुले दिली. एकही दिवस असा गेला नसेल की आम्ही केसात फुले माळली नाहीत. घराच्या कडेला जी जागा होती त्यात सर्व फुले होती. गुलाब, अबोली, कोऱ्हांटी, चिनी गुलाब, मोगरा, हजारी मोगरा, अळू, टोमॅटो, वांगी अशा भाज्या. पेरूच्या झाडाने अनेकाअनेक पेरू दिले आम्हाला. पपई, केळीचे झाड, केळीला घडच्या घड लागायचे तेव्हा ते उतरवून आई त्याचे वाटे करायची व रिक्षा करून नातेवाईक/मैत्रीणी नेऊन द्यायची. मी लग्नानंतर डोंबिवलीला गेले त्यामुळे नंतरची मजा मला नाही मिळाली. पेरू भरपूर खाल्ले पण मला वाटते की सीडलेस पपई व केळीचे झाड नंतर लावले कारण मी एकही पपई व एकही केळं खाल्ले नाही.
आत्ता आई बाबांच्या फ्लॅट मध्ये कुंड्या होत्या. त्यात कडीपत्ता, अळू, अनेक रंगांचे गुलाब, शेवंती, अनेक रंगांचे जास्वंद, असे बरेच काही होते. आईने इथेही अळूच्या पानांच्या अळूवड्या केल्याच. शिवाय शिजवलेले उंडे पण अनेकांना दिले. मी मात्र एकदाही अळूची भाजी व अळूवड्या खाल्या नाहीत अमेरिकेत असल्याने. क्वचित एखाद-दोन वेळा खाल्या असतील. गणपती विसर्जनाला आई मोठ्या प्रमाणात वाटली डाळ करायची. पण लग्नानंतर मी खूपच मिस केली.
पूरग्रस्त भाड्याच्या जागा सरकारने नंतर सर्वांच्या मालकीच्या केल्या. या जागेत आईबाबा, आम्ही दोघी बहिणी, व आजोबा (१९६५ ते २००२) इतके वर्षे राहिलो. आम्ही दोघी लग्ना आधी 1988 पर्यन्त राहिलो. २ खोल्यांच्या जागेतच आमच्या दोघींचे साखरपुडे व लग्न झाले. भाचीचा जन्मही या जागेतला. खूप वारेमाप आठवणी आहेत या जागेच्या.
एकूणच चाळ, वाडे गेले आणि मजाही गेली. चाळ, वाडा संस्कृतीमध्ये एकोपा, देवाण-घेवाण, एकमेकांना मदत, सुख दु:खाच्या गोष्टी सर्व काही पडद्या आड गेले. नंतर फ्लॅट आले आता अपार्टमेंट. आता जिकडे बघावे तिकडे टोलेजंग इमारती दिसतात. आज मला एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक हे गाणे आठवले व प्रचंड रडले. आज तापमान छान होते, थंडी नाही, वारा नाही. नेहमीची 1 मैलाची चक्कर चालून आले, कट्यावर बसले तरीही एका तळ्यात होती हे गाणे आठवून रडू फूटतच होते. अजूनही बरंच काही आठवत होते जे सहसा कधीच आठवत नाही आणि रडत होते. मी ब्लॉग वर चांगल्या कविता की ज्या सर्वांनाच माहिती आहेत अशा टाईप करते व खाली कवीचे नाव लिहिते व त्याप्रमाणे मी काढलेला फोटोही टाकते. आज ही कविता टाईप केली. तसेच मी एका वहीत ज्या ज्या कविता आवडतील त्या नावासकट माझ्या हस्ताक्षरात लिहिते. अधून मधून वाचते. आजचा दिवस असाच काहीसा होता.
rohinigore
No comments:
Post a Comment