Thursday, March 28, 2024

सुंदर माझं घर ..... (१)

आमचे लग्न १९८८ साली झाले आणि नव्यानेच सुरू झालेल्या वैवाहीक जीवनाची सुरवात झाली. विनुची पिएचडी अजून थोडी बाकी होती. तो ऑरगॅनिक केमिस्ट्री मध्ये संशोधन करत होता. शिष्यवृत्ती १२०० फक्त. आमचे घर जरी डोंबिवलीला होते तरी आम्ही २ वर्षे वसतिगृहात राहिलो याचे कारण संशोधनात लॅब मध्ये विनू दिवसरात्र काम करायचा. असे काम डोंबिवलीला राहून करणे शक्य नव्हते. डोंबिवलीच्या घराकरता विनुच्या वडिलांनी महाराष्ट्र बॅंकेतून लोन काढले होते आणि त्याचा ९०० रूपये हफ्ता विनु न चुकता दर महिन्याला पाठवत होता. तो मनी ऑर्डर करायचा. डोंबिवलीला जागा घेतली होती याचे कारण विनु आधी एका बहुराष्ट्रीय औषधी कंपनीत मुलुंडला नोकरी करत होता. डोंबिवलीची जागा घेण्या आधी तो त्याच्या काकाकडे बोरिवलीला रहायचा. बोरिवलीवरून मुलुंडला कामासाठी ये-जा करायचा. २ वर्षात त्याने नोकरी सोडली आणि पिएचडी साठी आयायटी (IIT) पवईत वसतिगृह ९ मध्ये रहायला गेला होता. विनुने डोंबिवलीची जागा पेईंग गेस्टना रहायला दिली होती. हफ्ता भरण्यासाठी मदत होत होती. त्यामुळे नोकरी सोडल्यावर शिष्यवृत्तीतले ६०० आणि पेइंग गेस्ट कडून मिळालेले ३०० रूपये असे ९०० रूपये हफ्ता पाठवण्याला सुरवात केली. अर्थात आमचे लग्न झाले तेव्हा फक्त पेइंग गेस्टचे कडून मिळणारे रूपये आम्ही दादांना पाठवत होतो. आमचा संसार १२०० रुपयांमध्ये सुरू झाला. 

 
 
लग्न झालेल्या जोडप्यांना आयायटीने वसतिगृहात रहायला जागा दिली. वसतिगृह ११ हे मुलींचे होते. तिथे बऱ्याच खोल्या रिकाम्या होत्या. प्रत्येकी २ खोल्या लग्न झालेल्या जोडप्यांना दिल्या होत्या. आमच्या खोल्यांचे नंबर होते ६९, ७० आणि या खोल्या तिसऱ्या मजल्यावर होत्या. त्यावेळेला लिफ्ट नव्हत्या. विनुचे डिपार्टमेंट पण तिसऱ्या मजल्यावर होते. लिफ्ट नाही. डिपार्टमेंटला जाण्यायेण्यासाठी विनुकडे एक सायकल होती. आयायटी - पवईचे आवार खूपच मोठे आहे. आवारात अर्थातच काहीही मिळत नव्हते. भाजीपाला आणि किराणा आणण्यासाठी आम्हाला जाऊन येऊन २ मैल चालायला लागायचे. धुणे भांडी मी घरीच करत होते. शिवाय दोन्ही खोल्यांचा केर काढून फरशी पण पुसून घेत होते.प्रत्येक खोलीत एक टेबल, एक खुर्ची, एक कॉट, व एक लोखंडी कपाट होते. आम्ही जेव्हा या दोन खोल्यांचा ताबा घेतला तेव्हा एका खोलीचे बेडरूम बनवले व एका खोलीचे स्वैपाकघर. बेडरूम मध्ये दुसऱ्या खोलीतली एक कॉट आणली व त्या खोलीतल्या कॉटला जोडून ठेवली. अश्याने आमचा मोठा बेड तयार झाला. विनायककडे त्याच्या बॅचलर जीवनातली एक गादी होती. ती कॉटवर घातली व शेजारी एकावर एक अशा सतरंज्या, बेडशीटा घालून त्या गादीच्या लेव्हलला आणल्या. विनु म्हणाला मला सतरंजीवर झोपायची सवय आहे, तू गादीवर झोपत जा. त्या खोलीतल्या लोखंडी कपाटात आम्ही आमचे सर्व कपडे ठेवले. पावडरीचा डबा, कुंकू, कंगवे ठेवले. तिथल्या टेबलावर काही पुस्तके ठेवली. टेबलावर घड्याळ ठेवले किती वाजले आहेत ते बघण्यासाठी. मी रोज रात्री पहाटे ६ चा गजर लावायचे. गजर बंद करून आम्ही परत झोपायचो. ७ वाजता उठून चहा ब्रेकफास्ट अंघोळ करून विनु ८ ते ९ च्या दरम्यान लॅब मध्ये जायचा. 
 
 
रुखवतात आम्ही दोघी बहिणींनी मिळून केलेला नाडी वर्क पडदा बेडरूमच्या दरवाज्याला लावला. या पडद्याचे खूप कौतुक झाले. जो तो विचारी कसा केला हा पडदा! नाडीवर्कचा जो पडदा होता त्यावर पाने फुले छापली होती आणि फुलाची प्रत्येक पाकळी पांढऱ्या शुभ्र नाडीने भरली होती. पांढऱ्या शुभ्र पाकळ्या मरून रंगाच्या पडद्यावर खूपच उठून दिसत होत्या. प्रत्यक्ष पाकळ्या चिकटवल्या आहेत की काय असे वाटे. या खोलीत विनयने पेंट केलेला गणपती लावला होता. रात्री जेव्हा झोपायला या खोलीत यायचो तेव्हा आठवणीने पाण्याने भरलेले तांब्या भांडे आणायला लागायचे, कारण की झोपताना दुसऱ्या खोलीला कुलूप लावायला लागायचे. ही कुलुपे पण निराळीच होती. कुलूप लावताना किल्ली लागायची नाही. फक्त उघडायला लागायची. दोन्ही खोल्यांना एकेक खिडकी होती त्यामुळे घरात वारा आणि प्रकाश दोन्ही छान येत होते. रात्री झोपताना ट्रॉंझिस्टर वर छायागीत, बेलाके फूल ऐकूनच झोपायचो. झोपताना हा ट्रान्झिस्टर आम्ही कॉटच्या जवळच असलेल्या कोनाड्यात ठेवायचो. दुपारचे व रात्रीचे जेवण करताना पण सोबत आम्हाला दोघांना ट्रान्झिस्टर लागायचा. खिडकीतून बाहेर बघितले की सगळीकडे हिरवेगार दिसायचे. पावसाळ्यात खूप अंधारून यायचे. सकाळी उठून अशा अंधारलेल्या वातावरणात दिवा लावायला लागायचा. एकीकडे चहाचे आधण गॅसवर ठेवायचे व खिडकीतून पावसाला बघत रहायचे. आले घालून केलेला चहा मग आम्ही दोघे प्यायचो. 
 
 
स्वयंपाकाच्या खोलीतल्या कपाटामध्ये सर्व पीठाचे डबे व इतर पोहे, साबुदाणे वगैरे ठेवले. टेबलावर गॅस ठेवला. त्यावरच एकीकडे पोलपाटावर मी पोळ्या करत असे. कुणी आले तर बसायला खुर्ची होतीच. दोन्ही खोल्यांना भिंतीतले कोनाडे होते. ते मला खूपच आवडायचे. जमिनीलगतचा एक आणि त्यावर एक असे प्रत्येक खोलीत ६ कोनाडे होते. बेडरूमच्या कोनाड्यांमध्ये आम्ही आमच्या दोघांच्या बॅगा ठेवल्या. एकात पांघरूणे - बेडशीटा, एकात ट्रान्झिस्टर ठेवला. स्वैपाकघरातल्या कोनाड्यात एकाचे देवघर बनवले. एकात भाजीपाल्यासाठी ३ जाळी असलेल्या टोपल्या एकावर एक ठेवल्या. एकात कांदे बटाटे, एकात फळभाजी, एका छोट्या टोपलीत, मिरच्या, कोथिंबीर, आलं असे होते. कोथिंबीर मी ओल्या फडक्यात ठेवायचे. ज्या टेबलावर गॅस होता त्या टेबलाच्या शेजारी मी पिण्याचे पाणी व स्वैपाकाला लागणारे पाणी स्टीलच्या बादलीत आणि कळशीत ठेवायचे. हे पाणी मी रोजच्या रोज बदलायचे. एका कोनाड्यात मी एका टबात खरकटी भांडी ठेवायचे. एक कोनाडा स्टोव्ह, रॉकेलचा डबा याकरता होता. त्यावेळेला फ्रीज नव्हते कोणाकडेच ! फक्त एकीकडे होता. लोणी दही याकरता मी एका ताटलीत पाणी घालून त्यात ते लोण्या-दह्याचे सट ठेवायचे. मिक्सरही नव्हता. मी आईकडून एक दगडी रगडा आणला होता. आईकडे दगडी रगडे विकायला एक बाई यायची. पुण्यावरून हा दगडी रगडा आणला होता. त्यात मिरची कोथिंबीरीचे वाटण व थोडी चटणी होईल इतका छोटा होता. त्यावर चटणी वगैरे करताना खाली आवाज जाऊ नये म्हणून मी एक तरट घालायचे. तरटाची चौकोनी घडी त्यावर टॉवेल पागोट्यासारखा गुंडाळून, त्यावर हा रगडा ठेवायचे !. 
 
 
सुरवातीला आम्ही एका गवळ्याकडून दूध घ्यायचो. ते खूपच पातळ होते. त्यावर साय अगदीच थोडी धरायची. पण त्या सायीचे दही-लोणी-तूप ताजे ताजे बनवायचे. दूध पातळ असल्याने जास्त साय येत नव्हती तरी मी रोज थोड्या सायीचे विरजण लावून रोज सायीचे ताजे ताक करायचे व रोज थोडे थोडे लोणी काढायचे. पूजा करताना काही वेळा मी लोणी साखरेचा नैवेद्य दाखवायचे. ४ दिवसाचे लोणी अगदी थोडेच साठायचे. रोजच्या रोज लोणी पाण्याने धुवून मी ते सटात ठेवायचे व तो सट एका ताटलीत गार पाणी घालून त्यात ठेवायचे व ४ दिवसांनी लोणी कढवून तूप करायचे.विनुने त्याच्या बॅचलर जीवनातली एक गादी, एक कपड्यांनी भरलेली बॅग, ट्रान्झिस्टर व हॉटप्लेट वसतिगृह ९ वरून आणलेलीच होती. हॉट्प्लेट बघितल्यावर मला इतका आनंद झाला आणि ठरवले की आपण सर्व स्वैपाक यावरच बनवायचा. कूकर लावला. एक तास झाली तरी कूकरला वाफ धरेना. हॉटप्लेटच्या तीव्र आचेमुळे पहिली पोळी करपली. प्लग काढून दुसरी पोळी करून घ्यावी तर ती खूपच कडक बनली. या माझ्या सर्व करामतींमध्ये मोठा आवाज झाला तो फ्युज उडाल्याचा होता. गॅसला नंबर लावला होता पण तो यायला महिनाभर तरी लागेल असे कळाले तेव्हा विनु म्हणाला की मी आधी बाहेर जाऊन स्टोव्ह विकत घेऊन येतो. स्टोव्ह आणण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. 
 

 
आईकडे स्टोव्हमध्ये रॉकेल कसे भरतात, स्टोव्हला पिना कशा करतात ते पाहिले होते पण प्रत्यक्ष अनुभव नव्हता. स्टोव्हच्या एकूणच खूप भानगडी असतात. रॉकेलचा डबा, रॉकेल स्टोव्हमध्ये भरण्याकरता एक काचेची बाटली, रॉकेल ओतताना वापरायचे नरसाळे, पिनांचे व काडेपेटीचे बंडल, स्टोव्हमध्ये रॉकेल भरताना ते जर बाहेर आले तर पुसायला लागणारी फडकी! नुसता व्याप नि ताप! सुरवातीला त्रास झाला व खूप चिडचिड झाली पण नंतर हे सर्व सवयीने जमायला लागले. एकदा स्टोव्ह पेटवला की त्यावर स्वयंपाक कसा उरकायचा तेही कळाले. आधी कूकर लावायचा, तो होईपर्यंत भाजी चिरून घ्यायची. कूकर झाला की भाजी करायची. भाजी परतता परतता कणीक भिजवायची, भाजी झाली की पोळ्या, पोळ्या झाल्या की वरण फोडणीला टाकायचे. ते झाले की सर्वात शेवटी दुध तापवून घ्यायचे कारण की दुध नासले की दूध बाहेरून आणायला परत दीड दोन मैल पायपीट! स्टोव्हवर क्रमाक्रमाने करण्याच्या स्वयंपाकामध्ये जर का काही उलटेसुलटे झाले तर एका भांड्यात नुसते पाणी घालून ते तापवत ठेवायचे कारण एकदा का स्टोव्ह बंद झाला तर परत तो कोण पेटवणार? वाजणारा स्टोव्ह बंद झाल्यावर कसे शांत शांत वाटायचे. नंतर १५ दिवसांनी गॅस शेगडी आणि सिलिंडर आला तेव्हा खूपच हायसे वाटले.
 

 
विनुने लॅब मधून ३ वेगवेगळ्या आकाराचे काचेचे प्लास्क आणले होते दुध गरम करण्यासाठी हॉटप्लेटवर त्याच्या बॅचलर जीवनात. लग्न झाल्यानंतर मी सकाळी हॉटप्लेटवर दूध गरम करायचे ते मोठ्या काचेच्या फ्लास्कमध्ये. नंतर दोन छोट्या फ्लास्कमध्ये मी दोघांकरता दूध घ्यायचे. त्यात इंस्टंट ब्रु कॉफी घालायचे. एकीकडे विब्सचा ब्रेड भाजून त्याला अमुल बटर लावायचे. कॉफी, ब्रेड असा छान ब्रेकफास्ट झाला की विनु लॅब मध्ये जायचा. त्यावेळी आम्ही १०-१२ जोडपी होतो, त्यात चार महाराष्ट्रीयन. या जोडप्यांमध्ये काहींच्या बायका पी. एचडी करणाऱ्या होत्या व त्यांचे नवरे बाहेर कंपनीत कामाला जायचे. तर १-२ जोडपी दोघेही पी.एचडी करणारी होती, तर काहींचे नवरे पिएचडी करत होते आणि आम्ही बायका घरकाम करायचो. काही रसायनशास्त्र व भौतिक शास्त्रामध्ये संशोधन करणारे होते, तर काही अर्थशास्त्र व गणिता मध्ये.


आम्ही सर्व बायका घरीच धुणे भांडी करायचो. तिथे एक भारती नावाची मुलगी सर्वांना विचारायची. भांडी घासायला कुणी हवे आहे का? भांड्यांचे ७० रुपये होते पण १-२ जणींनीच तिला कामावर ठेवले होते. बाथरूम टॉयलेट व बेसिन बाहेरच कॉमन होते. त्या वसतिगृहात २ ठिकाणी ३-४ बाथरूम होत्या. एकीकडे बायकांची व दुसरीकडे पुरुषांची झाली. हसतखेळत धुणेभांडी व्हायची. सकाळी ९ वाजता आपापल्या नवऱ्यांना त्यांच्या कामावर पाठवून दिले की आमचेच राज्य. वसतिगृहाच्या सर्व खोल्या समोरासमोर होत्या, त्यामुळे आम्ही सगळ्याजणी पॅसेजमध्ये जमा व्हायचो. एकीकडे गप्पा, गाणी ऐकणे व धुणे भांडी व आमच्या अंघोळी करता नंबर लावायचो. ए तुझी भांडी झाली की मी शिरते हं बाथरूममध्ये. एकीची भांडी, तर दुसरीचे धुणे तर तिसरीची अंघोळ, असे सर्व २ तास चालायचे. मग मात्र स्वयंपाकघरात शिरायलाच लागायचे कारण की १ वाजता सर्वांचे 'हे' जेवायला घरी यायचे. भांडी घासायला ओणवे बसायला लागायचे. धुणे पण आधी धुणे भिजवणे, नंतर ब्रशने कपडे घासणे, धोपटणे, २ ते ३ वेळा वेगवेगळे पाणी घेऊन आघळणे आणि मग पिळणे. भांडी घासताना खरकटी भांडी आधी टबा बाहेर काढायचे. टबही घासून स्वच्छ विसळून घ्यायचे. नंतर एका बादलीत पाणी घेऊन घासलेली भांडी कमरेत वाकून विसळायचे व टबात टाकायचे. अंघोळीच्या पाण्याकरता आम्हाला एक नळ स्पेशल गरम पाण्याचा होता. त्यामुळे गरम पाणी अंघोळीला आयते मिळायचे. विनू रोज गार पाण्याने अंघोळ करायचा. 
 

 
आईकडे धुणे भांडी करायची कधीच सवय नव्हती. स्वैपाक पण मोजकाच येत होता कारण लग्ना आधी आम्ही दोघी बहिणी नोकरी करायचो तेव्हा आईच आम्हाला डबा भरून देत होती. धुणेभांड्याची सवय नसल्याने चादरी व विनायकचे शर्ट पॅन्ट धुवून हात दुखायला लागायचे. धुणे वाळत घालण्यासाठी खोलीत ज्या तारा बांधल्या होत्या त्या खूपच उंच होत्या. खुर्चीवर उभे राहून मी काठीने धुणे वाळत घालायचे. वर पाहून मान दुखायला लागायची. धुणे धुतल्यावर पिळताना माझ्या हातून कपडे नीट पिळले जायचे नाहीत, बरेच पाणी रहायचे. म्हणून मग विनायक मला सर्व कपडे नीट पिळून द्यायचा. वर पाहून एका रेषेत काठीने कपडे वाळत घालताना मान दुखायची. विनु मला म्हणाला की चादरी धुवायला अवघड आहेत त्यामुळे त्या फक्त भिजत घालून ठेव. चादरी मी धुवत जाईन.
काही दिवसांनी आमच्या घोळक्यामध्ये एका छोट्या मुलाची भर पडली. मीनाक्षीला एक "सुंदर" नावाचा गोंडस मुलगा झाला. तो त्याच्या आईकडे कधीच नसायचा. त्याला घेण्यासाठी आमचे नंबर लागायचे. तो पूर्ण पॅसेजमध्ये या टोकापासून त्या टोकापर्यंत रांगायचा. मीनाक्षीला तिचे काम करायचे असेल तर मला विचारायची "सुंदर को देखेगी क्या? " . मी लगेचच होकार द्यायचे. . मला त्यानिमित्ताने सुंदरशी खेळायला मिळायचे. मीनाक्षीने मला सांगून ठेवले होते की तुझी पुजा झाली की मला बोलवत जा. मग ती व सुंदर येऊन नमस्कार करून जायचे. सुंदरला सांगायची "भगवान को प्रणाम करो" की लगेच सुंदर त्याचे छोटे हात जोडायचा व "जयजय" म्हणायचा. एकदा सुंदरच्या हातात मी हापूसचा आंबा सोलून दिला. तो त्याने त्याच्या इवल्याश्या हातात धरला आणि आंबा खात होता. खाताना त्याच्या तोंडावर हातावर व झबल्यावरही आंब्याचे तुषार उडले होते. आंबा खाण्यात तो अगदी मग्न होऊन गेला होता. 
 

 
हा सुंदर रांगत रांगत प्रत्येकीच्या घरी जायचा. रांगताना मध्येच बसायचा. आमच्या घोळक्यामध्ये कुणी जात असेल तिच्या मागोमाग जायचा, मग ती उचलून परत त्याच्या आईकडे द्यायची. मी भांडी घासून आले आणि जर का सुंदर आमच्या घरात असेल तर धुतलेली सर्व भांडी टबाच्या बाहेर आलीच म्हणून समजा! सुंदर एकेक करत सर्व भांडी टबाच्या बाहेर काढायचा. वाट्या, कालथे, झारे तर त्याला खूप प्रिय. फरशीवर दणादणा आपटायचा वाट्या! त्याचा अजिबात राग यायचा नाही. आम्ही हसलो की त्याला अजुनच चेव चढायचा. एकदा तर सगळी भांडी बाहेर आणि हा टबात जाऊन बसला! एकदा मी पूजा करताना आला. मग मी त्याच्या कपाळावर गंध लावले, नैवेद्याचे लोणी साखर खायला दिले. एकदम खुश झाला ! मी त्याला बाप्पाला "जयजय" करायला शिकवले. आईने मला पुजेसाठी देव्हारा दिला होता, शिवाय तेल व तूप वाती. त्यावेळी फुलपुडी पण चांगली येत असे. लाल, पांढरी, पिवळी फुले, दुर्वांची जुडी, तुळस, बेल असे सर्व काही. त्यामुळे पूजाही साग्रसंगीत व्हायची. तेला-तुपाचे २ दिवे आणि उदबत्ती पण लावायचे. पूजेत लग्नात आईने दिलेले २ देव होते. देवी आणि बाळकृष्ण. शिवाय देवात मी १ रूपयाचे नाणेही ठेवले होते. 
  
आमचे बिऱ्हाड वेगळे स्थापन होणार आहे म्हणून विनुच्या ५ आत्यांनी व २ काकांनी व २ मावश्यांनी सर्वच्या सर्व संसाराला लागणाऱ्या स्टीलच्या भांड्यांचा, डब्यांचा कूकर व मिसळणाच्या डब्यासकटअहेर दिला होता. आम्ही फक्त विळी, पोलपाट लाटणे, कढई, सोलाणं, लिंबू पिळायचे यंत्र घेतले. सर्वच्या सर्व भांडी पोत्यात भरून वसतिगृहात घेऊन आलो होतो. - Copy Right (Rohini Gore )

 


Sunday, March 24, 2024

गृहव्यवस्थापन

 फेबुवरच्या छंद नावाच्या ग्रूपवर थीम होती गृहव्यवस्थापन. मी लिहिणार नव्हते कारण मी बरीच घरे बदलली. विचार केला की भारतातल्या आणि अमेरिकेतल्या २ घरात मी सलग १० वर्ष राहिली आहे. अमेरिकेतल्या घराबद्दल लिहिले तर ते चित्र डोळ्यासमोर येणार नाही म्हणून भारतातल्या घराबद्दल लिहिले आणि माझा मलाच खूप आनंद झाला. अजून एक लक्षात आले की बाकी बरेच फोटो काढले पण कोणत्याही घराचे फोटो काढले नाहीत. कोणत्या तरी निमित्ताने काही ना काही लक्षात येते. मन भूतकाळात गेले आणि लेख लिहिला गेला. इथे शेअर करत आहे. ही थीमवजा स्पर्धा होती. साधारण ६० ते ७० लेख आले असावेत. त्यात पहिल्या ४ क्रमांकाना ऑनलाईन सर्टीफिकेट आणि काही रोख रक्कम भेट म्हणून होती.

 
 
- गृहव्यवस्थापन - मी लिहिलेला लेख -
 
 
गृह व्यवस्थापनात सर्वात महत्वाचे काय असेल तर ते स्वैपाकघर. ते नेहमीच स्वच्छ ठेवायला लागते. भारतात असताना माझ्याकडे स्टीलचे आणि हिंडालियमचे डबे होते. मी दर २ ते ३ महिन्यांनी सर्व डबे घासायचे. ओटा कडप्प्याचा होता आणि त्या खाली कडप्प्याचे कप्पे होते. हे कप्पे मी ओल्या फडक्याने पुसून घ्यायचे. डबे धुतल्यावर ते उपडे करून ठेवले की लगेच वाळतात आणि त्यात जे काही असेल ते परत लगेच भरता येते. पूर्वी कपडे वाळत घालायच्या काठ्या असायच्या त्याला झाडू बांधायचे आणि भितींवरली आणि छतावरची जळमटे साफ करायचे. झाडू हा बुटका असतो त्यामुळे तो काठीला बांधला की छ्तावरची सर्व जळमटे निघतात. कुंचा भिंतीवर फिरवून मग कानाकोपऱ्यातून केर काढायचे. पूर्ण घराची साफसफाई मी वर्षातून एकदा दिवाळीपूर्वी करायचे. पूर्वी फ्लॅटमध्ये हॉल आणि बेडरूमला पाणी जाण्याकरता थोडी जागा असायची. फरशी पण कढत पाण्यात धुणे धुण्यासाठी जो डिटर्जंट असतो तो घालून त्याचा फेस व्हायचा आणि तो फरशीवर घालून ब्रशने फरशी घासायचे. सगळे साबणाचे पाणी खराट्याने ढकलून बाहेर घालवायचे. पंख्यावरची जळमटे कुंच्याने साफ करून नंतर विनायक उंच असल्याने तो स्टुलावर उभा रहायचा आणि ओल्या फडक्याने पंख्याची पाती साफ करायचा. रोज रात्री झोपताना ओटा घासून पुसून लक्ख करायचे.
 
 
कामवाली बाई जरी कामाला होती तरी मी रोज सर्व फर्निचर ओल्या फडक्याने पुसून काढायचे. शिवाय सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपताना केर काढायचे. दर महिन्याला सर्व चादरी, अभ्रे, पांघरूणे धुवून वाळवून ठेवायचे. जेव्हा धुणे-भांडी करायला बाई यायची तेव्हा आणि मी घरी धुणे-भांडी करायचे तेव्हाही मी सर्व ताटे विसळून टबात ठेवायचे. कढई, आणि इतर भांडी सुद्धा थोडी घासणीने हात फिरवून विसळून ठेवायचे. टबात ठेवल्यावर सुद्धा त्यात मी थोडे पाणी घालायचे. असे केल्याने भांडी घासायलाही किळस वाटत नाही. शिवाय जास्त स्वच्छ निघतात. कप बशा, पाणी प्यायची भांडी मी घासून विसळून ठेवायचे. धुणे धुताना सुद्धा ते आधी एका बादलीत गरम पाण्यात त्यात धुण्याची पावडर टाकून भिजवून ठेवायचे. जेव्हा वॉशिंग मशीन घेतले तेव्हा पण मी आधी धुण्याचे कपडे गरम पाण्यात भिजवायचे व नंतर १ तासाने ते मशीनमध्ये धुण्याकरता टाकायचे. माठातले पिण्याचे पाणी आणि पिंपातले स्वैपाकासाठी लागणारे पाणी रोजच्या रोज भरून ठेवायचे. आधीचे पाणी काढून पिंप घासून मग ताजे पाणी भरायचे. डोंबिवलीत आल्या आल्या मला काविळ झाली. त्यामुळे पिण्याचे पाणी तापवण्याचे काम वाढले. मोठ्या पातेल्यात पिण्याचे पाणी उकळवून ठेवायचे. ते पूर्ण गार झाले की प्लॅस्टीकच्या बाटलीतून भरून ते फ्रीज मध्ये ठेवायचे किंवा माठात भरून ठेवायचे. नंतर पाणी भरून ठेवायला फिल्टर घेतला. तोही महिन्यातून एकदा साफ करायला लागायचा. केराचा डबा असतो त्यात तळाला जुन्या वर्तमानपत्राची जाड घडी करून मग त्यात कचरा टाकायचे. शिवाय कचऱ्याचा डबा दर २-३ दिवसांनी घासून उपडा करून वाळवायला ठेवायचे.
 
 
भाजी खरेदी साठी मी मंडईत जायचे. तिथे भाज्या स्वस्त आणि ताज्या मिळायच्या. घरी आले की मिरच्यांची देठं काढून ती एका जाळी असलेल्या प्लॅस्टीकच्या डब्यात ठेवायचे. कोथिंबीर निवडून ती पण दुसऱ्या प्लॅस्टीकच्या डब्यात ठेवायचे. आठवडाभर मिरच्या कोथिंबीर ताज्या रहातात. १ नारळ खरवडून तो स्टीलच्या डब्यात भरून तो फ्रीजर मध्ये ठेवायचे. उन्हाळ्यात लिंबाचे सरबत करून तेही फ्रीज मध्ये ठेवायचे. लिंबाचा रस, त्यात तिपटीने साखर घालायची व काचेच्या बरणीत भरताना तळाशी मीठ घालायचे. खूप दिवस टिकते. विनायक डोंबिवलीवरून अंधेरीला कामाला जायचा तेव्हा उन्हाळ्यात कामावरून आल्यावर रोज एक ग्लास लिंबाचे सरबत प्यायचा. कोणी पाहुणे आले तरी हे सरबत उपयोगी पडायचे. त्यात बर्फाचे तुकडे फ्रीजर मध्ये तयार असायचे. त्याकरता मी ४-५ प्लॅस्टीकचे ट्रे आणले होते की ज्यामध्ये पाणी घालून ते फ्रीजर मध्ये ठेवले की बर्फाचे छोटे तुकडे तयार होतात. या ट्रेमध्ये छोटे चौकोनी आकार होते. विनायक कामावरून आल्यावर थेट बाथरूम मध्ये अंघोळीला जायचा. रोजच्या रोज शर्ट, पॅंट, रूमाल, पायमोजे नवीन असायचे.
 
 
पहिले दूध तापले की ते गार झाल्यावर फ्रीज मध्ये ठेवायचे. दुपारी चहा करताना दूध बाहेर काढले की त्यावर जमा होणारी जाड साय एका पातेल्यात काढायचे. अशी ४ दिवसांची साय जमा झाली की त्याचे ताक करायचे. लोणी भरपूर यायचे. हे लोणी मी रोजच्या रोज पाण्याने धुवून फ्रीजमध्ये ठेवायचे. असे लोणी बरेच जमा झाले की त्याचे तूप बनवायचे. घरच्या घरीच दुधाचे सर्व प्रकार व्हायचे. सायीचे दही, अदमुर दही, ताक, लोणी आणि तूप. मी कधीच बाहेरून दही, लोणी तूप विकत आणले नाहीये. आळीपाळीने कोरड्या चटण्या करायचे. लसणाची, दाण्याची, कारळाची इत्यादी. आलं किसून एका डबीत ठेवले आणि ते फ्रीज मध्ये ठेवले की चहात घालायला त्यातूनच आलं घालायचे. आलं, लसूण, मिरचीची पेस्ट करून ठेवायचे. किराणा सामानाची यादी दर महिन्याला एका कागदावर लिहून मग दुकानात जायचे. त्यात सण येतील त्याप्रमाणे काही जास्तीचे सामान आणायचे. दुकानात जाऊन गहू, तांदुळाची क्वालिटी आणि किंमत पाहून त्याप्रमाणे ठरवायचे. तांदूळ पण दर महिन्यात वेगळा आणायचे. सोना मसूरी, आंबेमोहोर, सुरतीकोलम इत्यादी.
 
 
दळणा मध्ये गहू पीठाबरोबर, हरबरा डाळ, ज्वारी-बाजरी, तांदुळ, अंबोळीचे पीठ आणि थालिपीठाची भाजणी करायचे. वर्षाचे लाल तिखट, हळद आणि गोडा मसाला केला की प्रत्येक वेळी सामानात हळद, तिखट आणायला लागत नाही. त्याकरता मी सुक्या लाल मिरच्या व हळकुंड आणून ती उन्हात ठेवून मग दळून आणायचे. हळद तिखट दळायच्या गिरण्याही वेगळ्या असायच्या. सीझनप्रमाणे फळेही आणायचे. हिवाळ्यात लिंबे स्वस्त मिळतात तेव्हाच लिंबाचे सरबत करून ठेवायचे. उन्हाळ्यात कैरीचे खार असलेले नेहमीचे लोणचे, गोड लोणचे व पन्हे करायचे. कैऱ्या उकडून त्याचा गर काढून दुप्पट साखर घालून काचेच्या बरणीत हा पन्ह्याचा गर ठेवला की आलेल्या पाहुण्यांना पन्हे देता येते. शिवाय कोकमचे सरबत पण असेच साखर मीठ घालून तयार ठेवता येते. गुळांबा आणि मुरांबा करून तो काचेच्या बरणीत ठेवायचे. पावसाळ्यात मी सुंठ, गुळ, तूप एकत्र करून त्याच्या अगदी छोट्या गोळ्या करून ठेवायचे. चहाच्या आधी ही गोळी खायची व नंतर चहा प्यायचा.घरात काही गोष्टी मी कायमस्वरूपी ठेवते. यात थर्मामीटर, क्रोसीनच्या गोळ्या, अमृतांजन, व्हिक्स, बर्नॉल, आयोडेक्स, कफ सिरप. कापसाच्या तेलाच्या व तुपाच्या वाती करून ठेवायचे. बाहेर जेवायला वर्षातून आम्ही फक्त ३ वेळा जायचो. आमच्या दोघांचे वाढदिवस व लग्नाचा वाढदिवस. बाहेर हॉटेलमध्ये क्वचित जायचो. पदार्थ जितके घरी करता येतील तितके मी केलेले आहेत. यातून पैशाची बचतही होतेच होते. शिवाय तब्येतीही चांगल्या रहातात.
 
 
लग्नानंतर मी काही वर्ष नोकरी केली. आम्ही दोघेही नोकरी करायचो. विनायक ७.१२ ची फास्ट लोकल पकडायचा. माझी नोकरी डोंबिवलीतच होती. मी नंतर निघायचे. सकाळी घाई गडबड होऊ नये म्हणून विनायकचा शर्ट-पॅंट, रूमाल, पायमोजे, घड्याळ, टॉवेल, रेल्वेचा पास, पैसे, आतले कपडे, तसेच माझेही आतले कपडे, पंजाबी ड्रेस, रूमाल, घड्याळ, कानातले, एके ठिकाणी काढून ठेवायचे. आदल्या दिवशी माझ्या ड्रेसला व विनायकच्या ड्रेसलाही इस्त्री करून ठेवायचे.
पूर्वी गीझर नव्हते त्यामुळे अंघोळीचे पाणी गॅसवर तापवायला लागायचे. सकाळी उठल्यावर एका शेगडीवर एकीकडे चहा आणि दुसऱ्या शेगडीवर मोठ्या पातेल्यात अंघोळीकरता पाणी तापवत ठेवायचे. विनायक बाहेर पडला की मी माझे अंघोळीचे पाणी तापत ठेवून एकीकडे माझ्यापुरत्या डब्यात नेण्यासाठी दोन पोळ्या आणि भाजी करायचे. विनायक डबा न्यायचा नाही. तो कंपनीतल्या कॅंटीन मध्ये जेवायचा. पोळी भाजी झाली की अंघोळीचे पाणी तापलेले असायचे त्याने अंघोळ करून मग पूजा करायचे. पिण्याकरता दूध तापवून घ्यायचे. विनायक पण दूध पिऊन जायचा. दुधात घालायला मी काजू-बदाम-पिस्ते याची पूड करून ठेवायचे. नंतर कपडे भिजत घालून, व्यायाम करून, कामावर निघायच्या वेळी वेणीफणी करून ड्रेस घालून, सर्व काही बंद आहे ना याची खात्री करून कुलूप लावून निघायचे. मी रोज रिक्शाने कामावर जायचे. डोंबिवली एम आय डी सी मध्ये कंपनी होती. आमच्या घराजवळच्या बस स्टॉप जवळ बस कधीच थांबायची नाही.
 
 
घरखर्चाला लागणारी ठराविक रक्कमच आम्ही बॅंकेतून काढायचो. त्यात मी थोडे पैसे बाजूला ठेवायचे आणि त्याचा उपयोगही व्हायचा. आम्हाला दोघांना शनिवारी हाफ डे होता. त्यामुळे फक्त एक रविवार मिळायचा. माझी नोकरी गावातच असल्याने मला घर आणि नोकरी सांभाळता येत होते. नंतर काही वर्षांनी मी नोकरी सोडली.डोंबिवलीत आलो तेव्हा विनायकची स्कॉलरशिप संपली होती त्यामुळे आम्हाला आयायटी- पवईचे वसतिगृह सोडायला लागले. डोंबिवलीत आमचा फ़्लॅट आहे. घरात काहीही नव्हते. विनायकचा थिसीस लिहायचा बाकी होता. तेव्हा आमची खरी कसोटी लागली. मी रोज देवाजवळ प्रार्थना करायचे की मला नोकरी लागू दे आणि देवाने तथास्थू म्हणले आणि मला नोकरी लागली. ही नोकरी कायमस्वरूपी नव्हती. रोज ५० रूपये मला मिळत होते. महिन्याचे १५०० रूपये. यातच सर्व भागवले. किराणामाल, वर्तमानपत्र, धुणे-भांड्यांना बाई लावली तिचे पैसे, दूध, भाजीपाला यातच निम्याच्या वर खर्च व्हायचे. उरलेले पैसे आम्ही दिवस किती आणि पैसे किती हे मोजूनच खर्च करायचो. तेव्हा मी मंडईत कधीच गेले नाही. बजेट ठरवले. कोपऱ्यावर एक भाजीवाला बसायचा. तिथून ५ रूपये पाव किलोच भाजी आणायचे. दुपारी पोळी भाजी. दूध अर्धा लिटरच घ्यायचे. सकाळचा दुपारचा चहा आणि सकाळी आम्ही दोघांनी नाश्त्याला दूध प्यायले की दूध संपायचे. रात्री फक्त मुगाच्या डाळीची खिचडी खायचो. त्याकरता फक्त आधा पाव किलो दही आण्याचो त्याचे मी ताक बनवायचे भरपूर पाणी घालून. तेच पुरवायचो. नंतर विनायकला अंधेरीत हिंदुस्थान लिव्हर मध्ये नोकरी लागली. पण तो १ ते दीड वर्षाचा काळ आम्हाला खूप काही शिकवून गेला. घरी फोन, टिव्ही, फ्रीज, कपाट काहीही नव्हते. डबे आणि पातेली कपबशा ठेवायला एक मोठी मांडणी होती. कपडेही बिग शॉपर बॅगेत ठेवायचो. माझा तुटपुंजा पगार तांदुळाच्या डब्यात ठेवायचो. विनायकला थिसीस लिहायला टेबल खुर्चीही नव्हती. त्याने सतरंजीवर बसून थिसीस लिहिला. 
 
 
फक्त धुणे-भांडी करायला बाई लावली होती. विनायक रोजच्या रोज केर काढायचा व पूजा करायचा. आठवड्यातून एकदा फरशी पुसून घ्यायचा. मी त्याला नको नको म्हणत असतानाही तो ही कामे आपणहून करायचा. तो म्हणायचा की थिसीस लिहिता लिहिता मला पण मध्ये ब्रेक घ्यावासा वाटतो तेव्हा ही कामे होऊन जातात. रोजच्या रोज व्यायाम आम्ही दोघेही करतो. कोणताही आजार झाला की तो लवकरात लवकर बरा होण्यासाठी व्यायामाचा उपयोग होतो. बायकांना घरच्या घरी रोजच्या रोज होणारा व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार. आम्ही दोघे सूर्यनमस्कार, जोर बैठका घालतो. शिवाय योगाही करतो. शिवाय रोजच्या रोज रात्रीचे जेवण झाल्यावर आम्ही एक चालत चालत चक्कर मारायचो.जेव्हा अमेरिकेत आलो तेव्हा गृहव्यवस्थापन बदलले. किराणामाल,-दूध,प्यायचे पाणी, भाजीपाला हा दर आठवड्याचा आणावा लागतो. कोव्हीड मुळे आता सर्व घरपोच येते. पण इथे घरपोच सेवा नाहीये. इथे घाऊक मालाची दुकाने आहेत. त्याचे वार्षिक ५० डॉलर्स भरुन सदस्यत्व घ्यावे लागते. या दुकानातून आम्ही साखर, तेल, मीठ, धुण्याचे व भांडी घासायचे डिटर्जंट, पेपर टॉवेल, टिश्यु पेपर, कचरा भरायच्या पिशव्या, दाढी करण्यासाठी लावायचा फोम, जंतुनाशक ओली फडकी, भाजके दाणे, सुकामेवा, प्रोटीन पावडर, टुथपेस्ट, पिण्याचे पाणी, या आणि अशा सर्व प्रकारच्या रोजच्या रोज वापरातल्या गोष्टी आम्ही आणतो. भाजी फळांमध्ये मी पालक, संत्री, केळी, काकडी, टोमॅटो, कांदे घेते. बाकीच्या खरेदी आम्ही अमेरिकन आणि इंडियन दुकानातून आणतो. जिथे जे जे चांगले मिळेल ते ते सर्व काही ! इथे सर्व किराणामाल जसा लागेल तसा आणतो. भाजीपाला-किराणामालाची मी दर आठवड्याला वेगळी यादी करते. आठवणीने काय काय आणायला झाले आहे ते पाहून त्याची यादी बनवते. याचे कारण एक जरी गोष्ट राहिली की परत कारने जावे लागते. पटकन चालत जाऊन भाजी आणू असे इथे होत नाही. इथे दुकाने खूप लांब असतात. विशेष करून थंडीच्या दिवसात हवामान पाहूनच बाहेर पडावे लागते. बर्फ पडणार असेल तर आठवणीने सर्व काही घरात आहे ना ते पहावे लागते.
 
 
इथेही मी काही वर्ष नोकरी केली. तेव्हापासून मी रात्रीचे जेवण व दुसऱ्या दिवशीचे डब्यातले जेवण असे एकदाच करते. रात्री भांडी तर इथे घासायलाच लागतात. इथे डिश वॉशर आहेत पण न घासता भांडी त्यात ठेवली तर ती नीट निघत नाहीत. मी भांडी घासते आणि नळाखाली पटापट विसळल्यासारखी करते आणि मग ती डिश वॉशर मध्ये टाकते. डिश वॉशरचा वेगळा डिटर्जंट मिळतो. अशाने भांडी खूप छान घासली जातात. शिवाय वाळूनही निघतात. रोजच्या रोज ओटा ओल्या फडक्याने पुसायचा. रोजच्या रोज ओला कचरा कचरा कुंडीत टाकायचा. कोरड्या कचऱ्याच्या पिशव्या भरल्या की त्याही टाकायच्या. कोरडा कचराही इथे भरपूर साठतो. पाणी पिण्याच्या बाटल्या, दुधाचे, ज्युस चे कॅन्स, इथे जे काही मिळते ते सर्व प्लॅस्टीकच्या डब्यातून. ते संपले की त्या प्लॅस्टीकच्य बाटल्या, डबे असे सर्व काही असते. इथे पोस्टाच्या पेटीत बरीच पत्रे साठतात की ज्यामध्ये जाहीराती असतात. असा अनावश्यक कचराही बराच साठतो. रोजच्या रोज किचनच्या फरशीचा केर काढतो आणि पुसुनही घेतो. तसेच बाथरूम कमोड मधल्याही फरशा पुसून घेतो. केर-फरशी पुसणे, कार्पेट असेल तर व्ह्य्क्युमिंग करतो, दर महिन्यात सर्व लाकडी सामान पुसून घेतो. इथे भारतीय दुकानात काही स्टीलच्या वस्तू असतात पण त्या खूप महाग असतात. इथे मी स्टीलचे डबे कधीच आणले नाहीत. सर्व काही प्लॅस्टीकच्या बरण्यांमध्ये ठेवते. फक्त कूकर, इडली पात्र आणि काही स्टीलच्या चायना डिश जेवणासाठी आणल्या. इथे गिरणी नाही त्यामुळे दळणाची कामे नाहीत. दूध वेगळे तापवायचे काम नाही. आधी मी विरजण लावून दही घरीच बनवायचे. तूपही इथे मिळणाऱ्या मीठविरहीत बटरचे घरीच करायचे. आता दही, तूप विकत आणते.
 
 
अमेरिकेत हवामानाप्रमाणे कपड्यांचेही व्यवस्थापन करावे लागते. हिवाळ्यात, हातमोजे, पायमोजे, उबदार जाकिटे, फूल टी शर्ट, जीन्स टोप्या बाहेर काढून ठेवायच्या. हिवाळा संपला की सर्व उबदार कपडे धुवून वाळवून बॅगेमध्ये ठेवायचे. उन्हाळा आला की हाफ टी शर्ट, घोळदार पॅंटी, उन्हाळ्याच्या टोप्या असे बाहेर काढायचे. थंडीत कफ सिरप, आयब्रुफेनच्या गोळ्या, फ्ल्युचे च्या लसी टोचून घ्याव्या लागतात. तसेच वसंत ऋतूमध्ये पोलन ऍलर्जी होते. श्वास घेताना त्रास होतो त्याच्या गोळ्याही आणून ठेवाव्या लागतात. अमेरिकेत एका शहरात गेल्यावर आम्हाला घर मिळायला खूप वेळ लागला. एका स्टुडिओ अपार्टमेंट मध्ये आम्हाला नाईलाजाने जावे लागले. स्टुडिओ अपार्टमेंट म्हणजे एकच खोली. त्या खोलीत डिश वॉशर नव्हते. धुणे धुवायचे दुकानही लांब होते. सर्व काही एकाच खोलीत! हा एक गृहस्थापनाचा वेगळाच अनुभव आला. अर्थात तो कसा होता त्याचा वेगळा लेख होईल. लग्न झाल्यावर सुरवातीला वसतिगृहात राहिलो. तिथले व्यवस्थापन पण वेगळे होते. मी नंतर कधीतरी "सुंदर माझे घर" ही लेखमाला लिहिणार आहे. लेखात एकूणच घराचे व्यवस्थापन थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. मी १०-१२ घरे बदलली. घराचे वर्णन व आठवणी असे एकत्रित लेखन मी लेखमालेत करणार आहे.
- रोहिणी गोरे

Monday, March 18, 2024

चांगल्या दिवसांचा सिलसिला

 प्रचंड थंडी, बोचरे वारे नकोसे होतेच नेहमी पण जेव्हा वसंत ऋतु चालू होतो तेव्हा मरगळ जाऊन उत्साहाचे वारे सुरू होतात. तसेच काहीसे गेले ४ दिवस होते. नोव्हेंबर महिन्यात मी बाहेर दुकानात हिंडायला गेले होते. गुरवारी वेदर बघितले आणि लगेचच बाहेर पडले. गुरुवारी हवा खूपच छान होती ! हवेत अजिबात गारवा नव्हता की बोचरे थंड वारे नव्हते. नेहमीप्रमाणे मी आधी विला पिझ्झा मध्ये गेले. तिथे मला दोन प्रकारचे व्हेज पिझ्झे दिसले. त्यातला ब्रोकोली, सिमला मिरचीचे टॉपिंग असलेला स्लाईस पिझ्झा मी नेहमीच खाते. यावेळी कांदा, टोमॅटो पालक टॉपिंग असलेला पिझ्झा खाल्ला. सोबत डाएट कोक. मी कोक मध्ये बर्फ कधीच घालायला सांगत नाही. तिथला माणूस पण मला म्हणाला "किती दिवसांनी?" बरी आहेस ना? मी पण त्याची विचारपूस केली. आरामात पिझ्झा खाल्ला. तिथून नेहमीप्रमाणेच Kohl's मध्ये गेले. तिथे नुसती फिरले. घेतले काहीच नाही. नंतर चालत चालत टार्गेट मध्ये गेले. तिथेही नेहमीप्रमाणेच दुकान चालून पालथे घातले. तिथे मी स्लीपर्स घेतल्या आणि १० डॉलर्सचे सेल मध्ये मला ३ ला मिळाले. मला आवडले म्हणून लगेच घेतले. विनुला फोन केला की मला न्यायला ये. जाताना मी उबरने जाते. विनु म्हणाला, अजून थोडी थांबलीस तर मला डबल फेरी पडायला नको. १ तास थांबायला लागणार होते. मी म्हणाले हरकत नाही. मग मी ग्रोसरी सेक्शन मध्ये फिरले. तिथे भाजके मीठविरहीत दाणे आहेत का ते पाहिले तर ते नव्हते. भूक लागली होती म्हणून किटकॅट आणि वेगळ्या प्रकारचे बटाटा वेफर्स घेतले. वेगळ्या प्रकारचे म्हणजे तिखट-गोड असे. टार्गेटच्या बाहेर आले आणि बाकड्यावर विनुची वाट पाहत बसले. हवामान खूपच सुंदर होते. बाकड्यावर बसून वेफर्स आणि चॉकलेट खाल्ले. नंतर घरी येऊन चहा प्यायला. रात्री चवळीची उसळ आणि भात केला.

शुक्रवारी उठल्यावर थोडे घरकाम केले. नहायचे होते पण कंटाळा आला होता. अंघोळीला जाणार तितक्यात ऑर्कुट मैत्रिण मेघनाचा फोन आला. ती म्हणाली की माझी एक मिटींग आता संपली आहे. दुसऱ्या मिटींगला अजून वेळ आहे. ती घरून काम करते. गप्पांना सुरवात झाली ती तब्बल ३ तास बोलत होतो. खूप मनसोक्त गप्पा मारल्या. खूप हासलो देखील. गप्पा मारता मारता मी उसळ भात खाल्ला. तिच्याकडेही उसळ भातच होता. तिच्याकडे हिरव्या मुगाची तर माझ्याकडे चवळीची उसळ होती. गप्पा मारता मारता चार्जिंग खाली खाली जात होते. तिला म्हणले की मी आता थांबते. नंतर परत बोलूच. गप्पा मारून सुद्धा दमायला झाले मला. मग थोडी आडवी झाले. नंतर डोक्यावरून अंघोळ केली. खूप दमल्यासारखे वाटत होते. रात्रीचा स्वैपाक करायचा खूप कंटाळा आला होता. मी म्हणाले जायचे का आज बाहेर? तर विनु म्हणाला उद्याच जाऊ. कामावरून आल्यावर परत बाहेर पडावेसे वाटत नाही. शुक्रवारी रात्री इडली सांबार चटणीचा बेत केला. गरम गरम इडली सांबार खाऊन मन तृप्त झाले ! संध्याकाळी खूपच भूक लागली होती म्हणून इडली सांबार चटणी होईपर्यंत दडपे पोहे खायला केले. 
 
 
शनिवारी सकाळी एका कामाकरता बाहेर पडलो. नंतर बाहेर जेवून नेहमीची ग्रोसरी, केर, धुणे असे सर्व काही झाले. शनिवारी रात्री आदल्या दिवशीची इडली सांबार चट्णी होतीच. रविवारी म्हणजे आज पण बाहेरच जाण्याचा विचार केला. शक्यतो आम्ही दोन दिवस बाहेर जेवत नाही पण खूपच दमायला झाले की जातो कधीकधी. नेहमीची साफसफाईची आणि ग्रोसरीचे कामे यातच शनिवार रविवार कधी निघून जातो ते कळतच नाही. आम्ही जेवायला बाहेर पडणार इतक्यात सोनालीचा फोन आला. ती म्हणाली काय करताय? ग्रोसरी झाली का? तिला सांगितले आम्ही बाहेर जेवायला जातोय. नंतर ग्रोसरी करून मग घरी जाऊ. ती म्हणाली चालेल मग मी तुम्हाला जॉईन होऊ का? मी म्हणाले अगदी अवश्य ये ! कोणत्या उपाहारगृहात? तर मी तिला एक नाव सांगितले. नंतर परत दुसरे नाव सांगितले. केसर थाळी असे नाव आहे. इथे जरा थोडी जास्त व्हरायटी आहे. ती म्हणाली माहीत आहे मला येतेच. ती तिच्या घरातून आणि आम्ही आमच्या घरातून निघालो. तिचे घर लांब आहे म्हणून तिला यायला उशीर होईल म्हणून आम्ही पण जरा उशीरानेच बाहेर पडलो. रस्त्यात वाटेतच तिच फोन आला की मी केसर मध्ये आहे. तिला सांगितले की आम्ही ५ मिनिटातच पोहचत आहोत. तिथे गेलो तर तिने शेवपुरी, पनीर टिक्का आणि छोट्या इडल्यांची ऑर्डर आधीच दिली होती. मी तिला केसर सांगितले कारण तिथे भेळ, पाणिपुरी, शेवपुरी अशी थाळी मिळते आणि आम्ही अजून ती कधीच घेतली नव्हती. अर्थात तिला ते माहीती नव्हते. आज मी भेळ, पाणीपुरी आणि शेवपुरी खाल्ली अमेरिकेत पहिल्यांदाच. भारतीय उपाहारगृहामध्ये मिळते पाणीपुरी भेळपुरी इत्यादी पण जेवणाच्या वेळी घेत नाही ना! आणि इतकी चांगली पण नसते. शिवाय सर्वच्या सर्व घेत नाहीच. एखादवेळेस एखादे काहीतरी घेतो. केसर मधली खूपच चविष्ट होती ! आम्ही अंधेरीत असताना दर महिन्यात मी पार्ल्यात जाऊन पाणीपुरी, भेळपुरी, शेवपुरी, रगडापॅटीस आणि सर्वात शेवटी मसाला पुरी खायचे ! त्याची आज खूप आठवण आली आणि आज मात्र आत्मा खऱ्या अर्थाने तृप्त झाला.
 
 
विनुने उताप्पा घेतला. नंतर आम्ही दोघींनि मिळून व्हेज बिर्याणी घेतली. मी व तिने अगदी थोडीच खाल्ली. पनीर टिक्का आम्ही खाल्ले नाही कारण पनीर आम्हाला दोघांनाही आवडत नाही. सोनाली म्हणाली चालेल. मी बांधून नेते माझ्या मुलाकरता, तो खुश होईल. बिल तिनेच दिले ! उपाहारगृहामध्ये खाण्याबरोबर २ तास मनसोक्त गप्पा मारल्या. नंतर आम्ही आमच्या घरी आलो. तिला सांगितले की आता रात्रीची जेवूनच घरी जा. ती म्हणाली नको माझा मुलगा घरी एकटाच आहे. घरी आल्यावर परत गप्पांचे सत्र सुरू झाले. ती चहा कॉफी काहीच घेत नसल्याने तिला गरम पाणी प्यायला दिले. आम्ही दोघांनी चहा घेतला आणि ती ६ ला आमच्या घरातून निघाली. तिला खाऊ दिला आणि मी लिहिलेल्या २ पुस्तकांच्या ३ प्रति दिल्या. एक तिच्यासाठी, एक तिच्या आई साठी आणि एक तिच्या सासूबाईंसाठी. वेगवेगळ्या विषयांवर आमच्या तिघ्यांच्याही गप्पा खूपच रंगल्या होत्या ! अधुन मधून हास्याचे फवारे उडले.सोनाली ही आमची मनोगती मैत्रिण आहे. २००५ साली आमची मनोगत या मराठी संकेतस्थळावर भेट झाली. तिची व आमची पहिली भेट भारतभेटीत २००८ की २०१०? साली झाली. आम्ही न्यु जर्सीत रहायला आल्यावर आम्ही त्यांच्याकडे व सोनली प्रसन्ना आमच्याकडे आले होते. त्यानंतर आजची ही अचानक भेट झाली! फोन भेट होतेच. तब्येतीच्या चोकश्याही करतो. इतरही काही बोलत राहतो. आमच्या दोघांच्याही मित्र/मैत्रिणींची ऑर्कुट- फेसबुक , मनोगत, आणि इतरत्र झालेल्या मित्रमैत्रिणींची भेट झाली की आम्हाला दोघांनाही अगदी मनापासून खूपच आनंद होतो ! मनमोकळ्या गप्पा, खळखळून हासणे यामुळे एनर्जी मिळते. एक प्रकारचे टॉनिकच म्हणायला हवे, नाही का? Rohini gore
 














 

Friday, March 08, 2024

महिला दिनाच्या निमित्ताने ..... 8 March 2024

 काल सकाळी उठले आणि नेहमीप्रमाणे फेबुवर गेले. छंद नावाच्या ग्रुप वर राधिका ताईंनी थीम लिहिली होती ती म्हणजे गाणं गायची. गाणं म्हणून ते रेकॉर्ड करायचे आणी पोस्ट करायचे. अशा काही थिमा आल्या ना की माझी लगेचच चुळबुळ सुरू होते. भाग घ्यावासा वाटतो. ऑनलाईन भाग घेणे ऑर्कुट पासूनच सुरू आहे माझे ! २००६ साली आणि नंतर २०१० फेबुवर. निबंध स्पर्धा, रेसिपी स्पर्धा, गाण्याच्या भेंड्या इत्यादी. पूर्वी मनोगतावर मी मराठी गाण्याच्या भेंड्या सुरू केल्या होत्या. त्या खूपच गाजल्या. अर्थात त्यावेळेला गाणी म्हणायची नाही तर लिहून पाठवायची होती. भारतात जेव्हा सकाळ उगवायची तेव्हा भारतातले मनोगती भाग घ्यायचे आणि काही तासांनंतर अमेरिका, युरोपवाले क्रमाक्रमाने जागे होऊन भाग घ्यायचे. या धाग्यात शेकड्याने मराठी गाणि टाईप केली गेली होती. ऑर्कुटवर एकीने दर बुधवारी ऑनलाईन भेंड्याही सुरू केल्या होत्या.


तर काल जेव्हा छंद ग्रूप वर गाण्याची थीम आहे असे कळाले तेव्हा कोणते गाणे म्हणायचे याची उजळणी मनात सुरू झाली. रेकॉर्ड न करता नुसती म्हणली. काही गाणी मनात होती ती अशी की माझे आवडते गाणे पहिले म्हणून बघितले ते म्हणजे जरासी आहट होती है तो दिल सोचता है, रिमझिम गिरे सावन, कब आओगे बालमा, मराठी गाण्यांची शीर्षक गीते, अशी काही गाणी मनात आली आणि ती नुसती म्हणून बघितली. अर्थात गुगलमध्ये त्या गाण्याचे बोल बघूनच. कालचा सबंध दिवस रेकॉर्डिंग मध्ये गेला आणि हाती काहीच लागले नाही. काल माझी अवस्था कवि लोकांसारखी झाली होती. कागदावर सुचेल ते लिहायचे, आवडले नाही की कागदाचा चोळामोळा करून कागद फेकून द्यायचा. असे खोलीभर कागद जमा झाले तरी मनाप्रमाणे कविता काही होत नाही. तसेच मनासारखे रेकॉर्डिंग काही झाले नाही. दुपारी थोडी पडले होते शांतपणे. संपूर्ण आठवड्यात भरपूर पाऊस, ढगाळलेले आकाश, सूर्यदर्शन नाही. त्यामुळे डल्ल वातावरण. रेकॉर्डिंग साठी नीट जागा सापडत नव्हती. एकदा डायनिंग टेबलवर मोबाईल ठेवून खुर्चीवर बसून गाणे म्हणून पाहिले, तर एकदा सोफ्यावर बसून. कागदावर काही गाणी लिहून घेतली. म्हणताना चुक होउन कसे चालेल? आवाज पण बरा लागला पाहिजे ना ! मग विचार केला जाऊ देत नकोच भाग घ्यायला. रात्री झोप कुठची यायला ! कारण ८ मार्च भारतीय वेळेनुसार थिम घोषित होणार होती. मोबाईल जवळच घेऊन बसले होते. कोणि गाणी टाकली बघत होते. गाण्याला लाईक करत होते. एकीकडे विचार चालू होते. कोणते गाणे म्हणावे?

 

 
शाळा - कॉलेज मध्ये असताना काही गाणी तोंडपाठ होती. अभिमान, तेरे मेरे सपने, शर्मिली. आता सराव नसल्याने कोणतीही गाणी तोंड्पाठ नाहीत. कसे काय सर्व जमणार? असे विचार चालू होते. पहाटे झोप लागली. उठले आज आणि परत काही गाणी म्हणून पाहिली. आदल्या दिवशी रात्री कोणती गाणी आठवतात ती आठवून पाहिली. मनातल्या मनात म्हणूनही पाहिली. आजा रे मै तो कबसे खडी इसपार, आणि अजून काही गाणी मनातल्या मनात म्हणतच झोप लागली होती. आज महिला दिनानिमित्ताने फिमेल सोलोच गाणी म्हणायची होती. नंतर वाटले निगाहे मिलाने को जी चाहता है म्हणायचे का? किंवा किसी लिए मैने प्यार किया म्हणायचे? गाणी एकेक करत आठवत होते. कब आओगे बालमा आणि आई भोर सुहानी ही गाणी म्हणायची असे ठरले. अजून दोन माझ्या आवडीची मराठी मालिकेची शीर्षक गीते म्हणायची असेही ठरले. आभाळमाया आणि या सुखांनो या ही दोन्ही गाणी मला खूप आवडतात. फुलाला सुगंध मातीचा हे पण आवडते.
युट्युबवर मी पूर्वीच काही गाणि रेकॉर्ड केली आहेत पण ती डिजिटल कॅमेरावरून. नंतर मोबाईल वरूनही केली आहेत. पण त्यात मी माझा चेहरा दाखवला नाहीये. गाणं म्हणताना माझ्याकडे कोणी पाहिले की मी गडबडते. मोहिनी अंताक्षरी मध्ये पण चेहरा दाखवावा लागत नाही त्यामुळे चांगले वाटते. चेहरा दाखवून सेल्फी रेकॉर्डिंग हे पहिलेच होते माझे. भारतभेटीत मी एक गाणे गायले होते घरच्या घरीच. ते माझ्या भाची सईने माझ्या नकळत रेकॉर्ड केले होते. तिचे मला खूपच कौतुक आहे. तिने रेकॉर्डिंग छानच केले होते ! ते आणि आजचे माझे मी केलेले सेल्फी रेकॉर्डिंग !

मोबाईल ठेवायला माझ्याकडे स्टॅंड नाही की स्टीक नाही. एका डब्याला मोबाईल टेकवून रेकॉर्ड केले. सोफ्यावर बसून मोबाईल असाच डब्याला टेकवून रेकॉर्ड केले. तरी कोणतेच मनासारखे झाले नाही. शेवटी फोन हातात घेतला आणि म्हणले. चेहरा गंभीर होता. छे असे नको. परत रेकॉर्ड केले आणि त्यात थोडी मान हालवली, हास्यमुद्रा थोडीशी आणि हातात कागदावर लिहिलेले गाण्याकडे बघून गाणे म्हणले आणि ते आवडून गेले. तर आज मी दोन-तीन गाणी रेकॉर्ड केली आणि "आई भोर सुहानी" हे गाणे मला बरे वाटले आणि छंद मध्ये पोस्ट केले. वेळेत झाले सगळे. कारण की भारतात ८ मार्च संपायच्या आधीच पोस्ट करायचे होते. आई भोर सुहानी हे बेकसूर मधले गाणे आहे. १९५० सालातला हा चित्रपट - मधुबाला वर चित्रित झाले आहे.

तर अशा रितीने छंद ग्रुपवरच्या या थीममुळे आतरराष्ट्रीय महिला दिन साजरा झाला. आज स्वच्छ सूर्यप्रकश होता. हौस किति ती गाण्याची ! मी गाणे शिकलेली नाही. मराठी/हिंदी गाणि युट्युबवर ऐकायला आवडतात. रेडिओवर लागणारी गाणी ऐकण्यासाठी तर मी नेहमीच उत्सुक असते. गाणं ऐकणे हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. विनुचाही ! सर्वांना महाशिवरात्रीच्या आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !Rohini Gore. 


 

Wednesday, February 21, 2024

२१ फेब्रुवारी २०२४

 

आजचा दिवस आळसात गेला. आनंदातही गेला. फेबुच्या आठवणी मध्ये आज रोजी २०२० साली महाशिवरात्र होती. मी अपलोड केलेला फोटोही पाहिला आणि छान वाटले. दिवस आनंदात गेला याचे कारण सविताने लिहिलेली इमोजीवाली मेल ! त्या मेल मध्ये तिने माझ्या दोन्ही ब्लॉगचे आणि फोटोग्राफीचे कौतुक केले होते. आम्ही लहानपणच्या मैत्रिणी बरेच वर्षांनी माझ्या ब्लॉग मुळे (आणि तो ब्लॉग तिच्या वाचनात आल्याने) परत भेटलो. तिने व मी मेसेंजरवर मारलेल्या गप्पाही आठवल्या. मागच्या वर्षी मी आईला घेऊन तिच्या कॅफेत गेलो होतो तिला भेटायला. मला व आईलाही तिचा कॅफे पाहायची खूप उत्सुकता होती. गोखले नगरलाही जायचे होते त्यामुळेही एकत्र अशी ही ट्रिप खूपच छान झाली. भाग्यश्रीची पण भेट झाली. दुसऱ्या एका कारणाने आज मी जरा अस्वस्थ आहे. अगदीच तसे म्हणता येणार नाही. मी इंगल्स मध्ये नोकरी करत होते आणि तिथल्या गमतीजमती लिहीत होते ब्लॉगवर आणि फेबुवरही. ते पण फेबुच्या आठवणीत आले होते. पण त्यात मी माझा एक फोटो लावला होता. तो त्या पोस्ट मध्ये नाहीये. बहुतेक मी तो काढला आहे. का काढला होता तेही आठवत नाहीये. तो फोटो मी सगळीकडे शोधला. मिळतच नाहीये.
 
 
फोटोच्या बाबतीत मी खूपच चोखंदळ आहे. कुठे गेला असेल तो फोटो? या विचारात आहे मी आज सबंध दिवस. तो फोटो वेगळाच होता. ती पोस्ट शेअर करणार होते पण केली नाही. काम करता करता विकीने माझ्या टी शर्ट वर अनेक लेबल्स चिकटवली होती. त्यामुळे तो फोटो जरा वेगळा होता. त्या दिवशी डेली सेक्शनला बदला बदली होत होती. धावपळ चालली होती. गिचमिड होत होती. आम्ही जे पदार्थ बनवत होतो त्याकरता लागणारे साहित्यही नीट सापडत नव्हते. काही वेळा मला फोटो मिळतात. तसा हा का नाही मिळाला याचा विचार करत्ये. आज बिनाका गीतमालाचे निवेदक अमीन सयानी यांचे निधन झाले. युट्युबवर आता काहीही सापडते. त्यामुळे मी लगेच शोधले आणि बिनाका गीतमालाची काही गाणी आणि अमिन सयानींचे निवेदन असेही ऐकत होते. आज रेडिओवर मला रेडिओ मिरची नावाचे अजून एक स्टेशन सापडले. परवा मी अजनबी सिनेमा पाहिला. हम दोनो दो प्रेमी दुनिया छोड चले हे गाणे आहे त्यात. पुढे पुढे सरकवत पाहिला. पूर्ण पाहीलाच नाही. कंटाळवाणा सिनेमा आहे. त्यात शेवट काय आहे ते आता नंतर कधीतरी बघेन. इंटरनेट मुळे सर्व काही जुने सापडते ना ! मित्रमैत्रिणी तर सापडतातच. शिवाय जे हवे ते सर्व काही मिळते. 
 
गुगल महाराज की जय हो ! आणि आता युट्युबवर इतकी चॅनल्स झालेली आहेत की काही वर्षातच माणशी एक चॅनल होईल जसे की माणशी एक टु व्हिलर किंवा एक कार !Rohini Gore

Tuesday, February 13, 2024

१३ फेब्रुवारी २०२४

 

आज म्हणे रेडिओ डे आहे. किस डे, हग डे, उद्या वॅलनटाईन डे, अमुक डे आणि तमुक डे. मला रेडिओ वर गाणी ऐकायला खूपच आवडते ! सध्या मी रोज दुपारी २ तास रेडिओ जिंदगी वर गाणी ऐकते. मस्त वाटते. आजही ऐकत होते. पलभरके लिए कोई हमे प्यार कर दे, कही दूर जब दिन ढल जाए, अशी छान छान गाणी लागत होती. आमच्याकडे आज स्नो डे होता. भाकीत होते की ७ ते ८ इंच पडेल पण ३ इंच पडला. रात्री अगदी थोडा आणि सकाळी ८ ते १२ दरम्यान पडला. सकाळीच बाहेर चालून येण्याचा विचार होता पण म्हणले नको. जेवणानंतर थोडी आडवी झाले. रेडिओ ऐकायला सुरवात केली होती. ऍनिमल नावाचा महाभयानक सिनेमा पहायचा इरादा होता. सुरू पण केला होता. एका ग्रुपवर वाचले होते परिक्षण आणि हा सिनेमा नेटफ्लिक्स वर आहे असेही कळाले होते. तापमान पाहिले. ते बऱ्यापैकी चांगले होते. गरम गरम चहा घेतला आणि सर्व जामानिमा घालून चालून आले. निसर्गाचे रूप नेहमीच छान असते. मी पूर्वी डोंबिवलीत रहात असताना पाऊस सुरू झाला की लगेचच छत्री घेऊन चालून यायचे.
 
 
सकाळी आज तिखटमीठाचा शिरा खावासा वाटला. जरा काहीतरी वेगळे म्हणून शिऱ्याची मूद पाडली. स्नो डे असला की नेहमीच मी चमचमीत खायला करते. तसे जेवायला बटाटेवडे, कोशिंबीर, भात आणि तोंडल्याची रस भाजी केली. फिरून आल्यावर डोके भणभणायला लागले आहे. आज मी एकटीच भुतासारखी चालत होते. रस्त्यावर २/४ वाहने होती. सफाई कामगार बर्फ साफ करण्याचे काम करत होते. चिखल झाल्यावर तो कसा बाजूला सारतात तसाच बर्फही सारतात आणि चालणाऱ्यांना वाट मोकळी करून देतात. तसा आजचा दिवस खूप उत्साहात नाही गेला. Rohini Gore ..