Friday, March 29, 2024

सुंदर माझं घर ..... (२)

 

आयायटी - पवईच्या आवारात काहीही मिळत नसल्याने आम्हाला गेटच्या बाहेर भाजीपाला आणि वाण सामान आणण्याकरता जावे लागे. रस्ता क्रॉस केल्यावर मोजकीच काही दुकाने होती. त्यात महाराष्ट्र ग्रेन नावाचे वाणसामानाचे दुकान होते. तिथे मी दर महिना सामानाची यादी टाकायचे आणि सामान घरपोच यायचे. या दुकाना शेजारीच एका केरळी माणसाचे भाजीचे दुकान होते पण तिथे सर्वच्या सर्व भाज्या मिळायच्या नाहीत. माझी मुंबईत भाजी खरेदी करण्याची पहिलीच वेळ होती. पुण्यात आईकडे असताना आम्ही दोघी बहिणी आईबरोबर मंडईत जायचो. मुंबईत भाजी ठेवण्यासाठी कॅरी बॅगा मिळत. शिवाय ४ आण्याचा मसालाही मिळतो हे माझ्यासाठी नवीन होते. या मसाल्यात मिरच्या, कोथिंबीर, कडीपत्ता आणि आलं मिळायचे. मी व भैरवी एक दिवसा आड भाजी खरेदीसाठी जायचो. भाजी दुकानाच्या थोडं पुढे गेले की एक लक्ष्मी नावाचे टपरीवजा हॉटेल होते. तिथे आम्ही दोघे कुल्फी खायचो. ही कुल्फी ६ रूपयाला मिळायची. गोल आकाराची कुल्फी एका स्टीलच्या छोट्या थाळीत मिळत असे. चांगली जाडजूड असे.


लग्नानंतर आम्ही आमच्या सणांना पुण्याला जायचो. आम्ही रिझर्व्हेशन करून कधीच गेलो नाही. रेल्वे मध्ये उभे राहून प्रवास करायला आम्हाला मजा वाटायची. आम्ही पुण्याला जायचो तसेच डोंबिवलीलाही अधुन मधून जायचो. महाराष्ट्र ग्रेन किराणामालाच्या दुकानात अमुल श्रीखंड मिळायचे व त्रिकोणी जाड पुठ्याच्या अमुल दुधाच्या पिशव्या मिळायच्या. ह्या पिशव्या आयत्यावेळी कोणी आले तर चहा करण्यासाठी उपयोगी पडायच्या. नंतर आयायटी ते घाटकोपर बससेवा सूरू झाली. ही बस सूरू झाली तेव्हा आम्हाला खूप उपयुक्त ठरली. त्यावेळेला घाटकोपरला जाऊन पाणी पुरी व भेळ पुरी खाणे होत असे. एकदा उन्हाळा सुरू झाला तेव्हा मी व भैरवीने घाटकोपरला जाऊन गार पाण्याचे "माठ" आणले होते बसमधून!! गाऊनही घेतले होते.


भाजीच्या दुकानातला केरळी मुलगा रोज रात्री वसतिगृहात यायचा २ मोठ्या पिशव्या घेऊन. त्यात केळा वेफर्स, सर्व प्रकरची बिस्कीटे, चिवडे, फरसाण ब्रेड व अंडी असायची. एकदा आम्ही सर्व बायकांनी मिळून त्याला पटवले की आमच्याकरता तू रोज भाजी आणशील का? त्याने अजिबात आढेवेढे घेतले नाहीत कारण त्याचीच भाजी विकली जायची. जेव्हा तो मुलगा केळा वेफर्स वगैरे घेऊन यायचा तेव्हा आम्ही बायका भाज्यांची यादी तयार ठेवायचो व त्याला द्यायचो. तो दुसऱ्या दिवशी सकाळी भाजी आणून द्यायचा. वसतिगृहामध्ये आमच्या कोणाचे फोन आले की रखवालदार खूप जोराने ओरडून नंबर पुकारायचा. आमच्या खोल्या तिसऱ्या मजल्यावर होत्या. जिने भराभर उतरून खाली जास्तपर्यंत काही वेळा फोन ठेवलेला असायचा. आईबाबा मला फोन करायचे माझी खुशाली विचारण्याकरता. तिथे खालीच एका बोर्डवर आम्हाला आलेली पत्रे असायची. त्यात पोस्ट कार्ड व इनलॅंड पत्रेही असायची. त्यात आईबाबांचे पत्र आलेले दिसले की मला खूपच आनंद होत असे. पत्रे वाचताना मनामध्ये त्यांचे चेहरे उमटत. मी पण आईबाबांना पत्रे लिहायचे पण त्यात मी केलेल्या पदार्थ्यांच्या रेसिपीच जास्त असायच्या.
६ महिन्या नंतर विनुची शिष्यवृत्ती १२०० वरून २१०० रूपये झाली. डोंबिवली मधल्या जागेत पेइंग गेस्ट पण नंतर मिळेनात म्हणून ९०० रूपये हफ्ता दादांना पाठवून आम्ही परत १२०० मध्येच होतो. शिष्यवृत्ती वाढल्यावर पहिले काय केले असेल तर २ गाद्या, २ उशा, करून घेतल्या. नंतर मला कळाले की आयायटीच्या बाहेर एक बाई शिवण शिकवते. त्यामुळे मी शिवणाचा क्लास लावला व धुणे-भांडी-केर-पोछाला भारतीला काम दिले. ही मुलगी खूप चुणचुणीत होती. हा क्लास दुपारी ३ ते ५ होता आणि खूपच लांब मी जाता येता चालत जायचे. मला पंजाबी ड्रेस आणि ब्लाऊज शिवायला शिकायचे होते. त्या बाई म्हणाल्या आधी बाळाचे छोटे कपडे, म्हणजे लंगोट, झबली टोपडी शिवा म्हणजे तुम्हाला सराव होईल.


एके दिवशी आम्हाला कळाले की लग्न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ब्लॉक्स देणार आहेत आणि ते सुद्धा लाकडी सामानासह! आम्ही रोज पहायला जायचो बांधकाम कुठपर्यंत आले आहे ते पाहण्यासाठी. नाव पण किती छान "तुलसी" ब्लॉक्स. हे एका छोट्या टेकाडावर होते वसतिगृहाच्या आवारातच! छोट्या टेकाडावर असल्याने भरपूर वारे!! हे ब्लॉक्स खूपच छान नवे कोरे करकरीत होते. यामध्ये एक मोठा हॉल व त्याला लागून बाल्कनी होती. बाल्कनीला काच असलेली दुमडती दारे होती. बाल्कनीत उभे राहिले की थंडगार वाऱ्याच्या झुळका यायच्या. या दाराला पडदा मी शिवला होता. स्वयंपाकघर व हॉलच्या मधे नाडीवर्कचा पडदा लावला होता. स्वयंपाकघराला मोठाल्या काच लावलेल्या खिडक्या होत्या. त्याची दारे सरकती होती. कडप्प्याचा गुळगुळीत ओटा होता. या घरातही स्वैपाकघरात कोनाडे होते. त्यात मी सर्व डबे, पातेल्या, भाज्यांच्या टोपल्या ठेवल्या होत्या. एका कोनाड्यात देव्हारा होता. फरशा पण छान गुळगुळीत होत्या. हॉलमध्ये भिंतीतले मोठे कपाट होते. मोठा, बेड, टेबल, खुर्च्याही होत्या. टेबलाचा उपयोग आम्ही डायनिंग म्हणून करत होतो. याच टेबल खुर्चीवर बसून मी आई बाबांना पत्रे लिहायचे. त्यावरच आमचा ट्रान्झिस्टर पण ठेवला होता. दुपारी विनु जेवायला घरी आला की जेवायला बसायचो.


दुपारच्या जेवणानंतर थोडावेळ आम्ही दोघे वामकुक्षी घ्यायचो. बाल्कनीच्या लगतचा दरवाजा होता त्याला पडदा होता. तो पडदा दोन्ही बाजूने बंद करून घ्यायचो. बाईकचा हॉर्न वाजला की विनायक उठून परत लॅबला जायचा. विनायकचा मित्र देसाई त्याला जेवायला येताना व जाताना बाईकने सोडायचा. संध्याकाळी परत दोघे यायचे. मी चहा पोहे बनवायचे व ते खाऊन परत दोघे लॅब मध्ये जायचे. रात्रीच्या जेवणानंतही परत लॅब मध्ये काम ! मी काहीवेळा विनुला चिडून म्हणायचे माझ्याशी लग्न कशाला केले? लॅबशीच करायचे. मोठ्या बेड शेजारची रिकामी जागा होती तिथे गादी व त्यावर बेडशीट व मागे उशा ठेवल्या होत्या भिंतीला टेकून. यावर दुपारचे बसणे होत असे. या जागेमध्ये बाथरूम , कमोड , व वॉश बेसिन होते इमारत गोलाकार होती. बाहेरून जीने खूप वेगळे व छान होते.


शिष्यवृत्ती वाढल्याने काहीनी छोटे टीव्ही तर काहीनी टु-इन वन घेतले होते. मला आठवत आहे आमची पहिलीवहिली खरेदी टु-इन - वनची. त्यात आम्हाला एक कॅसेट फ्री मिळाली होती. ती आम्ही आँधी व मौसमची घेतली होती. या ब्लॉकमध्ये मी आँधी चित्रपटातले "तुम आ गये हो नूर आ गया है... " हे गाणे बरेच वेळा ऐकले. . या टु-इन-वन मध्ये मी रेडीओवरची आवडती गाणी टेप केली होती. रेडिओ वर गाणे लागले की मी त्यातच असलेल्या टेप रेकॉर्डरचे प्ले+ रेकॉर्डचे बटन दोन्ही एकत्रच दाबायचे म्हणजे रेडिओवर लागलेले गाणे आपोआप टेप मधल्या कॅसेट वर रेकॉर्ड व्हायचे. आमच्या या घरी ४ दिवस आई बाबा रहायला आले होते तेव्हा टु-इन-वन वर बाबांनी आणि मी असे एकेक गाणे रेकॉर्ड केले होते. बाबांनी "वाजवी पावा गोविंद" हे गाणे गायले. बाबा गाणे रेकॉर्ड करत आहेत ते लक्षात आले नाही. मी आणि आई स्वयंपाकघरात जोरजोरात गप्पा मारत होतो आणि मी भांडी लावत होते ते आवाज पण रेकॉर्ड झाले ! पण ही आठवण कायमची होऊन गेली.


तुलसी ब्लॉक्स मध्ये मी माझ्या बहिणीचे म्हणजेच रंजनाचे डोहाळेजेवण केले. भैरवीकडून अन्नपूर्णा पुस्तक आणले व त्यातून रेसिपी शोधून स्वयंपाक केला होता. गाजर घालून भात केला. टोमॅटो सूप व बटाट्याचे पराठे बनवले. कोबीची भजी केली व गोड म्हणून शेवयाची खीर बनवली. नेमका गॅस संपल्याने सर्व स्वयंपाक स्टोव्ह वर करायला लागला. रंजना म्हणाली की तू आधी सर्व स्वयंपाक उरकून घे. मग मी बसल्या बसल्या पराठे करते. तिचे पराठे होईपर्यंत मी पानाची तयारी केली. रांगोळी काढून मग आम्ही चोघे म्हणजेच रंजना, सुरेश मी व विनायक जेवायला बसलो. रंजनाला द्यायला म्हणून एक साडी आणली होती. ही साडी आम्ही दोघांनी घाटकोपर मधल्या एका दुकानातून आधीच खरेदी करून ठेवली होती. तिचा रंग निळा व थोडा मोरपंखी रंगाकडे झुकणारा होता. त्यावर मॅचिंग ब्लाऊज पीसही आणले होते. रंजना व सुरेश काही कामानिमित्ताने मुंबईला आले होते आणि म्हणूनच आमच्या घरी आले होते. मी तसे त्यांना फोन करून कळवले होते. मला तिचे डोहाळेजेवण करता आले म्हणून मला खूप आनंद झाला होता.घाटकोपरवरून छोटे छोटे खूप सुंदर फ्रॉक आणले. त्याचे रंगही मला अजून आठवतात. गुलाबी, लाल, आकाशी, पिवळा ! मी आधी शिवलेले सर्व लंगोट, झबली टोपडी मी स ईच्या बारशाला दिली. मी तिला चांदीच्या तोरड्याही दिल्या. मला खूपच आनंद झाला होता. आम्ही दोघेही रंजनाच्या डोहाळेजेवणाला आणि सईच्या बारशाला उपस्थित होतो. विनायकचे भाऊ व भावजय त्यांच्या लग्नानंतर आमच्या जुन्या हॉस्टेल म्हणजेच एच ११ ला आली होती. वसुधाला मी साडी घेतली होती. त्याचा रंग लाल होता आणि दीराला शर्टपीस.


विनायकची शिष्यवृत्ती संपल्यावर आम्हाला तुलसी ब्लॉक्स सोडावे लागले. आम्ही आमच्या सामानाची बांधाबांध केली. आमच्या घरी जे पेईंग गेस्ट होते त्या वाजपेयींनी आमच्याकरता टेंपो ठरवला होता पण तो आलाच नाही. शेवटी वाट पाहून पाहून आशा म्हणाली की तुम्ही आमच्याकडेच जेवा. त्या दिवशी तिने वांग्याचे भरीत व भाकरी केली होती. दुसऱ्या दिवशी पण दुपारपर्यंत टेंपो आलाच नाही. शेवटी आम्हीच एक टेंपो ठरवला व डोंबिवलीस जायला निघालो. दुपारचे जेवण परत आशाकडे केले. तिने इडली सांबार केले होते. आयते इडली सांबार खायला खूपच छान वाटत होते. निघताना भैरवी, आशा होत्या. आम्ही त्यांचा निरोप घेतला. आशाच्या डोळ्यात पाणी आले. मी पण रडले. भैरवीने माझा डोंबिवलीचा पत्ता तिच्या डायरीत लिहून घेतला. ती अमेरिकेत तिच्या नवऱ्याबरोबर जाणार होती. ती म्हणाली की मी तुला पत्र पाठवीन. आशा म्हणाली की डोंबिवलीवरून तू केव्हाही येत जा रोहिणी माझ्याकडे. स्वरदा डिपार्टमेंटला गेली होती त्यामुळे तिची भेट झाली नाही. आमच्याकडे सामान खूपच कमी होते. आमच्या दोघांच्या बॅगा, गाद्या उशा, पांघरूणे आणि भांडीकुंडी. सर्व सामान पोत्यात भरले. गाद्यांची एक वळकटी तयार केली होती. टेंपोत आमचे सामान टाकले. मी व विनायकही टेंपोत सामानासोबत बसलो आणि आमचा टेंपो डोंबिवलीच्या दिशेने निघाला. सोबत मित्रमैत्रिणींच्या छान आठवणी होत्या. टेंपोत मागे बसल्याने आमच्या डोळ्यासमोरून मागचा दिसणारा रस्ता भराभर पुढे सरकत होता. अंतःकरण खूप जड झाले होते. आता पुढे काय? स्कॉलरशिप संपली होती. रहायला फक्त आमचे घर होते. थिसीस लिहून पूर्ण करायचा होता. डोंबिवलीच्या जागेत झोपण्यासाठी एक कॉट सोडली तर दुसरे काहीही सामान नव्हते. माझे मन तर डोंबिवलीच्या जागेत जायला मुळीच तयार नव्हते. Copy Right (Rohini Gore )
 
क्रमश : ...

No comments: