Tuesday, January 31, 2023

भारतभेट २०२२ - महाएपिसोड

 

३ जानेवारीला संध्याकाळच्या सुमारास (६ वाजता) आम्ही दोघे केके ट्रॅव्हलच्या गाडीत बसलो. बुधवार होता त्यामुळे सर्व कामावर गेले होते. रविवार असतो नेहमी आमचा तिकडून निघण्याचा दिवस पण यावेळेला बुधवार होता. रविवारी आम्ही निघताना रंजना, सई, विनुचा मित्र हरीश, ऋजुता असतात. यावेळी आई एकटीच होती. तिला म्हणले की आपण ५.३० वाजताच खाली जाऊन बसू म्हणजे नंतर घाई व्हायला नको. शेजारची सोनु आली आणि ती म्हणाली की तिच्या आईने सांगितले आहे की तू बाहेर जाऊ नकोस. आजीला खाली घेऊन जायचे आहे. मीच तिच्या आईला तसे सांगितले होते. तर ती म्हणाली काकू काही मदत हवी असेल तर सांगा. आई म्हणाली अगं नको तिला कुठे जायचे असेल तर जाऊ देत. इथे खाली सगळ्या जणी बसतात मला कोणी ना कोणी सोडेल. तर सोनु म्हणाली काकू मी थांबते. तिने व विनायकने सर्व बॅगा लिफ्ट ने खाली नेल्या. मी काही राहिले नाही ना हे बघितले आणि आईला लिफ्ट मधून खाली नेले आणि आईला घराची किल्ली दिली. असे केल्याने मला आई सोबत बाकावर थोडावेळ का होईना निवांत बसता आले. एकेक करत आईच्या सर्व मैत्रिणी बाकड्यावर बसायला आल्या. गप्पा टप्पा होत होत्या. केके चा फोन आला आणि मागोमाग काही मिनिटातच गाडी पण आली. मला खूपच रडू फुटले. आईच्या चेहऱ्यावरून, डोक्यावरून मायेचा हात फिरवला. तसे मला नेहमीच रडू फुटते पण यावेळी जरा जास्तच. कारण की आता बाबा नाहीत आई एकटीच आहे हे चांगलेच जाणवत होते. सर्व मैत्रिणी म्हणाल्या अगं तू आईची अजिबात काळजी करू नकोस. आम्ही आहोत सगळ्या. ठकार काकू तर म्हणाल्या तुम्ही तिकडे दोघच्या दोघे असता. तुम्हीच एकमेकांची काळजी घ्या. आई म्हणाली रडू नकोस. हासत जा. केकेची गाडी निघाली. मागच्या काचेतून परत एकदा आईला बघितले आणि खूप ओक्साबोक्शी रडले. मुंबई विमानतळावर आलो आणि ब्रिटीश ऐअरवेजच्या रांगेत उभे राहिलो. बरेच आधी ये ऊन पोहोचलो होतो. बघता बघता रांग वाढली. मुंगी पण पटपट तिच्या चालीने पुढे जाईल इतकी रांग त्याहीपेक्षा हळूहळू पुढे सरकत होती. २ काउंटर्स उघडले होते. एकाचे बॅगेत सामान खूप होते म्हणून त्याला तिथून जायला सांगितले. तो काही वेळाने परत आला आणि बॅगा दिल्या. नंतर एक माणूस पुढे सरकला. दुसऱ्या काउंटर वर माणसे रांग सोडून तिथे घुसत होती. हा काय प्रकार चालू आहे आम्हाला कळेना ! तितक्यात दोन माणसे त्यांच्या अवाढव्य ४ बॅगा घेऊन आली आणि आमच्या नंबराच्याही आधी घुसली.
 
 
विनायक जाम चिडला. आम्ही यांना घुसू देणार नाही. त्याच्या बरोबरचा ब्रिटीश ऐरवेजचा माणूस म्हणाला की हे तुमच्याही आधी आले आहेत. त्यांच्या बॅगेतले सामान ठराविक वजनाच्या खूप होते म्हणून त्यातले सामान काढून ते परत आले. विनायक म्हणाला की मी बरेच प्रवास केले आहेत पण इतका सावळा गोंधळ कुठेही पाहिला नाही. मी यांना मधे घुसू देणार नाही. तुम्ही त्यांना दुसऱ्या काउंटर वर जायला सांगा. चिडूनच जा जा आधी असे त्याने सांगितले. मग आम्ही पुढे गेलो.आमचे सोपस्कार झाले आणि एके ठिकाणी बाकड्यावर येऊन बसलो. आम्ही नेहमी रिकामी प्लॅस्टीकची बाटली जवळ ठेवतो म्हणजे पाणी भरून आणण्यासाठी आणि पिण्यासाठी बरी पडते. पुण्यावरून ६ वाजता निघालो ते १० वाजता विमानतळावर पोहोचलो होतो. ११ वाजता आम्ही घरून मी केलेली पोळी भाजी खाल्ली. यावेळी बटाट्याची उकडून भाजी पोळीच्या गुंडाळीत होती. भाजी खूप कमी तेल तिखट मीठ घालून केली होती. खाताना अगदी सॅंडविच सारखी चव लागली. पाणी प्यायलो आणि मुंबईहून लंडनला जाणाऱ्या गेट पाशी आलो. विमान पहाटे २ चे होते. शारिरीक आणि मानसिक दोघांनाही खूपच थकायला झाले होते.७ तासांच्या प्रवासानंतर आम्ही लंडनच्या हिथ्रो विमानतळावर पोहोचलो. 
 
 
विमानतळ खूपच गजबजलेले होते. सर्व प्रवाश्यांनी टर्निनल अ वर जा असे फलक होते . तिथे गेल्यावर प्रचंड गर्दी, खाणे पिणे विकत घेऊन बाकड्यावर अनेक जण बसलेले दिसले. आम्ही पण एक चहा घेतला आणि बाकड्यावर बसलो. कोरडे पदार्थ अश्यावेळी उपयोगी पडतात. पार्ले जी ची बिस्कीटे आणि चकली असे थोडे थोडे खाल्ले. वर चहा घेतला. फेसाळलेला चहा मला अजिबातच आवडला नाही. विमान उड्डाणाचे फलक बघत होतो. तिथे हिथ्रोवरून नेवार्कच्या विमानतळावर जाणाऱ्या विमानाचे गेट काही वेळाने लागेल असे लिहिले होते. विमानतळावरची टॉइलेट अजिबात चांगली नव्हती. थोड्यावेळाने पाहिले तर सी टर्निनलला जा असे लिहिले होते म्हणून परत विमानतळावरच्या आगगाडीत बसून आम्ही सी टर्मिनल वर गेलो. तिथे गेल्यानंतरही बऱ्याच वेळाने आमच्या विमान उड्डाणाचे गेट नंबर लागले आणि आम्ही विमानात प्रवेश केला.ब्रिटीश ऐअरवेजच्या सीटा उंच लोकांना चांगल्या आहेत. दोन सीटच्या मधे अंतर बरेच आहे पण मला ते सोयीस्कर नव्हते. पुढची आणि मागची सीट जवळ जवळ असली की मी पुढच्या सीटच्या मागे डोके ठेवते त्यामुळे मला श्वास नीट घेता येतो. काही वेळा डुलकी लागते. किंवा पुढच्या सीटला जो डायनिंग ट्रे असतो तो खाली करून त्यावर छोटी उशी ठेऊन आपण कसे शाळेच्या बाकड्यावर डोके ठेऊन झोपतो ना तसे झोपले की बरे वाटते. त्याहीपेक्षा कोपरे टेकून गालावर हात ठेवले तरी थोडी डुलकी लागते. स्क्रीनवर हिंदी सिनेमे एकदम फालतू होते. क्राईम पॅट्रोल चे काही एपिसोड बघितले ते छानच होते. गेम खेळलो आम्ही दोघे आपापल्या स्क्रीन वर. पत्यांचा डाव, बुद्धीबळ, कौन बनेगा करोडपती (इंग्रजी) हा खेळ छानच वाटला. अजून एक खेळ आहे तो पण खूपच इंटरेस्टीग वाटला. विनायक नेहमीच सुडोकु खेळतो.
 
 
हा विमानप्रवास १० तासांचा होता. विमानात जी थंड हवा फिरत असते ती जास्तच थंड होती. मी नेहमीच माझा जाड स्वेटर, टोपी घालून बसते. हवा खूपच थंड होती. काही विमानात तीच तीच फिरत असलेली हवा कमी जास्त करता येते. इथे तसे दिसत नव्हते. पांघरायला देणारी शाल डोक्यावरून घेतली होती. तश्या त्या गिचमिडीच्या सीट वर बसताना नेहमीच कसरत असते. छोट्या उश्या इकडे तिकडे पडतात. खायला प्यायला आले की त्या छोट्या डायनिंग ट्रे वर जे काही येते ते पण ठेवताना कसरतच करावी लागते. काटे चमचे, थोडे काही गरम, ब्रेड-बटर , चहा- कॉफी, ज्युसेस, पाणी, योगर्ट, केक सगळेच असते एका वेळेला काही ना काही ना काही. भाततुकलीसारखे जेवण असले तरी त्यांनी पोट भरते आणि ताकत येते. काहीवेळा ब्रेकफास्टला रॅप्स किंवा टोस्ट केलेले काही येते. ते काही वेळा नाही आवडत काही वेळा आवडते. यावेळी जे खाल्ले ते अगदीच थोडे पण मला थोडे डचमळायला लागले होते. खाल्ले गेले नाही की ताकद कमी होते. अशक्तपणा जाणवतो. विमानातले रेस्ट रूम म्हणजे 🙁 काय हा त्रास आहे, असे होऊन जाते. तिथे गेल्यावर होत काहीच नाही, पाय फक्त मोकळे होतात.
 
 
१० तासांच्या दीर्घ प्रवासानंतर आम्ही नेवार्कला उतरलो. तिथे सगळ्यांसाठी एकच लाईन होती पण पटापट पुढे जात होती. तिथला एक माणूस सतत ओरडून सांगत होता " हातात पासपोर्ट ठेवा. फोन खिशात ठेवा" खूप मोठी रांग होती तरी काही मिनिटातच आम्ही बाहेर आलो आणि टॅक्सी करून घरी पोहोचलो. अमेरिकेत आल्यावर इथली प्रदुषण विरहीत हवा पाहून हुरूप आला. घरी आलो आणि प्रवासातले घाणेरडे कपडे काढून गरम पाण्याने स्वच्छ अंघोळी केल्या. इकडून भारतात जाताना काही गोष्टी घरात आणून ठेवल्या होत्या. पाणी होते. माझे दूध लॅक्टोज फ्री असल्याने त्याची एक्सपायरी डेट लांबची होती त्यामुळे चहा बिस्किटे खाल्ली. पटकन होणारी खिचडी केली. दही पण होते. पापड भाजले. लोणचे घेतले. विनायकचा डबा भरून ठेवला आणि झोपलो. भारतावरून जेव्हा आपण निघतो त्याच वारी आपण अमेरिकेत येऊन पोहोचतो कारण अमेरिकेचे घड्याळ भारताहून मागे आहे. गुरवारी सकाळी विनायकने व्यायाम केला आणी ऑफीस मध्ये जाऊन आला. तो आला तरी मला पत्ता लागला नाही. मी खूपच ढाराढूर झोपले होते. मी सकाळचा चहा घेतला. नंतर थोडीफार खिचडी खाल्ली होती.
 
 
शुक्रवार पण असाच गेला. मी ढाराढूर झोपले होते. जेटलॅग म्हणण्यापेक्षा हे काहीतरी वेगळेच होते. मी निपचित पडून होते. गुरवारी फ्रीज मधला कोबी चांगला होता म्हणून त्याची डाळ घालून भाजी केली आणि वरण भात लावला. शनिवारी मात्र सामान आणायलाच झाले होते. पाणी-लोणी, वाण सामान, भाजीपाला, दुध, ज्युस असे सर्व काही आम्ही दोघांनी मिळून आणले. शिवाय इंडियन स्टोअर मधे जाऊन भाज्या आणि इतर बरेच काही. त्या दिवशी दोन गोष्टी घडल्या. दीर्घ काळ विमानप्रवासानंतर सगळ्याच गोष्टी बिघडून जातात. भूक, झोप, वेळेच गणित. सेक्युरिटीतून जाण्यासाठी मी सर्व काही माझ्या पर्समध्ये ठेवते. त्यात विनायकचे पाकीट पण ठेवले होते. घड्याळ पण होते. आम्ही तसेच बाहेर पडलो होतो. सॅम्स मध्ये गेलो आणि सामान चेक करून कार्ड काढायला गेलो तर पाकीट घरी राहिलेले. मी म्हणाले मी इथेच थांबते तू घरी जा आणि पाकीट घेऊन ये. बरेच सामान घरी आले. अजून एक गोष्ट घडली ती म्हणजे मी नेहमीच जाड जाकीट घालते. डोक्यावर टोपी असते. ती न घालता पातळ जाकीट घातले. इथे थंडीत विंड चिल नावाचा प्रकार खूप डेंजरस असतो. स्नो परवडतो, थंडीही परवडते. पण थंडीत जोरात वाहणारे गार वारे अजिबातच परवडत नाही. त्याचा जबरदस्त फटका मला बसला आणि माझी तब्येत पूर्णपणे ढासळली.
क्रमश : ....


No comments: