Saturday, October 08, 2022

FB memory October 9 2020

 

photo 1989-90 (me and friend's daughter) IIT - powai - Tulsi blocks 🙂

माझ्या कडेवर असलेली धनश्री, आशाची मुलगी. एक आठवण आहे आशाची आणि माझी. आशा आयायटी मध्ये पिएचडी करत होती. ती तिच्या मुलीला एकीकडे सांभाळायला ठेवायची. त्या सांभाळणाऱ्या बाई कुठेतरी गावाला जाणार होत्या त्यामुळे आशाने मला विचारले की रोहिणी तु काही दिवसांसाठी धनुला सांभाळशील का? मी म्हणाले काही हरकत नाही पण मला अजिबात अनुभव नाहीये. तू जसे सांगशील तसे मी करीन. तर त्याप्रमाणे धनश्रीला ती माझ्याकडे ९ वाजता सोडायची आणि डिपार्टमेंटला जायची. जेवणाकरता सगळेच घरी यायचे. आशा जेवून परत तिला माझ्याकडे ठेऊन जायची. आणि ५ ला ती किंवा जय धनश्रीला न्यायला याायचे. धनश्रीचा काहीच त्रास झाला नाही उलट तिच्याशी खेळायला मजा यायची. ती बरेच वेळा झोपलेलीच असायची. उठली की अजिबात रडणे नाही तर खेळणे सुरू.

माझ्याकडे स्वरदा आणि भैरवी आल्या गप्पा मारायला की त्याही तिच्याशी खेळत बसायच्या. धनश्रीला गालाला हात लावला की हासायची. एकदा मात्र माझी त्रेधातिरपीट उडाली. धनश्री वेळेच्या आधी उठली आणि रडायला लागली. मी तिला कडेवर घेतले की थांबायची. पण मला स्वयंपाक करायचा होता. विनू घरी जेवायला येत असे त्यामुळे मी एकीकडे स्वयंपाक करत होते आणि एकीकडे तिला कडेवर घेत होते. मला पोळ्या करायच्या होत्या त्यामुळे मी तिला खाली दुपट्यावर ठेवले. मग ती परत रडायला लागली. तिला भूक लागली होती की तिला बरे वाटत नव्हते हे मला काहीच कळत नव्हते. मग मी तिला सांगितले रडू नको हं आई येईलच इतक्यात. तिच्या रडण्याने मलाच रडू फूटायला आले होते. तितक्यात आशा आलीच तिला घरी न्यायला आणि मला हलके वाटले. काही वेळा दुपारी भैरवी आणि मी तिच्याशी खेळायचो.

या फोटोची पण मजा आहे. मी तिला कडेवर घेतले होते आणि धनश्री खूप चुळबुळ करत होती. धनश्रीला सांगत होते कॅमेराकडे बघ. आणि सांगता सांगता जय (आशाचा नवरा) म्हणाला की तू पण कॅमेरा कडे बघ आणि त्यामुळेच माझा असा मान वाकडी असलेला फोटो आला आहे. 😃 😃
हे मला त्यावेळीच जाणवले होते. हाहा. धन्यवाद आशा फोटो पाठवल्याबद्दल. मागच्या आठवणी आल्या आणि आयायटीतले दिवस पुन्हा एकदा नव्याने जागे झाले. मी नेसलेली काळी साडी मला सासूबाईनी पहिल्या संक्रांतीची घेतली होती. मला खूप आवडली होती. ही साडी मी खूपच पादडली होती. आणि माझ्या आईने संक्रांतीचा माझ्या पसंतीने पंजाबी ड्रेस घेतला होता त्याची पण प्रखरतेने आठवण झाली. काळा टॉप , सलवार आणि दुपट्टा नारिंगी रंगाचा होता. हा ड्रेस पण मी खूप पादडला होता. जिथे तिथे तोच ड्रेस मी घालायचे.



No comments: