Saturday, May 07, 2022

आठवण स्टीलच्या भांड्यांची

 

लग्नानंतर आम्ही दोघे डोंबिवलीच्या आमच्या फ्लॅट मध्ये रहाणार होतो म्हणून काही नातेवाईक व इतर काही जणांनी आम्हाला स्टीलच्या भांड्यांचा अहेर दिला होता. त्यावेळेस स्टीलच्या भांड्यांचे भारी कौतुक होते. माझ्या सासूबाईंनी काही भांडी आधीच घेऊन ठेवली होती, तर काही भांडी आईने रुखवतात मांडली होती. पूर्वी स्टीलच्या भांड्यांवर ती कोणाकडून आली आहेत आणि कोणाला दिली आहेत यांची नावे कोरायचे. दिनांकही घालायचे.
- पोळ्या ठेवायचा गोल डबा - सासूबाई
- मिसळणाचा डबा - सासूबाई
- तेलाची बरणी - सासूबाई
- ६ ताटे, वाट्या, फुलपात्री - सासूबाई
- भाजी धुवायची रोळी - चुलत सासूबाई
- छोटी परात - मावस चुलत सासूबाई
- दूध तापवायची पातेली - आत्ये सासूबाई (सर्वात मोठ्या)
- स्टीलची बादली - दुसऱ्या आत्ये सासूबाई
- एकात एक बसणारे सर्व डबे - २-३ आत्येसासूबाईनी मिळून
- कळशी - आईकडे कामवाली बाई होती तिचा अहेर
- आयताकृती भांडे - सासूबाईंकडे पोळ्यावाली बाई होती तिचा अहेर
- चहा साखरेचे डबे - रुखवत (आईकडून)
- ठोक्याची पातेली रुखवत (आईकडून) या पातेल्यात फोडणी करता येते
- मोठी परात - आईच्या शेजारी रहाणारे शहा काका यांचा अहेर
- झारा, उलथणे, मोठे डाव, छोटे डाव, चिमटा - आईची मैत्रिण
- ६ चायना डीश आणि ६ उभे पेले - विनुचा मित्र
लग्नानंतर मी व चुलत सासूबाई तुळशीबागेत इतर काही गोष्टी खरेदी करायला गेलो होतो. त्या म्हणजे विळी, लिंबू पिळायचे यंत्र, किसणी, कढई, सोलाणे इत्यादी.

स्टीलचा उभा गंज ताक करायला, स्टीलची रवी पण होती. मोठाले थाळे, देव्हारा, निरंजन, उदबत्तीचे घर, रोजच्या वापरातले तेल ठेवण्यासाठी उभट आणि चोच असलेला कावळा, स्टीलचे कुंडे, शिवाय उभट कुंडे त्यावर झाकण, वाडगे, स्टीलचे चहाचे कप ठेवायचे ट्रे आम्हाला अहेरात आले होते. पूजेची थाळी दिली होती कुणीतरी होती. खूप छान होती. त्यावर नक्षीकाम होते. स्टीलचं पुरणयंत्र , संक्रांतीच्या हळदीकुंकू करता लुटण्यासाठी स्टीलचे असेच छोटे छोटे द्यायचे. मी म्हणायचे याचा काय उपयोग? तर झाकण ठेवण्यासाठी अश्या छोट्या ताटल्या उपयोगी पडायच्या. आईने अधिक मासामधे तीस-तीन सवाष्णी घातल्या होत्या तेव्हा सर्व बायकांना मोठाले स्टीलचे थाळे दिले होते. माझ्याकडे जेव्हा पूजा झाली तेव्हा मी झाकण असलेले गोलाकार आणि खालून निमुळते असे कुंडे दिले होते. मिसळणाच्या डब्यात पण हळद, तिखटासाठी वेगवेगळे छोटे स्टीलचे चमचे वापरत होते. मी ते आईकडून आणले आहेत. फक्त आठवणीत असण्यासाठी ठेवून दिलेत. वापरत नाही. लहान मुलांच्या ताटल्या होत्या. त्यात उथळ कप्पे होते, भाजी, कोशिंबिरीसाठी. ही ताटल्या मला प्रचंड आवडतात. पेढेघाटी स्टीलचा डबा पण खूप फेमस होता पूर्वी आणि स्टीलचे चहाचे कानवाले भांडे 🙂 चहा प्यायचे मग पण आले होते. चहा साखरेचे किलवरचे चमचे. मला या चमच्याने पोहे, उपमे खायला पण आवडतात, इतके गोड आहेत.गेले ते दिन गेले,, राहिल्या त्या फक्त आठवणी.
 
पाणी पिण्याकरता "जग" होते. जास्तीची माणसे जेवायला असायची तेव्हा तांब्या/लोटीतून पाणी न घेता जगात घेत असु. ते असेच गोलाकार, खाली निमुळते. एखाद्या फ्लोवरपॉट सारखे होते. आईकडे स्टीलचे बदक होते. त्याच्या पोटात विड्याची पाने, त्यावर एक झाकण असायचे. त्यात चुना, लवंग आणि कात ठेवायला कप्पे होते. इतके छान होते हे बदक ! आमच्या घरी सण-समारंभाला या बदक जेवण झाल्यावर प्रत्येक जण स्वत:चे स्वत: विड्याचे पान करून घेई.







2 comments:

Anonymous said...

wa chhan.. choch aslela telacha kavla.. -----kiti varshanni telacha kavala shabd parat kani aala.. wah.. dil khush ho gaya..

post vachun ekdun vatle ki are next bharat bhetit, taak-karaycha ubha ganj anayla hawa.. chhan idea dilis.. noted!

- sau. avani

rohinivinayak said...

Thank you Avani !!! :) tula hi post vachun chhaan vatle, tyamule malahi aanand jhala aahe.