विनायक न्युयॉर्कला जाऊन आला आणि लगेचच दुसऱ्या दिवशी अमेरिकेत लॉक डाऊन सुरू झाले. ग्रोसरी स्टोअर्स सोडल्यास सर्वच्या सर्व बंद झाले. मुख्य म्हणजे ज्या ज्या स्टोअर्स मध्ये जाऊ तिथे तिथे रिकामे रॅक दिसू लागले. सॅनिटाईझर गायब, टिश्यू पेपर गायब,इतकेच नाही तर आम्हाला पिण्याचे पाणी आणि दूधही मिळेनासे झाले. आम्ही दर शनिवारी सकाळचा चहा झाल्या झाल्या स्टोअर्स मध्येजाऊन जे काही पाहिजे आहे ते ते सर्व आणायला लागलो. त्याकरता आम्हाला २ ते ३ स्टोअर्स हिंडावी लागत होती. हेच पाहिजे, असेचपाहिजे, अश्या तक्रारी न करता समोर दिसत आहे ना? उचला पटापट, नंतर नाही मिळाले तर? असेच सर्वजण करत होते. सगळे जणवेड्यासारखा दैनंदिन जीवनाला लागणाऱ्या गोष्टींचा साठा करून ठेवत होते. स्टोअर्स मध्ये काम करणाऱ्या माणसांची धांदल उडत होती.सर्वांना सर्व काही मिळेल या हिशोनाबे शेवटी स्टोअर्स मध्ये " एका फॅमिली करता एकच उचला" अश्या पाट्या दिसायला लागल्या. सुरवातीला तर मी ५ किलो कांदे बटाटे पण आणून ठेवले. काही फ्रोजन बीन्स आणून ठेवले.विनायक संशोधक असल्याने त्याला वर्क फ्रॉम होम नाही त्यामुळे आमच्या रूटीन मध्ये काहीही बदल झाला नाही. चार भिंतींमध्ये आम्हीदोघे एकमेकांची तोंडे सततची न पाहिल्याने आमच्यात भांडणे झाली नाहीत. विनायकच्या ऑफीस मध्ये अंतरा अंतरावर बसण्यासाठीजागा करून दिल्या होत्या. अजूनही तसेच आहे. रोजच्या रोज ऑफीस मध्ये प्रत्येकाने शरीराचे तापमान आपले आपण घ्यायचे आणि ते लगेच मेलने कळवायचे असे रूटीन होते. आणि काम करताना मास्कही लावायचा हे सक्तीचे केले त्यामुळे काळजी नव्हती. तसेही लॅब मध्ये काम करताना ग्लोव्ज आणि पांढरा ओव्हरकोट घालावा लागतोच त्यात मास्कची भर पडली होती.
नंतर कोरोना इतका काही वाढला की स्टोअर्स मध्ये गेल्यावर रांगेत उभे राहावे लागत होते. एका वेळी १० जणांना स्टोअर्सच्या आतमध्ये घेत होते. स्टोअर्सच्या समोर थंडीच्या दिवसात माणसे रांगा लावत होती. आणि अर्थाताच सॅनिटाईझर आणि मास्क सक्तीचे होतेच. कामासठी रांगा लावणे हा प्रकारच विसरायला झाला होता. रांगांमुळे गर्दी कमी होत गेली. बहुतेक सर्वजण ऑनलाईन ऑर्डर करायला लागले. आम्ही मात्र दोघच्या दोघं असल्याने दर शनिवारी ग्रोसरी करत होतो. मला स्टोअर्स मध्ये काम करणाऱ्या लोकांची खूप काळजी वाटत होती. मास्क लावून काम करायचे हे किती अवघड आहे याची कल्पनाही करवत नव्हती. तिथल्या लोकांना कामाचा बोजा किती पडत असेल याचा विचार करत होते.कोरोना इतका काही वाढला की अमेरिकेचे राज्यानुसार कोष्टक बघून घाबरायला होत होते. आधी युरोप मधले वाढलेले आकडे पाहत होतोनंतर अमेरिकेचे वाढलेले आकडे पाहायला लागलो. रोजच्या रोज ८०० ते १००० मृत संख्या वाचताना पोटात धस्स होत होते. न्युयॉर्क मध्ये तरमृत्युचा जणू काही सापळाच रचलेला होता !साधारण ६ महिन्या नंतर न्यूयॉर्क न्युजर्सी मध्ये कोरोना केसेस खूप कमी झाल्या आणि डेथ रेट पण कमी झाला . पण आताअमेरिकेतल्या इतर राज्यातून कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. खूपच वाढत आहे. न्युजर्सी राज्यात क्वारंटाईनचे निर्बंध असे आहेतकी तुम्ही दुसऱ्या राज्यात जरी गेलात तरी परत आल्यावर स्वतःला १४ दिवस क्वारंटाईन करायचे.सर्व लाँग वीकेंड वाया गेले.
प्रत्येक देशाच्या लॉक डाऊनला सर्वांनाच सामोरे जावे लागले. आता प्रत्येकाला कळून चुकले आहे की आता आपल्याला कोरोना बरोबरच राहायचे आहे. काळजी मात्र घ्यायलाच हवी.कोरोनाच्या काळात घरीच बसायचे. अन्न पाणी आणण्याकरताच फक्त बाहेर जायचे. मग करायचे काय घरी बसून ! हा प्रश्न भेडसावाय्ला लागला. नेटफ्लिक्स कामाला आले. बऱ्याच स्पनिश मालिका बघितल्या. सिनेमे बघितले. होटेल्स बंद म्हणून बाहेर काही खाणे झाले नाही. ऑर्डर देवून आणता येत होते. पण कंटाळा यायचा. जायचे, यायचे आणि ऑर्डर केलेले पदार्थ परत गरम करून घ्यायचे. म्हणजेभांडी घासले आलेच परत.चमचमीत काहीतरी करावे आणि खावे असे ठरवले आणि केले पण ! जास्तीचे काही केले की भांडी घासून घासून प्रचंड दमणूकव्हायला लागली. तसे तर इथे भांडी घासायला लागतातच, २ माणसे असली तरीही भरपूर भांडी पडतात. पदार्थ करून रेसिपी लिहायचेते दिवस आठवले. डिपेंडंट विसावर हेच तर करत होते मी, तेव्हाही क्वारंटाईन होतेच की ! अमेरिकेतल्या थंडीत कुठे बाहेर फिरायला जातो?
व्यायाम होईनासा झाला. मग चालणे करायचे मास्क बांधून आणि आठवड्यातून एकदा तरी व्यायाम हा झालाच पाहिजे असे ठरवले व केले.चालणे आणि व्यायाम झाला नाही तर प्रतिकार शक्ती कोठून येणार?स्मृती ब्लॉग मध्ये अजून काही लिहायचे होते ते लिहिले. म्हणजे काही लेखाचे काही भाग लिहून झाले होते आणि आता या पुढचा लेख पुढीलभागात असे लिहिले होते ते सर्व पुढील भाग जितके जमतील तितके लिहिले. काही जुने फोटोज स्कॅन केले. हे सर्व करूनही पुढे काय?हे प्रश्नचिन्ह उभे राहतेच. तसेही कोरोना नसता आला तरीही पुढे काय हा प्रश्न उरतोच माझ्या आयुष्यात.
न्युजर्सी मध्ये आल्यावर नोकरीचा प्रयत्न केला होता. दोन ठिकाणाहून मुलाखतीसाठी बोलावणे पण आले पण त्यावेळी नेमकी माझी तब्येत बिघडली होती. आता असे वाटते की होते तेचांगल्यासाठीच. इंगल्स हँडरसनविल मध्ये काम करताना इतके काही दमायला व्हायचे की नोकरी सोडाविशी वाटायची आणि सोडली तर काय करायचे या विचारात कॉलेज मध्ये जाऊन स्पॅनिश शिकावेसे वाटत होते. ही स्पॅनिश शिकण्याची इच्छा कोरोनाच्या काळात पूर्ण झाली.कोर्सेरा वर स्पेशलाईझेशन इन स्पॅनिश व्होकॅब्युलरीची ५ कोर्सेसची सिरीज पूर्णत्वास नेली. वेगळी भाषा प्राथमिक लेव्हलला शिकायला मिळाली. यामुळे वेळ चांगला गेलाच आणि मन बिझी होऊन गेले. घरातले काम आणि अभ्यास यामध्ये इतकी व्यग्र होऊन गेले की डोक्यात इतर फालतू विचारांना थारा मिळाला नाही. कोरोनाच्या भीतीदायक काळात मे ते डिसेंबर महिने कधी गेले ते कळले नाही.सणवार तर आपण करतोच. काळ कोणताही असो. सणावारा निमित्त आपण जे करतो त्याने थोडातरी उत्साह येतोच. मी ब्लॉगवर जे नवीन लेखन केले ते लेख तुम्हाला २०२० या लेबल मध्ये दिसतील. त्या लेखाची शीर्षके आहेत अनुक्रमे, पीठाची गिरणी, टेलिव्हिजनचे दिवस, वेणीफणी, कॅसेट, आहार, व्यायाम, वजनातील घट आणि वाढ एक स्वानुभव, एका कथेचा जन्म, आणि संभ्रम या दोन अतिलघूकथा ब्लॉगवर लिहिल्या. महिला दिनाच्या निमित्ताने लिहिलेला माझ्या आईवरचा लेख, ऍपल पिकींग, कोर्सेस, बर्थडे गर्ल - आई, रोजनिशीची काही पाने, रस्ते,आईच्या आठवणी, बैठे खेळ, मला सुचलेली एक प्रेमकविता आणि एक फिलोसॉफिकल कविता ब्लॉग वर लिहिली. बाबांवर केलेली कविता, क्लेमसनच्या आठवणींचे काही लेख, नेटफ्लिक्सवर स्पॅनिश सिरीज पाहिल्या त्याचे थोडक्यात रसग्रहण, त्यात एका सिरीजचे रसग्रहण केले आहे. त्याचे पुढील भाग लिहायचे बाकी आहेत. अजून काही सिरीजचे रसग्रहण लिहायचे मनात होते पण लिहिले गेले नाही.
साडी चॅलेज मध्ये साडी नेसली गेली. फेसबुकवर काही खेळ टाकले होते. गाळलेल्या जागा भरा. यामध्ये इंग्रजी शब्द होते. काही अक्षरे लिहियची आणि काही अक्षरे गाळलेली जागा. अजून एक म्हणजे जुन्या-नव्या चित्रपटांची नावांची अक्षरे उलटीसुलटी करून द्यायची आणि ती ओळखायला सांगायची. जो ओळखेल त्याने पुढील चित्रपटाचे नाव द्यायचे. एक खेळ असा टाकलाहोता की दोन पैकी एक पर्याय निवडा. व परत दोन पर्याय द्या. यामध्ये काही जणींनी भाग घेतला होता. कोरोना काळातला हा एक टाईमपासकेला. जे काही ठरवले होते ते करता आले नाही. एडिसन रेल्वे स्टेशनवर बसून न्युयॉर्कला जाणार होतो. इथे काही पाहणार होतो. टेकटूरच्या २ ते ३ दिवसाच्या छोट्या ट्रीप करणार होतो. खूप चांगल्या ट्रीप्स होत्या. लाँग वीकेंडला या ट्रीप झाल्या असत्या. ७ ते ८ महिन्यांनी जेव्हा उपहारगृहामध्ये डाईन इन सुरू झाले तेव्हा १५ दिवसातून एकदा बाहेर जेवायला लागलो. घरी माझ्या स्वतःच्या हाताच्या चवीने खाऊन खाउन तोंडाची चवच निघून गेली होती. काहीतरी चमचमीत करत होते उत्साह वाढवण्यासाठी पण भांडी बरीच पडत होती. मग शेवटी वेगवेगळेपदार्थ करणे थांबवले. रगडा पॅटीस, मसाला डोसा, चकोल्या, दुधी हलवा, गाजर हलवा, असे काही ना काही पदार्थ केले होते. जेव्हा लॉकडाऊन उठले तेव्हा बाहेर काय परिस्थीती आहे ते पाहण्यासाठी एका मॉल मध्ये गेलो. तिथे शुकशुकाटच होता. परिस्थितीगंभीर वाटत होती. काही उत्साही बायका खरेदी करत होत्या. मला तर तिथल्या कपड्यांना हात पण लावावासा पण वाटत नव्हता. फिटींगरूम अजूनही बंदच आहेत.
२०२० किती वेगळे गेले ना ! ग्रोसरी शिवाय बाहेर जाणे नाही, खरेदी नाही. लाँग वीकेंडला वेगळेपणा नाही.
आधी जी मनात भीती साठून राहिली होती ती कमी कमी होत गेली. कोव्हिड केसेस किती वाढल्या, कितीजण मृत्युमुखी पडले हीकोष्टके बघणेही संपले. हळूहळू न्युयाॅर्क व न्यू जर्सी मधल्या केसेस खूप कमी झाल्या. थोडे हायसे वाटले खरे पण हे सर्व कधी संपणारही टांगती तलवार अजूनही आहेच आणि लस येईपर्यंत राहीलही. माणसांना कोरोनाची सवय होऊन गेली.२०२० संपता संपता लस तर आली पण तरीही टांगती तलवार गेलेली नाही. २०२० पेक्षा २०२१ बरे असे म्हणावेसे वाटते. कदाचित २०२२ची पहाट चांगली असेल अशी आशा करायला हारकत नाही.
प्रत्येक देशाचे लॉकडाऊन वेगळे त्यामुळे प्रत्येकालाच त्या त्या देशाच्या अंतर्गत कोव्डिडचा सामना करावा लागला आहे. तसे तर २०२० वर्षाने शिकवले पण खूप ! असे वाटते निसर्गाने सूत्र हातात घेतली आहेत का? कोरोना निमित्तमात्र आहे. कोरोनाने ज्यांचे बळी घेतले त्यांच्या घरात किती दुःखाचे सावट पसरलेले असेल याची कल्पनाही करवत नाही. Wishing you All a Very Happy and healthy New year 2021 !
2 comments:
तुमचं पूर्ण वर्ष कसं गेलं असेल याचं चित्रच डोळ्यांपुढे उभं राहिलं. इथे पुण्यात ग्रोसरी वगैरे बाबत बरी परिस्थिती होती. येणाऱ्या वर्षासाठी शुभेच्छा!
Thank you Prachi !! tula pan 2021 nutan varshachya hardik shubhechchaa !!
Post a Comment