Tuesday, March 03, 2020

आहार,व्यायाम, वजनातील घट आणि वाढ - स्वानुभव (1)

मला गोड पदार्थ अजिबात आवडत नाही आणि मला भातही आवडत नाही. शिवाय मी एका वेळेला खूप खाऊ शकत नाही. कदाचित यामुळेच माझे वजन नेहमी आटोक्यात राहत असावे असे मला वाटते. लग्ना आधी माझे वजन ४५ किलो होते. माझी उंची ५ म्हणजे माझे वजन ५० ते ५५ असायला पाहिजे. लग्नानंतर मी व्यायाम सुरू केला आणि माझे वजन वाढायला लागले. मी १२ सूर्यनमस्कार घालत होते. एका दमात १२ सूर्यनमस्कार घालायचे. नंतर ते साधारण 25 पर्यंत गेले. पण २५ सूर्यनमस्काराने मला खूप दमायला व्हायचे. याउलट १२ नमस्काराने छान वाटायचे. माझे वजन ४५ वरून ५० पर्यंत गेले. मला खूप आनंद झाला. त्यानंतर मी १२ सूर्यनमस्कार, 8 जोर आणि 8 बैठका घालायला लागले. त्याचबरोबर काही आसने करत होते. ८ जोर आणि ८ बैठकाने खूप जडत्व आले. मग मी माझा व्यायाम सेट केला. तो म्हणजे १२ सूर्यनमस्कार, ४ जोर आणि ४ बैठका. आणि काही आसने.


सूर्यनमस्काराने आणि आसने केल्याने अंग खूप लवचिक बनते. जोर बैठका घातल्याने स्नायुंना बळकटी येते.
अर्थात लग्नानंतरच मी व्यायाम करायला लागले. विनायक मला म्हणाला की सूर्यनमस्कार हा व्यायाम बायकांसाठी चांगला आहे. पहिल्या दिवशी सूर्यनमस्कार घातले. दुसऱ्या दिवशीही घातले. नंतर खांदे मान दुखायला लागली. विनायक म्हणाला की तसेच रेटून तिसऱ्या आणि ४ थ्या दिवशी व्यायाम कर. तसे केल्याने अंगदुखी थांबली आणि मला खूप छान वाटायला लागले आणि रोजच्या रोज नमस्कार घालायला लागले. चपळता वाढली. उत्साह वाढला. आयायटी पवई मध्ये भाजी आणण्याकरता खूप चालावे लागते. त्यामुळे चालणेही आठवड्यातून एकदा अंदाजे २ मैल व्हायला लागले. नंतर मी शिवणाचा क्लास जॉईन केला तो जाऊन येऊन २ मैल होता. आठवड्यातून १ वेळा २ मैल चालणे सुरू झाले. भाजी घाटकोपरवरून बसने जाऊन आणायला लागले.विनायकचे वजन त्याच्या ५ फूट ११ इंच उंचीनुसार ७२ किलो पाहिजे. तसे ते होते. शिवाय खाणे म्हणजे डब्यातले. त्यातल्या पोळ्या म्हणजे दिव्यच असायच्या. आणि भाजीही पातळ असायची. त्याचे केमिस्ट्री डिपार्टमेंट ३ ऱ्या मजल्यावर होते. त्यामुळे चालत जाऊन शिवाय जिनेही चढणे उतरणे व्हायचे. याशिवाय त्याचा जोर बैठकांचा वेगळा व्यायाम्ही असायचा.



लग्नानंतर आमचा आहार असा काहीसा होता. विब्स ब्रेड स्लाईस भाजून त्यावर अमुल बटर पसरवून ते स्लाईस ४ ते ५ खायचो. त्यावर दुधाची कॉफी. दुपारी जेवणाला पोळी भाजी, कोशिंबीर, आमटी भात, ताक , संध्याकाळच्या खाण्याला पोहे उपमे आणि रात्री मुगाच्या डाळीची खिचडी किंवा आमटी भात. लग्नानंतर विनायकचे वजन ७२ चे ८० किलो झाले आणि माझे ४५ चे ५० किलो झाले. विनायकला मी सल्ला दिला की तू नुसते जोर बैठकांचा व्यायाम करू नकोस. जोडीला सूर्यनमस्कारही घाल. डोंबिवलीला आल्यावर आमच्या दोघांचा व्यायामाचा पॅटर्न एकच झाला तो म्हणजे आधी सूर्यनमस्कार, नंतर जोर बैठका आणि नंतर काही आसने. मी काही वर्षे नोकरी केली आणि माझे वजन ५० चे ५४ झाले. नोकरी करताना आपण चहा खूप पितो. म्हणजे जितका चहा पितो तितकी साखर तुमच्या पोटात जाते. शिवाय सटर फटर खाणे होते. मित्रमैत्रिणींबरोबर होटेल मध्ये खाणे होते. माझा अनुभव म्हणजे नोकरी करताना वजन वाढते आणि घरी बसल्यावर कमी होते. विनायकला हिंदुस्ताने लिव्हर मध्ये नोकरी लागली आणि त्याचे जेवण तिथेच व्हायला लागले. तो म्हणाला की लोकल ट्रेन मध्ये जाताना गाडी पकडण्यासाठी दोन्ही हात मोकळे असलेले चांगले म्हणून मला डबा धरण्याचे लोढणे नको.



विनायकने डोंबिवलीवरून अंधेरीला ट्रेन आणि बसने १० वर्षे नोकरी केली. घरचे जेवण रात्रीचेच असायचे त्यामुळे मी रात्री पोळी भाजी भात आमटी असे सर्व करायला लागले. विनायकचे वजन ८० वरून ८५ वर गेले. वजन वाढण्याचे मुख्य कारण कॅंटीन मधले जेवण. शिवाय चहाबरोबर बिस्किटेही असायची. धकाधकीच्या जीवनातही विनायक रोजच्या रोज व्यायाम करायचा. कधी पहाटे उठून तर कधी रात्री जेवणानंतर तासाभराने. व्यायाम एक व्यसन आहे ते कधीही सुटत नाही. अंधेरीत रहायला आल्यावर दुपारचे जेवण व्हायला लागले. विनायक दुपारी जेवायला घरी यायचा त्यामुळे परत पोळी भाजी भात आमटी कोशिंबीर, ताक असे व्हायला लागले. अंधेरीत आल्यावर उपहारगृहामध्ये इडली, डोसे खायला लागलो. अंधेरीत आल्यावर माझे वजन ५४ चे ५८ झाले.
अमेरिकेत आल्यावर युनिव्हरसिटी परिसरात आमचे दोघांचेही चालणे खूपच वाढले. सुरवातीला इतर खाणेही वाढले होते. आईस्क्रीम, बटाटा चिप्स आणि कोक भरपूर खाल्ले. आणि एका पॉईंटला आम्ही हे खाणे पूर्णपणे थांबवले. विल्मिंग्टनला आल्यावर माझे वजन ६० किलोपर्यंत झाले. विल्मिंग्टन मध्ये रहायला आल्यावर आम्ही वजनाचा काटा आणला.



व्यायामातही चालण्याने वजन घटते. चालणे म्हणजे किमान १ मैल आठवड्यातून २ ते ३ वेळेला. आणि नुसते चालून उपयोगी नाही. सूर्यनमस्कार, जोर बैठकाही हव्यात नाहीतर स्नायुंची ताकद निघून जाते. विल्मिंग्टन मध्ये असताना मी रोजच्या रोज १ मैल चालायचे. बाकीचा व्यायाम रोजच्या रोज व्हायचा नाही. तो आठवड्यातून २ वेळा व्हायला लागला. विनायक शनिवार रविवार मध्ये एक दिवस २ मैल चालायचा. एके दिवशी माझे चालणे थांबले. रोजच्या रोज मैलोंमैल चालण्याने खांदे आणि पाठ खूप दुखायला लागली. नंतर मी एका स्टॉप साईन पर्यंत रोजच्या रोज चालायचे ठरवले.


माझे खरे वजन घटले ते हँडरसनविलला आल्यावर इंगल्सच्या नोकरीमुळे. कसे ते पुढील लेखात.@Rohini Gore
क्रमश : ...


No comments: