Thursday, June 28, 2018

२८ जून २०१८

आज सकाळी ७ ला मला जाग आली तेव्हा विनू म्हणाला "वीज नाहीये" मोबाईल data वरून गुगलमध्ये शोधले असता वीज रात्री ८ वाजता येईल असे कळाले. काल मध्यरात्री २ वाजताच वीज गेली होती आणि म्हणून विनुची झोप उडाली होती. मी २ वाजेपर्यंत जागी असल्याने मला २ नंतर झोप लागली होती :D वीज गेल्यामुळे सर्व कारभार ठप्प होतातच पण इथे अमेरिकेत ते जरा जास्तीच ठप्प होतात. भारतामध्ये वीज जाते तेव्हा घरात गॅस सिलिंडर असल्याने स्वयंपाक, चहा, अंघोळीचे गरम पाणी या सर्व गोष्टी तरी करता येतात. इथे अमेरिकेत अपार्टमेंटमध्ये इलेक्ट्रीक शेगड्या असल्याने स्वयंपाक करता येत नाही. शॉवरला गरम पाणी नाही. शिवाय मायक्रोवेव्ह मध्ये चहा पण करता येत नाही. नेट बंद असल्याने सोशल मिडिया वर जाता येत नाही. व्होनेज फोन नेटशी जोडलेला असल्याने आंतर-राष्ट्रीय कॉल करता येत नाहीत. :(



हीटर कूलर नाहीत म्हणजे थंडी असेल तर बसा कुडकुडत ! :D सध्या उन्हाळा सुरू असल्याने कूलर जरी बंद असला तरी आमचे तरी फारसे अडत नाही. आम्ही खिडक्यांची दारं नेहमीच थोडी उघडी ठेवतो. जरा तरी बाहेरची हवा येऊद्या ना राव ! आज मला कामावर जायचे नव्हते .उद्या परवा आणि तेरवाही कामावर जाण्याचे वेळापत्रक आहे. आम्ही दोघेा कामावर जातो त्यामुळे मी आदल्यादिवशीच दोघांचे जेवणाचे डब्बे करून फ्रीज मध्ये ठेवते त्यामुळे आज खूप काही अडले नाही. विनुने थंडगार दूधातच प्रोटीन पावडर मिक्स करून प्यायले. तसे इथले लोक थंडगार दूधच पितात पण आम्हाला दूध गरम करून पिण्याची सवय आहे. शॉवरला थोडेफार कोमट पाणी असल्याने विनुने अंघोळ केली आणि तो कामावर निघून गेला. मला म्हणाला चहा ऑफीसमध्येच घेईन. मी पण कोमट पाणी तर कोमट पाणी, थंड नाही ना ! म्हणून लगेचच अंघोळ करून घेतली. थंडगार दूधात इंन्स्टंट कॉफी आणि साखर घालून कोल्ड कॉफी प्यायली. ती खूपच छान लागली. विचार केला की आपण कधीच उपवास करत नाही, या निमित्ताने करू. आणि जशी भूक लागेल तसे खाऊ. म्हणजे आज जेवणासाठी तेल तिखट मीठ पोहे खाऊ असा विचार केला पण तो फक्त विचारच राहिला. भाजी होती पण कणीक भिजवलेली नव्हती. अर्थात कणीक भिजवलेली असली तरी पोळ्या कश्या करणार होते मी? ज्यांना सकाळी उठल्यावर गरम चहा प्यायची सवय असते त्यांची अवस्था चहा न मिळाल्याने खूप वाईट होते, तशीच माझी झाली. अंघोळ करूनही चहा न प्यायल्याने पारोसे असल्यासारखेच वाटत होते.



सकाळचे १० वाजले आणि पोटात कावळे "काव काव" करायला लागले. ड्रेस घातला आणि इंगल्स मध्ये गेले. तिथे सँडविच खाल्ला. कोक प्यायला. संध्याकाळच्या खाण्याला कूकीज आणि पोटॅटो चिप्स घेतले आणि थोडावेळ कॅफेत बसून निघताना कॉफी घेतली आणि १ वाजेपर्यंत घरी आले. कूलर नसल्याने खूप गरम होत होते. सगळेच ठप्प असल्याने आडवी पडून राहिले. झोप लागली नाहीच पण खूप पोकळी निर्माण झाल्यासारखे वाटू लागले. तसे तर इथे स्मशान शांतताच असते. वीज गेल्याने त्यात जरा जास्तीच भर पडते. वीज असल्याने गाण्यांचा आवाज, आपलीमराठीवर मराठी मालिकांचा आवाज येत असतो त्यामुळे घर भरल्यासारखे वाटते आणि आवाजांच्या सान्निध्यात राहिल्याने आपण एकटे नाही याचा खोटा का होईना दिलासा मिळतो. आजच्या दिवसाचे वीज नसल्याचे कारण कळाले नाही. बहुतेक ट्रान्सफॉर्मर जळाल्याने फक्त शहराच्या काही भागातच काम चालू असल्याने वीज पुरवठा नव्हता असे मला इंगल्स मध्ये कळाले. या आधी २ ते ३ वेळा वीज नसल्याचे दिवस काढले होते पण त्यावेळेला वादळ वारे आणि पाऊसही होता.



रात्री ८ वाजता येणारी वीज ४ वाजताच आल्याने बरे वाटले. लगेचच पहिला चहा करून प्यायला आणि गरम गरम तिखट तिखट पोहे खायला केले. दुखणारे डोके बऱ्यापैकी शांत झाले. आज आता रात्री नेहमीप्रमाणेच पोळी भाजी करीन. डब्बे भरीन आणि उद्या कामाला जाईन. वीज गेल्याने आजचा दिवस नेहमीपेक्षा वेगळा गेला.
Rohini Gore

2 comments:

dr mohan said...

excellent writing

rohinivinayak said...

तुम्हाला माझे लिखाण आवडल्याबद्दल अनेक धन्यवाद मोहन !!