Thursday, May 11, 2017
तीर्थस्वरूप दादा
मी माझ्या आईला नेहमी फोनवरून सांगते की तू तुजे अनुभव लिही. पण ती म्हणते मला काही लिहीता येत नाही. पण ९ मे रोजी पहाटे साधारण ३ ला तिने तिच्या वडिलांबद्दल थोडे लिहिले. सुरवात श्री नृसिंह जयंती च्या दिवशी झाली. मला खूप आनंद झाला आहे. आता ती पूर्वीचे तिचे अनुभव लिहून काढेल आणि फोनवर ते मी उतरवून घेईन आणि माझ्या ब्लॉगवर टंकेन. पूर्वीच्या काळचे अनुभव वाचायला मला खूप छान वाटणार आहे.
*******
ती. स्व. दादा म्हणजे माझे वडील यांच्याविषयी थोडे विचार मनापासून. तुमचा व माझा तसा काहीही सहवास नाही पण ज्या काही गोष्टी आठवत आहेत त्या मी मनापासून लिहीत आहे. दुसरे म्हणजे मी तुमची सर्वात लहान मुलगी असल्याने तुम्ही खूप मोठे आहात वयाने व मनाने. तुम्ही कडक शिस्तीचे असल्याने व त्या काळच्या विचाराने मी असे ऐकले होते की तुम्ही खूप मुलांना मारलेत पण परिस्थितीच्या मानाने लाड केले असावेत.
मी तुमच्या हातून कधीच मार खाल्ला नाही. नाही म्हणायला एकदा करकरे वाड्यात (पुणे मुक्कामी) मार खाल्ला. साल १९५० साधारण असेल. पण नंतर तुम्हाला खूप वाईट वाटले व मला माझे आवडते दाणे गुळ खावयास दिलेत. नंतर १९५२ साली तुम्ही पनवेलला व मि पुण्यात होते. काही कारणाने ती. स्व. दाजीने (माझा भाऊ) मला पनवेलला पोहोचवले आणि योगायोगाने तुम्ही पण आईला सांगायचात की बाबीला इथे घेऊन ये. मी तिला मारणार नाही किंवा बोलणार पण नाही आणि थोडेच दिवसात रमा एकादशीला १९५२ साली तुम्हाला देवाज्ञा झाली.
माझ्या आईचे वय ८० आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment