Friday, January 22, 2016
२२ जानेवारी २०१६
आजचा दिवस स्नो चा होता. तसे तर बुधवारी पण थोडा पडला, म्हणजे नुसता भुरभुरला. गुरवारी वादळ येणार येणार म्हणून तयारीत गेला. उद्यापर्यंत पडणार आहे. कदाचित लाईटी जाण्याची शक्यता आहे. अर्थात लाईटी गेल्या नाहीतर तर खरेच खूप बरे होईल !
आजची रोजनिशी लिहायची म्हणजे त्या आधीच्या दोन दिवसांची भर घालायला लागेल. काल मला कामाला जायचे नव्हते आणि आज जायचे होते पण वादळ आल्याने आज सुट्टी ! वि आणि मी आज दोघेही घरी भजन करत बसलो आहोत.
काल मी बराच आराम केला. केसांना रंग लावला. पोळी भाजी सकाळीच झाल्याने नंतर काही काम नव्हते. युट्युबवर काही ना काही बघत होते आणि एकीकडे बातम्याही ऐकत होते. तर काल रात्रीपासून आजच्या वादळाची तयारी केली. ढोढो भात आमटी आणि रस्सा केला. पोळ्या ४ च केल्या. वाल मार्ट मध्ये काही जरूरीचे घेण्याकरता गेलो तर ही गर्दी ! प्रत्येक जण सामान भरभरून घेत होते ! केळी घ्यावी म्हणावी तर एकही शिल्लक नाही. ब्रेड घ्यावा तर अगदीच २ ते ४ होते. त्यातला एक घेतला. दुध, पाणी, मेणबत्ती, बटाटा चिप्स, काही कुकीज असे काही ना काही घेतले. घरी आलो जेवलो. झोपच लागली नाही. खूप गरम होत होते. म्हणून कूलर लावला. नंतर इतके काही थंड झाले कि परत हीटर लावला. मला ३ वाजेपर्यंत झोप नाही. त्यात मला पहाटे स्वप्न पडले की बातम्यांमध्ये सांगत आहेत की निसर्गाने खूप मोठा पोपट केला आहे. कामावर जा. स्नो , पाऊस, वारे काही काही नाहीये ! जाग आली तर वि उठला होता. म्हणाला बाहेर बघ. सगळीकडे पांढरा बर्फ पसरलेला आहे.
बातम्या ऐकून ऐकून डोके पकून गेले होते. खूप मोठा राडा होणार आहे हे सांगत होते. स्लिट, पाऊस, वारे, स्नो, पावर जाईल तयारीत रहा. आज सकाळपासून माझे नि वि चे वेळापत्रक वेगवेगळे लागले होते. वि पहाटे ५ लाच उठला होता. मी झोप नाही म्हणून ९ ला उठले. नंतर चहा घेतला, दुदू प्यायले आणि मफलर टोपी, जाकीट घालून खाली गेले बर्फाचे फोटो काढायला. मला तर खूप मोठी फेरी मारायची होती पण खूपच गारेगार झाले होते. फोटोसेशन झाल्यावर आधी अंघोळ करून घेतली. धुणे धूउन घेतले. लाईट गेले तर ! आमटी भात, रस्सा गरम करून खाल्ला.
ढाराढुर झोपावे म्हणावे तर अजिबात झोप लागली नाही. वि ने ब्रेड आणि रस्सा खाल्ला. संध्याकाळी गरम गरम उकड खायला केली. आता रात्री परत भीतीपोटी उद्याचाही स्वयंपाक करून ठेवणार आहे. कारण की संध्याकाळी परत जास्तीचा स्नो पडणार आहे असे सांगत आहे.
सकाळी उठलो आणि लाईटी नसल्या तर स्वयंपाक करून ठेवलेला केव्हाही चांगलाच.. उद्यापर्यंत कुठेही न जाण्याची शिक्षा आहे ! परवा मात्र स्वच्छ सूर्यप्रकाश आहे !
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment