क्लेम्सनमधून बाहेर पडल्यावर काही वेळाने ८५ महामार्गावर जाण्यासाठी
ग्रीनवीलची एक मोठीच्या मोठी वेटोळी एक्झीट घ्यावी लागते. ही एक्झीट लक्षात
राहिली याचे कारण इथे अमेरिकेत आल्यावर पहिलावहिला लांब पल्य्यचा प्रवास
जेव्हा केला होता तेव्हा या भल्यामोठ्या वेटोळ्या एक्झीटवरून जाताना मी तर चक्क श्वास रोखून धरला होता !
त्या
आधीचा एक रस्ता होता त्याचा उजव्या बाजुने एक वळण घेतले तेव्हा मी
मागे वळून पाहिले आणि मनात म्हणाले "आता इथे परते येणे नाही" एक्झीट घेताना
सुद्धा जाणवत होते की एक्झीट घेतोय ती आता शेवटची ! मन खूप भरून आले होते.
कारमध्ये आम्ही दोघे पुढच्या सीटवर होतो. माझ्या पायाशी काही सामान होते.
तर मागच्या सीटवर डेस्कटॉप आणि छोटा टीव्ही होता. त्याला आधार देण्यासाठी
उश्या लावल्या होत्या.
हे सर्व सामान लावायला आम्हाला
पूर्णिमाने मदत केली. कारमध्ये सामान व्यवस्थित ठेवल्यावर आम्ही परत घरात
आलो. रिकाम्या घराकडे बघवत नव्हते. पूर्णिमेला आम्ही आमच्या फ्रीजमधले दूध व
ज्युस दिले. ती म्हणाली, मी तुमच्याकरता कॉफी बनवते. रिकाम्या खोलीत आम्ही
मांडी घालून बसलो. पूर्णिमाने आमच्या तिघांकरता कॉफी बनवली. ती प्यायली
आणि मी कप विसळायला उठले तर मला एकदम हुंदकाच फूटला. पूर्णिमेलाही रडू
फुटले. आम्ही दोघीही रडलो. पूर्णिमा म्हणाली "बहूतही
अच्छे दिन थे ना इधरके ! हम वो कभी नही भूलेंगे ! पूर्णिमा व अभिरामी या
दोन्ही विद्यार्थिनी आमच्या घराच्या वरच्या मजल्यावार रहायच्या. मी त्यांना
बरेच वेळा बटाटेवडे, समोसे, साबुदाणा खिचडी द्यायचे. त्याही मला त्यांचे
रसम आणि सांबार द्यायच्या. तिथे राहत असताना आम्ही आमच्या कारमधून त्या
दोघींना ग्रोसरीकरता न्यायचो. शुक्रवार ठरलेला. रात्रीची जेवणे करून
ग्रोसरीला निघायचो.
आमचे विल्मिंग्टनला जायचे निश्चित झाल्यावर मी सामानाची बांधाबांध करायला
सुरवात केली. मूव्हींगचा आधीचा अनुभव कामी आला ! एकेक करत १० ते १२ खोकी
तयार झाली. त्या सर्व खोक्यांना चिकटपट्या चिकटवून त्यावर नवीन
अपार्टमेंटचा पत्ता व फोन नं लिहिला. अपार्टमेंट बुक करतानाच तिथल्या
ऑफीसमध्ये विचारून ठेवले होते. अमुक एका दिवशी आमचे सामान येईल ते तुमच्या ऑफीसमध्ये ठेवले तर चालेल का? त्यांनी लगेचच होकार दिला. इंडियातून आणलेल्या भल्या मोठ्या ४ बगा, त्यात
सामान कडेकोट भरलेले ! शिवाय १० ते १२ खोकी एकेक करत ४ ते ५ चकरा कारने
झाल्या. जड खोकी विनायकने उचलून कारमध्ये घालायची व ती युएस पीएस मध्ये
नेऊन द्यायची. असा काही वेळ आमचा कार्यक्रम पार पडला. निरानिपटीने घर आवरले होते. प्रत्येक खोक्यामध्ये एकाच प्रकारचे सामान ठेवले होते.
म्हणजे एका खोक्यात स्वयंपाकाची भांडी, तर एका खोक्यात पुस्तके, तर एका खोक्यात सटरफटर सामान. जरूरीपुरते सामान मात्र आधीच वेगळे करून त्याची एक बॅग आम्ही आमच्या बरोबर घेणार होतो. टुथपेस्ट, ब्रश, कंगवे, घरात घालायचे व बाहेर घालायचे २ ४ कपडे, पेपर टॉवेल, टिशू पेपर, साखर, चहा, २ -४ चहा प्यायचे कप, पाणी पिण्याची भांडी, थोडी कणीक, तांदुळ, मिसळणाचा डबा, इ. इ. म्हणजे काही कारणाने आमच्या सामान आमच्या आधी पोहोचले नाही तर पंचाइत व्हायला नको ! निघायच्या आधीच घर रिकामे झाले होते. जरुरीपुरते सामान, डेस्क टॉप, लॅडलाईन फोन, टिल्लू टीव्ही इतकेच सामान खोलीत उरले होते. त्यादिवशी रात्री आम्ही पूर्णिमा अभिरामीकडे
जेवलो. फ्रीजमधल्या उरलेल्या काही भाज्या त्यांना दिल्या. त्यांच्याकडे
जेवून घरी आल्यावर झोपलो. झोप नीट लागली नाही कारण सामानाची बांधाबांध करून
आणि अपार्टमेंटची स्वच्छता करून खूपच दमायला झाले होते.
क्लेम्सन मधले घर जरी लहान असले म्हणजे एकच खोली (स्टुडिओ अपार्टमेंट) तरी बाकीच्या दृष्टीने क्लेम्सनचे दिवस खूपच छान गेले होते. मी ३ ते ४ नोकऱ्या केल्या, मित्रमंडळ जमा झाले
होते. एकत्र जेवणे होत होती. त्यामुळे हे सर्व सोडून दुसऱ्या ठिकाणी जायला
मन तयार नव्हते. अर्थात पोस्ट डॉक पर्व संपणार होते ते एका अर्थाने चांगलेच
होते. एच १ च्या कॅप मध्ये वेळीसच गेलो होतो. माझा मात्र एच ४ व्हिसा झाल्याने मला नोकरी करता येणार नव्हती. आधीच्या विसावर वर्क परमिट काढल्याने मला नोकरी करता आली. वेगळा अनुभव मिळाला होता. नवीन शहरात मिळालेले अपार्टमेंट छानच होते. २ बेडरून अपार्टमेंट, भरपूर सूर्यप्रकाश, समोरासमोर दारे, सिलींग फॅन होते. त्यामुळे नव्या जागेत जागेत जायला आम्ही दोघेही उत्सुक होतोच. शिवाय नोकरी
निमित्ताने जाणार होतो आणि नवीन घरात नवीन फर्निचरही घेणार होतो.
आत्तापर्यंतच्या साडे तीन वर्षात आम्ही आमचे असे फर्निचर घेतले नव्हते.
आधीच्या मूव्हींग मध्ये विमाना प्रवास होता तर या मूव्हींगमध्ये आम्ही
आमच्या कारने जाणार होतो ! प्रत्येक मूव्हींग वेगळ्या प्रकारचे असते, नाही का?
दमणूक आणि मनातले विचार याने झोप काही लागत नव्हती. शेवटी बऱ्याच वेळाने लागली. सकाळी उठवत नव्हते पण उठायला तर हवेच ना ! उठून अंघोळी पांघोळी उरकल्या. वास्तूला नमस्कार केला आणि मनात म्हणाले "खूप छान गेले इथले दिवस" राजेश प्राचीने आम्हाला सकाळच्या न्याहरीला बोलावले होते. प्राचीने गरम गरम सँडविचेस बनवली होती. ती खाल्ली आणि त्यावर आलं घातलेला चहाही प्यायलो. त्यांचा निरोप घेतला व परत घरी आलो. कारमध्ये सामान ठेवलेले होतेच. पूर्णिमेचा निरोप घेतला आणि तिला आमच्या अपार्टमेंटची चावी दिली आणि ती ऑफीसमध्ये नेऊन दे असेही सांगितले. विनायकने कार सुरू केली आणि तिला टाटा बाय बाय करत हळूहळू कार रस्त्याला लागलीही! कारमध्ये बसण्या आधी परत एकदा खिडकीतून घराला बघून घेतले. हे घर कायमचे सोडून जात आहोत याची तीव्रतेने जाणीव झाली.
त्या दिवशी निघताना भरपूर थंडी होती ! प्रवासात मधल्या वाटेत विश्रांती
थांबा होता. तिथे थांबलो. प्रचंड थंडीमुळे बाहेर बाकावर बसून जेवता आले
नाही. त्यामुळे कारमध्ये बसूनच पोळी भाजी खाल्ली. पाण्याची बाटली होतीच
त्यामुळे बरे झाले ! साधारण संध्याकाळच्या सुमारास विल्मिंग्टनला येऊन
पोहोचलो. एका मित्राच्या घरी आलो आणि तिथूनच सकाळी उठून आम्ही आमच्या अपार्टमेंटमध्ये आलो. अपार्टमेंट वरच्या मजल्यावर होते. आमचे सामान आदल्या दिवशी येऊन पोहोचले होते ! सर्व खोकी, बॅगा, डेस्क टॉप, टिव्ही, एकेक करत आमच्या अपार्टमेंटमध्ये विनायकने व त्याच्या मित्राने वाहून आणले. मी बाकीच्या छोट्या बॅगा आणल्या. सकाळी सकाळीच जिना चढण्या उतरण्याचा भरपूर व्यायाम झाला. सामान उचलून उचलून अंगदुखीमध्ये आणखी भर पडली. नंतर विनायकने दूध आणले.
चहा प्यायल्यावर जरा थोडे बरे वाटले. हॉलमध्ये सर्व सामान होते. थोडावेळ जरा आडवे झालो आणि मग नंतर जवळच असलेल्या पिझ्झा हटमध्ये जेवण करून आलो. एकेक करून परत खोक्यांवर चिकटवलेल्या चिकटपट्या काढल्या आणि सामान काढले. स्वयंपाक घरातले सामान पटापट लावून घेतले. रिकाम्या जागेत परत एकदा नव्याने संसार मांडायला सुरवात झाली !!
क्रमश : .....
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
Nice post!Changing home & shift to new is always a new experience to remember forever!
Thank you so much !! for your comment !
Post a Comment