Sunday, February 08, 2015
८ फेब्रुवारी २०१५
आजची रोजनिशी लिहायची म्हणजे मला आदल्या दिवशीची पण थोडी भर घालायला लागेल. नेहमीचे वीकेंडचे कार्यक्रम थोडे उलटे सुलटे झाले व त्यामुळे आजचा दिवस जरा वेगळा आणि चांगला गेला. आज सकाळी सूर्योदय पहायचा योग आला. सूर्योदय पाहणे म्हणजे देवळात जाऊन आल्यासारखेच वाटते. सूर्य आधी लाल, नंतर पिवळा व नंतर पांढरा होत जाताना छान तर वाटतेच, शिवाय त्याची किरणे जेव्हा आजुबाजूला फाकतात तीही अतीव छान दिसतात. मुख्य म्हणजे समुद्रावर जाऊन सूर्योदय बघण्याची मजा काही औरच असते. एक तर तिथे कोणताही अडथळा नसतो. अथांग समुद्रातून सूर्य जेव्हा वर येतो तेव्हा तो खास आपल्याला भेटण्यासाठीच आलेला आहे असेच वाटत रहाते.
शुक्रवारी रात्री मुडाखी , भाजी व कोशिंबीर खाल्ल्याने झोप लागली नाही. नेहमीचाच अनुभव आहे आमचा. आम्ही भात खाणे सोडले आहे. मला तर मुळातच भात तितकासा आवडत नाही. पोळी भाजी आम्हाला दोघांनाही प्रिय आहे. शुक्रवारी झोप नाही म्हणून शनिवार खूप कंटाळवाणा गेला. खरे तर आम्ही शनिवारी बाहेर जेवायला जातो. पण झोप नसल्याने अशक्तपणा आला आणि भूकही खूप लागली होती. मी घरीच करते काहीतरी पटकन म्हणून फ्रीज उघडला तर शुक्रवारची भाजी, कोशिंबीर होती. कणिक बाहेर काढली. आणि अगदी होॅटेलमध्ये कसे आर्डर केल्यानंतर १० मिनिटात खायला तुमच्या टेबलावर येते ना, अगदी तसेच झाले. कणिक खरे तर गार होती. पण ती पटकन ५ ते १० सेकंद मायक्रोवेव्हला ठेवली. भाजी गरम केली. पोळ्या लाटल्या आणि १० मिनिटांच्या आतच जेवायला बसलो. मग झोप लागली. उठल्यावर चहा घेतला आणि वि म्हणाला आज हवा चांगली आहे तर बाहेर फिरायला जाऊ. मला खरे तर जाववत नव्हते. पण फिरून आल्यावर जरा तरतरी आली.
शनिवारी रात्री सिमला मिरचीची भाजी केली. दुपारच्या पोळ्या होत्याच त्यामुळे बरे झाले. पण परत शनिवारी रात्री झोपेच खोबरे. झोपेचे खोबर होण्याचे कारण हवा. इथली हवा इतकी काही बदलते ना की रात्री प्रचंड थंडीने जर हीटर लावला तर सकाळी उठल्यावर बदाबदा पाऊस पडत असतो. तर संध्याकाळी हिवाळ्याच्या दिवसातही गरम हवेची लाट येते. झोपेच तितके खोबरे झाले नव्हते. झाले होते इतकेच की पहाटे ४ लाच जाग आली आणि मग झोप लागता लागेना. गरम हवा होती. सूर्योदय बघण्याचे आज ठरवले नव्हते. वि पण लवकर जागा झाला होता. दोघांनी समुद्रावर सूर्योदय बघायला जाण्याचे ठरवले. असा योग क्वचितच जुळून येतो. हिवाळ्यात सूर्योदय उशीराने होतो पण प्रचंड थंडी असल्याने बाहेर पडवत नाही. शिवाय ढग व पाऊस असला तरीही उपयोग नाही. आणि उन्हाळ्यात लवकर सूर्योदय होतो पण तेव्हा भल्या पहाटे उठून जायचाही कंटाळा येतो.
तर असा हा आमचा सूर्योदयाचा योग जुळून आला. चहा घेऊन निघालो. आज आकाश खूपच निरभ्र होते. एकही ढग नव्हता. समुद्रावर मोजकीच हौशी माणसे कॅमेरा हातात धरून सूर्याला कॅमेरात बंदिस्त करायला हजर होती. आज विशेष म्हणजे सूर्योदय होण्यापूर्वी आकाशात क्षितीजावर लालसर रंग उमटतो तो आज नव्हता. पिवळसर रंग होता. सूर्य सुद्धा आज लाल लाल गोळा होऊन बाहेर आला नाही. सुरवातीला होता थोडा लालसर पण लगेच तो पिवळा झाला. तरी सुद्धा सूर्योदय बघण्याचा आनंद नेहमीच छान असतो. समुद्राच्या खालून तो वर येताना अति क्लासिक दिसतो. नेहमीप्रमाणेच फोटो घेतले. आल्यावर तिखटामिठाचा शिरा खायला केला व नंतर चहा हवाच. नंतर दुपारी बाहेर जेवायला मेक्सिकन उपहारगृह. आज भाताचा वेगळा मेनू छानच होता. त्यामध्ये आपल्या आवडीच्या भाज्या सांगायच्या. भातामध्ये भाज्या व सॉस व चीझ घालून देतात. खूप आवडला मेनु. आत पुढच्या वेळी फोटो घेईन. नंतर घरी येऊन व्हक्युमिंग, ग्रोसरी इ. इ. कामे केली. पण आज सुद्धा थोडे डोळे तसे पेंगतच आहेत अजूनही. पण काहीही म्हणा, आजचा सूर्योदय मात्र खूप आनंद देवून गेला.
ली रिंगरला फोटोज पाठवले. बघू वेदर शॉटमध्ये वेदर चॅनलला मी पाठवलेला फोटो दाखवतात का ते. पण शक्यतोवर सूर्योदयाच्या फोटोला प्राधान्य देतात.
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
क्या बात आहे! खूपच छान लेख आणि हे वाक्य तर खासच-
"सूर्योदय पाहणे म्हणजे देवळात जाऊन आल्यासारखेच वाटते."
या वाक्याला तुम्हाला हजार गावे इनाम रोहिणीजी!
Anonymous ,, anek dhanyawaad !!
kharech mala asech feeling yete ho,, soorya hach tar sarv jagacha karta aani karvita aahe na !
tumhala he vakya aavadle he vachun mala khup aanand jhala aahe :)
Post a Comment