लास वेगासला निघालो तेव्हाच मधल्या वाटेत गाईडने आम्हाला सांगितले होते की उद्या ग्रँड कॅनियनकडे जायचे आहे. यामध्ये साऊथ रिम व वेस्ट रिम असे दोन भाग आहेत. ही सगळी बस उद्या वेस्ट रिमला जाणार आहे आणि आम्हाला तर साऊथ रिम बघायची होती. टूरचे बुकींग करतानाच ते विचारतात की साऊथ की वेस्ट? ट्रीपच्या आधीच बरेच गुगलिंग करून ठेवले होते. ग्रँड कनियनच्या वेबसाईटवर असे लिहिले आहे की ९०% प्रवासी साऊथ रिमला जातात. इथूनच दरीचा भाग जास्त छान दिसतो. त्याप्रमाणे गुगल इमेजमध्ये फोटोही पाहून ठेवले होते.
गाईड वेस्ट रिम कशी चांगली आहे ते सांगत होता. वेस्ट रिमचे फोटोही आम्ही गुगल इमेजमध्ये पाहिले होते. ते तितकेसे प्रभावी वाटले नाहीत. वेस्ट रिमला हेलिकॉप्टर राईड, स्काय वॉक, कोलोरॅडो नदीत बोटींग असे सर्व मिळून दोघांचे ६०० डॉलर्स जाणार होते. त्या गाईडला विचारले तर तो म्हणाला "ठीक आहे. तुमच्यासारखी अजून एक फॅमिली आहे साऊथ रिमला जाण्यासाठी. मी त्यांना सांगून ठेवतो. तुम्ही एकत्र भेटा" तरी तो आम्हाला पटवायला बघत होता की साउथ रीम ही जाऊन येऊन १२ तासांची आहे आणि एवढे करून तुम्हाला तिथे जास्तीत जास्त २ तासच मिळतील. पण तुम्ही वेस्ट रिमला आलात तर तिथे जाऊन येऊन ४ तासच आहेत म्हणजे उशीरा निघून चालेल आणि तिथेही ४ ते ५ तास घालवता येतील पण आम्ही त्याच्या म्हणण्याला बळी पडलो नाही. खरे तर टूर मध्ये त्यांनी तसे लिहायला हवे होते की साऊथ रिम व वेस्ट रिम ला जाण्यायेण्याचा वेळ , तिथे किती वेळ घालवणार आहोत असे सर्व काही. पण तसे लिहिले नव्हते.
लास वेगासच्या नाईट टूरवरून आल्यावर जेवण तर छानच झाले होते ! गरम गरम नान, नवरतन कुर्मा. पहाटे ५ ला निघायचे म्हणजे ४ लाच उठायला हवे होते. नीट झोप अशी लागलीच नाही. फक्त पाठ गादीवर टेकल्याने आराम मिळत होता इतकेच. पहाटे उठून सर्व आवरून हॉटेलवरची कॉफी व विकत घेतलेला थोडा केक खाऊन हॉटेलच्या लॉबीमध्ये येऊन थांबलो. ५ जणांची चिनी फॅमिली तिथे आम्हाला भेटली. नवरा बायको व त्यांची तीन मुले छान होती. मुख्य म्हणजे गपिष्ट होती. ते पण आमच्यासारखाच एक भला मोठा केक ५ जणात मिळून खात होते. कारण की ५ ला निघायचे तर न्याहरी कुठे करणार ? मग असेच काहीतरी तोंडात टाकून निघणार होतो. तितकाच पोटाला आधार. बरोबर पहाटे ५ वाजता आमचा ग्रँड कॅनियनकडे प्रवास सुरू झाला. बस मध्ये झोपलो. व्हुवर डॅम इथे आहे असे गाईडने आम्हाला सांगितले व दूरवर तो आहे पण येताना आपण तिथे जाऊ असे सांगितले. आता थोडे थोडे उजाडायला लागले होते. हवेत सुखद गारवा होता आणि लवकर उठलेलो असलो तरी थोडी तरतरी होती. सूर्योदय पाहिला मिळाला. प्रवासात आजुबाजूला कुठेही झाड नाही. सर्व प्रदेश वाळवंटी होता. अधून मधून डोंगर लागत होते पण तेही सर्व बोडकेच ! डोंगरावर एकावर एक दगड रचल्याप्रमाणे दिसत होते. ते प्रत्यक्षात रचले नसून निसर्गातूनच निर्माण झाले होते. हे एक वेगळेच दिसत होते. लांबच लांब रस्ता एकदाचा संपला. मधेवाटेत २० मिनिटे चहापाण्यासाठी बस थांबली. तिथे थोडे बटाटा चिप्स व कॉफी घेतली. साऊथ रिमला पोहोचायला जवळ जवळ ११ वाजले. तिथे पोहोचल्यावर पहिल्यांदा आयमॅक्स थिएटर मध्ये ग्रँड कॅनियन माहिती संदर्भातला एक तासाभराचा मुव्ही पाहिला. नंतर व्हेज पिझ्झा व कोक असे जेवण केले व परत बसमध्ये बसलो. १० मिनिटांनी साउथ रिमपाशी बस थांबली. खाली उतरलो व गाईडने आम्हाला ट्रेलचा नकाशा दिला. तसेतर त्या नकाशावरून जाऊन येऊन ट्रेल ३ तासाचा होता पण आम्हाला एक तासच देण्यात आला होता. गाईडने सांगितले, वेळेवर या !
चालायला सुरवात केली. प्रचंड बोचरा वारा होता. साऊथ रिमवरच्या दऱ्याखोऱ्या खूपच खोलवर पसरलेल्या होत्या. दऱ्यांमधले खडक वेगवेगळ्या रंगांचे दिसत होते. गुलाबी, फिकट निळा, फिकट पिवळा, मधूनच एखादा मातकट किंवा पांढऱ्या रंगाचा ओबडधोबड खडक दिसत होता. दऱ्या ४ ते ५००० मैल तीक्ष्ण लांबीच्या आहेत. भीतीच वाटत होती बघताना. जाऊन येऊन तासभर चाललो. चांगलाच दम लागला होता. आमचे नशीब की तिथे त्यावेळेला बर्फ नव्हता. बर्फ आदल्या दिवशी पडून गेलेला दिसत होता. प्रत्येक पॉईंटला जाऊन खालची अवाढव्य विस्तारलेली दरी बघत होतो. फोटो काढताना कॅमेरा पडेल की काय, अशी भीती वाटत होती इतका प्रचंड गार बोचणारा वारा होता. तशी थंडी पण होतीच. वाऱ्याचा घों घों असा आवाज येत होता. ४० ते ५० फोटोज काढले. भराभर चालत येऊन बसमध्ये बसलो. आमची बस आता परत लासवेगासच्या मार्गावर परतायला लागली. व्हुवर डॅम काही पाहणे झाले नाही कारण की तिथे पोहोचे पर्यंत अंधार पडायला सुरवात झाली होती. खूपच दमायला झाले होते. १० ते १२ तासाचा प्रवास व तासाभराचे प्रचंड वाऱ्यामध्ये चालणे झाले होते. साऊथ रिम आवडली होती पण तरीही जितके कौतुक करतात तितके काही दिसले नाही. तशी थोडी निराशाच झाली. असे वाटले की वेस्ट रिमला गेलो असतो तर तिथे हेलिकॉप्टर राईड, कोरोरॅडो नदीत बोटींग व स्कॅय वॉक करता आले असते पण तरीही ६०० डॉलर्स म्हणजे जरा अतीच झाले, नाही का? पण एकूण ग्रँड कॅनियनने साफ निराशा केली. शिवाय टूरवाल्यांनीही प्लॅनिंग चांगले केले नाही. तिथे किमान एक दिवस राहिले असतो तर ट्रेल तरी पूर्ण करता आली असती आणि बाकीच्या सर्व अँगलने दऱ्याखोऱ्या पाहता आल्या असत्या. शिवाय तिथे राहिल्यावर थोडी विश्रांतीही झाली असती.
खूप दमायला झाले होते. भूक लागली होती आणि चहा प्यावासा वाटत होता. लास वेगासच्या हॉटेलमध्ये पोहोचलो आणि तिथल्या भारतीय उपहारगृहात एक डोसा आणि चहा घेतला. हॉटेलवरच थोडी विश्रांती घेऊन डाऊन टाऊनला एक चक्कर मारण्याचा विचार होता कारण की थंडी अजिबात नव्हती. हवा छान होती आणि परत एकदा लास वेगासचा चकचकाट पाहून होईल. शिवाय थोडे चालणेही होईल या उद्देश्याने जाणार होतो. हे सर्व ठरवून थोडे आडवे होण्यासाठी म्हणून गादीवर पाठ टेकली मात्र ! ढाराढूर झोप लागून गेली. रात्रीचे जेवण नाही की चालणे नाही . शिवाय लासवेगासचा शेवटचा चकचकाटही बघणे नाही. पहाटे ४ ला जाग आली तीच मुळी प्रंचड भूक लागूनच. पटापट सर्व आवरून परत खाली भारतीय उपहारगृहात गेलो आणि डोसा आणि उत्तपा घेतला. वर एकेक गरम चाय ! लॉबीमधली सर्व उपहारगृहे पहाटे ५ ते १० न्याहरी साठी उघडी ठेवतात. आम्ही पहाटे ६ ला डोसा उत्तप्पा खात होतो ! एरव्ही करू का आपण असे काही. यालाच तर ट्रीपची मजा म्हणतात ना ! सोबतची चटणी व सांबारही खूप छान लागत होते. आत्मा तृप्त होत होता ! गाईडला फोन करून विचारले केंव्हा निघायचे आहे? तर म्हणाला बरोबर ८ वाजता तयार रहा. बॅगांची आवराअअवर केली. व्यायामही केला कारण की बसून बसून अंग पार आखडून गेले होते. ८ वाजता बॅगांसकट आम्ही लॉबीमध्ये हजर झालो. आमची बस आता परत लॉस ऍजलिसला जायला निघाली होती . तो दिवस तसा आरामाचा होता. मधेवाटेत दोन दोन तास २ वेळेला मॉल भटकंती होती. आम्ही कोणतीही खरेदी केली नाही. मॉलमध्ये भरपून चालून घेतले. चिनी लोकांनि मात्र बॅगा भरभरून खरेदी केली. पुर्ण बस खरेदीच्या बॅगंनी भरली होती. मधल्या वाटेत जेवणासाठी व्हेज पिझ्झा आणि डाएट कोक घेतला. आज चालण्याने जरा बरे वाटत होते. लॉस अँजलिसच्या चायना टाऊन भागात एका होटेलमध्ये आमची राहण्याची व्यवस्था होती.
तिथले आजुबाजूचे वातावरण थोडे भकास होते. आणि रात्र झाल्यामुळे ते जास्तच वाटत होते. सर्व पाट्या चिनी भाषेत. हॉटेलही अजिबात चांगले नव्हते. हॉटेलवर जाऊन थोडी विश्रांती घेतली. पण बाहेर पडायलाच हवे होते जेवणासाठी! बाहेर पडून एका चौकातून चालायला सुरवात केली. काही उपहारगृहे दिसली पण सर्वांच्या पाट्या चिनी भाषेत.
एके ठिकाणी बाहेरच्या काचे च्या तावदानात पदार्थांची चित्रे व त्याखाली इंग्रजीमधून त्या डिशचे
नाव लिहिले होते. आत शिरलो तर एक चिनी बाई आली आणि चिनी भाषेतच बोलायला
लागली. नंतर एक बाई आली तर तिने तोडके मोडके इंग्रजीमधून आम्हाला विचारले
तर आम्ही तिला म्हणालो की बाहेरची व्हेज डिश मिळेल का? तर तिने तत्परतेने
उत्तर दिले की नाही, ही डिश आम्ही फक लंचलाच ठेवतो. थोडे चालल्यावर एक
हॉगकाँग मार्केट दिसले पण तिथेही निराशाच झाली. इथे काही फळे तरी मिळतील
अशी आशा होती. शेवटी तिथे वेलची केळी दिसली. ती घेतली व पिण्यासाठी पाणी
घेतले व हॉटेलमध्ये परत आलो. वेलची केळी, थोडासा घरून करून आणलेला चिवडा, एक
लाडू, कचोरि, चॉकलेट असे खाऊनच रात्रीच्या जेवणाची वेळ निभावून नेली. नशीब
इतकेच की दुपारी पिझ्झा झाल्याने थोडा तरी निभाव लागला. अपुऱ्या जेवणामुळे नीट अशी झोप लागलीच नाही.
क्रमशः ------
क्रमशः ------
1 comment:
But why did you go with such Chinese travel company...?
Post a Comment