आज नको तितका सूर्यप्रकाश होता. डोळे दिपत होते. बरेच दिवसानंतर आज हवेत
अजिबात आर्द्रता नव्हती. कालचा आणि आजचा दिवस दिवाळी साजरी केली. म्हणजे
अगदीच काही नाही तरी शास्त्रापुरते तरी पदार्थ करू असे ठरवले होते. काल
बेसन लाडू आणि पातळ पोह्यांचा चिवडा केला आणि आज सकाळी उठल्या उठल्याच दोन
पदार्थ केले ते म्हणजे ओल्या नारळाच्या करंज्या आणि जाड पोह्यांचा चिवडा.
धान्याची रांगोळी काढली आणि झाली दिवाळी. अगदी सुटसुटीत अशी. हल्ली तेलकट
तुपकट खाणे नको वाटते. आज सकाळी विनायक बाहेर फिरायला गेला आणि म्हणाला आज
आपण समुद्रकिनारी जायचेच. काल ठरवल्याप्रमाणे उसळ आणि पोळ्या केल्या म्हणजे आल्यावर काही करायला नको. आवडीच्या ओल्या नारळाच्या करंज्या, उसळ पोळी खाल्ली आणि आडवे न होता लगेचच आवडत्या समुद्रकिनारी जायला निघालो. खरी तर झोप येत होती आणि प्रखर सूर्य डोळ्यावर येत होता. तिथे पोहोचलो आणि नेहमीप्रमाणे चक्कर मारली.
आज
आकाश खूपच निरभ्र होते. एकही म्हणजे एकही ढग नव्हता. समुद्राचे पाणी शाई
किंव्हा नेव्ही ब्ल्यू रंगाचे दिसत होते. ढग असले की त्याच्या निरनिराळ्या
छटा पाण्यावर उमटतात. हिरवा, निळा, मातकट असे रंग समुद्राच्या पाण्यावर दिसतात. आज तसे नव्हते. कुठेही नजर फिरवा, रंग एकच होता. गडद निळा आणि आज ओहोटी असल्याने वाळू ओली होती त्यामुळे चालताना त्रास होत न्हवता आणि म्हणूनच खूप चालणे झाले.सीगल पक्षांची दोन चार पिल्ले किनारी खेळत होती. इटुकली पिटुकली छान दिसत
होती. आज ओहोटी जरी असली तरी पूर्वी एकदा गेलो होतो तशी नव्हती. काही भागात
पाणी होते त्यामुळे सलग किनाऱ्यावरून चक्कर मारता आली नाही. उन
लागल्यामुळे डोके मात्र जाम दुखत आहे. आल्यावर गरम चहा आणि सोबत चिवडा
खाल्ला. आज रोजनिशी लिहायलाही मुहूर्त लागला. आजचा दिवस हवेच्या बाबतीत खरच खूपच वेगळा होता ! आणि एकूणच जेवणाच्या बाबतीतही खूप वेगळा होता. आज सावल्यांचे फोटो घेतले. जरा काहीतरी वेगळे. नाहीतरी वेगळे असे एखाददिवशी तरी झाले पाहिजे ना ! नाहीतर तोचतो पणा तर आयुष्यात भरलेलाच असतो.
Saturday, October 25, 2014
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment