Wednesday, February 12, 2014
१२ फेब्रुवारी २०१४
आजचा दिवस घडामोडींचा होता. हिवाळ्यातली हिमवृष्टी आणि वादळे इथे अमेरिकेत होतच असतात. आमचे गाव या वादळाच्या पट्ट्यात कधीच येत नाही हे एका अर्थाने खरच खूप चांगले आहे. वादळाचा थोडाफार प्रभाव आमच्या शहरावर पडतो इतकेच. तसे तर आमच्या गावात हिमवृष्टी कधीच होत नाही. ९ वर्षात ४ वेळाच झाली आहे आणि ती सुद्धा महाभयंकर नाहीच. अगदी पहिला स्नो तर काय पडला पडला म्हणेपर्यंत गेला पण. नाही म्हणायला दुसरा स्नोफॉल म्हणजे २०११ मधला चांगला होता. तो एकच दिवस होता. १० दिवसापूर्वी पडला तोही जरा वेगळाच आणि आजचा तर खूपच वेगळा. या चार स्नो फॉलमध्ये बर्फाची वेगवेगळी रूपे पहायला मिळाली.
२०११ चा स्नोफॉल मात्र छान अनुभवायला मिळाला. त्यात मी स्नो डॉल, स्नो गर्ल आणि स्नो मॅन बनवले होते. भुसभुशीत बर्फ पडला तर चांगले वाटते. पण जरा का तसा न पडता आईस रूपासारखा पडला तर कटकट होऊन बसते. आईस म्हणजे आपल्या फ्रीजमध्ये जसा असतो तसा बर्फ पडतो. हवेतून कापसासारखा हलका पांढराशुभ्र पडला तर त्याची मजा असते. आमच्या राज्यात बाकीच्या शहरात दणाणून हिमवृष्टी झाली आहे. हवामान चॅनल वर वीज जाईल असा संदेश देत होते. पण तरीही आपल्या शहरात जाणे शक्यच नाही म्हणून मी तशी निर्धास्त होते. सकाळी उठल्यावर विनायक ऑफीसमध्ये चालतच गेला. जवळच ऑफीस असल्याने ते शक्य होते. गाडीवर बर्फ जमा म्हणजे चिकटून बसला होता. तो खरवडायलाच लागणार होता. आमच्याकडे खरवडण्यासाठीचे हत्यार नव्हते. तसे ते मुद्दामहून घेणे कधीच झाले नाही कारण की तशी वेळच येत नाही . त्यामुळे तो चालत गेला. चालण्यासारखी परिस्थिती होती कारण की जमिनीवर बर्फ साठलेला नव्हता. यावेळी तो फक्त झाडांवरच लपटलेला दिसत होता. फेसबुकावर येरझाऱ्या आणि बाकीची भाजी आणि नेहमीची फोनाफोनी करून झाली. भाजी झाली आणि आज कणिक भिजवायची होती इतक्यात आपण डोळे कसे मिचकावतो तसे लाईटनेही २ ते ३ वेळा मिचकवले. लाईट जाणार की काय? थोडी शंका आली. लगेचच भराभर पाऊले उचलली. म्हणजे पटकन कणिक भिजवून अगदी मोजून ५ मिनिटे कणिक मुरल्यावर लगेच पोळ्या करून घेतल्या. थोड्या रात्रीसाठी पण लाटून ठेवल्या. गरम पाणी आहे तोवर लगेचच घाई घाईने अंघोळ उरकली.
अंघोळ उरकल्यावर वरण भाताचाही कूकर लावणार होते पण तितक्यात लाईट गेले. दुपारची जेवणे झाली. विनायक ऑफीसला चालत गेला आणि आता काय करावे बरे या विचारात मी थोडी आडवी झाले. लाईट काय दोन चार तासात येतीलच पण नाही आले तर आणि उद्याही आले नाहीतर? त्यापेक्षा उजेड आहे (तसा खूप उजेड नव्हता) तोवर काही ना काही दुकानातून घेऊन येऊ. खाली उतरणार आहोतच तर कचराही टाकू म्हणून जय्यत तयारीनिशी म्हणजे सर्व अंगाला सर्व बाजूने लपेटून घेतले. आणि जिन्याला धरून सावकाशीने खाली उतरले. कचरा टाकला आणि छत्री उघडून चालू लागले. पुढच्या चौकातच दुकान आहे. जास्त लांब नाही पण तरीही बोचरे वारे असल्याने शॉर्ट कटने गेले. वारे इतके होते की मी छत्री डोळ्यासमोर धरली होती. या शॉर्ट कट रस्त्याचे मी आज मनापासून आभार मानले. तसे तर हा रस्ता बनवला नाही. आमच्या अपार्टमेंटच्या समोर गॅस स्टेशन आहे आणि आमच्या दोघांमध्ये तारेचे कुंपण आहे. पण हे कुंपण लोक नेहमीच तोडून टाकतात त्यामुळे हा रस्ता तयार झाला आहे. चालत दुकानात गेले तर आत लाईट नव्हते. पॉवर नसली तरी जनरेटर असतो. पण या दुकानात का नव्हता कोण जाणे. दुकानातल्या मॅनेजरने दार उघडले आणि सांगितले की पॉवर नाहीये. सॉरी. मी म्हणाले की मी इमर्जन्सी साठी काही वस्तू घेण्याकरता आली आहे. तरी तो सॉरीच म्हणाला. मग मी बाहेरच्या बाकड्यावर थोडी दम खायला बसले . तितक्यात एक बाई बाहेर आली आणि मला सांगितले की तुला मॅनेजर बोलावत आहे. मी आत गेले आणि माझ्याबरोबर कॅशिअरही चालत चालत दुकानभर काही गोष्टींसाठी फिरला. दुकानात अगदी तुरळक मंद लाईट होते. तो मॅनेजर म्हणाला की नंतर येऊन पैसे द्या तर मी म्हणाले नको माझ्याकडे कॅश आहे. तेव्हा मग पैसे दिले आणि परत शॉर्टकटने घरी परतले. येताना झाडांकडे बघत होते. सर्व झाडे बर्फाने वेढलेली होती. एका हातात सामानाच्या कॅरी बॅगा होत्या. छत्री मानेने सावरली व एका हाताने फोटो घेतले. काय जरूर आहे का एवढे क्ररायची. पण हे क्षण गेले की गेले परत थोडीच येणार आहेत?
थंडीने जाम गारठले होते. आल्यावर चहा प्यावासा वाटत होता पण पॉवर नसल्याने कुठला आलाय चहा. सर्व कसे अगदी ठप्प होऊन जाते. मायकोवेव्ह नाही. इलेक्ट्रिक शेगड्या चालत नाही की गरम पाणी नाही. तसे गरम पाणी थोडावेळ टिकते. सामानात बटाटा वेफर्स, बिस्किटे आणि ब्रेड आणला होता. फळे होतीच , पिण्याचे पाणी होतेच त्यामुळे तितकी चिंता नव्हती. लाईट उद्याला आले नाहीत तर ब्रेड सँडविच खायचे असे ठरवले. टोमॅटो, काकडी, कांदा यांचे काप, थोडे लोणचे लावायचे ब्रेडला आणि साजूक तूप लावायचे. टोमॅटो केचप बरोबर असे हे जेवण आम्ही उद्या करणार होतो.
हिटर नसल्याने जाम थंडी वाजायला लागली. एरवी हिटर चालू असला की साधा स्वेटर ही घालायला लागत नाही पण आज बाहेर जाताना जसे लपेटून जातो तसेच लपेटून शिवाय मफलर गुंडाळून , दुलई घेऊन आडवी झाले. डोळे मिटून आडवे पडण्याशिवाय काहीच करता येत नाही लाईट गेले की. थंडी वाजून ताप भरतो की काय असे वाटू लागले. परत उठले. गरम पाणी आहे तोवर दुपारची साठलेली भांडी घासून टाकूया म्हणून घासली आणि तितक्यात लाईट आले. पण आले म्हणता म्हणता गेलेही. नंतर परत थोड्यावेळाने असेच झाले. लाईट आले म्हणून पटकन मायक्रोवेव्हचे घड्याळ सेट करून चहा ठेवायला गेले तर परत लाईट गेले. नंतर परत बराच वेळ लाईट नाहीत. असे वाटले की बहुधा आता ते येत नाहीत. आजची रात्र थंडीत कुडकुडत आणि ठार अंधारात काढावी लागणार बहुतेक असे वाटून गेले. अंधारून येत होते आणि तितक्यातच दिवेलागणीच्या सुमारास दिवे लागले. विनायक पण घरी आला. लाईट आल्यावर इतके काही हायसे वाटले. हिटरने संपूर्ण घर गरम झाले आणि आम्हीही गरमागरम चहा घेतला. आता काही लाईट जाणार नाहीत हे माहीती असून सुद्धा मी लगेच वरण भाताचा कूकर लावून घेतला. जेवताना आम्ही बोलत होतो की हेच जर लाईट आले नसते तर मेणबत्तीच्या प्रकाशात झोपून राहण्याशिवाय काहीही पर्याय नव्हता ना ! थंडी असल्याने रात्रभर चांगलीच हुडहुडी भरली असती. कोणत्याची गोष्टींची कमतरता असली कीच त्या त्या गोष्टींची किंमत कळते ना ! आज रोजनिशी लिहायला मजा येत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
chan watle wachun. khup divasani aaj tuzya blog la bhet dili. nivant pane dupari.:)
Pallavi
ameriket baher jaychye thandit mhanje apne aap me ek lambi shtory ch aste na. mala nehmi watate.. kahi tari prachand kam karun aalyasarkhe damayla hote kharach khup. ghari aalya alya chaai pyavasach watato. pallavi
pallavi,, tuza abhipray vachun khup chhan vatle ga ! utsah aala, ho ga, thadit jastach damayla hote na, tari ithe itaki khup thandi nahi, snow pan kadhich padat nahi, ya varshi tar thandine kamal keli aahe,, phone kar na mala edka, :) mi pan karinach, tuzyashi phone var bolun pan mala masta vatate ekdam ! thanks !
Post a Comment