"रिक्शा! " रिक्शा थांबल्यावर मी विचारते पार्ले ईस्ट? रिक्शावाला खुणेनेच 'बसा' म्हणतो आणि ती रिक्शा मी थेट मराठी ग्रंथालयापाशी उभी करण्यास सांगते.
आम्ही जेव्हा डोंबीवलीवरून अंधेरी ईस्टला रहायला आलो तेव्हा मी दर रविवारी पार्ले येथे जाऊन बाजारहाट करीत असे. रविवारी सकाळी आवरून १० लाच मी बाहेर पडायचे. ग्रंथालयात पुस्तके बदलाय्ची. नंतर चालत भाजी मार्केटात शिरायचे. भाजीचे ढीगच्या ढीग लागलेले असायचे. ताजी ताजी भाजी बघताना माझे मन खूपच प्रफुल्लीत व्हायचे ! मटार, गाजर, फ्लॉवर अशा एकेक करत भाज्या घेत असे. कणसे बाजारात दिसली रे दिसली की ८ ते १० घ्यायचेच, कारण की भाजून खाण्यापेक्षाही मी त्याचा फोडणीचा चिवडा करायचे. त्यात नारळाचा खव आणि कोथिंबीर जशी पोह्यांना घालतो अगदी तसेच. गरम गरम खायला छान लागतो हा चिवडा. कोवळी कणसे किसली पण पटकन जातात. मिरच्यांचे वाटे, कोथिंबीरीची गड्डी, नारळाची वाटी हे तर हवेच हवे ! फळफळावळही घ्यायचे. कधी ताजी अंजिरे तर कधी ब्लॅक ग्रेप्स, चिकू, किंवा मग फणसाचे गरे ! घरून निघताना एकात एक अशा ५ ते ६ पिशव्या घेऊन जायचे. मग एकेक करत एकेक पिशवी उघाडून त्यात भाज्या स्थानापन्न व्हायच्या. भाज्या पिशवीत घालताना पण खाली टोमॅटो आणि वरती कोबीचे जडजड गड्डे असे कधी होऊन द्याय्चे नसते ! पर्स नेहमी एकपट्टी म्हणजे मग गळ्यात अडकवली की दोन्ही हात जड भाज्यांच्या पिशव्या उचलायला मोकळे राहत असत. दोन हातात ५ ते ६ पिशव्या घेऊन लगेचच आमची स्वारी एका ठिकाणावर येऊन थांबायची. तिथे गरम गरम बटाटेवडे, समोसे मिळायचे. ते घेऊन लगेचच रिक्शाला हात ! आणि हो ताजे आलेही आठवणीने घ्यायचे बरं का ! कारण की घरी गेल्या गेल्या बटाटेवडे नाहीतर समोसे खाल्ले की लगेचच हातात आलं घातलेला चहाचा मग असायचा.
नंतर एकीकडे वरणभाताचा कूकर लावून, कणीक भिजवून पिशव्यातील भरगच्च भरलेली भाजी एकेक करून वर्तमानपत्रावर ठेवायचे. पिशवीत गिचमिडीत बसलेल्या भाज्यांना पण हवा लागली पाहिजे ना! त्यातली एक भाजी चिरून रोळीत धूउन ठेवायचे. नंतर एकेक करून भाज्या शीतकपाटात जायच्या. नारळाची वाटी थोडी विळीवर खरवडून ताजे खोबरे असायचे आमटी भाजीला! कढीपत्त्याशिवाय तर माझे पान हालायचे नाही. एवढे सगळे होईपर्यंत आम्हाला जेवायला चांगलाच उशीर व्हायचा. असा हा रविवारचा बाजारहाट मोठ्या थाटामाटात साजरा व्हायचा.
मला भाजी खरेदी खूपच आवडते. किती भाज्या घेऊ न किती नाही असे मला नेहमीच होते. प्रत्येक ठिकाणचा बाजारहाट मला खूप आनंद देऊन जातो. जेव्हा आम्ही डोंबिवलीत रहायचो तेव्हाही मी अशीच सकाळी भाजीला जायचे. डोंबिवलीत आजुबाजूच्या खेडेगावावरून ताज्या ताज्या भाज्या खूप यायच्या. या भाजी खरेदीमध्ये ताज्या पालेभाज्या, छोटी वांगी व छोटी कारली यांची खरेदी व्हायचीच! एक अननसवाला होता, त्याच्याकडून मी अननस कापून घ्यायचे. घरी आल्यावर तो शीतकपाटात ठेवायचे. रात्री जेवणानंतर गार गार अननसाच्या फोडी खायला खूपच मजा यायची. डोंबिवलीत भाजी खरेदी करताना ऊसाचा रस प्यायला जायचा. बेकरीतून खारी घेतल्या जायच्या. इथे तर काही भाजीवाल्या बायका त्यांच्याकडूनच भाजी घेण्यासाठी ठरून गेल्या होत्या. त्यांच्याकडे खूप छान भाजी मिळायची. डोंबिवलीत असताना मी रविवारी कधीच जायचे नाही. मधल्या वारी सकाळी भाजीखरेदीला जायचे. नोकरी करत असताना नोकरीच्या ठिकाणावरून बस भाजी मार्केटमध्ये जायची, तिथे उतरायचे व भाजी घेऊन रिक्शाने घरी परतायचे. त्यावेळेला रविवारी सकाळी आमच्या सोसायटीत एक भाजीवाली यायची. तिच्याकडून मी नेहमी भोपळे घेत असे.
डोंबिवलीत राहत असताना पालेभाज्यांमध्ये मी मुळा खूप वेळा आणला होता. मुळ्याच्या पाल्याची वेगळी भाजी परतून करायचे व मुळ्याची दह्यातली कोशिंबीर! हिवाळ्यात मेथी आली रे आली की लगेच माझे मेथीचे पराठे करणे सुरू व्हायचे. शिवाय ताजी मेथीची पाने चिरून त्यामध्ये थोडा कांदा, तिखट व मीठ असे जेवणाच्या ताटात डाव्या बाजूला ठरलेले असायचे. मेथीची भजीही अनेकवेळा करत असे. कडू मेथीची चव छानच लागते. तसेच जास्तीचे तेल घालून केलेली गोळा भाजी व पीठ पेरूनही ही भाजी व्हायची. आणि हो बटाटे उकडून त्याच्या फोडी किंवा बटाट्याच्या काचऱ्या चिरून त्याही मेथीबरोबर परतल्या जायच्या. बोरांमध्ये सुपारीएवढी बोरे मला खूप आवडायची. त्यावेळेला गाजरे लाल रंगाची मिळायची. ही गाजरे नुसती खायला चांगली असतात. कारण ही गोड लागायची. मला शेंदरी रंगाची गाजरे कधीच आवडली नाहीत. लाल किसलेल्या गाजरात लाल टोमॅटोच्या फोडी घालून कोशिंबीर छान लागते. त्यावर चिरलेली कोथिंबीर आणि वरून फोडणी. फोडणीमध्ये मिरच्यांचे तुकडे आणि लाल तिखटही! विळीवर भाजी चिरता चिरता गाजरे एकीकडे खात असे.
त्यावेळेला आमच्या शेजारच्या पारखीवहिनींबरोबरही मी सकाळी बाजारात भाजी घ्यायला जायचे. दोघी घरी आलो की चहाबरोबर खारी खायचो. त्यादिवशी आम्ही दोघी एकत्रच जेवायचो. जेवण आमच्या घरीच व्हायचे. त्यांना माझ्या हातची मुगाच्या डाळीची खिचडी खूप आवडायची. मुगाच्या डाळीच्या खिचडीबरोबर भाजलेला पोह्याचा पापड, खिचडीवर साजूक तूप आणि चिरलेली कोथिंबीर व ओल्या नारळाचा खव. शिवाय एका ताटलीत भरपूर गोल पातळ कांदा, टोमॅटो, काकडी, गाजर व मुळ्याचे कापाही करून ठेवायचे. नंतर सायीचे दही व ताजे ताक. असा आमच्या दोघीचा बाजारहाट खूप मजा देऊन जायचा.
क्रमश: ----
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 comments:
Farach surekh lihile aahe :) Waiting eagerly for next part rohinitai ...
Thanks a lott nisha,, lavkarach lihin :)
baryach divasani blog la bhetle. chan jamlay lekh agdi. tuza phone no. mazya modlelya phone madhun haravla. jamel tenva phone kar uchalala nahi tar message thev. lavkarach boluya - pallavi
thanks pallavi,,, mi tula phone karnarach hote, karin udya parva kade, tuzi comment vachun khup chhan vatle,, thanks
Post a Comment