Tuesday, March 26, 2013

२६ मार्च २०१३

मध्यंतरी मी पल्लवीला फोन केला तर म्हणाली तू बरेच दिवसात रोजनिशी लिहिली नाहीस. मला खूप छान वाटले हे ऐकून. कोणीतरी इतके मन लावून वाचतय आणि ते आवडतय हे बघून मला खूपच छान वाटले. आमच्या इतर गप्पा टप्पा झाल्या. बरेच दिवस लिहू असे म्हणत होते पण लिहिणे होत नव्हते. आज लिहावेसे वाटले.





आज संध्याकाळी फिरायला बाहेर पडले. नेहमीचीच तळ्यावर एक चक्कर आणि त्यापुढे अजून एक तळे आहे, तिथेही गेले होते. आज थंडी होतीच. स्प्रिंग चालू झाला तरी थंडी जायला तयार नाही. आज आभाळ ढगांनी थोडे भरले होते. नेहमीसारखेच निळे, लालसर छटा असलेले ढग होते. तशी हल्ली तळ्यावर बदके बरीच कमी असतात. तळ्यावर ब्रेड घालायला बंदी घातलेली आहे आमच्या अपार्टमेंटच्या मॅनेजर बाईने, खरे तर तसे चांगलेच झाले. बदके खूप झाली होती. छोटी मोठी , त्यांची पिले, रस्ता ओलांडताना वाहतुक मुरंबा करतात. आज तळ्याभोवती चक्कर मारताना चांगलेच जाणवत होते. पूर्वी या सर्व जागेवर इथे न तिथे किती बदकांचे फोटोज घेतले होते. तळ्यावरच्या प्रत्येक जागा आठवत होत्या. बदकांच्या पूर्वीच्या आठवणी येत होत्या.




आज होळी पौर्णिमा असल्याने आकाशात चंद्र फुलून आला होता. संध्याकाळचा सूर्यास्तही छान होता. दोघांचेही फोटो घेतले. आज सकाळी युट्युबवर होळीची गाणी पाहिली ती सुद्धा नेहमीचीच. आज विचार केला की पूर्वी लहानपणी रंगपंचमी साजरी करायचो. हा रंगपंचमी नावाचा वेगळा दिवस असतो आणि तो रंग खेळून व गोडाधोड करून पुण्यात साजरा व्हायचा. हल्ली सर्व विसरलेत की काय या रंगपंचमीला.






पूर्वी माझा अगदी नियमित व्यायाम व्हायचा पण गेले काही वर्षे नियमीत व्यायाम होत नाही. रोजच्या रोज केला तर तो करवतही नाही पण निदान आठवड्यातून दोनदा तरी व्हायला पाहिजे असे ठरवते पण होत नाही. आज सकाळी केला आणि एकीकडे पीसीवर गाणीही लावली. असे लक्षात आले की व्यायाम करताना गाणी ऐकली तर तो जास्त उत्साहात केला जातो, तसे तर मला स्वयंपाक करताना पूर्वी रेडिओवरची गाणी लागायचीच. एकीकडे गाणी ऐकत ऐकत स्वयंपाक. तसे आता होत नाही. सकाळचा वेळ इंटरनॅशनल कॉल मध्ये जातो. फोन वर बोलता बोलता माझी भाजी होऊन जाते. आज संध्याकाळी सारखे पोहे आणि शिरा होतो म्हणून उकड केली होती. काल अंजली मला म्हणाली होती की ती झोपताना फेसबुकवर गुडनाईटचे एक चित्र टाकणार आहे. मी आज त्या चित्राची खूप वाट पाहत राहिले होते. कसे असेल आजचे चित्र अशी उत्सुकता होती.
आजचा दिवस खूप खास नव्हता पण अगदी वाईटही नव्हता.

3 comments:

श्रिया (मोनिका रेगे) said...

छान लिहिले आहेस ताई ...:)

Mohana Prabhudesai Joglekar said...

छान लिहलं आहेस रोहिणी. मी एरोबिक्स करताना टी. व्ही. वर DVD लावते आणि लॅपटॉपवर आपली मराठीचा कोणतातरी चित्रपट. त्यामुळे आपण एरोबिक्स करतो आहोत याची जाणीवच होत नाही.

rohinivinayak said...

monika,, mohana,, pratisadabaddal anek dhanyawaad ! chhan vatle