Monday, January 30, 2012

ऑनलाईन

"ए हिनी ऑनलाईन म्हणजे काय गं?" इति लिना, "का गं?" इति हिनी. परवा सोहम मला सांगत होता की अश्विनी सतत ऑनलाईन असते म्हणून. जेव्हा पाहावे तेव्हा ती इंटरनेटवर कायम पडीक असते. हंऽऽऽ ती अश्विनीना! हो. ती कायम असते तिथे. मी तिला किती वेळा सांगितले की ऑनलाईनचे व्यसन कमी कर म्हणून. पण ऐकायलाच तयार नाही ती! मला म्हणते अगं ऑनलाईन असेल तर माणसात असल्यासारखे वाटते गं म्हणून मी कायम पडीक असते.








मी पण आधी खूप 'नेटव्यसनाधीन' होते पण आता हळूहळू कमी करत आणले आहे हे व्यसन. सुटणे शक्य नाही पण निदान कमी करणे तरी आपल्या हातात आहे ना! बरं तू काय विचारत होतीस? ऑनलाईन म्हणजे काय? अगं ऑनलाईन म्हणजे आपला जो संगणक असतो ना त्याला जोडायचे इंटरनेट कनेक्शन की झाले ऑनलाईन. याचा एक फायदा असा की तुम्ही घरबसल्या जगभर फिरून येऊ शकता. घरबसल्या मित्रमैत्रिणींचे कलागुण पाहायला मिळतात. ओळखी होतात. घरबसल्या तुम्ही जगभरातील मित्रमैत्रिणींशी बोलू शकता. काही वेळेला असेच भेटल्यासारखे पण वाटते प्रत्यक्षात न भेटताही! मी आता तुला सविस्तरच सांगते की मला ऑनलाईन व्यसन कधी आणि कसे लागले ते!







मी व वि जेव्हा अमेरिकेत आलो त्या आधी नुकतेच ऑनलाईन चालू झाले होते. इथे आल्यावर मला आठवत आहे 'वि'च्या रेडीफ ईपत्र खात्यातूनच मी माझ्या एक दोन मैत्रिणींना ईमेल पाठवायचे. सुरवातीला विद्यापीठाच्या ग्रंथालयात जाऊन संगणकावर इसकाळ वाचणे हे नित्यनियमाचे होते. साप्ताहिक सकाळचा अंकही वाचायचे. एखादी मेल पाठवायचे. मेल आली असेल तर त्याला उत्तर पण त्यावेळी मला कोणाची ईमेल आली का नाही याबद्दल फारसा रस नव्हता.








दुसऱ्या शहरात आल्यावर पण विद्यापीठात जायचे मेल वगैरे पाहण्यासाठी किंवा वाचण्यासाठी. नंतर घरीच एखादा संगणक घ्यावा का असा विचार चालू झाला. त्यावेळी "म्युझिक इंडिया ऑनलाईन" वर आपल्याला हवी असलेली सर्व गाणी ऐकता येतात हे माहिती झाले होते. आम्हाला दोघांना गाण्याची आवड असल्याने निदान संगणकावर गाणी तरी भरपूर ऐकता येतील म्हणून संगणक घ्यायचा ठरवला. ख्रिसमस मध्ये इथे सेल भरपूर प्रमाणात असतात तेव्हा खरेदी केला. संगणक चालू करण्यासाठी वायरीची जुळवाजुळव केली व संगणक सुरू झाला. त्यावेळी सुरवातीला इंटरनेट कनेक्शन फोनमधून सुरू होणारे घेतले होते. जितका वेळ नेट सुरू राहील तितका वेळ फोन बंद राहायचा. नाहीतरी इथे कुणाचे सारखे फोन येतात! थोडीफार गाणी ऐकून, मेल पाठवून, थोडे वाचन करून एक दोन तासात बंद पण करायचो आम्ही नेट!








आम्ही अमेरिकेत आलो तेव्हा माधवी नावाची माझी एक मैत्रीण झाली होती. तिच्या घरी संगणक होता व नेटही! तिच्याकडे जाऊन मग मी अधुनमधुन मेल चेक करायला जायचे. ती तर त्यावेळीही म्हणजे २००१ मध्ये चॅटिंग करण्यात तरबेज होती. तिची ओळख जेव्हा झाली आणि तिला विचारले की तू तुझा वेळ कसा घालवतेस? तर म्हणाली की मी सकाळी सर्व आवरून स्वयंपाक करून ९ वाजता नेटवर बसते ती १२ ला उठते. त्यावेळेला तिचे भारतातील मित्रमैत्रिणी तिच्याशी याहू निरोपकावर गप्पा मारायचे. नंतर दुपारी ३ ते ५ ती तिच्या अमेरिकेत राहणाऱ्या दोघी बहिणींशी गप्पा मारायची. मला खूप छान वाटले होते ते ऐकून. मग तिला सांगितले की तू जेव्हा निरोपकावर गप्पा मारशील तेव्हा मला बोलाव. मला बघायचे आहे तू कशी गप्पा गोष्टी करतेस ते आणि शिकायचे पण आहे. मला ते पाहिल्यावर खूप मजा वाटली होती. घरी संगणक आल्यावर मी माझे रेडीफ व याहूमध्ये माझे खाते उघडले.







संगणक घरी आल्यावर म्युझिक इंडियावर हिंदी मराठी गाणी ऐकणे म्हणजे एकदम वा!! असे होते. मनोगत संकेतस्थळ हे त्यावेळी नवीन होते. तिसऱ्या शहरात आल्यावर मात्र सुरवातीला काही वर्षे मनोगतावर पडीक रहायचो आणि त्यातूनच या व्यसनाला खरी सुरवात झाली. त्यावर वाचन लेखन सुरू झाले. याहू निरोपकावर बरेच मित्रमंडळही जमा झाले. सकाळी संगणक उघडताच निरोपकावरील मित्रपरिवाराच्या ४-५ खिडक्या उघडायच्या. "काय चालू आहे? ", "उठलीस का? ", "कशी आहेस? " वगैरे निरोप यायचे. त्यावेळी सुरवातीला ३-४ खिडक्यांना जलद गतीत टंकित करून उत्तरे लिहिली जायची. नंतर याहू निरोपकावर आवाजी चर्चा सुरू झाल्या. काही वेळेला गप्पा मारण्यासाठी एकाच याहू निरोपकाच्या खिडकीत जमा होऊ लागलो. मंद गतीने चालणारे नेट जाऊन जलद गतीने चालणारे नेटही आले! आता तर उठल्यावर जो संगणक चालू होतो तो रात्री झोपायच्या आधी बंद होतो. संगणक बंद करायच्या आधी सगळीकडे फेरफटके मारतो.









म्युझिक इंडिया नंतर धूम एफ एम बरेच ऐकून झाले. अमेरिकेतील घड्याळानुसार दुपारी २ ते ४ जुनी हिंदी गाणी लागायची आणि अधून मधून निवेदन करणाऱ्या बाईचा गोड आवाज! युट्युबवर तर इतकी काही गाणी वाजवून झाली की पुरे आता! इतके म्हणण्याची वेळ आली. पुरे आता! म्हणण्यापेक्षा गाणी ऐकून ऐकून मीच आता युट्युबवर गायला सुरवात करून हौस भागवत आहे. ऑनलाईन शब्द मिळतात. चाली तर जवळजवळ बऱ्याच गाण्यांचा जश्याच्या तश्या गाता येतात. तो देर किस बातकी! पूर्वी रेडिओवर ऐकलेली गाणी संगणकाच्या पडद्यावर बघितल्यावर परत परत बघावीशी वाटली. इथे अमेरिकेत नेट कधी गायब होत नाहीच. झालेच तर इतकी काही चिडचिड व्हायची ना! "हात मोडल्यासारखे" वाटायचे. घरात खूप मोठी "पोकळी" निर्माण झाल्यासारखे वाटायचे. आता तसे होत नाही. असे वाटते नेट गेले तर बरेच होईल "शांतपणे झोपता येईल" आणि घरातले "पसारे" आवरले जातील. नेट नव्हते तर आपण कोणत्या गोष्टीत मन रमवायचो हे आता आठवायला लागेल इतके आपण त्यात गुरफटले गेलो आहोत. टिचक्या मारणे आता बरेच कमी करत आणले आहे. सकाळी सर्व टिचक्या मारून झाल्या की बंद करू संगणक आणि बाकीच्या गोष्टींमध्ये मन रमवू असेही करून बघितले. पण मनाची "चुळबूळ" काही थांबत नाही म्हणून मग संगणक तसाच ऑन ठेवते.








आधी ऑर्कुट आवडायचे नाही. सवयीने ते आवडायला लागले. फेसबुक नको! खूप गिचमीड वाटते पण काही मित्रमैत्रिणींसाठी मी फेसबुकवर आले व सवयीने तेही आवडायला लागले. नेटचा एक फायदा म्हणजे घरबसल्या आपण जगभर फिरतो पण तेवढाच तोटा म्हणजे एकाजागी आपण किती वेळ बसून असतो देव जाणे! राहत्या जागेत बाकीच्या खोल्यांमधला वावर अगदीच मोजका असतो. डायनिंग वर जेवण नाही. बरोबर संगणक लागतोच. लॅपटॉप मुळे सगळीकडे फिरवा हवा असेल तसा. जणू काही छोटे बाळच! कडेवर घ्या आणि जा कुठेही!








घरात इन मीन दोन तीन माणसे पण तिही दाही दिशांना पांगलेली! पूर्वी दूरदर्शनच्या खोक्यासमोर बसायचो आता संगणकासमोर! नवराबायको असतील तर तिही वेगवेगळ्या दिशांना. एका खोलीत बायकोच्या नाकासमोर संगणक तर दुसऱ्या खोलीत नवऱ्याच्या नाकासमोर संगणक. कदाचित दोघेही प्रत्यक्ष न बोलता निरोपकाद्वारेच बोलत असावेत! आता हे व्यसन मी इतके काही कमी करत आणले आहे की काही लिहायचे असेल तरच मी त्याच्याजवळ जाते अन्यथा "दूर हटो मेरी नजरोंसे! " सकाळी उठल्यावर चहाचे घोट घेता घेता जितक्या टिचक्या होतील तितक्याच. दहा मिनिटात उरकते सगळे. सध्या वॉच इंडियावर कधीही न संपणाऱ्या मालिका पाहणे इतकाच थोडाफार वापर आहे.









या नेट व्यसनात मात्र काही गोष्टी कायमच्या आठवणीत राहिल्या आहेत. मनोगत संकेतस्थळावर पूर्वी मी चालू केलेल्या मराठी गाण्याच्या भेंड्या! ऑर्कुटवर एका मराठी समुदायात एकीने सुरू केलेली ऑनलाईन अंताक्षरी! त्याच मराठी समुदायात मी सुरू केलेला गाण्याचा खेळ "मुखडा अंतरा!" आर्कुटवरील काही ऑनलाईन पाककृती आणि निबंध स्पर्धा! या आणि अजूनही काही "खूप छान" अशा आठवणी आहेत की ज्या संगणकामुळेच शक्य झाल्या, होत आहेत आणि होतीलही! नेटवरचा गुगलमित्र मात्र कायम लक्षात राहील इतका तो मदतीसाठी धावून येतो!




"लिना कळले का गं आता तुला ऑनलाईन म्हणजे काय ते! "






"होंगं ! मस्तच आहे हे ऑनलाईन! मी पण येईन आता तुमच्याबरोबर ऑनलाईन आणि हो या "नेटव्यसनाधीन" कसे व्हायचे नाही याची सुरवातीपासूनच काळजी घेईन गं हिनी मी!

2 comments:

mau said...

मस्त लिहिले आहेस रोहिणी...आपण किती गप्पा मारल्या असतील नं..कित्ती कित्ती गोष्टी शिकलो एकमेकिंकडुन..माझे याहु अकाऊंट डिलीट करुन वर्ष झाले आता..सगळं कसं चिडीचुप झालय आता..खरचं हे एक व्यसन आहे..आपण वेळीच बाहेर निघालो हे मात्र खरे.....

rohinivinayak said...

हो गं उमा,, खूप मजा केली.. पण आता कंटाळा आला आहे.. मी जर भारतात असते तर मला हे व्यसन लागले नसते कदाचित.. अर्थात मी पूर्वीच्या गोष्टी करत आहे..