Friday, September 16, 2011

तळे... (२)

मी जेव्हा बदकांना ब्रेड घालायला सुरवात केली तेव्हापासून रोज तळ्यावर जायला सुरवात झाली. बदकांना ब्रेड घालण्याच्या आधी मी रोज नित्यनियमाने फिरायला जायचे. फिरायला जायच्या आधी दहा मिनिटे व फिरून आल्यावर दहा मिनिटे तळ्यावर उभी राहून बदकांचे निरिक्षण करायचे. बदकांना ब्रेड घालण्याची सुरवात केव्हा आणि कशी झाली हे सांगण्याची सुरवात मी नंतर करते. त्या आधी ७ सप्टेंबरला जी पिल्ले जन्माला आली तशीच १३ सप्टेंबर रोजी १० ते १२ पिल्लांचा जन्म झाला.









तळ्याच्या अगदी जवळच्या अपार्टमेंटमध्ये जॉना राहते. तिच्या घरासमोर व मागे एकेक उथळासारखे दिसणारे लाकडी चौथरे तिने बांधले आहेत. त्यातल्या एका चौथऱ्यात एक व दुसऱ्यात एक अशा दोन बदकीणींनी अंडी घातली होती. रोज मी जाऊन अंडी मोजायचे. १,२,३,४... करता करता १८ ते २० अंडी दोघींनी घातली. अंडी घालून झाल्यावर बदकीणी त्यावरती बरीच पिसे जमा करून ठेवतात व नंतर एक दिवस ठरवून त्यांनी घातलेल्या अंड्यांवर बसायला सुरवात करतात. ७ सप्टेंबर रोजी जन्माला आलेली बदकपिल्ले केव्हा एकदा येत आहेत असे मला झाले होते. रोज चौथऱ्याजवळ जाऊन मी त्या बदकीणीला हाय, हॅलो करायचे. थोडी बारीक शीळ घालून, काय गं आली का तुझी पिल्ले! असे म्हणल्यावर ती थोडी जागची हालायची तेव्हा मला तिचे एक पिल्लू दिसले तेव्हा जॉना पण तिथे उभी होती व मला म्हणाली कालच हे पिल्लू जन्माला आले. ते सारखे डोकाऊन वर बघायचा प्रयत्न करत होते. नंतर २-३ दिवसांनी अजून २-४ पिल्ले तिच्या अवतीभवती पिसाऱ्याच्या आत दडलेली दिसली. एकदा गेले तर बदकीणीने चोच उघडून 'आ' केला, लगेच तिला ब्रेड खायला घातला. काही वेळाने ते आधी जन्मलेले पिल्लू पिसातून वर आले व बदकीणीच्या पाठीवर जाऊन बसले. उखळासारख्या लाकडी दिसणाऱ्या चौथऱ्यांना छोटे चौकोन आहेत त्यातून सूर्यप्रकाश आत येत होता. कुतुहलाने ते पिल्लू बाहेर डोकाऊ पाहत होते. आईच्या पाठीवरून चालताना ते सारखे घसरत होते. हे सर्व पहायला खूप मजा वाटत होती. त्या पिल्लाचे नामकरण "चिंटुल्या" असे केले. बाकीची सर्व पिल्ले बाहेर आल्यावर पिंटुल्या, नकटुल्या, शोनुल्या, पिटकुल्या, गोटुल्या, मोनुल्या अशी नावे ठेवली!









दुसऱ्या चौथऱ्यापाशी जाऊन रोज बघत होते पण तिथे "जैसे थे परिस्थिती" होती. त्या बदकीणीच्या चेहऱ्यावरून ती वैतागलेली दिसत होती. शेवटी १३ सप्टेंबर रोजी १२-१५ पिल्ले एकत्र दिसली. उखळातून सर्वांचा एकत्र असा फोटो घेतला. त्यावेळी ती बदकीण कुठेतरी बाहेर गेली होती. दुसऱ्या दिवशी दुपारी सगळी पिल्ले व ती बदकीण हळूहळू सावधगिरीने चालताना दिसली. पहिली जन्मलेली पिल्ले खूपच चिवचिवाट करत होती, त्याविरुद्ध ही दुसऱ्या कुटुंबातली पिल्ले, एकदम शांत! शांतपणे हळूहळू आईमागोमाग चालत होती. पहिली बदकीण पिल्लांना घेऊन तळ्यात पोहून आली. नंतर तिने छानपैकी तळ्यात जाऊन तिचे पंख धुतले. तळ्याच्या बाहेर येऊन पंख चोचीने साफही केले! या ज्या बदकीणी आहेत त्या साधारण कोंबडीसारख्या दिसणाऱ्या आहेत. ही पिल्ले जेव्हा जन्माला येतात तेव्हा बदकीण त्या पिल्लांना घेऊन जी गायब होते ती काही दिवसांनी एकदम उगवते, तोपर्यंत पिल्ले थोडी मोठी झालेली दिसतात. गायब म्हणजे इथेच कुठेतरी आसपासच्या तळ्यावर जात असतील. ही झाली दोन बदकीणींच्या कुटुंबाची कहाणी! आणि हो, या बदकीणीनि अंडी जरी २०-२५ घातलेली असली तरी पिल्ले जन्माला येतात ती १५ ते २० आणि त्यातूनही त्यातील ८ ते १० च पिल्ले जगतात.









अजून दोन कुटुंब या जगात येण्यासाठी तयार झाली आहेत. एक बदकीण एका जिन्याखाली घातलेल्या अंड्यांवर बसली आहे व एका बदकीणीने एका बुटक्या झुडुपामागे अंडी घातली आहेत. ही अंडी किती असतील? ३५ ते ४० या अंड्यांवर जेव्हा बदकीणी येऊन बसतात तेव्हा कळते ही कोणत्या बदकीणीची ही अंडी आहेत ते! या अंड्यांवरही एक बदकीण बसलेली दिसली आजच सकाळी, मात्र त्या अंडी केव्हा घालून जातात ते मात्र अजून कळालेले नाही.









काही महिन्यांपूर्वी मला जॉनाने एकदा सांगितले की तूला बदकपिल्लांची आवड आहे ना! इकडे ये मी तूला एक गंमत दाखवते तेव्हा तिने तिच्या कुंडीत एक अंडे मला दाखवले होते. तेव्हा तिच्याकडे एक भली मोठी कुंडी होती. मी अशीच रोज त्या कुंडीपाशी येऊन अंडी मोजायचे. त्यावेळी अशीच २०-२५ अंडी जमा झाली होती व त्याभोवती भरपूर पिसेही! पण एके दिवशी आले तर तिथे एकही अंड नाही! माझा खूप हिरमोड झाला होता. काही दिवसांनी १५-२० पिल्लांना घेऊन एक बदकीण आली तेव्हा कळाले हीच ती! यावेळी जॉनाला सांगितले होते की पिल्ले जन्मली की लगेच मला बोलाव, मला नुकतीच जन्मलेली पिल्ले बघण्याची खूप उत्सुकता आहे तेव्हा यावेळी तिने मला बोलावले व माझी इच्छा पूर्ण झाली त्यामुळे मी खूप आनंदात आहे!









अगदी पहिल्यांदा मी ज्या पिल्लांचा विडिओ घेतला ती पिल्ले होती एका वेगळ्या बदकीणीची. ही बदकीण करड्या व चॉकलेटी रंगाची असतात, बुटकी व बसकी असतात. ही बदके मला खूप आवडतात. ही बदके-बदकीणी खूप घाबरट असतात. त्याविरूद्ध ही कोंबडीसारखी दिसणाऱ्या बदकीणी खूप अघोचर असतात. अर्थात डोक्याने शार्प ही बसकी बदके असतात. त्या पहिल्या विडिओ शुटींगसाठी बदकीण, तिची दोन पिल्ले व त्यामागोमाग मी १ मिनिटभर शर्यतीसारखे पळत होतो!!

2 comments:

Nisha said...

badkanchya pillanchi naave ekdum sahi thevleyt tumhi rohinitai :) khup goaddd...

rohinivinayak said...

chhan aahet na nave, pillana shobhnari :) ashich suchli aani thevli. tula aavadali he vachun khup aanand jhala ga!!!