Saturday, July 16, 2011

१६ जुलै २०११

आजचा दिवस खूप छान होता. ऐन उन्हाळ्यात हवे तसे हवामान होते. कमी उष्मा, आद्रता नाही, थोडेफार वारे, निरभ्र स्वच्छ आकाश अजून काय हवे?





आज सकाळी उठल्यावर तापमान पाहून ठरवले की आज घरी पीसीसमोर तोंड करून बसायचे नाही. नेहमीची साफसफाईची कामे उरकली. कधी नव्हे तो हेअर कलर केला. हल्ली त्याचाही कंटाळा येतो. शनिवार असल्याने बाहेरचे जेवण, अर्थात मेक्सीकन उपहारगृह कारण की व्हेज मिळते आणि नॉन व्हेज डिश मध्ये भाज्या घालून द्या असेही आम्ही सांगतो.







जेवण करून थेट समुद्रकिनारा गाठला. हा समुद्रकिनारा मला खूप आवडतो. किनाऱ्यावरून चालणे, बसणे होते. शिवाय इथे थोडा डांबरी रस्ता पण आहे त्यावरून चालले की बाजुबाजूने समुद्र दिसतो. आज तर हवा अतिशय उत्तम होती. निळे आकाश आणि त्यावर अधुनमधून थोडेथोडे ढग वावरत होते. काही काळेनिळे तर काही पांढरे शुभ्र! सूर्य कधी ढगाच्या आड लपत होता तर कधी बाहेर येत होता. आज समुद्रावर जत्रा होती कारण की सुंदर हवा असल्याने सर्व बाहेर पडले होते. लहान मुले लाटांवर बागडत होती. वाळूवर वाळूनेच बरेच काही बनवले होते. कधी नव्हे ते आज मी छोटे शिंपले वेचले! निरनिरळ्या रंगाचे आणि आकाराचे. त्यातून खूप टिल्लू आकाराचे खूप छान दिसत होते.






आजचा समुद्राचा रंगही खूप वेगळा होता. वेगवेगळ्या रंगांच्या छटा होत्या लाटांवर. गडद निळाचा थर, नंतर हिरवा, निंतर मातकट, नंतर परत थोडा हिरवा. जेव्हा सूर्य ढगाच्या आडून बाहेर यायचा तेव्हा लाटा उसळताना पांढऱ्या शुभ्र व्हायच्या. लाट ओसरली की खालच्या वाळूत आकाशाचे आकाशी रंगाचे प्रतिबिंब दिसायचे. खूप चालणे झाले त्यामुळे खूप उत्साह! वेगवेगळी मरून रंगाची फुले उमलली होती आणि त्या फुलांना पिवळी झालर होती. बरीच होती ही फुले. काही वाळूवर तर काही खडकांमध्ये तर काही रस्त्याच्या आजूबाजूला. आज समुद्रावरून अजिबात हलू नये असे वाटत होते. घरी आल्यावर गरम गरम चहा घेतला. आज एका वेगळ्या रेसिपीला मुहूर्त लागला. रात्री काही वेळा डाळीचे धिरडे असते. आज मुगाच्या डाळीचे बनवले होते. आज मी त्यात कांदा ,मिरची, टोमॅटो, पालक, सिमला मिरची व गाजर असे घातले होते त्यामुळे छान चव आली.



आजचा दिवस अगदी लक्षात राहील असा गेला. खूप उत्साह आला!

4 comments:

mau said...

तुझा हा दिवस वाचुन मलाच इथे हुरुप आलाय..कधी कधी खुप कंटाळवाणे होते..अशा वेळेस अस काही चांगल वाचले की मन पुन्हा प्रफुल्लित होते..अशीच लिहित रहा आणि मस्त एन्जॉय कर...

rohinivinayak said...

Uma, dhanyawaad! aani tuzya mast abhiprayane maza utsah double hoto!

विनायक पंडित said...

एकदम ताजंतवानं वाटलं मलाही! :) शुभेच्छा!

rohinivinayak said...

Thank you very much Vinayakji!