तुम मुझे युँ भुला ना पाओगे, जब कभी भी सुनोगी गीत मेरे, संग संग तुम भी गुनगुनाओगे, हा तुम मुझे युँ ... आठवणींबरोबर हे गाणे पण ओठांवर आले आहे. आठवणींची प्रचंड गर्दी उसळली आहे. असे वाटत आहे की आत्ता उठावे आणि क्लेम्सनला जावे. सगळे कसे अगदी डोळे भरून परत पाहावेसे वाटत आहे. विद्यापीठ, ग्रंथालय, एकार्ड, लॉन्ड्रोमॅट, बसस्टॉप, उंचसखल वळणे घेत जाणारे रस्ते, केमिस्ट्री लॅब. मनाने मी क्लेम्सनला जाऊन पोहोचले आहे. प्रत्यक्षात जाईन तेव्हा भरपूर फोटो काढणार आहे. क्लेम्सनच्या काही आठवणी मी या आधीच लिहिल्या आहेत त्याला आता क्लेम्सनच्या आठवणी असे लेबल देणार आहे. त्या आठवणी आहेत अनुक्रमे कॅट बस, इंग्रजीचा वर्ग, अमेरिकेतील पाळणाघर, केट व मॅगी, मॉप्स, एक सुखद आठवण. यात अजून एक भर पडेल ती "खेड्यामधले घर कौलारू" याची.
त्याचे असे झाले फेसबुकवर मित्रमंडळाची संख्या ९९ झाली होती. शंभरावे कोण यामध्ये फेसबुकवर काही नावे शोधली पण एकाच नावाचे बरेच जण अशी यादी आली त्यातले नक्की कोण? शोधता शोधता ध्यानी मनी नसताना माझ्या मावसपुतणीचे नाव लिहिले आणि ती यादीत पहिलीच दिसली आणि मी पाहतच राहिले! तिला मी २००४ च्या भारतभेटीमध्ये पाहिले होते त्यामुळे चेहरा लक्षात होता. माहिती वाचली आणि हीच ती! याची खात्री झाल्यावर तिला मैत्रिण विनंती पाठवली. त्याचबरोबर मला अजूनही या गोष्टीचा आनंद झाला की ती क्लेम्सनला आहे याचा. एक दोन तासाच फोनाफोनी, संगणकावर बोलणे पाहणे झाले. पुतणीलाही आमच्या इतकाच आनंद झाला होता.
संध्याकाळपासून क्लेम्सनच्या आठवणी इतक्या काही दाटून आल्या की कागदावर उतरवल्याच पाहिजेत त्याशिवाय झोप येणे शक्य नाही म्हणून झोपायच्या आधी वहीत खरडल्या आणि लगेच संगणकावर टंकतही आहे! क्लेम्सनला पहिल्याप्रथम एका मित्राकडे काही दिवस राहून क्लेम्सन प्लेस अपार्टमेंटमध्ये ३ महिन्यांकरता राहिलो. ही जागा मुख्य रस्त्यावरून बरीच आत होती. खूपच छान होती ही अपार्टमेंटस, टुमदार! क्लेम्सनमध्ये रस्ते सरळ नाहीत, उंचसखल आहेत. सुरवातीला कार नसल्याने मी आठवड्याची कामे अशी काही आखली होती की त्यात माझा वेळही जाईल व कामेही होतील. यात मी एकार्ड मधून दूध आणायचे. एकार्डच्या बाजूला पोस्ट ऑफीस आहे एकदम चकाचक! इथे मी पत्र टाकायला यायचे. कॅट बसचा स्टॉप शोधण्यात पण मी वेळ घालवला आहे. क्लेम्सन प्लेसला टीव्ही वर लाईफ टाईम चॅनलवर लागोपाट दोन चित्रपट आम्ही रोज पाहायचो. टाईम मॅगझीन वाचण्यात वेळ घालवला आहे. बरेच वेळा जे काही सुचेल ते भराभर वहीत उतरवायचे. असे बरेच लिखाण केले आहे ते सर्व लिखाण मी जेव्हा लिहायला सुरवात केली त्यावेळेला कामी आले. त्यावेळचे सर्व लिखाण असंबद्द होते ते नंतर मी सुसंबद्द केले.
त्याच शहरात दुसऱ्या जागेत राहिल्या आल्यावर सकाळचा पोळी भाजीचा डबा झाला की बाहेरच्या लाकडी ओंडक्यावर येऊन बसायचे. गार हवा यायची. सगळीकडे हिरवी गार झाडेच झाडे आहेत क्लेम्सनला. जिथे जिथे तुमची नजर जाईल तिथे तिथे सर्व हिरवेगार! सकाळी उठायला उशीर झाला की विनायकला पोळीभाजीचा डबा द्यायला जायचे बसने लॅबमध्ये. तिथे सर्वांना हाय हॅलो करून दुसऱ्या बसने घरी परत. विद्यापीठाच्या स्टॉपच्या इथे लागुनच थोडे उंच चढण आहे तिथे काही पायऱ्या आहेत. त्या पायऱ्यांवर बसायचे मी बस येईपर्यंत. बरेच जण असे बसायचे तिथे पायऱ्यांवर. थंडी असेल तर कोट मफलर घालून. रणरणते उन असेल तर टोप्या घालून. सुरवातीला वेळ जावा म्हणून बसने भरपूर हिंडलेली आहे. वेळापत्रक बरोबर घ्यायचे. शिवाय पाणी पिण्याची बाटली, टोपी, छत्री घेऊन निघायचे मी. दुकानात जाऊन सावकाशीने रमत गमत त्या दुकानात काय काय आहे ते बघायचे. काही वेळा काही खरेदी करायचे. भूक लागली तर बटाटा चिप्स व किटकॅट विकत घ्यायचे. बसस्टॉपवर बसची वाट पाहत खायचे. वर थोडे पाणी प्यायचे. काही दिवसांनी मित्रमंडळ जमा झाले. एकमेकांकडे जाणे येणे सुरू झाले, जेवणे सुरू झाली. शनिवारी रात्री एकमेकांकडे जाऊन निवांत गप्पा टप्पा, नंतर गरमागरम चहा ठरलेले. बरेच वेळा संगळ्यांनी मिळून तिथल्या थिएटरवर चित्रपट पाहायचो. इथले चित्रपटगृह पण मला खूप आवडले. नंतर काही दिवसांनी मला नोकरी लागली.
साधारण दोन ते अडीच वर्षांचा काळ होता क्लेम्सनमध्ये. त्यानंतर एक्झीट घेतली ती विल्मिंटनची शहराची. क्लेम्सनच्या आठवणी खूप खूप छान आहेत! विसरणे शक्यच नाही. आपल्या आयुष्यात काही काही आठवणी खूपच रमणीय असतात त्यापेकी ही एक आठवण क्लेम्सन, साऊथ कॅरोलायनाची!
क्लेम्सनच्या आठवणी असे लेबल दिले आहे. त्यात तिथल्या काही आठवणी लिहिल्या आहेत त्या जरूर वाचा. या सर्व आठवणींचे फोटो मी जाईन तेव्हा घेणार आहेच ते पुढील लेखात बघा.
Wednesday, October 20, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
mast !!!
Uma, abhipray vachun chhan vatle ga!thanks!
Post a Comment