Friday, March 26, 2010

पत्र

तुम्हाला पत्र लिहायला आवडते का? मला तर खूप आवडते! पत्र लिहिताना मला जास्तीत जास्त सुवाच्य अक्षर काढायला आवडते. अगदी सुरवातीला लहान असताना मी पत्र लिहिले ते पोस्टकार्डावर. मला आठवत आहे त्यावर आधी मी पट्टीने रेघा मारून घेतल्या होत्या व पत्र लिहिले होते. त्या छोट्या पत्रात मी एक वेगळा परिच्छेद पण केला होता. पोस्टकार्ड व इनलँड मध्ये मला पोस्टकार्ड जास्त आवडते. थोडक्यात काही सांगायचे असेल, खुशाली कळवायची असेल आणि वरचेवर पत्र पाठवायची असतील तर पोस्टकार्ड उत्तम!




आमच्या घरात सगळ्यांनाच पत्र लिहायची आवड आहे. पूर्वी आईबाबा त्यांच्या भावडांना व भाचवंडांना पत्रे लिहीत असत. आम्हा दोघी बहिणींना कळायला लागल्यापासून आम्हालाही पत्र लिहायची उत्सुकता वाटू लागली. आईला सांगायचो आम्हाला पण पत्र लिहायचे आहे. आई तशी सविस्तर पत्रे लिहायची त्यामुळे तिला नेहमी इनलँड पत्रे लागत. निळ्या रंगाची होती ही पत्रं. त्यात आई आम्हाला दोघींना चार ओळी लिहिण्यासाठी जागा सोडायची. मग आम्ही दोघी बहिणी आईला विचारायचो काय लिहू गं पत्रात? आई म्हणायची काहीही लिहा, तुम्हाला जे वाटेल ते, मनात येईल ते. मग आम्ही दोघी बहिणी मिळून ठरवायचो काय काय लिहायचे ते. आही आईचे पत्र वाचायचो तिने कसे लिहिले आहे ते बघायचो. आईची पत्राची सुरवात नेहमी पत्र लिहिण्यास कारण की ------- जे निमित्त असेल त्याने सुरवात करायची. आम्ही लिहायचो पत्र लिहिण्यास कारण की "असच" किंवा पत्र लिहिण्यास कारण की "उगीचच" आता खूप हसू येते. नंतर कळायला लागले की पत्राची सुरवात अगदी याच वाक्याने झाली पाहिजे असे नाही.




पत्राच्या शेवटी ताजाकलम पण क्वचित लिहावा लागतो. पत्र लिहून झाले आणि काही सांगायचे राहून गेले असेल तर पत्राच्या खाली ता. क. यामध्ये जे राहून गेले असेल ते लिहायचे. या ताज्या कलमाने आम्ही सगळ्या भावंडांनी खूप धमाल केली होती एका पत्रात. सर्वात मोठ्या मामेबहिणीचे लग्न ठरले तिला अभिनंदनाचे पत्र लिहिले आम्ही सर्वांनी मिळून. त्यात बरेच ताजाकलम लिहिले गेले. ते अनुक्रमे असे होते. ता. क. "एं कसा गं दिसतो तुझा 'न' (नवरा) , ता. क. "भुरकून पी" , ता. क. "दिल्या घरी तू सुखी रहा" (नवऱ्याचे नाव दिलीप) , ता.क. " हा ताजा कलम पत्रातच दडला आहे शोधून काढ" हे ताजेकलम इतके लिहिले ना आम्ही नुसती धमाल. शेवटी अगदी छोटी रिकामी जागा दिसली तरी गिचमिडीत नवीन सुचलेले ताजाकलम घुसवायचो.



लग्नानंतर मी दर महिन्यात आईबाबा व सासुसासरे यांना पोस्टकार्ड टाकत असे. एकदा माझा भाऊ म्हणाला "काय गं तू पत्र लिहितेस की रेसीपीज, प्रत्येक पत्रात जो पदार्थ करून पाहिला त्याची रेसीपी. जरा दुसरे पण लिही की काहीतरी" जेव्हा आमचे लग्न झाले तेव्हा विनायकचा मित्र म्हणाला की वसतीगृहाच्या खोल्या दिल्या गेल्या की लगेच पत्राने कळवतो तुला मग या तुम्ही इथे. लवकरच मिळाल्या. त्याचे पत्र आले आणि आम्ही लगेच निघण्याच्या तयारीला लागतो. आता मजा वाटते. आजच्या काळात टकाटका मोबाईल वाजले असते ना! पत्राची भानगडच नाही.



लग्नानंतर आयायटीत रहायला गेलो आणि आईबाबांना व सासुसासऱ्यांना मी पत्रातून आमच्या लग्नानंतरच्या दिवसांची पत्रे लिहू लागले. आईबाबांची पण सविस्तर पत्रे मला येत असत. आयायटी वसतिगृहात सर्वात खालच्या मजल्यावर एक बोर्ड होता नोटीसबोर्डसारखा. त्यामध्ये खोल्या क्रमांक लिहिले होते त्या कप्यात पोस्टमन पत्रे टाकून जात. माझ्या सारख्या चकरा खाली पत्र आले का ते पहायला. आता रोज कसे काय पत्र येईल ना! पण जेव्हा आमच्या खोल्या क्रमांकाच्या कप्यात पत्र दिसे तेव्हा मला खूप आनंद होई. आईबाबांच्या पत्राचे तर मी पारायण करायचे.




अमेरिकेत आल्यावर सुरवातीला वेळ जाता जात नव्हता. असाच एक दिवस खूप कंटाळा आला. मनात खूप साठले होते. कुणालातरी सांगावेसे वाटत होते. तो दिवस आठवत आहे मला अजूनही. त्यादिवशी आभाळ भरून आले होते. कंठ दाटून आला होता. थोड्याच वेळात मुसळधार पावसाला सुरवात झाली आणि एकदम मूड आला. आईला पत्र लिहायला घेतले आणि मनातले सर्व उतरवले गेले कागदावर. त्या पत्राचेही असेच पारायण केले. खूप आनंद झाला होता मला. आईने माझे पत्र वाचले की तिलाही किती आनंद होईल या विचाराने खूप सुखावले. पत्राची सुरवात केली. आत्ता या ठीकाणी खूप मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाकडे बघतच तुला पत्र लिहीत आहे........




आयायटीतली माझी मैत्रिण जेव्हा अमेरिकेला गेली तेव्हा तिचे मला पत्र आले होते. तेव्हा मला खूप आनंद झाला होता. मी पण तिला तिच्या पत्यावर सविस्तर पत्र लिहिले. पत्ता पण दोन तीन वेळा चेक केला बरोबर लिहाला आहे ना! तेव्हा किती वेगळेपणा वाटला होता या अमेरिकेच्या पत्राबाबत. अशी ४-५ पत्रे आम्ही एकेमेकींना पाठवली होती. आत्ताचा काळ असता तर ती अमेरिकेत पोहोचण्या आही मीच तिला ईपत्र पाठवले असते पोहोचली का व्यवस्थित?




पूर्वीचा पत्र लिहिण्याचा काळ खूप छान होता. पत्रामध्ये आपण बरेच काही लिहू शकतो. पत्र वाचले की तो किंवा ती एकमेकांना भेटल्यासारखे वाटतात. आपलेपणा वाटतो. हे सर्व ज्यांनी पत्रलेखन केले असेल त्यांनाच कळेल. मी अगदी आत्ता आत्तापर्यंत पत्र पाठवत होते. अमेरिकेतल्या सुरवातीच्या काळात काही पत्रे मलाही आलेली आहेत. काळ इतका काही बदलला आहे की पत्राचा जमाना मागे पडला आहे म्हणण्यापेक्षा पूर्णपणे बंद झाला आहे. पत्राची जागा ईपत्राने घेतली आहे असे जरी म्हणले तरी कोण कुणाला ईपत्रातून सविस्तर लिहित असेल? कोणीच नाही. लिहिले तरी जरूरीपेक्षा जास्त शब्द नसतीलच.


परत पत्रलेखनाला सुरवात करावी काय? असा विचार चालू आहे. हाहाहा! किती हास्यास्पद विधान आहे ना!

 










 

15 comments:

adreeshta said...

Mi tumhala lihu ka patra?
Reshma

Yogesh said...

आजही मला पत्र लिहायला खूप आवडत. . .माझ्याकडे माझ्या बाबांनी मी हॉस्टेल असताना पाठवलेली सर्व पत्र संग्रहीत आहेत!! पत्र लिहाण्यात अन् वाचण्यात जी मजा आहे ती काही औरच!!!

श्रिया (मोनिका रेगे) said...

नमस्कार रोहिणी
तुझा पोस्ट वाचले. हो पत्र लिहायला मला देखील खूप आवडते , आता इमेल करते पण पत्र लिहिणे हे कायम आहे.
तू खूप छान लिहिले आहेस. ताजा कलम ह्या सदरात बरंच काही टाकता टाकता तो ताजा कलम इतका मोठा व्हायचा कि काही विचारू नकोस.
पत्रात मनात येते ते लिहिणे आणि त्याला एक छान स्वरूप देऊन लिहिणे खूप महत्वाचे असते न! मी आणि माझी मैत्रीण आमची पत्र मैत्री खूप वर्ष चालली, एकमेकांशी पत्रातून केलेलं संवाद जरी १० दिवस थांबून पूर्ण होत, तरीही त्यातही एक मौज होती.
मी कॅनडाला असते , इकडून देखील आई बाबा , मित्र परिवार सर्वांशी संपर्क पत्राद्वारे पण ठेवला आहे.
छान वाटले तुझे पोस्ट अशीच लिहित राहा...

तृप्ती said...

हे बघितलत का ? अनेक लोकांनी लिहिलेली खूप गोड पत्र वाचायला मिळतील.

नूतन said...

रोहिणी, तुझ्या या लेखाने माझ्या पत्रस्मृती ताज्या झाल्या. मी सहावी इयत्तेपासून वसतिगृहात राहिले आहे,तेव्हा दर २-३ दिवसांनी आईवडिलांना पत्र लिहित असे.महिन्यातून एखादे पत्र आजीआजोबा,काका,मावशी यांनाही लिहायचे.मैत्रिणींनाही ५-६ पत्र लिहायचे.कोणाचे आपल्या नावे पत्र आले कि,कोण आनंद व्हायचा !!! जवळजवळ लग्नाअगोदरपर्यंत नियमित पत्रलेखन व्हायचे. आजकाल वर्षातून ४-५ पत्र काय ती लिहिणे होते.जुनी बरीचशी पत्र मी जपून ठेवली आहेत.भारतात गेल्यानंतर काढून वाचले कि, जुन्या आठवणींना उजाळा मिळतो.आई आजीआजोबांना आंतरदेशीय पत्र लिहायची तेव्हा मी हट्टाने माझ्यासाठी थोडी जागा ठेवायला सांगायचे आणि त्यावर मजकूर लिहायचे.दुसरीला असताना एकदा आईच्या पत्राची कॊपी करत मीही पत्राच्या शेवटी आपली नात सौ.नूतन असे लिहिले होते.पोस्टकार्ड आणि आंतरदेशीय पत्र,कित्येक वर्षांमध्ये पाहिले नाही.फोनमुळे काही गोष्टी चांगल्या झाल्या पण पत्रलेखन मागे पडले. ई-मेल म्हणजे पत्रच पण हस्ताक्षरात लिहिलेले पत्राची मजा निराळीच...

rohinivinayak said...

Adreeshta, manmauji, shreeya, trupti, nutan abhiprayabaddal anek dhanyawaad!! khup chhan vatle vachun. tumchya sarvanchya patra aathvani pan khup chhan aahet. aavadlya. thanks !!

amruta said...

namaskar.. tumche manogat varil lekh ani recipies baryach diwsanapasun vachat ale ahe.. khup chan lihita tumhi. patra prapancha varcha lekh hi chaanch ahe. ankhin vishesh namud karavishi goshta mhanaje tuncha pane fule ani nisargachitrancha choice khup chan ahe. saglya imagaes tumchya page varchya sunder display hotat vachakanchya screen var! ashyach lihit raha..

rohinivinayak said...

Amruta, khup chhan abhipray aahe tumcha. mast vatle vachun. tumcha bloghi chhan aahe. thanks a lot!!

Shyam said...

http://youtu.be/Ax8OWmkhOEQ
रोहिणी ताई अशी अपेक्षा कि हे गाणे आवडेल आपणाला !!!

rohinivinayak said...

thanks! ho ge gane mahit aahe mala. mastach aahe. kavita chhan aahe ya ganyachi.

सौ. अवनी अंकुर राजोपाध्ये said...

या आधीही मी अनेकदा "स्मृती" चाळून गेले आहे, पण हे एवढे छान वाचायचे कसे सुटले, काय माहित. असो. विषयांतर नको, निदान एवढा चांगला विषय तू मांडला असताना..
पत्र.. खरे तर माझाही खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. आम्ही बहिणी नातलगांच्या वाढ-दिवसाला हाताने तयार केले ग्रीटिंग आणि एक छोटे पत्र नेहमी पाठवायचो. माझी मोठी बहिण कोणत्यातरी शिबिराला गेली होती, तिथे एक मुलगी तिची मैत्रीण झाली. मी तिला आवर्जून पत्रे पाठवलेली आजही आठवतात. तिची आलेली पत्रे आजही सोबत आहेत. अनोळखी, न पाहिलेले म्हणून आम्हा दोघींना आम्हीच पेनफ्रेंड नावंही दिलेले आजही स्मरते आहे. तर अशीही कोणत्याही कारणासाठी पाठवलेली पत्रे होती. जीवाची होती. फार जवळची होती. अगदी २००० सालापर्यंत पत्र पाठवलेले आठवते. मग आमचा आणि इंटरनेटचा परिचय झाला आणि सगळेच सुटले असे झाले. पण तरीही, ग्राज्यूएशन झाल्यानंतर मी जेव्हा पोस्ट ग्राज्यूएशन साठी पुण्याला आले तेव्हा आई बाबांशी मोबाईल वर बोलून संवाद व्हायचा. ख्याली खुशाली तशीच कळत असे. पण मला चांगले आठवते, मी तेव्हा माझ्या वर्गात असलेल्या माझ्या मित्राला पत्र लिहायची. तो मित्र नसून माझी आई किंवा माझी बहिण नाहीतर माझी मैत्रीणच आहे, असेच वाटे. आमची दोस्ती अशी होती कि आमच्या बाकी ग्रुपला आमचे काहीतरी शिजते आहे कि काय अशी शंका यायची. आणि ती येऊ नये म्हणून, मी त्याला पत्र लिहित असे. असो.
रोहिणीताई, पत्रातून ती व्यक्ती भेटते, या तुझ्या विश्वासावर माझाही २०० टक्के विश्वास आहे. पत्रातून मनं मोकळी होतात, आपलेपणा वाटतो, हेही तितकेच खरे आहे. तुझ्या पत्र-प्रवासाला पोस्ट कार्डाने सुरवात झाली आणि मग पत्र लिहीण्यास कारण काय काय सुचले गेले, हे वाचून जाम हसू आले मला. नंतर ताजाकलम मध्ये 'दिल्या' घरी सुखी राहा वगैरेचे निरोप; ...खरोखर ते दिवस औरच होते, असे वाटून गेले. कारण तू म्हणतेस तसे आजकालच्या काळात, ईपत्र पाठवतील सगळेच..पण त्या पत्रातून कोण मोकळे बोलेल.. सविस्तर लिहेल..किती सध्या शब्दात तू इमेल मधून संवाद साधताना आलेला अनुभव व्यक्त केला आहेस! खरच..असेच होते आहे खरे.
आजूबाजूच्या जगाला, हे कितीही हास्यास्पद वाटले तरी, पत्रलेखनाला आता खरोखरच मी सुरवात करणार आहे. कारण, शेवटच्या ओळीत तू जो आशावाद निर्माण केला आहेस ना.. त्याने मलाही आंतर्बाह्य झपाटून टाकले आहे.

- सौ. अवनी

Anonymous said...

mast ahe. me pan roj nahitar ek divas aad aai la e-patr lihite ahe halli. agadi savistar. chan watate.. pallavi

rohinivinayak said...

ho na,, asech epatra konakadun aale agadi 2 oliche tarihi khup chhan vatate na ! aani savisttar aaila tu email kartes he vachun chhan vatle ga pallavi !

Shyam said...

रोहिणी ताई मधुराच्या मुलाचे नाव ठेवले आहे " अबीर "
अन पत्रांचे म्हणशील तर मी जी काही लिहिण्याचा प्रयत्न केला ह्या क्षेत्रात दोन पाऊले चालण्याचा जो काही प्रयत्न केला तो पत्रा-न-द्वारे च
मग ते आई-वडिलांना असो की मित्राला की माझे आत्याचे मिस्टर असोत ....रोजचे आलेले अनुभव लांब च लांब पत्रांनी कळवायचो ...
पाऊस पडला की पारसिक च्या बोगद्यातून शुद्ध झर्यातील धो धो पाणी अन त्याचे तुषार अन तू सुगंध घेण्याचा अनुभव असो कि राजकपूर चा बघितलेला अन भारावून गेलेले ते क्षण असोत
की ...एखादी बांद्रया हून चर्चगेट कडे जाणाऱ्या लोकल मध्ये घाई गरबडीत पुरुष-न-च्या डब्यात चढलेल्या तरुणीची घुसमट असो अगदी जस्से च्या तस्से उतरवून काढून तत्काळ पोस्ट करावायचो ....खूप छान लिहितेस ....अशीच छान छान लिहित जा !
तुझा च ,
जोशी काका .

rohinivinayak said...

Thanks Joshi kaka !!