Monday, November 23, 2009

टंकलेखन (२)

टंकलेखनामध्ये प्रत्यक्ष टंकलेखन करताना काय काय करावे लागते ते पाहू. कळफलकावर जसे ए टु झेड अक्षरे असतात. त्याप्रमाणे इतर अनेक प्रकारची चिन्हे असतात जसे की स्वल्पविराम, पूर्णविराम, उद्गारवाचक, प्रश्नार्थक चिन्हे व इतरही दुसऱ्या काही कीज जसे की स्पेसबार, टॅब लावण्याची की, टॅब मोकळे करण्याची की कॅपलॉक वगैरे. टंकलेखन मशीनच्या वरील भागात अक्षरे प्रत्यक्ष कागदावर उमटवले जाणारे छोटे छाप अर्धवर्तुळाकार दिसणाऱ्या चापाच्या टोकाला बसवलेले असतात. त्यावर सर्व इंग्रजी अक्षरे कोरलेली असतात. टंकलेखन मशीनवर असणाऱ्या विविध कीज (बटणांवर) दाब देऊन ही अक्षरे रोलर वर जाऊन रिबीनीवर आदळतात आणि कोऱ्या कागदावर अक्षरे उमटतात. टेपरेकॉर्डरमध्ये ज्या कॅसेट असतात त्याप्रमाणे रिबीनीचे रीळ जोडण्याकरता टंकलेखनाच्या मशीनवर डाव्या व उजव्या बाजूला दोन स्तंभ असतात. त्या स्तंभावर पत्र्याच्या दोन चकत्या असतात तिथे रिबीन लावून घ्यायची. ही रिबीन त्या चकत्यांमध्ये रिळाप्रमाणे गुंडाळली जाते. रोलरच्या उजवीकडे एक स्टीलचा छोटा नॉब असतो तो पुढे ओढला की रोलरमधून कागद घालण्याकरता थोडी मोकळी जागा होते, त्यातून कागद घालायचा. कागदाचे वरचे टोक त्यात घातले की पुढे आणलेला नॉब मागे करायचा व रोलरच्या साहाय्याने फिरवून कागद गुंडाळून मशीनच्या वर येतो म्हणजेच तो रिबीनीच्या व रोलरच्या मध्ये येतो. तिथे एक स्टीलची बारीक पट्टी असते ती त्या कागदावर आणायची. परत रोलरच्या उजव्या बाजूला असलेला नॉब पुढे आणायचा. आता कागदाचा पुढे आलेला भाग व कागदाचा शेवटचा भाग एकावर एक हाताने जुळवून घ्यायचा आणि परत तो नॉब मागे करायचा. आता तुमचा कागद टंकलेखन मशीनवर सरळ व घट्ट बसला आहे असे समजावे.



हा कागद लावताना रोलरला लागूनच कॅरेज असते व त्यावर एक मोजपट्टी असते तिथे शून्यावर किंवा मोजपट्टी नसेल तर एक छोटी रेष रंगवलेली असते तिथे कागदाची डावी कड येईल असा कागद लावायचा. कॅरेजच्या डावीकडे एक हँडल असते ते ओळ पुढे जाण्यासाठी वापरतात. दोन ओळींमध्ये किती अंतर हवे यासाठी पण एक स्पेस मार्जिन असते, ते सेट केले की त्याप्रमाणे पुढच्या ओळीवर जाता येते. याला कॅरेज रिटर्न म्हणतात. स्पेसबार वापरून कागद पुढे जातो. ही स्पेसबारची पट्टी कळफलकावर खाली असते. रोलरला लावलेला कागद डावीकडून उजवीकडे जाण्यासाठी किंवा लावलेले टॅब योजलेल्या ठिकाणी बरोबर जाऊन पोहचतात की नाही किंवा लावलेले टॅब सर्व मोकळे झाले आहेत का हे पाहण्यासाठी स्पेसबार सारखीच एक पट्टी कळफलकाच्या वर असते. कॅरेजवर मार्जिन लावण्यासाठी दोन बाजूला दोन छोटे नॉब असतात. कागदावर मार्जिन सेट करण्यासाठी कागदाच्या डाव्या बाजूच्या सुरवातीपासून १० मोकळ्या जागा मोजायच्या आणि कॅरेजवरचा डावा नॉब त्या सेट केलेल्या मार्जिनावर आणायचा. असेच उजव्या बाजूने पण मार्जिन सेट करायचे. आता या सेट केलेल्या मार्जिनामध्येच तुम्ही जे टंकणार आहात ते टंकले जाईल. कळफलकाच्या साहाय्याने टंकीत करताना दोन शब्दांमध्ये किती मोकळी जागा सोडायची किंवा वाक्यानंतर किती मोकळी जागा सोडायची यासाठी स्पेसबारचा वापर केला जातो. साधारण दोन शब्दांमध्ये एक मोकळी जागा व एका वाक्यानंतर दोन मोकळ्या जागा सोडण्याची पद्धत आहे. हा स्पेसबार दाबताना उजव्या हाताचा अंगठा वापरला जातो. स्पेसबारप्रमाणे एक मोकळी जागा मागे न्यायची असल्यास बॅकस्पेस या बटणाचा वापर केला जातो. त्याकरता डाव्या हाताचा अंगठा वापरतात. कागदावरच्या डावीकडून उजवीकडे सर्व मोकळ्या जागा मोजायच्या असतील तर स्पेसबार वर दाब देण्याकरता मधले बोट वापरले जाते.



टंकलेखनाच्या मशीनवर तुम्ही कागद लावलेला आहे. मार्जिन सेट झालेले आहे. आता सुरवात करा तुमच्या टंकलेखनाला! टंकताना कळफलकाच्या साहाय्याने एकेक अक्षरे कागदावर उमटवली जातात. मजकूर टंकित करताना "कागदाची उजवी बाजू आता संपत आली आहे. दुसऱ्या ओळीवर जा" असा संदेश देणारी "टिंग" अशी एक बेल वाजते. कारण आपण टंकित करताना कागदाकडे किंवा कळफलकाकडे पाहात नाही आहोत. तुमची नजर टेबलावर असलेल्या कागदाकडे आहे की ज्यावर लिहिलेले तुम्ही टंकत करत आहात. आता ही "टिंग" बेल वाजली की कागदाकडे पाहायचे किती जागा शिल्लक आहे त्याप्रमाणे अंदाज घेऊन टंकून मग दुसऱ्या ओळीवर जायचे. आता ही "टिंग" बेल वाजल्यावर टंकता टंकता पुढे येणारा शब्द तिथे बसेल का? किंवा अर्धा बसवून पुढील शब्द खाली घेऊ का? किंवा ती जागा तशीच रिकामी सोडू? हे सर्व तुमचे तुम्हाला ठरवावे लागते. शेवटी टंकीत केलेले पत्र सुबक दिसायला हवे ना!



कॅरेजवर अजून एक पट्टी असते ती उभी करून ठेवायची. त्यावर तुमचा रिकामा कागद असेल. जसजसे तुम्ही टंकाल तसतसा हा रिकामा कागद खाली सरकेल. याचा उपयोग अशा करता होतो की आता कागद संपत आलेला आहे. मजकूर अजूनही शिल्लक असेल तर तो आता दुसऱ्या पानावर घ्यायला हवा. आता हा कागद टंकलेखन मशीनवरून काढा आणि पाहा कागदावरचा मजकूर कसा दिसतो ते!


तक्ते कसे बनवायचे व अजून काही गोष्टी पुढच्या भागात पाहू.

..... क्रमशः

3 comments:

Anonymous said...

टंकलेखनाची चर्चा ठीकच आहे. पण टंकयंत्राची इतकी चर्चा म्हणजे 'बैलगाडीतून कसा प्रवास करावा' याच्या अभ्यासासारखी वाटते आहे.

- डी एन

rohinivinayak said...

हेहेहे. टाईपराईटरवर टायपिंग हे किचकट नसले तरी त्रासदायक होते.
Thanks!

Anonymous said...

रोहिणीबाई : अज़ून टंकयंत्र वापरणारे लोक असतीलही, पण तुमचा लेख कंप्युटरवर वाचू शकणारे लोक ते कालबाह्य झालेलं (वा होत चाललेलं) यंत्र वापरायचे नाहीत.

तुमच्या 'Favorite Music' भागात 'Vishwas' हा मराठीत वापरला जाणारा शब्द तरी वापरा किंवा मूळचा 'Biswas' असा तरी. 'Bishwas' शब्द ना मराठी, ना इंग्रजी, ना हिंदी, ना बंगाली. इंग्रजीत 'Biswas' हाच शब्द वापरात आहे.

- डी एन