मी अमेरिकेत राहून आईला मिस करते म्हणजे मी गप्पांना मिस करते. आई ही माझी सर्वात पहिली मैत्रिण. तिच्याजवळ मी मनातले सर्व काही बोलते. काही काही वेळा तर मी मनातल्या मनात आईशी गप्पा मारते. माझ्या फोनची आतुरतेने वाट पहाणारा तिचा चेहरा मला दिसतो आणि दर आठवड्याच्या बुधवारी आईशी फोनवर बोलणार म्हणजेच भेटणार या आनंदात मी असते.
मी माझ्या आईच्या हातचे खाणे मिस करते असे आता मी म्हणणार नाही कारण तेवढी लहान मी नाही. याउलट आपण भारतात गेल्यावर आपण तिला आपल्या हातचे काय काय खायला घालू अशी यादी मी बनवत असते. माझी आई कशी आहे याबद्दल सांगायचे झाले तर पहिले म्हणजे ती सतत हसतमुख आहे, अन्नपूर्णा आहे. शिवाय एक उत्तम नियोजक व व्यवस्थापक आहे. म्हणजे अगदी लहानात लहान कार्यक्रम असला ना (उदा. हळदी कुंकू) तरी तो खूप साग्रसंगीत करते. तिने मनात ठरवल्यापेक्षाही तो कार्यक्रम काकणभर जास्त चांगला होतो.
आम्ही दोघी बहिणी जेव्हा वयात आलो तेव्हा तिने आम्हाला सांगितले की तुम्ही आता लहान नाही. तुम्ही मोठ्या होत आहात. या वयातच तुमचे व्यक्तिमत्त्व घडणार आहे, तेव्हा त्याकडे लक्ष द्या. एकदा हे वय निघून गेले की ते परत येणार नाही, आणि नंतर विचार करून त्याचा काहीही उपयोग नाही.
माझ्या आईचा अजून एक गुण म्हणजे ती खूप हौशी आहे. नागपंचमीचा सण आला की तुळशीबागेत जाऊन आम्हाला कानातले गळ्यातले आणणार. आणि नागपंचमीच्या आदल्या रात्री आमच्या हातावर मेंदी लावणार. प्रत्येक सण उत्साहाने व आनंदाने साजरे करणार. आमच्या दोघी बहिणींच्या वाढदिवसाच्या दिवशी आमच्या आवडीचे पदार्थ करणार. ती उत्तम पंजाबी सूट शिवते, त्यामुळे आम्ही कॉलेजमधे असताना सर्व प्रकारच्या फॅशनचे पंजाबी सूट घातले आहेत. नुसते आमच्या दोघींचेच हौशीने करणार नाही तर तिच्या सर्व भाचवंडांचे, त्यांच्या नातवंडाचे करणार. माझी एक मावसबहीण आहे ती आमच्या घरी आली की नेहमी म्हणते की आता माझ्या मुलांचा " लाड एरिया" सुरू झाला.
अमेरिकेवरून फोन करताना आता सवयीने तिलाही माहित झाले आहे की ठराविक मिनीटांचे कॉलिंग कार्ड असते आणि मिनिटं संपली की आपोआप फोन कट होतो, तरीसुद्धा मी तिला सांगते "हं आई, कार्ड संपत आले बरं का, आपोआप फोन कट होईल" तेव्हा ती म्हणते " हो हो अच्छा बाय बाय करून ठेवू या. किती पटकन वेळ जातो ना!"
लग्नाअधी मी नोकरी करायचे तेव्हा डबा पण साग्रसंगीत. एका पोळीमधे तूपसाखर, एका पोळीमध्ये लोणचे/चटणी, भाजी आणि एका बाटलीत ताक. हे ताक मी खूपच मिस करत आहे. पुढील भारतभेटीमध्ये भरपूर ताक पिऊन घेणार आहे.
आता आई खूप थकली आहे, पण उत्साह किती!! मी आईला नेहमी म्हणते की तुझा निम्मा उत्साह पण आमच्या दोघींच्यात नाही. तिने केलेले संस्कार आम्हां दोघी बहिणींना शेवटपर्यंत उपयोगी पडतील यात वाद नाही. तिची अजून एक शिकवण म्हणजे ती म्हणते तुम्ही बाकी काहीही सहन करा पण अन्याय सहन करू नका. यशाने हुरळून जाऊ नका व दु:खात खचू नका. अशा या प्रेमस्वरूप व वात्सल्यसिंधु आईला माझा साष्टांग दंडवत.
आज ती ७३ वर्षाची आहे. तिच्या पुढील आयुष्यात तिला उत्तम आरोग्य लाभो अशी देवाजवळ प्रार्थना करून मी माझे लिखाण थांबवते.
आईवर लता मंगेशकर यांनी एक खूप सुंदर गाणे गायले आहे ते खाली दिलेल्या दुव्यावर जरूर ऐका. गाणे असे आहे "प्रेमसवरूप आई वात्सल्यसिंधू आई, बोलावू तुज आता मी कोणत्या उपायी"
http://www.musicindiaonline.com/music/marathi/s/artist.653/
रोहिणी गोरे
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
"आई,आई" (आलें,आलें) म्हणणारी तो आई.हांक मारल्यावर मदतीला तिच एकटी धांवते.कारण
"पक्षिण उडे आकाशी परि लक्ष असे घरट्याशी"
तिच ना आई?
"आई" ह्या शब्दात "आ" मधे "आकाश " आहे
आणि "ई" मधे "ईश्वर " आहे ती आई.
ज्याना आई नाही ते श्रिमंत असले तरी भिकारीच.
असे कुणी तरी म्हटले नाही कां?
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी नाही काय?
"गे आई, कमलमुखी तूं सुंदर असता
रूप विधात्याचे कसे वेगळे?"
आईचा सातवा महिना
तुझ्या उदरातून
पाहिला मी
आई, तुझा
आनंदाचा सोहळा
जरी पुर्ण
काळोख होता
इकडे सगळा
येइन मी प्रकाशात
जेव्हा
पुनश्च पाहिन मी
तुझा अन माझा
अत्त्यानंद आगळा
हे किती खरं आहे नाही काय?
नको रडूं तूं आई
मी तुला दु:ख देणार नाही.
कळत नाही मला
तुझ्या दु:खाचे कारण काही.
पाहिले प्रथ्म तुला रडताना
जेव्हां होई मी भग्यवान
तूं घालीशी जन्मा मला
मी पण रडलो
तुला पाहुनी
माझ्यासाठी कण्हतानां
सुख दु:खाच्या अश्रू मधला
फरक मला कळेना
यशापयशाच्या प्राप्ती
मधला अर्थ जूळेना
काय चुकले माझ्याकडूनी
गोंधळतो मी तुला पाहूनी
तुला डोळे पुसताना
कळले आता विचारांती
आईच्या अंतरी असे
ओहटी अन भरती
जरी होई माझी
प्रगती अथवा अधोगती
नेत्रात तुझ्या सदैव
अश्रू असती
कारुण्याचे अन त्रुप्तीचे
किती लिहू कविता अन किती लिहू लेख
तूला निर्मीण करून हीच खरी
विधात्याची मेख
श्रीकष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
Shreekrinshna, Deepanjali, thanks for the comment on my blog!
Post a Comment