Tuesday, August 13, 2013

Biltmore Estate - Asheville - North Carolina (2)



















Biltmore Estate - Asheville - North Carolina (1)

















Biltmore Estate - Asheville - North Carolina इथे फिरायला गेलो होतो. ही जागा खूप सुंदर आहे. इथे एक खूप सुंदर बंगला आहे. तो आतून बघण्यासाठी त्याला तिकीट आहे. हा बंगला बघायला आतून एकेक करत सर्व जागा दाखवतात. २ तास लागतात. बंगल्यात खूप कोरीव नक्षीकाम केले आहे. बंगल्या व्यतिरिक्त इथे आजुबाजूला शेती आणि बागा आहेत. हा सर्व परिसर खूपच रम्य आहेत. हे सर्व  एका दिवसात  बघून होते. या इस्टेट बद्दल  बाकी सर्व माहीती गुगलमध्ये मिळते.


Friday, July 26, 2013

आज इथं तर उद्या तिथं ! ...(७)

अपार्टमेंट फाईंडरमध्ये क्लेम्सनमधल्या सर्व अपार्टमेंटची यादी होती. एकेक करून अपार्टमेंटची यादी वाचत होते पण उपयोग काहीही नव्हता. सर्व अपार्टमेंट २ ते ३ नाहीतर ४ बेडरूमची होती. वाचता वाचता मला त्यात एक बेडरूमचे अपार्टमेंट सापडले. तसे तर २ बेडरूमचे अपार्टमेंट पण पाहून घ्यायचा विचार होताच.







फोन करून अपॉईंटमेंट घेतली व जागा बघायला गेले. एक बेडरूम अपार्टमेंटने साफ निराशा केली. खोल्या खूपच अंधाऱ्या होत्या म्हणजे दिवसाही दिवे लावूनच वावरायला लागणार याचा अंदाज येत होता. दोन बेडरूमची अपार्टमेंट अजिबातच चांगली नव्हती. खूप जुनाट वाटत होती. त्यात १ ते २ अपार्टमेंट रिकामी होती पण तीही खूप मागच्या बाजूला होती. विद्यापीठातून घरी येताना विनायक बहुतेक करून चालत यायचा. चालत येताना त्याला एक लग्न झालेला विद्दार्थी भेटला. त्याचे नाव होते कृष्णकुमार. त्याची ओळख झाली व तो म्हणाला मी एम एस करतोय व माझे लग्न झालेले आहे. आम्ही दोघे स्टूडिओ अपार्टमेंटमध्ये राहतो. कॉलेज ऍव्हेन्यू वर हे अपार्टमेंट आहे. तशी अजूनही दोन ठिकाणी आहेत पण ती खूप लांब आहेत. हे तसे जवळ आहे आणि बस नसेल तर विद्यापीठात चालत जायला त्यातल्या त्यात जवळ आहे. विनायकने त्याचा फोन नं घेतला व त्याला सांगितले की आम्ही सध्या ज्या जागेत राहतो ती फक्त तीन महिन्यांकरताच आहे. दुसरीकडे जागा शोधत आहे त्यामुळे आम्ही पण स्टुडिओ अपार्टमेंट पाहून घेतो. बरं एक सांगा तुमची जागा पहायला आले तर चालेल का? तो "अवश्य या" म्हणाला.






विनायकने घरी आल्यावर मला त्या अपार्टमेंटबद्दल सांगितले. मी विचारले स्टुडिओ अपार्टमेंट म्हणजे? तर विनायक म्हणाला की एकच खोली असते. त्यातच बाथरूम वगैरे पण सर्व असते. एक खोली म्हणल्यावर माझ्या कपाळाला आठ्या पडल्या. विनायक मला म्हणाला आपल्याकडे जागेबद्दलचे असे किती पर्याय आहेत? तर अगदी थोडे. जागा बघून तर येऊ, मग ठरवू कोणते अपार्टमेंट फिक्स करायचे ते.  मी कृष्णकुमारच्या बायकोला फोन लावला व विचारले की तुमची जागा पहायला आले तर चालेल का? ती लगेचच 'हो' म्हणाली. तिच्या घरी गेले. ते अपार्टमेंट म्हणजे एक मोठी चौकोनी खोली होती. गप्पा मारता मारता एकीकडे नजर जागेमध्ये फिरत होती. उमा म्हणाली की दोघांकरता हे अपार्टमेंट तसे चांगले आहे. मलाही ते बरे वाटले. एका भिंतीत सामान ठेवायला बरीच जागा होती.










आमच्याकडे जास्तीचे पर्याय नव्हतेच मुळी! त्यामुळे स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये जायचे निश्चित केले. नेमकी त्याच वेळेला आमच्या नशिबाने त्या अपार्टमेंट कॉप्लेक्समध्ये एकच जागा शिल्लक होती. ती बुक केली आणि एका संध्याकाळी आमची वरात स्टुडिओ अपार्टमेंटकडे जायला निघाली. क्लेम्सनमध्ये आल्यापासून पहिले मोटेलमध्ये एक रात्र काढली, नंतर सुनिताकडे आठवडाभर, नंतर क्लेम्सन प्लेसमध्ये तीन महिने आणि आता ही एक खोली. क्लेम्सनमध्ये पाय टाकल्यापासून आमची व आमच्याबरोबर आमच्या सामानाचीही बरीच नाचानाच झाली होती. यावेळीही सामानाची विशेष बांधाबांध करायची नव्हती. पॅके केलेले सामान , त्यातले रोजचे वापरातले कपडे आणि स्वयंपाकाची भांडीच काय ती बाहेर काढली होती. तरी पण आठवणीने सर्व बरोबर घेऊन, आवरा आवर करून निघालो. यावेळी विनायकच्या लॅबमधला एक अमेरिकन आम्हाला सोडायला आला. त्याच्याकडे एक टेंपो होता. त्यात आमचे सामान ठेवले व तो आणि विनायक निघाले आणि मी चालत निघाले. चालत जाण्याच्या अंतरावरच हे घर होते. एका खोलीमध्ये राहण्याची ही पहिलीच वेळ ! संध्याकाळचा सुमार, आणि सामानाची गिचमिड ! बसायला एक रोलींग खूर्ची होती तिथे !







खोली जरी एकच असली तरी मला छान वाटत होते, स्थिरावल्यासारखे ! या जागेत मला एक अत्यंत आवडले होते ते म्हणजे मुख्य दाराला लागून असलेले जाळीचे दार ! या आधीच्या  क्लेम्सन प्लेस अपार्टमेंटमध्ये ३ महीने राहून इतके काही कंटाळवाणे झाले होते की अगदी कारागृहातून सुटका झाल्यासारखे वाटत होते !  या घराच्या बाहेर पडल्या पडल्या लगेचच बस थांबा होता. रस्त्यावरून वाहनांची वर्दळ होती. बसेल ये जा करत असल्याने त्याचाही आवाज यायचा. या घराच्या आजुबाजूला भरपूर हिरवीगार व उंच झाडे होती. माणसात आल्यासारखे वाटत होते ! या आधीच्या जागेत म्हणजेच क्लेम्सन प्लेस ही जागा छान आणि मोठी असली तरी हे अपार्टमेंट मुख्य रस्त्याच्या खूपच आत आत होते. त्यामुळे एकतर शांतता होतीच. शिवाय उन्हाळ्याची सुट्टी असल्याने बरेचसे विद्दार्थी जागा सोडून त्यांच्या गावी रहायला गेले होते त्यामुळेही एकूणच वर्दळ कमी होती. इथले रस्त तर अगदी निर्मनुष्य होते. विनायक सकाळी आठला जायचा ते रात्री लॅबमधून ८ ला परतायचा. तोपर्यंत मी एकटीच इतक्या मोठ्या जागेत भूतासारखी वावरणारी ! त्या तीन महिन्यात मी भरपूर टीव्ही बघून घेतला. तिथे असलेली इंग्रजी मासिकेही वाचली. शिवाय असंबद्ध सुचेल तसे डायरीत लिहित सुटले होते ! ते तीन महीने ! या लेखात त्याचे वर्णन आहे.






साधारण तीन वर्षांनी क्लेम्सन सोडायची वेळ आली आणि आम्ही विल्मिंग्टनची एक्झीट घेतली त्याचे वर्णन पूढील लेखात ! क्लेम्सनमध्ये एकाच खोलीत राहण्याचा अनुभव घेतला.  क्लेम्सन सोडताना खूपच वाईट वाटत होते, त्याला कारणच तसे होते. क्लेम्सनमधले दिवस खूप छान गेले होते. मित्रमंडळ जमा झाले, त्यांच्याकडे जाणे येणे, गप्पा टप्पा होत होत्या. एका खोलीत बऱ्याच जेवणावळीही झाल्या. विनायकचे ऑरगॅनिक केमिस्ट्रीमधले संशोधनाचे बरेच पेपर्स जर्नल्समध्ये प्रकाशित झाले. मी तीन ते चार नोकऱ्या केल्या. मला फक्त "शनिवार" हा एकच दिवस रिकामा असायचा. नोकरी करायच्या आधी मी क्लेम्सनमध्ये बसने खूप खूप हिंडले ! कॉलेज ऍव्हेन्यूवरून रोजच्या रोज चालणे होत होते. याच एका खोलीत आमचा टिल्लू टिव्ही खूप शोभून दिसायचा. डेस्कटॉपची खरेदी झाली होती. पांढरी शुभ्र टोयोटा याच घरात असताना आली. चर्च, डे-केअर व इतरत्र नोकरी असल्याने लहान मुलांच्यातच वावरत होते. त्यांचे हासरे चेहरे सतत डोळ्यासमोर असायचे. मोटेलमध्ये काम करण्याचा अनुभव आला. इथले काही मोटेलवाले त्यांना कुठे बाहेर जायचे असेल तर विद्दार्थ्यांना बसायला सांगत. जास्त करून ज्या विद्दार्थ्यांचे लग्न झाले आहे असे तिथे विंडोवर बसायचे. दोघे मिळून हे काम पहायचे. त्यातल्या काही जणांसाठी त्यांना वेळ नव्हता म्हणून त्यांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही जाल का? त्यामुळे तोही एक अनुभव मिळाला. असे एक ना अनेक गोष्टी क्लेम्सनमध्ये असताना घडल्या. या सर्वांचे अनुभव मी लिहिलेले आहेत.







क्लेम्सनमध्ये असताना माझ्या अंगाअंगातून उत्साह सळसळत होता ! रम्य ते क्लेम्सनचे दिवस ! आत्तापर्यंतच्या आयुष्यातील लग्नानंतरची दोन ठिकाणांमधली वास्तव्ये खूप आनंद देवून गेली. पहिले म्हणजे आयायटी पवई, आणि दुसरे म्हणजे क्लेम्सन ! निसर्गरम्य जंगलात राहण्याचे पुरेपूर समाधान आम्हाला क्लेम्सनमध्ये मिळाले होते ! आम्हाला दोघांनाही निसर्ग खूप आवडतो.


क्रमश : ...

Monday, July 22, 2013

Art Photography