Wednesday, May 17, 2017

माडीवाले कॉलनी - पुणे

१९६१ साली पूर आला. पुरात जवळजवळ सगळेच वाहून गेल्यानंतर पुढे काय? हा प्रश्न होताच. साने माई यांचा बंगला माडीवाले कॉलनीमध्ये होता. त्या आईला म्हणाल्या  "तू अजिबात काळजी करू नकोस. माझ्याकडे एक खोली रिकामी आहे तिथे तुम्ही रहायला या." पूर आला तेव्हा माझे बाबा विश्रामबागवाड्यात कामावर गेले होते तर आई शिवणाच्या क्लासला गेली होती. माझी आजी (आईची आई) घरी पोळ्या करत होती. तिघेही तीन दिशेला होते. माझे आजोबा त्यावेळी वलसाडला होते काकाकडे. पूर येतोय ही बातमी कळताच बाबा कामावरून घरी आले  तोपर्यंत औंकारेश्वराजवळील नदीचे पाणी वाड्याच्या आतपर्यंत पोहोचत होते. बाबा सांगतात की जवळजवळ कमरेइतक्या पाण्यातून वाट काढून आम्ही कसेबसे बाहेर पडलो. बाबांनी पटापट जे सुचेल तसे आईचे दागिने, थोडीफार घरी असलेले पैसे आणि जे काही सुचेल तसे पटापट पँटच्या खिशात कोंबले आणि आजीला म्हणाले, चला चला लवकर बाहेर पडा. केव्हाही पाण्याची पातळी वाढेल आणि वाडा बुडेल. आजी म्हणाली, एव्हड्या पोळ्या करून घेते. तर बाबा म्हणाले, अहो पोळ्या कसल्या करताय, लवकर उठा आणि माझ्याबरोबर बाहेर पडा. आगाशे वाड्यात आईबाबांचे बिऱ्हाड होते. श्री व सौ आगाशे यांना बातमी कळताच सामान पटापट कुठेतरी उंचावर, गच्चीवर जसे जमेल तसे ठेवले होते आणि तेही बाहेर पडत होते. श्री आगाशे यांचे वडील गच्चीत जाऊन बसले होते. ते म्हणाले मी इथून कुठेही हालणार नाही. माझे काय व्हायचे ते होईल. त्यांना समजावता समजावता नाकी नऊ आले.
आई शिवणाच्या क्लासमध्ये होती. तिलाही बातमी कळली आणि ती आणि तिच्या मैत्रिणी लक्ष्मी रोडकडे जायला निघाल्या. खरे तर बातमी रात्रीच कळाली होती की पानशेतचे धरण फुटले आहे आणि पाण्याचे लोटच्या लोट वहायला लागले आहेत.  बाबा, श्री आगाशे आणि त्यांच्या शेजारचे आदल्या रात्री गप्पा मारताना "काही नाही हो, अफवा असतील, दुसरे काही नाही" अशा भ्रमात ! बाबा सांगतात आम्हाला पूर रात्री  आला असता तर आम्ही दोघेही या जगात नसतो आणि तुम्हा दोघी बहिणींनाही हे जग पाहता आले नसते. सगळेजण सदाशिव पेठेत राहणाऱ्या एका मामाच्या खोलीत येऊन पोहोचले. एका खोलीत १० - १५ माणसे!  आळीपाळीने काही आत आणि काही बाहेर असे करत होती. पूर येऊन गेल्यानंतर किती नासधूस झाली होती हे आईबाबांनी मला फोनवरून सांगितले आहे, त्याचे वर्णन पूढच्या लेखात करीनच. पण माडीवाले कॉलनीमध्ये सौ माई साने व श्री साने यांच्या बंगल्यामधल्या एका खोलीत आईबाबांनी त्यांचा नवा संसार कसा थाटला याचे वर्णन अप्रतीम आहे. मुद्दे लिहून ठेवलेत मी ते नंतर विस्तारीन.


माडीवाले कॉलनीतल्या त्यांच्या दुमजली बंगल्याच्या वर गच्ची होती. त्या गच्चीला लागून एक खोली होती. तिथेच माझा जन्म झाला. माझ्या बहीणीचा जन्म गोखलेनगरचा पण माई माझ्या आईला म्हणतात की अगं रंजना खऱ्या अर्थाने इथलीच ! आईला रंजनाच्या वेळी दिवस गेले व गरोदरपणाच्या ७ व्या महिन्यात तिने व माझ्या बाबांनी श्री व सौ साने यांचा निरोप घेतला ते गोखलेनगरला येण्यासाठी. गोखले नगर ही पूरग्रस्तांची कॉलनी आहे. तिथे माझ्या  आजोबांनी  पूरग्रस्तांच्या यादीमध्ये बाबांचे नाव लिहून जागेसाठी खटपट केली. वलसाडला असताना पुर आल्याची बातमी कळाल्यावर  त्यांनी मन खूप घट्ट केले आणि मनाशी म्हणाले की पुण्यात गेल्यावर  मला दोनापैकी एकच चित्र दिसेल ते म्हणजे की निळू आणि निर्मला जिवंत असतील किंवा नसतील !Thursday, May 11, 2017

तीर्थस्वरूप दादा


 मी माझ्या आईला नेहमी फोनवरून सांगते की तू तुजे अनुभव लिही. पण ती म्हणते मला काही लिहीता येत नाही. पण ९  मे रोजी पहाटे साधारण ३ ला तिने तिच्या वडिलांबद्दल थोडे लिहिले. सुरवात श्री नृसिंह जयंती च्या दिवशी झाली. मला खूप आनंद झाला आहे. आता ती पूर्वीचे तिचे अनुभव लिहून काढेल आणि फोनवर ते मी उतरवून घेईन आणि माझ्या ब्लॉगवर टंकेन. पूर्वीच्या काळचे अनुभव वाचायला मला खूप छान वाटणार आहे.


 *******

ती. स्व. दादा म्हणजे माझे वडील यांच्याविषयी थोडे विचार मनापासून. तुमचा व माझा तसा काहीही सहवास नाही पण ज्या काही गोष्टी आठवत आहेत त्या मी मनापासून लिहीत आहे. दुसरे म्हणजे मी तुमची सर्वात लहान मुलगी असल्याने तुम्ही खूप मोठे आहात वयाने व मनाने. तुम्ही कडक शिस्तीचे असल्याने व त्या काळच्या विचाराने मी असे ऐकले होते की तुम्ही खूप मुलांना मारलेत पण परिस्थितीच्या मानाने लाड केले असावेत.


मी तुमच्या हातून कधीच मार खाल्ला नाही. नाही म्हणायला एकदा करकरे वाड्यात (पुणे मुक्कामी) मार खाल्ला. साल १९५० साधारण असेल. पण नंतर तुम्हाला खूप वाईट वाटले व मला माझे आवडते दाणे गुळ खावयास दिलेत. नंतर १९५२ साली तुम्ही पनवेलला व मि पुण्यात होते. काही कारणाने ती. स्व. दाजीने (माझा भाऊ) मला पनवेलला पोहोचवले आणि योगायोगाने तुम्ही पण आईला सांगायचात की बाबीला इथे घेऊन ये. मी तिला मारणार नाही किंवा बोलणार पण नाही आणि थोडेच दिवसात रमा एकादशीला १९५२ साली तुम्हाला देवाज्ञा झाली.

माझ्या आईचे वय ८० आहे.

Friday, May 05, 2017

५ मे, २०१७

आजचा दिवस भूतकाळात रमणारा होता. माझ्या बाबांचे मित्र सरपोतदार काका फेसबुकावर आले आहेत. त्यांना मी फोन केला. शिवाय त्यांच्या मुलीशी सविताशी पण आज बोलले. आज माझा मूड गोखले नगर मूड होता. नंतर सुरेखा, जोशी काकू सगळ्यांना फोन लावले आणि बोलले. भाग्यश्रीला ही फोन लावला. जोशी काकू म्हणाल्या की तू भारतात आलीस की तुम्ही सर्व मैत्रिणी आमच्या घरीच जमा, मजा करा आणि खूप गप्पा मारा. त्या इतक्या काही प्रेमाने हे बोलल्या की मनाने मी लगेच गोखले नगरला जाऊन पोहोचले देखील.

गोखले नगरची आठवण येण्याचे अजून एक कारण असे आहे की आम्ही सध्या जिथे राहतो तो डोंगराळ प्रदेश आहे. पुण्यातील गोखले नगरचा भाग ही असाच डोंगराने व्यापलेला आहे. वेताळचा डोंगर, गणेश खिंड, पॅगोडा, हनुमान नगर, पत्रकार नगर, कांचन बन, चतुर्श्रींगी, पुणे विद्यापीठे, कमला नेहरू पार्क हे सर्व एकाच लाईनीत येते. आम्ही सर्व मैत्रीणींचे लहानपण, शाळा कॉलेजमधले दिवस ते अगदी आमच्या सर्वजणींची लग्न होईतोवर
आम्ही गोखले नगरला रहायचो.

आज मी आईशी फोनवर बोलतानाही तिला सांगितले की यावर्षीच्या भारतभेटीत मला गोखले नगर पहायचे आहे.
 आता मला त्याचे खूप वेध  लागलेत की मी सगळ्या मैत्रिणीना भेटून खूप गप्पा मारणार आणि खूप फोटोज घेणार. मुख्य म्हणजे आमच्या जुन्या घरी जाऊन मला माझ्या जाईला बघायचे आहे. जाईच्या फुलांचे आणि झाडाचे फोटोज घ्यायचे आहेत. हे मी जेव्हा प्रत्यक्षात करीनही पण त्याहीपेक्षा आज मी मनानेच तिथे जाऊन पोहोचले आणि सगळ्यांना भेटले आणि त्यामुळेच आज माझा सर्व दिवस भूतकाळात रमला.
 

वर जो फोटो आहे तो आम्ही जिथे राहतो तिथला  आहे.

Thursday, April 20, 2017

र‍ंजनारोहिणीच्या बाहुल्या मंडईत" जातात

बाबा गोष्टी खूप छान रंगवून सांगतात. त्यामुळे बाबा जिथे जातील तिथे सर्व लहान मुले त्यांच्या आजुबाजूला असतात. आजोबा गोष्ट सांगा ना ! असे म्हणल्यावर कोणती गोष्ट सांगु? भुताची, माकडाची की हत्तीची असे विचारतात. आम्हाला लहानपणी बाबा रोज गोष्टी सांगायचे. रोज एक तरी गोष्ट ऐकल्याशिवाय झोपलो नाही आम्ही दोघी बहिणी. त्यातली एक गोष्ट बाबांनी रचून सांगितलेली आहे. आणि तीच गोष्ट आम्हां दोघी बहिणींनाही खूप आवडते. गोष्टीचे नाव आहे " र‍ंजनारोहिणीच्या बाहुल्या मंडईत जातात" :D
तर एकदा काय होते रंजनारोहिणीच्या बाहुल्या मंडईत जायचे ठरवतात. पण कधी जायचे आणि सगळ्यांची नजर चुकवून केव्हा जायचे? तर रंजनाची बाहूली म्हणते की आपण बाबा उठतात दूध आणायला तेव्हा पहाटेच उठून जाऊ. रोहिणीच्या बाहुलीलाही ते पटते. रात्री झोपायच्या आधी त्या दोघींच्या बाहुल्या नट्टा पट्टा करून तयार होतात आणि हळूच रंजनारोहिणीला झोप लागली का ते पाहून दोघींच्या पांघरूणात शिरतात. पहाट होते. बाबा उठतात आणि दार उघडे करून ठेवतात. शर्ट पॅंट घालून दुधाच्या बाटल्या घेऊन निघतात. रोहिणीची बाहूलीचे बारीक लक्ष असते. बाबा उठल्यावर ती हळूच रंजनाच्या बाहूलीला उठवते आणि म्हणते चल. लगेच जाऊया आपण. दार उघडेच आहे. त्या दोघी बाहुल्यांनी नट्टा फट्टा आधीच करून ठेवलेला असतो त्यामुळे वेळ न घालवता २ मोठाल्या पिशव्या घेऊन दरवाजातून हळूच बाहेर पडतात. फाटकाचे दार आवाज येणार नाही याची काळजी घेऊन लावतात आणि रस्यावरून चालायला लागतात. रिक्षाला हात करून थांबवतात. रिक्षावाल्याला सांगतात. आम्हाला मंडईत जायचे आहे. रिक्षावाला त्यांना मंडईत आणून सोडतो तेव्हा उजाडलेले असते. बाजार नुकताच सूरू झालेला असतो. भाज्यांचे गड्डे टोपलीत ठेवून भाजीवाल्या बायकाही आलेल्या असतात. बाहूल्यांना असा काही आनंद होतो. आणि त्या दोघी मिळून बरेच काही घेतात. बोरे, चिंचा आवळे, कोथिंबीर, मिरच्या, भाज्या, फुले. असे करता करता भाज्यांच्या पिशव्याही जड होतात. आणि गर्दीतून वाट काढत काढत त्या चालत येताना बाबांना दिसतात. बाबा विश्रामबागवाड्यात कामावर येताना चितळे बंधूच्या दुकानापाशी या बाहुल्या भांबावलेल्या अवस्थेत उभ्या असलेल्या बाबांना दिसतात. बाबा म्हणतात अरे या तर आपल्या रंज्यारोहिणीच्या बाहूल्या? या इथे कश्या आल्या? मग ते बाहुल्यांपाशी गेले आणि त्यांना रिक्षात बसवून दिले. बाबा म्हणाले आता परत अश्या कुठेही एकट्या जाऊ नका. इथे या गर्दीत तुम्ही चेंगरल्या असता तर? बाहुल्या म्हणाल्या, आम्ही परत असे नाही करणार. पण आम्हाला रंजना रोहिणी ओरडणार नाहीत ना? नाही ओरडणार. मी सांगीन त्यांना ओरडू नका म्हणून.रिक्षाने रंज्यारोह्याच्या बाहुल्या घरी आल्यावर. फाटकाची कडी हळूच उघडली आणि जड पिशव्या घेऊन आत आल्या. तोपर्यंत रंजारोह्या उठून दात घासत होत्या. दात घासून चहा प्यायला आणि बाहेर येऊन पाहतात तर दोन पिशव्या भाज्यांनी भरलेल्या! अरे कोणी आणल्या या भाज्या? असे म्हणून इकडे तिकडे बघतात तर काय दोघींच्या बाहूल्या एका कोपऱ्यात उभ्या राहून हिरमुसलेल्या ! मग त्यांच्या लक्षात आले आणि बाहुल्यांना विचारले, काय गं तुम्ही आणली ही दोघींनी भाजी? आणि इतका नट्टा फट्टा कधी केलात. मग त्यांनी जे काही केले ते सांगितले आणि त्यांना बाबा मंडईत भेटले आणि त्यांनी आम्हाला रिक्षात बसवून दिले हेही सांगितले. मग त्या दोघी बाहुल्यांना ओरडल्या आणि म्हणाल्या आम्हाला सांगितले असते तर आम्ही घेऊन गेलो असतो तुम्हाला. पण एकट्याने कशाला जायचे? एवढे धाडस का करायचे. बाहुल्या म्हणाल्या आम्ही चुकलो. आम्ही परत असे कधीही करणार नाही. मग आई बाहेर आली म्हणाली जाऊ दे गं. त्या आता परत नाही अश्या वागणार. बघू तरी त्यांनी काय काय आणले आहे ते? बोरे, आवळे, चिंचा, आणि काय काय आई कोथिंबीर आणि भाजी पाहून खुश झाली. आणि रंज्यारोह्या रानमेवा पाहून खुष झाल्या. त्या बाहुल्यांना बोरे चिंचा दिल्या आणि म्हणाल्या पळा आता समोरच्या पारावर बसून खा ! बाहुल्या खुश झाल्या. आणि बाहुल्यांनी धाडस करून मंडईत जाऊन भाजी आणल्याबद्दल रंजनारोहिणीलाही बाहुल्यांचे खूप कौतुक वाटले.


त्या रात्री परत रंजना रोहिणीच्या पांघरूणात बाहुल्या शिरल्या आणि झोपल्या !

गोष्ट संपल्यावर बाबांनी आम्हा दोघी बहिणींना विचारले "कशी वाटली गोष्ट? " आम्ही बाबांना म्हणालो "बाबा आत्तापर्यंतच्या सर्व गोष्टींमध्ये आम्हाला हीच गोष्ट खूप आवडली. :D

Thursday, March 16, 2017

१६ मार्च २०१७

आजचा दिवस खुप बरे वाटले असे आपण म्हणतो ना तसाच आहे अगदी. काल आणि आज प्रचंड थंडी आहे. त्यामुळे काल कामावर जाऊ नये असेच वाटत होते. आज सुट्टी असल्याने आरामात उठले. कालच आजचा विनायक ला द्यायचा डबा तयार केला आणि माझ्यासाठीही पोळीभाजी.


थंडी म्हणजे महाभयंकरच आहे. त्यामुळे अंगदुखी आणि सोबत डोकेदुखीही आहे. आज मी  माझ्या मामेबहिणीशी बोलले. ती म्हणाली आम्ही काही बहिणी तिच्या लग्नात खूप लहान होतो. तिने आठवण सांगितली आणि मलाही ते आठवले आणि इतके काही छान वाटले ना ! ती म्हणाली तुम्ही माझ्या लग्नात रडलात, आणि विचारले तर म्हणालात ती रडली म्हणून मी रडले. आणि लग्नात रडायचे असते म्हणून आम्ही रडलो असे सांगायचात. मलाही ते आठवले आणि इतके हासू फुटले , विचार केला की असे हुकमी रडायला कसे काय आले आपल्याला? मजा असते ना लहांपणची ही.

आज मोनिकाशी फोनवर खूप बोलले. तिनेही तिच्या घरी तिची चुलत बहीण आली होती आणि त्या बहिणीची छोटी मुलेही आली होती. ती सर्व आल्यावर काय काय मजा केली असे तिने सांगितले. आणि तिची मुले कशी गोड आहेत हे वर्णन केले त्यामुळे अगदी तसेच्या तसे चित्र माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. तिने केलेले वर्णन ऐकून खूपच छान वाटले मला. मग मी पण मी काय काय योजले आणि माझ्या मनात काय काय करायचे आहे भारतभेटीमध्ये ते तिला सांगितले.
 
 
आज एका म्युझिक ग्रुपवर एक थीम होती त्यामध्ये मी जैसे राधाने माला जपी हे गाणे टाकले. गाणे थोडे गाऊन पाहिले. मला हे गाणे पाठ आहे आणि जसेच्या तसे म्हणताही येते. पण म्हणायला तसे अवघड आहे. सराव करायला लागेल. मग मी रिमझिम गिरे सावन गायले आणि रेकॉर्ड केले. युट्युबवर अजून अपलोड करायचे आहे. छान गायले गेले माझ्याकडून. जाणवत आहे अगदी.

 तर आज गाण्यांवरून आठवत गेले आणि मग थोडेसे त्याबद्दल लिहून फेबुवर टाकले. आजचा दिवस खूप वेगळा आणि बरे वाटण्याचा गेला म्हणून मग रोजनिशीत तो लिहिला. आता झोपायला हवे. उद्या कामावर जायचे आहे. :( पण उद्या हवा तशी बरे आहे ते एका अर्थी चांगलेच आहे म्हणायचे. फेबुवर लिहिलेले इथेही रोजनिशीत लिहीत आहे.
 
 
"लालला ललालाला लाललललल लललललाला" हा आलाप आहे "ये दिल और उनकी निगाहोंके साये" या गाणामधला. पूर्वी भारतात असताना आम्ही जेव्हा मोठाच्या मोठा टेप रेकॉर्डर घेतला होता त्याला स्टिरिओ साउंड होते त्याचे वेगळे बॉक्सेस होते. ज्या गाण्यांमध्ये बरीच वाद्ये आहेत अशी गाणी त्यावार जास्त चांगली वाजली जातात. प्रत्येक वाद्यवृंदाचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो. तेव्हा ये दिल और उनकी अगणित वेळा ऐकले आहे.
आयायटीत असताना जेव्हा आम्ही टु इन वन घेतला तेव्हा आम्हाला एक कॅसेट फ्री मिळाली होती ती होती आँधी आणि मौसमची. तेव्हा नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी तुलसी ब्लॉक्स बांधले होते. ब्लॉक्स नवीन असल्याने खोलीत गाण्याचा आवाज घुमायचा. या जागेत आम्ही" इस मोडसे जाते है" हे गाणे अगणित वेळा ऐकले आहे.
अमेरिकेत जेव्हा पहिल्यांदा आलो त्या जागेत टु इन वन घेतला. डॅलसवरून तेव्हा हिंदी गाणी २४ तास रेडिओवर प्रसारित व्हायची. तेव्हा "राधा कैसे न जले" हे गाणे रोज लागायचे. हे गाणे मी अगदी रेडिओला कान देवून ऐकायचे. काही रिकाम्या कॅसेट विकत घेतल्या त्यात एका विद्यार्थ्याने आम्हाला "मनमें नाचे मनकी उमंगे" हे गाणे रेकॉर्ड करून दिले होते. हे गाणे असेच अनेक वेळा ऐकले. या गाण्यात लताचा आवाज इतका काही मधुर आहे की कोणीतरी आपल्या कानात मध ओतत आहे असेच वाटते."अब कब आओगे बालमा" हे गाणे क्लेम्सन मध्ये राहत असताना बरेच वेळा ऐकले आहे. पाऊस पडतोय, आकाशातून ढग चालले आहेत आणि हे गाणे असे मिश्रण असायचे बरेच वेळा त्या खोलीत. क्लेम्सन मध्ये असताना डेस्क टॉप घेतला होता आणि त्यावेळी म्युझिक इंडिया ऑनलाईन वर बरीच आणि पाहिजे ती गाणी ऐकता येतात हे नव्यानेच कळाले होते. याच डेस्कटॉपवर "डोला रे डोला रे डोला रे डोला" आणि "होठोमें ऐसी बात" बरेच वेळा ऐकलेले आहे.
विल्मिंगटन मध्ये राहत असताना परत एकदा नव्याने टु इन वन आणला तेव्हा तेरे मेरे सपनेमधली गाणी बरेच वेळा ऐकली होती. काही कॅसेट आम्ही भारतातून येताना आणल्या होत्या तेव्हा त्यातली एक माझी अत्यंत आवडती कॅसेट म्हणजे तेरे मेरे सपने ची.

"देव माझा विठू सावळा" हे गाणे आणि झोपेतून जागे होणे अगदी एकाच वेळेला. पाऊस पडतोय. रेडिओवर भक्तीगीते लागलेली आहेत. उठावे तर लागणारच आहे. शाळा आहे ना !
गाण्यांच्या आठवणींमध्ये मन तरंगत तरंगत कुठच्या कुठे निघून जाते ना !
 
 

Tuesday, March 07, 2017

इंगल्स मार्केट ...(4)

विकी मला "रोरो" म्हणते. आमचा जो ओटा आहे तिथे मध्यभागी एक रेष आहे तर म्हणते हा डावीकडचा माझा ओटा आणि उजवीकडचा तुझा. मी म्हणते "ओके! " तुझे साऊथ कॅरोलायना आणि माझे नॉर्थ कॅरोलायना" डू नॉट क्रॉस द स्टेट लाईन, ओके! :) तर गाल्यातल्या गाल्यात हासते. एकदा तर मजाच झाली. ती सकाळी लवकर येत असल्याने काय काय बनवायचे याची एक यादी तयार करते आणि मला विचारूनच तू काय काय बनवणार आहेस? आणि त्यापुढे "रोरो" लिहिते. एकदा तिने मजेने ROW (रोरो) लिहिले होते. :D पदार्थ लवकर बनव असे म्हणायचे झाल्यास "हरी अप" नाही म्हणत, " हरी हरी हरी" म्हणते. मग मी पण तिला ती पदार्थ बनवताना " हरी हरी हरी" म्हणते. :D ६६ वर्षाची विकी मजेशीर आहे. तिच्याबरोबर काम करताना मजा येते.मी, विकी आणि कार्मेन (spanish) आम्ही तिघी उत्पादन विभागात आहोत. मला कार्मेन ने काम शिकविले. विकी आणि कार्मेन दोघीही एकमेकींच्या नावाने खडे फोडत असतात. उत्पादन विभागात खूप काम असते. आमच्या मदतीला सुशीवाल्या बायका त्यांच्या मनात असेल तर त्यांचे काम संपवून आम्हाला मदत करतात. त्यात एक लुलू :D नावाची बाई आहे. हे नामकरण विकिनेच केले आहे. ही लुलू नावाची बाई मुळची फिलीपाईन्स देशातली. ही ६३ वर्षाची आहे.
आम्हाला हॉट बारला मदत करावी लागते. कारण की कस्टमर्सना पहिले प्राध्यान्य दिले जाते. एकदा एक बाई आली आणि मी तिथे होते. तर मला म्हणाली दोन ड्र्मस्टीक. मी गोंधळले. विचारले शेजारच्या टबाटाला. ति म्हणाली she wants fried legs Rohini :), oh ! (me) :D ऑर्डर देणाऱ्या बाईने पण ड्रमस्टीक वाजवण्याची ऍक्शन करून दाखवली आणि म्हणाली, it looks like drumsticks ! oh, got it ! (me) :) एका तंगडीची किंमत किती हे यादीत पाहिले आणि त्याप्रमाणे गुणिले २ करून लेबल प्रिंट केले आणि तिला २ तंगड्या दिल्या. इथे ऑर्डर देताना काही जण जेवणाची ऑर्डर देत नाहीत. तर काहीवेळा ८ किंवा १६ पिसेस ऑफ चिकन मागतात. त्यात 8 pieces means 2 breast, 2 thigs, 2 legs and 2 wings. त्याचे मी मनातल्या मनात मराठीकरण केले आणि मनातल्या मनात खूप हासले.
नंतर एके दिवशी एकदा एक माणूस आला आणि मला म्हणाला I want dark meat, मी परत गोंधळले आणि विचारले तर टबाटा म्हणाली he wants legs and wings rohini :)
गोंधळण्याचे कारण की जन्मात कधी मांस आणि चिकन पाहिलेही नाही आणि खाल्लेही नाही. मी मांस त्याच्या रंगावरून ओळखायला लागली आहे. हॅम म्हणजे गुलाबी , रोस्ट बीफ म्हणजे लाल त्याच्या कडा काळपट. बीचवुड हॅम म्हणजे गुलाबी आणि कडा विटकरी आणि फुलासारख्या गोलगोल. मांसाचे बरेच प्रकार आहेत. हॅमच्या पातळ चकत्या म्हणजे आपल्या तांदुळाच्या ओल्या पापड्या रंग वेगळा :) हॅल सलाड म्हणजे दिसायला गाजरहलव्यासारखे रंग वेगळा. :)
सगळ्यांना माहीती झाले आहे की मी पक्की शाकाहारी आहे ते. शिवाय मी दारूही पीत नाही आणि सिगरेटही ओढत नाही ते.
मला एकदा एकीने विचारले की इंडियातले सर्व लोकं असेच आहेत का? तर मी म्हणाले नाही गं ! आमच्यासारखी मोजकीच लोकं अशी आहेत. बाकी सर्वजण मांसाहार करतात, दारू पितात आणि आणि सिगरेटीही फुंकतात. ती हासली :D आणि ओके म्हणाली.


डेली सेक्शनला पुरूष आणि बायका दोघेही कामे करतात. १८ वर्षापासून ते ६७ वर्षांच्या वयोमर्यादेतील सर्वजण आहेत. Arthur नावाचा एक आर्मी मधला मुलगा काही दिवस आमच्या डेली सेक्शनला होता. त्याने मला विचारले की तू कोणत्या देशाची आहेस. मी म्हणाले इंडिया. त्याला खूप आनंद झाला कारण की तो कॉलेजमध्ये cultural studies शिकत होता. त्याने मला विचारले आर यु तमिळ? मी म्हणाले नो, आय एम मराठी. त्याच्या चेहऱ्यावर प्रकाश पडलेला दिसला नाही. :D मग मी म्हणाले , आय एम हिंदी. ओह! हिंडी ! याया हिंडी हिंडी ! :D मग म्हणाला खूप प्रकारच्या प्रकारच्या भाषा बोलतात ना इंडिया मध्ये. मी म्हणाले हो.
कॅन यु स्पिक संस्कृत? नो रे बाबा ! माय मदर टंग इस मराठी, बट आय कॅन
स्पिक हिंडी,अँड इंग्लीश, नो तमिळ, नो संस्कृत ! :D त्याला संस्कृत शिकायचेय ! त्याला भारतीय कलचर आवडते हे समजल्यावर मला खूप छान वाटले.

जॉन नावाचा अजून एक मुलगा होता, तो आता आमच्या इथे काम करत नाही. मी टबाटाला म्हणाले की जॉन इथला जॉब सोडून चालला आहे का? अशी नोट वाचली मी जेमीच्या टेबलावर. ती म्हणाली छे गं. :) असे त्याने बरेच वेळा लिहिले आहे. पण यावेळेला खरच त्याला दुसऱ्या ठिकाणी जॉब लागला होता. मी त्याचे अभिनंदन केले आणि विचारले कुठे दुसरी नोकरी? तर म्हणाला steakhouse, fancy restaurant, more money ! :)
मजेशीर होता जॉन. लहर आली सगळ्यांना म्हणायचा I love you ! I love you Carmen, I love you lulu, I love you rohini. मग आम्ही पण सगळ्या जणी म्हणायचो मी टू, मी टू :D मग हगची खूण करायचा. मला तशी खुण केल्यावर मी फक्त हासले. त्याला ते कळले असावे. (मनात म्हणले मी नाही हं कुणाला हगबिग करणार. :D मला हगिंग हा प्रकारच आवडत नाही मग तो पुरुष असो अथवा स्त्री. ) हा टबाटा बरोबर हॉट बार आणि सब बार ला असायचा. १२ तासाची ट्युडी करायचा. अतिशय प्रामाणिक आणि मेहनती होता.
इथे एक स्पॅनिश मुलगा आहे. तो सकाळी कॉलेजला जातो आणि दुपारच्या शिफ्टला कामाला येतो. मला विचारत असतो तुमच्या भाषेत याला काय म्हणतात नि त्याला काय म्हणतात. एकदा विचारले नाईफ ला काय म्हणतात तर मी म्हणाले चाकू. तेव्हापासून तो कामाला आला की मला हाय हॅलो न म्हणता चाकू, चाकू म्हणतो.


आमच्या इथे सब, हॉट, सुशी बार बरोबर आणखी दोन बार सुरू झालेत ते म्हणजे पिझ्झा बार आणि ऐशियन बार. त्याची तयारी काही दिवसांपूर्वीच सुरू झाली होती पण आज हे २ नवीन बार प्रत्यक्षात सुरू करायचे होते. सुशी बार चा मॅनेजर सगळ्यांना (आम्हाला नाही) सूचना देत होता. ऍडम आमचा डेली मॅनेजर त्याने सांगितले की आज सर्वांनी हजर रहायचे आहे. ज्यांचा डे ऑफ आहे त्यांनी सुद्धा. टु फेस न्यू सिच्युएशन. अजून काही माणसे कामावर रूजू झाली आहेत. इतकी गर्दी छोट्या जागेत की आवाज सहन होत नव्हते. जातायेता एकमेकांवर सर्वआदळत होते. :D आमचे सामान मिळणे कठीण झाले होते. कोल्ड रूम सध्या तरी खूप मागे गेली आहे त्यामुळे बनवलेले पदार्थ तिथे जाऊन ठेवण्यासाठी अनेक फेऱ्या माराव्या लागत होत्या. त्यामुळे पाय प्रचंड दुखत आहेत. :( कार्मेन मला म्हणाली की मला तर चिकन केस मध्ये कश्या कोंबड्या वावरतात ना तसेच वाटत आहे. :D बाकीचीही बरीच बदलाबदली झाली आहे. गिचमिड गिचमिड. मला तर वाटत होते या आवाजाने आणि गर्दीने मी चक्कर येऊन पडते की काय. :( विकी चा आज फोटो काढण्याचा मूड होता. माझ्या ऍप्रन वर जे स्टीकर्स आहेत ते चिकन सॅलड सँडविचचेे. पदार्थ बनवून झाले की त्याचा कोड प्रिंटर वर टाकून त्यावर आकडा टाकून प्रिंट वर प्रेस केले की पटापट लेबल्स बाहेर येतात. मग ती ऍप्रन ला चिकटवायची आणि मग प्लॅस्टीकच्या डब्यांना. अजून २ स्टीकर्स चिकटवायचे असतात. आज विकी ने माझा आणि सुशीवाल्या दोघीजणींचे फोटोज काढले. मग मी पण एक विकीचा काढला. कार्मेन चा आज मूड नव्हता. मी तिचा पण फोटो काढणार होते. कार्मेन, मी आणि विकी उदपादन विभागात आहोत. नवीन मॅनेजर ने मला विकीसाठी २ दिवस आणि कार्मेन साठी २ दिवस ठेवले असल्याने मला आता शनि-रवी पैकी एक दिवस सुट्टी मिळते. आधीची मॅनेजर जेमी आणि विकीचा ३६ चा आकडा :D असल्याने ती मला कार्मेन साठी ३ दिवस द्यायची पण मला शनि-रवी सुट्टी कधीच मिळायची नाही. विकी म्हणते कि तू माझ्याबरोबर पहाटे ६ लाच कामाला येत जा. :D आणि कार्मेन म्हणते की मला तू ४ दिवस हवीस. :) ती ५ दिवस असते. कार्मेन आणि विकी ह्या दोघीही माझ्याकडे एकमेकींच्या नावाने खडे फोडत असतात. :D आणि मी फक्त ya, ok, इतपतच प्रतिसाद देते.
विकीने माझा फोटो काढल्यावर लुलूला म्हणाली "hey lulu, Look at that stickers girl. she is on sale !


अमेरिका म्हणजे सारे कसे छान छान असे नाहीये. गुळगुळीत रस्ते (काही रस्ते खडबडीत आहेत की ज्यावरून कार चालवली की आपण होडीत बसल्यासारखे वाटते :D ) आणि स्वच्छ हवा (काही ठिकाणी अत्यंत बोचरे वारे आणि हाडे गोठवणारी थंडी असते :( स्प्रिंग्मध्ये परागकणांची ऍलर्जी की काहीजणांना रोजच्या रोज गोळ्या घ्याव्या लागतात नाहीतर श्वास घ्यायला त्रास होतो :( आणि उन्हाळा म्हणजे काही राज्यात रणरणते उन असते. हवा इतकी बदलती असते की एका दिवसात सर्व ऋतू पहायला मिळतात.
इथेही बायकांना बऱ्याच समस्या असतात. मी ग्रोसरी स्टोअर मध्ये काम करते त्यामुळे मला माहीती झाले आहे. कमीतकमी मजूरी प्रत्येक राज्यात वेगवेगळी असते. प्रत्येक राज्याच्या महागाईनुसार ही मजूरी आहे.
आमच्या स्टोअरमध्ये ज्या बायका काम करतात त्यांचे जीवन कसे आहे ते काही त्यांच्याशी बोलून तर काहींनी ते मला सांगितले म्हणून माहीती पडले. स्टोअरमधला पगार त्याना पुरत नाही. पगार कमी आणि कष्ट खूप.
एक अमेरिकन बाई आहे. वय वर्षे ३० तिचे लग्न झाले आणि तिला ३ मुले आहेत. ती मला म्हणाली की ती तिच्या नवऱ्यापासून घटस्फोट घेणार आहे. कारण की तिला नवरा दारू पिऊन खूप मारहाण करतो. तो तिला बोलावत आहे परत ये म्हणून पण ती म्हणाली की मी आता मार सहन करणार नाही. काही झाले तरी मी परत जाणार नाही. तिची ड्युटी सकाळी ७ ते दुपारी ३ अशी आहे. ती लवकर उठून मुलांचे व स्वतःचे आवरून मुलांना डे केअर मध्ये सोडते आणि मग कामावर हजर होते. बरे नसताना पण ती कामावर येते. मला म्हणाली की मला पैशांची गरज आहे.
मेक्सिको देशामधल्या ४ बहीणी त्यांच्या चुलत भावांबरोबर अमेरिकेत १९८८ साली आल्या. पोटापाण्याकरता (सर्वजण इथे पोटापाण्याकरताच येतात, मजा मारायला येत नाहीत. ) त्यातल्या २ बहिणी आमच्या इथे काम करतात. दोघींचे नवरे व्हाईट अमेरिकन होते. एकाला रोग होता तो त्याने सांगितला नाही आणि तो लवकर मरण पावला. तिला एक मुलगा आहे. तिच्या बहिणीचा नवराही व्हाईट अमेरिकन होता. त्याने पैशाची अफरातफर केली आणि तो पळून गेला. तिला एक मुलगी आहे. त्यामुळे त्या दोघी बहिणी आणि त्यांची मुले एकत्र रहातात.
एक अमेरिकन बाई आहे तिची आई दवाखान्यात आहे. तिलाही असाच कुठला तरी रोग झाला आहे. पण ती आईकरता तिला होत नसनाही काम करते.
एक अमेरिकन बाई आहे तिला आता Breast cancer झाला आहे. त्यामुळे तिच्या ऑपरेशन करता ती काही दिवस रजेवर होती. मला वाटले की २ ते ३ महिने तरी येणार नाही. पण महिन्याच्या आत रूजू झाली. तिलाही पैशाची गरज आहे.

एक फिलिपियन बाई तिच्या नवऱ्या बरोबर इथे आली. आणि काही वर्षांनी तिचा नवरा वारला. ती ग्रीनकार्डावर आहे. आणि एका बॉय फ्रेंड बरोबर राहते. तिला ५ मुले आहेत. सर्व मुले निरनिराळ्या देशात आहेत.
एक फिलीपियन बाई आहे. ती सिंगापूर मध्ये काही वर्षे काम करत होती. लग्न झाले आणि मुले झाली. तिचा नवरा वारला. सिंगापूरमध्ये तिला एक व्हाईट अमेरिकन भेटला. आणि त्यांचे प्रेम जमले. ५ ते ६ वर्षांनी त्यांनी लग्न केले आणि ती अमेरिकेत आली. तिचा दुसरा नवराही वारल. तिला एक मुलगी आहे. तिच्याकरता ती नोकरी करते. ती पण एका बॉयफ्रेंड बरोबर राहते.आपल्याला वाटते की अरे, या वयात बॉयफ्रेंड? पण बॉयफ्रेंड म्हणजे नुसता सेक्स नसून बाकीच्याही गोष्टी आहेतच की. कुणाचा तरी आधार आणि भागत नाही म्हणून खर्चासाठी शेअरींग.

Friday, February 17, 2017

भारतभेट २०१६

यावर्षीची भारतभेट अगदी मोजून होती. दोघांच्याही नोकऱ्या नवीन असल्याने जास्त रजा मिळाली नाही. शिवाय नोकरीबदलामुळे जुलैचे काढलेले तिकीट रद्द केले होते आणि त्यामुळे रद्द केल्याचे पैसे तर कापलेले होतेच आणि त्यात भर म्हणजे आधी बुक केलेल्या एअरलाईन वापरून दुसरे तिकीट काढायचे होते. मी आधी नोकरी करत नसल्याने आरामात बॅग भरता यायची. आता नोकरी मुळे ज्यावेळी कामावर जायचे नसेल त्यादिवशी शॉपिंग आणि बॅगा भरणे असे चालले होते. थंडी तर इतकी होती की कामे पटापट उरकताच यायची नाहीत. भारतात पोहोचलो आणि जेटलॅग जातो न जातो तोच परतीच्या प्रवासाची तयारी सुरू झाली. आईबाबांना डोळे भरून पाहून घेतले.  आईने थालिपीठाची भाजणी आधीच करून ठेवली होती त्यामुळे वेळ वाचला. देवीचे दर्शन घेण्याचे ठरवले होते.

पुण्यातल्या जोगेश्वरीचे दर्शन खूप छान झाले. ओटीचे सामान बघताना छान वाटत होते. दर्शना नंतर बांगड्या भरल्या. मग हळूहळू चालत आम्ही दोघी म्हणजे आई आणि मी शॉर्टकटने तुळशी बागेत शिरलो. यावेळेला तुळशीबाग बरीच हिंडले. गाऊन घेण्यानिमित्ताने फिरलोच. शिवाय मला काही कानातले घ्यायचे होते. मी जिथे काम करत तिथल्या मैत्रिणींकरता मी कानातले घेतले. इथे आल्यावर त्यांना दिले तर सगळ्याजणी खूपच खूष झाल्या ! तुळशीबागेत फिरून मग बाहेरच मसाला डोसा खाल्ला. काही कामानिमित्ताने एफसी रोडला गेलो आणि न ठरवताच वैशालीला भेट दिली. अर्थात वैशालीवर मी काही प्रेमबिम करत नाही. पुर्वी पण क्वचित गेली आहे. १५ दिवस म्हणजे तसे जेमतेम ८ ते १० दिवसच आईकडे राहणे झाले. पण तरीही त्यातल्या त्यात आईने मला बरेच प्रकार खाऊ घातले.


शेवयाची खीर, साबुदाणा खिचडी,  चकोल्या, होळीनिमित्ताने पुरणपोळीही झाली.  बरेच वर्षानंतर होळी पहायला मिळाली. विमानात ३ सिनेमे पाहिले. पिकू एकदम फालतू आहे. बाजीराव मस्तानी बरा वाटला. बजरंग भाईजान छान आहे.रंजनाकडे बटाटेवडे फ्रुटसॅलड असे जेवण छानच होते. चव आली. अर्चनाने माझ्यासाठी भारतात आल्या आल्या मला वडापाव, शेवबटाटापुरी खायला घातली. शिवाय घरी बोलावून छान बेत केला होता. भाकरी वांग्याची भाजी, आणि स्वीट डिश म्हणून जिलेबी आणि मठ्ठा,माझ्या चुलत जावेने चविष्ट मिसळ केली होती. विनायक व त्याची चुलत बहिण वर्षा शेगावला जाऊन आले. नाही म्हणता म्हणता कमी वेळात बऱ्याच गोष्टी झाल्या म्हणायच्या.

मुंबई विमानतळ खूपच चकाचक झाला आहे. असे वाटले की आपण दुसऱ्या कोणत्या तर देशात आलोनाही ना? आजपर्यंत इतके विमानतळ बघितले पण आताचा हा चकाचक झालेला मुंबईचा विमानतळ तर जगात १ नंबर लागेल. आई कडे मी एकदा सौम्य खिचडी केली होती. ती आवडली सगळ्यांना.

Tuesday, February 14, 2017

१४ फेब्रुवारी २०१७आजचा दिवस आणि कालचाही छानच गेला. २ दिवस सुट्टी असल्याने थोडे विश्रांतीही झाली. जास्तीची कामे मात्र झाली नाहीत. हवा क्षणाक्षणाला बदलत आहे. प्रचंड बोचरे वारे आहेत. थंडी तर असणारच. हिवाळा संपत आलाय तरीही थोडीफार कमीजास्त होतच असते. काल आणि आज मुख्य म्हणले आईबाबांना , माझ्या बहिणीला आणि भाचीला विडियो कॉलवर बघता आले. आईबाबा सध्या ८ दिवस माझ्या बहिणीकडे रहायला आले आहेत. त्यांच्या आवडीचे आणि जे खावेसे वाटते असे सर्व लाड ती त्यांचे करत्ये हे पाहून खूप समाधान झाले. माझ्यासारखीच माझी बहिण पण गाते म्हणजेच गुणगुणते.  तीने गायलेले गाणे मी बऱ्याच वर्षात ऐकले नव्हते ते आज ऐकले. तिचा गायचा सूर माझ्यापेक्षाही छान आहे. तिचे गाणे ऐकून छानच वाटले. बाबांनिही गाणे गायले. आईनेही थोडे गायले. मी आईलाही म्हणते तू गात जा. तर म्हणते माझा आवाज गेला आता.   आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे आईबाबा, रंजना, सई, विनायक आणि सुरेश (आमचे नवरे) गाण्याची प्रचंड आवड आहे. सतत गाणी ऐकत असतो.


 आज मधुबालाचा  वाढविवस आणि व्हॅलेनटाईन डे एकत्र असल्याने तिची आणि काही रोमँटिक गाणी काल आणि आजही युट्युबवर पाहिली. आता उद्या आणि परवा कामाला जाताना उत्साह येईल कारण की गेले २ दिवस वेगळे आणि छान गेले. मैत्रिणीशी फोनवर खुप बोलणे झाले. आज तिखटामिठाचा शिराही बरेच दिवसांनी केला त्यामुळे खाताना खूप छान वाटत होते. चवीत बदल झाल्यासारखे. बरेच दिवसांनी आज रोजनिशी लिहीली. कामामुळे वेळ आणि एनर्जीही मिळत नाही. असो. २०१७ सालामधली ही पहिली रोजनिशी. असेच काही वेगळे आणि उत्साह देणारे असेल तर नक्कीच लिहीन.Henderonville, Horseshoe, Etowah, Laurel Park,  Pisgah National forest, Chimney Rock, Fruitland,  Brevard, Arden, Asheville, North Carolina हा सर्व प्रदेश छोट्या छोट्या डोंगराळ भागात वसला आहे.  प्रत्येक छोट्या शहराची लोकसंख्या ८  ते १५,००० च्या दरम्यान  इतकीच आहे. महिना झाला असेल  आम्ही दुसऱ्या अपार्टमेंट मध्ये राहायला आलो आहोत. आज मला कामावर सुट्टी असल्याने  अपार्टमेंटच्या आवारात  चक्कर मारायला गेले होते. तिथले फोटोज घेतले. रमत गमत गेले. साधारण ५० मिनिटे लागली. माझे कामाचे ठिकाण आता १५ मिनिटांच्या चालण्याच्या वाटेवर आले आहे. हे ठिकाण उतारावर आहे. येताना मला थोडा चढ चढावा लागतो. या आधी राहात होतो तिथे मला चालत ४५ मिनिटे लागायची. सुरवातीला बराच उतार होता. नंतर थोडी चढण होती. मग थोडा  सरळ रस्ता होता.  तिथल्या अपार्टमेंटच्या आवारात शिरल्यावर अजून थोडा चढ आणि खूप मागच्या बाजूला आमचे घर होते. एकूणच वर लिहिलेल्या छोट्या शहरांमध्ये  एकही रस्ता सरळ नाही. वळणावळणाचे रस्ते पसरलेले आहेत. खूप रमणीय भाग आहे हा नॉर्थ कॅरोलायनाचा.

Monday, February 06, 2017

वास्तू (८)

 
 
या चित्रात दिसत आहेत ते म्हणजे अमित, सिंपल , डिंपल आणि माझी भाची सई.  आईच्या घराशेजारील  घरात एक गुजराथी कुटुंब राहिला आले तेव्हा डिंपल ६ महिन्यांची होती. तिला आम्ही आमच्या घरी दुपट्यात गुंडाळून घेऊन यायचो. तिच्या गालाला बोट लावले की ती खुदकन हासायची आणि तिच्या दोन्ही गालाला खूप छान खळ्या पडायच्या. आम्ही तिच्या आईला विचारले ही  हिचे नाव काय? तर त्या म्हणाल्या की अजून तिचे नाव ठेवायचे आहे. त्यावर आम्ही त्यांना सांगितले की आम्हीच हिचे नामकरण करतो. तिच्या गालाला खळ्या पडायच्या त्यामुळे आम्ही तिचे नाव डिंपल ठेवले आणि डिंपल ची बहीण सिंपल. अश्या प्रकारे आम्ही दोघी बहिणींनी त्या दोघी बहिणींचे नामकरण केले.

सिंपलचे मी खूप पापे घ्यायची मग ती खूप चिडायची. नको ना गं ताई माझे पापे घेऊ. तिने माझे नाव पापेवाली ताई असे ठेवले. दोघी लहान असताना आमच्या घरी जेवायला यायचा. अमितही यायचा. पण येऊन लगेच पळायचा घरी. माझ्या आईला दोघी मावशी म्हणायच्या. लाडात येऊन कधी कधी माउ असेही हाका मारायच्या या दोघीजणी ! माझे लग्न होऊन मी मुंबईला आल्यावर दर ३ ते ४ महिन्यांनी आईकडे यायचे. मी नेहमी सकाळच्या ट्रेन ने यायचे. घरी आल्यावर विचारायचे अजून सिंपल नाही का आली? डिंपल तेव्हा शाळेत गेलेली असायची. येईल इतक्यात असे आई म्हणायची आणि तेवढ्यातच मावशी अशी हाका मारत तिचे शाळेचे दप्तर घरी टाकून आमच्या डायनिंग वर जेवायला बसायची. मग मी आई बाबा आणि सिंपल असे चौघे जेवण करायचो. मला विचारायची ताई तू कधी आलीस? काका कसे आहेत? जेवण झाले की रंजनाला फोन करायचे मी. मग ती आणि सई यायची. आमच्या दोघी बहिणींच्या लग्नाला या दोघीजणी लग्नाच्या आदल्या दिवशीपासून कार्यालयात आल्या होत्या.

या दोघींची आई पण आम्हाला अधून मधून खायला द्यायची. त्यांचा मटार भात आणि जाड पोह्यांचा चिवडा अजूनही माझ्या लक्षात आहे. सईचा जन्म याच जागेत झाला. मजा म्हणजे माझ्या बहिणीचा जन्मही यात जागेत झाला. दोघी मायलेकी एकाच घरात जन्मल्या. माझा जन्म माडीवाले कॉलनीतला ! त्यावर लिहिणार आहे. आईच्या आठवणी असे लेबल देऊन लिहिणार आहे. आईने त्या जागेच्या सर्व आठवणी मला फोनवरून सांगितल्या आहेत. त्या ऐकून मला खूपच छान वाटले. 
 
सईचा जन्म झाला आणि सिंपल डिंपल तिला खेळवायला लागल्या. फेसबुकावर सिंपल डिंपल मला सापडल्या आणि मला खूप आनंद झाला. अजूनही त्यांना त्या जागेच्या आठवणी येतात.  
 
क्रमश : ....