Wednesday, March 30, 2011

अनामिका...(1)

जोशीबाई पुण्यातील एका प्रशस्त वाड्याच्या मालकीण बाई होत्या. वाड्यात भरपूर खोल्या, वर व खाली सुद्धा. काहींमध्ये बिऱ्हाडे होती. काही खोल्या अश्याच रिकाम्या होत्या. वाड्यात एक मोठी विहीर होती. त्या विहीरीतले पाणी काढून धुणेभांडी होत असत. काही छोटी मुले तर तिथेच अंघोळी उरकत असत. वाड्यात फुलझाडे बरीच होती. वेली होत्या. वाड्याच्या मधोमध एक भला मोठा झोपाळा होता. त्याचा कुरकुर असा आवाज होत असे कारण की जो तो उठ बस करायला झोपाळ्यावर येत असे. बसल्यावर थोडासा तरी झोका घेतलाच जाई. आत्याबाईंना दोन मुले, एक मुलगा व एक मुलगी. दोघा मुलांमध्ये अंतर बरेच होते. आत्याबाईंचा मुलगा साधा सरळ, आपले काम बरे की आपण बरे अशा स्वभावाचा होता. मनमिळाऊ व बोलका असल्याने त्याला मित्रपरिवार खूप होता. मित्रांची येजा वाड्यात होत असे.


आत्याबाईंना एक मानलेला भाऊ होता. त्याला एकुलती एक मुलगी होती. त्या भावावर आत्याबाईंचा जीव होता. बेताची परिस्थिती असल्याने अधून मधून या ना त्या कारणाने आत्याबाई त्याला मदत करीत असत. त्याची मुलगी संजली आत्याकडे नेहमी सणासुदीला असायची. आत्याबाईंची बाकीची भाचवंडे पण आत्याकडे नेहमी असायची. त्याला कारणच तसे होते. एकतर ऐसपैस वाडा, सर्व गोष्टींची मुबलकता, खेळायला भरपूर जागा. संजली मात्र सर्वाच्यात वेगळी होती. ती कधी दंगामस्तीत भाग घेत नसे. तिला वेगळ्या गोष्टींमध्ये रस होता. अंगणात सडा घा. झाडांना पाणी घाल. झोपाळ्यावर बसून मनसोक्त झोका तर तिला खूपच आवडायचा. तशी ती अधुनमधून शिवाशिवी व आंधळी कोशिंबीरीमध्ये भाग घेत असे. आत्याच्या मुलाचे मित्र, भाचवंड यामुळे वाडा म्हणजे गोकुळ बनत असे. संजलीचे आईवडील साधेभोळे, आत्याचा मान राखणारे, तिची सल्लामसलत घेत होते. दिवाळीत तर सगळ्यांचा नुसता धुडगुस चालायचा.
कालांतराने खेळती मुले मोठी होऊ लागली. शाळा संपून त्यांचे कॉलेज सुरू झाले. मुले वयात यायला लागली. संजलीचा वर्ण गोरा गोरा पान होता. केस काळेभोर व कमरेच्याही खाली लांब होते. बांधा नाजुक त्यामुळे सर्वांच्यात ती खूप वेगळी दिसायची. आत्याच्या मुलाला बरेच मित्र होते. त्यात एक मित्र होता. त्याचे नाव अमित. तो खूप हुशार होता. पहिला दुसरा नंबर त्याने कधी सोडला नाही. अमित हळूहळू संजलीच्या प्रेमात पडत होता. संजलीला पण अमित खूप आवडायचा पण प्रेम वगैरे शब्द तिच्या गावीही नव्हते. लहानाची मोठी झालेली मुले आता आत्याकडे काही प्रसंगानेच येत असत. जास्त करून सणासुदीच्या वेळेला किंवा कोणता मोठा कार्यक्रम असेल तर. अमितचे कॉलेज सुरू झाले होते. संजलीला कॉलेजला जायला तसा अजून अवकाश होता.

अमित वर्णाने सावळा व उंच होता. कॉलेजचे शिक्षण संपवून नोकरी नाहीतर उच्च शिक्षणासाठी परदेसवारीवर जाणार होता. आत्याबाईंच्या मुलाचे व अमितचे एकमेकांकडे जाणे, गप्पा टप्पा होत असत, पण आत्याबाईंना मात्र अमितचे कौतुक नव्हते. मित्रांमध्ये बोलताना अमितचे झालेले कौतुक त्यांना रूचत नव्हते कारण की अमित त्यांच्या मुलापेक्षा खूप हुशार होता. तसे बघायला गेले तर त्या अमितचा थोडा दु:स्वासही करायच्या. अमितच्या हे लक्षात आले होते. आपण गेलो की त्या आपल्याकडे बघून "ये ना ये. बस. अनिल येईलच इतक्यात" असे म्हणत पण चेहऱ्यावर भाव मात्र हा कशाला आला इथे! असे नाराजीचेच असत. अमितला संजली आवडते हे पण त्यांच्या नजरेतून सुटले नव्हते. एकदा असेच झाले आत्याबाईंकडे चार दिवस पालट व्हावा म्हणून संजली आत्याबाईंकडे रहायला आली होती. आत्याबाई घरात नव्हत्या नेमक्या त्याच वेळी अमित आला. तिला अमितने विचारले "काय गं तु इथे कशी काय? " "नाही अशीच आले पालट म्हणून, आई पण म्हणाली बरेच दिवसात आत्याकडे गेली नाहीस. चार दिवस जाऊन ये" संजली म्हणाली. संजली आता मोठी झाल्याने पंजाबी सूट घालायची. त्यावर ओढणी घ्यायची. तिला कानातले खूप शोभून दिसायचे. अमित म्हणाला "मला जरा पाणी घेऊन ये ना प्यायला" ती पाणी घेऊन आली व पाण्याचा ग्लास अमितच्या हातात दिला. पाण्याचा ग्लास हातात घेताना अमितने संजलीकडे पाहिले व मनात म्हणाला "किती सुंदर आहे दिसायला संजली! " पाणी पिऊन ग्लास स्वयंपाकघरात ठेवायला जाणार इतक्यात आत्याबाई हजर होतात. "अगं संजली तु इथे काय करत होतीस? " अग आत्या अमित आत्ताच आला आहे. त्याला पाणी हवे होते म्हणून आले. आत्या म्हणाली " चल मला जरा चहा टाक. खूप उन आहे बाहेर. मंडईत पण खूप गर्दी होती" अमितला लगेच कळाले. अरे अमित, अनिल आत्ता कामावर जातो तुला माहीत आहे ना? अनिलचे शिक्षण नुकतेच पूर्ण होऊन त्याला बँकेत नोकरी लागली होती. त्याला पुढील शिक्षणात घेण्यात रस नव्हता.


आत्याबाईंकडे दिवाळी, भोंडला, जसे मोठ्या थाटामाटात साजरे होत, तसेच तुळशीचे लग्न पण आत्याबाई खूप हौसेने करायच्या. तुळशीच्या लग्नाची तयारी जोरात व्हायची. वाड्यातील सर्वजण, भाचे, भाच्या, पुतण्या, जावई, नातवंडे असे सर्व जण तुळशी लग्नसमारंभाला अगदी आवर्जून उपस्थित राहायचे. वाड्या मधोमध तुळशी वृदांवन होते. आत्याबाई रोज सकाळी नित्यनियमाने अंघोळीनंतर तुळशीची पूजा करत असत. यावर्षी पण आत्याबाईंनी तुळशीच्या लग्नाचा घाट घातला होता. आत्याबाईंचा मुलगा पदवीधर होऊन बँकेत नोकरीला लागला होता. बाकीची भावंडे व अनिलचे मित्र, कोणी शिकत होती, कोणी नोकरी व्यवसायाला लागली होती. तुळशीच्या लग्नाकरता आत्याबाईंचा भाऊ वहिनी व संजली दोन दिवस आधीच आले होते.तुळशीच्या लग्नाच्या दिवशी संजलीने सडा घातला. रांगोळी घातली. छोटे कंदील सर्व वाड्यात सर्व मुलांनी लावले. हार, माळा, लग्नाची तयारी होत होती. संजली आता मोठी झाली होती. तिला आत्याने तुळशी लग्नाकरता एक छानपैकी साडी घेतली होती. तिच्या गोऱ्या रंगाला शोभेल अशी साडी घेतली होती. संजलीच्या आईनेही तिला तुळशी लग्नानिमित्त एक सोन्याचा नाजुक सर केला होता. लग्नाची म्हणून हिरव्या गार रंगाची व त्याला शेंदरी काठ असलेली साडी पाहून संजलीला खूप आनंद झाला होता. संजलीच्या मोठ्या केसांचा आत्याबाईंनी सुंदर अंबाडा घालून दिला. त्यावर जुईचा नाजुक गजरा माळला. बाकी सर्व बहिणी, मैत्रिणी, भाऊ, मित्रपरिवार नटून थटून तुळशीच्या लग्नाला सज्ज झाली होती. अमितनेही छानसा शर्ट पॅंट घातला होता. संजलीची घाई गडबड पाहून तो तिच्याकडे कौतुकाने पाहत होता. संजलीच्या आईवडिलांनी अमितला पहिल्यांदाच पाहिले. त्याने तिच्या आईवडिलांशी स्वतःहून ओळख करून घेतली. ते तिघे गप्पा मारत उभ असतानाच संजली घाईने आली आणि तिच्या आईला म्हणाली "आत्याने तुला मुंडावळ्या, मणी मंगळसूत्र, जोडवी असे सर्व काही द्यायला सांगितले आहे. अमितला पाहून संजली त्याला म्हणाली" तु कोणाच्या बाजूने आहेस? " आम्ही सगळ्या मुली तुळशीच्या बाजूने आहोत. तुम्ही सर्व मुले श्रीकृष्णाच्या बाजूने, काय? " "हो हो आम्ही सर्व कृष्णाच्या बाजूने" अमित म्हणाला. अंग संजली अक्षता कोण वाटणार आहे? मुहूर्ताची वेळ तर जवळ येत चालली आहे. "अरे हो की! आत्याने सांगितले होते मला अक्षता वाटायला. विसरलेच होते मी" असे म्हणून संजली तिथून लगबगीने पळाली. आत्याबाईंच्या करड्या नजरेतून अमित संजलीच्या आईबाबांशी जवळीक साधतो आहे हे सुटले नव्हते.


मंडप सजला होता. तुळशीच्या मागे संजली करवली म्हणून उभी राहिली होती. आजुबाजूला कोण कोण आहे बघत होती. समोरच श्रीकृष्णाच्या मूर्तीच्या मागे अमित, अनिल, व त्याचे मित्र उभे होते ते संजलीने पाहिले व खुदकन हासली. अमितचे सर्व लक्ष फक्त संजलीवरच होते. संजलीच्या सौंदर्याकडे पाहून त्याच्या मनाची घालमेल होत होती. त्याने मनात विचार केला आपण संजलीशीच लग्न करायचे. एक दोन दिवसात तिच्या आईवडिलांना भेटून रीतसर मागणीच घालू आपण संजलीला. आपल्या पुढील शिक्षणाचा विचारही त्यांना बोलून दाखवू, तोपर्यंत संजलीचे शिक्षणही पूर्ण होईल. अशा विचारतंद्रीत असतानाच " ए लक्ष कुठे आहे तुझे? झाले तुळशीचे लग्न. हा घे पेढा. " असे म्हणून संजलीने अमितच्या हातावर पेढा ठेवला. नंतरच्या जेवणाच्या पंगतीत अमित संजलीच्या वडिलांच्या शेजारीच बसला होता. त्यांना काय हवे काय नको हे बघत होता. संजलीचे वडील अमितला म्हणाले, "येऊन जा एकदा आमच्या घरी. आमचे घर थोडे गावाबाहेर आहे. तिथे खूप शांतता असते. त्यामानाने इथे गावात खूपच गर्दी.


लग्न खूप छान रितीने पार पडले. सर्वांनी मनसोक्त मजा करून घेतली. सर्व मुले लहानाची मोठी झाली होती तरिही लहानपणीचा अल्लडपणा अजूनही शिल्लक होता. अमित आता घरी जायला निघाला. आत्याबाईंना "येतो मी. छान झाला कार्यक्रम. " असे म्हणाला. अनिलला पण त्याने बाय केले. आत्याबाईंचा चेहरा त्यावेळेला तर अगदी मखाः सारखा होता. त्यानी अमितला 'ये परत' असे काही म्हणाल्या नाहीत. अनिलने मात्र आवर्जून अमितला सांगितले "अरे आलास ते बरे केलेस. खूप मजा आली बघ. भेटुया परत" सर्वाचा निरोप अमितने घेतला खरा पण त्याची नजर संजलीला शोधत होती. ती कुठेतरी आत असावी असा त्याला अंदाज आला. कारण की त्याला सर्व बहिणींचा हसण्याखिदळ्याचा आवाज आला. तो निघणार तेवढ्यात अनिलची बहीण अमितला म्हणाली "काय रे अमित निघालास इतक्यात? थांब ना थोडावेळ. अमित म्हणाला "नको उशीर होईल. घर खूप लांब आहे. " अनिलची बहीण म्हणाली "ये ना जरा आत मी तुला लाडू चिवड्याची पुडी देते आनी थोडे लाडू बर्फी " असे म्हणून अमित व ती वाड्यातल्या एका खोलीत गेल्या जिथे सर्व तुळशीच्या लग्नाची तयारी ठेवली होती. तिथे संजलीला बघितल्यावर अमितला खूप आनंद झाला. अंबाडा जड होतो म्हणून संजलीने नुकताच अंबाडा सोडला होता. एक बहीण तिच्या लांबसडक केसांची वेणी घालत होती. संजली अमितकडे पाहून हासली.


अमित घरी आला तेव्हा रात्रीचे बारा वाजून गेले होते. त्याला काही केल्या झोप लागत नव्हती. सारखी संजली डोळ्यासमोर येत होती. संजलीच्या आईवडिलांशी ओळख झाली याचा मात्र अमितला खूप आनंद झाला होता. लवकरात लवकर त्यांच्याकडे जाऊन संजलीला आपण मागणी घालायचीच असे ठरवून तो झोपण्याचा प्रयत्न करत होता पण संजलीला आपण आवडतो का? असा एक विचार त्याच्या मनात आला. तिलाही आपण आवडत असणार नाहीतर ती आपल्याकडे पाहून हासत नाही. तशी ती खूप अबोल आहे आणि अल्लडही, त्यामुळे नक्की काय ते कळत नाही. पण आपण तर मागणी घालणारच, असा विचार करून अमित झोपला.

क्रमशः..........


कथा लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे. कथेचे नाव तूर्तास "अनामिका" कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.

Monday, March 21, 2011

वसंत ऋतूतील नवी पालवी...
आज बरेच दिवसांनी सकाळी तळ्यावर गेले. मी ज्या बदकांना ब्रेड घालते ती बदके आता दिसेनाशी झाली आहेत. २-४ दिसतात. ही जी २-४ दिसणारी बदके आहेत ती मात्र कुठे स्थलांतर करत नाहीत. इथेच या तळ्यावर असतात. त्यात मला जे आवडणारे पिल्लू आहे तेही आता मोठे झाले आहे. सीगल्स आता बरेच दिसायला लागले आहेत. आज हवेत आनंद देणारा गारवा होता. तळ्यावर पक्षांना ब्रेड घातला आणि नेहमीप्रमाणे अपार्टमेंटच्या आवारात एक चक्कर मारली. वसंतातील पालवी डोळ्यांना खूप सुख देऊन गेली आणि बरेच दिवसांनी मला एक प्रकारचा खूप उत्साह आला.

Friday, March 18, 2011

दशरथा घे हे पायसदान...
"ईप्सित ते तो देइल अग्नी अनंत हातांनी" - या इच्छेने दशरथाने यज्ञाश्व सोडला. पुढे एका संवस्तरानंतर तो यज्ञीय अश्व परत आला. राजा दश्रथाच्या विनंतीनुसार ऋष्यशृंगाने यज्ञ मांडला. एका शुभवेळी यज्ञीय ज्वालेतून एक रक्तवर्ण महापुरुष प्रकट झाला, आणि दुंदुभी सारख्या कणखर पण मधुर नादाने तो राजा दशरथाला म्हणाला-

दशरथा घे हे पायसदान
तुझ्या यज्ञी मी प्रकट जाहलो हा माझा सन्मान


तव यज्ञाची होय सांगता
तृप्त जाहल्या सर्व देवता
प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर, श्रीविष्णू भगवान ...१


श्रीविष्णूंची आज्ञा म्हणुनी
आलो मी हा प्रसाद घेऊनि
या दानासी या दानाहून अन्य नसे उपमान ...२


करात घे ही सुवर्णस्थाली
दे राण्यांना क्षीर आतली
कामधेनुच्या दुग्धाहुनही, ओज हिचे बलवान ...३


राण्या करतिल पायसभक्षण
उदरी होईल वंशारोपण
त्यांच्या पोटी जन्मा येतिल, योद्धे चार महान ...४


प्रसवतील त्या तीनही देवी
श्रीविष्णुंचे अंश मानवी
धन्य दश्रथा, तुला लाभला, देवपित्याचा मान ...५


कृतार्थ दिसती तुझी लोचने
कृतार्थ मीही तुझ्या दर्शने
दे आज्ञा मज नृपा, पावतो यज्ञी अंतर्धान ...६


गीत : ग. दि. माडगुळकर, संगीतकार व गायक सुधीर फडके