Friday, August 27, 2010

मी अनुभवलेली अमेरिका (४)

मला अमेरिकेतले सर्वात जास्त जे काही आवडले असेल ते म्हणजे इथले कायदे आणि त्याची अंमलबजावणी. इथले रस्ते स्वच्छ व गुळगुळीत तर असतातच शिवाय ठरवून दिलेल्या स्पीड लिमिट मध्ये कार चालवावी लागते. काही वेळा अति स्पीड गेला तर पोलीस येतो लगेच भोंगा वाजवत.



रस्त्याने जर पोलीसांची कार जात असेल तर त्यावेळी रस्त्यावरून सगळे कसे शहाण्या मुलाप्रमाणे जातात स्पीड लिमिट मध्ये. सिग्नल तोडला तर तुमच्या घरी लगेच तिकीट येते. बरेच गुन्हे तुमच्या नावावर झाले किंवा ऍक्सीडेंट केसेस तुमच्या नावावर असतील तर किंवा अश्या बऱ्याच कारणांसाठी तुमचा कारचा विमा वाढतो किंवा काही वेळेला तुमचा कारचालक परवाना रद्द होतो.



अपार्टमेंट तुम्ही राहता त्या जागेचे भाडे जर ५-६ तारखेच्या आत तुम्ही दिले नाही तर तुम्हाला दंड होतो. इथे माणूस आपोआपच शिस्तीत वागतो. पेट्रोल स्वस्त व कमी किंमतीत, वापरती कार थोड्या पैशात घेता येते त्यामुळे मैलो न मैल प्रवास करता येतो. अधेमध्ये रेस्ट एरिया असतात. शिवाय पेट्रोल पंप, मधे वाटेत तुम्हाला कुठे हॉटेलमध्ये रहायचे असेल तर तीही असतात. प्रवास करा निसर्ग पहा. अर्थात हल्ली भारतात पण जातात की कार प्रवास करून. अर्ध्या पँट, फॅशनेबल गॉगल आणि मोबाईल. कोकण प्रवासाला निघा. खा, प्या मजा करा.



कायद्याच्या बाबतील बोलायचे झाले तर आम्ही ज्या अपार्टमेंटमध्ये राहतो त्या आमच्या घराच्या खाली आधी एक जोडपे रहायचे ते आम्हाला म्हणाले की तुम्ही वर राहता हे आम्हाला जाणवत देखील नाही. किती शांतता. त्यांना खूप हायसे वाटले. इथे काही अमेरिकन्स एकटे असोत किंवा नवराबायको खूप मोठमोठ्याने बोलतात व भांडतातही. एक जण नंतर आमच्या खाली रहायला आला. एकटाच होता, त्याच्याकडे काही पोरी यायच्या गप्प्प मारायला. तोंडावरून दिसायचेच की हा दारूड्या आहे ते. जाताना हाय हॅलो, ते तर असतेच सर्व अमेरिकन्स लोकांचे. ओळख असो अथवा नसो हाय! असे म्हणतीलच. तो दणादण आवाज करायचा खालून. खूप भीती वाटायची. दारू पिऊन नुसता धिंगाणा.



एकदा त्याने अपार्टमेंट मॅनेजर बाईकडे आमच्या विरूद्ध. खरे तर आम्हीच त्याच्याविद्ध करणार होतो त्या आधी त्यानेच केली होती की वरून आवाज येतो. मी घरातच असते त्यामुळे या खोलीतून त्या खोलीत चालत जाताना म्हणे आवाज येतो. आम्हीही तक्रा नोंदवली मॅनेजर कडे की हा माणूस रात्री धिंगाणा घालतो. मोठमोठ्याने भिंतीवर दणादण हात आपटतो. तुमच्याच अपार्टमेंटचे नुकसान होईल. मॅनेजर बाई म्हणाली की त्या माणसानेच तुमच्याविरुद्ध तक्रार केली आहे की वरून आवाज येतो चालताना. आम्ही सांगितले की आमच्याकडे लहान मूल नाही आणि आमच्याकडे पार्ट्याही होत नाहीत. मॅनेजर बाई म्हणाली की माहीत आहे मला, तुम्ही काही काळजी करू नका. दुसऱ्या दिवशी त्या माणसाला हग्या दम भरला. नंतर आमची तो माणूस आमची माफी मागायला आला.


नंतर काही दिवसांनी दुसरे जण रहायला आले ते नवराबायको असेच रात्रीचे तावातावाने भांडायचे. दणादण आवाज करायचे भिंतीवर आदळ आपट. खूप दिवस चालली होती भांडणे. त्यांच्याविरूद्ध आमच्या शेजारच्या बाईने तक्रार नोंदवली. प्रकरण पोलीसात गेले. पोलीसांनीही समजाऊन सांगितले तरी भांडायचे थांबेनात. शेवटी दारावर कोर्टाची नोटीस. जागेचा ताबा आम्ही घेतला आहे. दार उघडून आत शिरलात तर अटक होईल.


आमच्या शेजारी ५-६ चिनी माणसे राहतात. त्यातली २-३ शेअर करून राहतात. त्यांचे एक हॉटेल आहे. इथे अपार्टमेंट वाल्यांना २ पार्कींग लॉट असतात कारण की माणशी एक कार असतेच. आमच्याकडे एकच कार आहे. आम्ही कधी एका लॉटवर तर कधी दुसऱ्या लॉटवर लावतो. त्या चिनी लोकांकडे २-४ गाड्या आहेत. त्यांच्या लॉटमध्ये त्यांच्या कार लावून एक कार आमच्या लॉटमध्ये. १-२ वेळा सांगितले त्याला तुमची कार आमच्या लॉटमध्ये लावू नका तरी ऐकेना. शेवटी सरळ अपार्टमेंट मॅनेजर कडे तक्रार केली. तेव्हापासून नाही लावत आमच्या लॉटमध्ये.




आम्ही या शहरात येण्या आधी दुसऱ्या शहरात राहत होतो तिथे भारतीय विद्यार्थी खूप होते. विनायकचा एक मित्र ज्या अपार्टमेंट मध्ये रहायचा तिथे बरीच भारतीय विद्यार्थी रहायचे. तिथे शनिवार रात्री असाच धिंगाणा चालायचा. खूप मोठ्या आवाजात गाणी बजावणी व नाचकाम. २-३ शनिवार बघितले. त्यांना एवढा आवाज करू नका असे सांगुनही झाले तरी एकेनात. मग शेवटी ९११ ला बोलावले. ३-४ पोलिसांच्या कार हजर. त्यानंतर सगळे बंद झाले.



इथे अजून एक मी पाहिले ते म्हणजे सगळीकडे जास्त प्रमाणात कामाला बायकाच बायका असतात. कुठेही जा दुकानात कॅशिअर बायकाच, हॉस्पीटलमध्ये बायकाच, बँकेत जा, केस कापायचा दुकानात जा बायकाच. डे केअर, लायब्ररी सगळीकडे कामाला बायकाच. अरेच्या पुरूष काय इथे घरातच बसलेले असतात की काय? असे प्रश्न पडावा.

....... पुढील भाग घेऊन येतेच हं......

Thursday, August 19, 2010

चिन्मय व त्याचे मित्रमंडळ







इंग्रजी मासिकात काही खूप छोट्या मुलांची चित्रे होती. ती कापून ठेवली होती २००३ साली. कागदाचे फोटोफ्रेम बनवले. नक्षीकाम केले आणि त्याचे फोटो काढले. मुलांची नावे अनुक्रमे चिन्मय, पिंकी, गोट्या व चिंटू अशी आहेत. वेळ घालवण्याचा काहीतरी उद्योग.

Saturday, August 14, 2010

Friday, August 13, 2010

रांगोळी









१५ ठिपके उभे आणि १५ ठिपके आडवे
ठिपक्यांची रांगोळी