Tuesday, July 24, 2018

आज इथं तर उद्या तिथं ... (१२)

विल्मिंग्टन मध्ये राहत्या घराचा पसारा आवरायला घेतला. पहिल्यांदा काय काय टाकायचे ते ठरवले. निर्जीव गोष्टींमध्ये आता जास्त अडकून बसायचे नाही. आणि पहिली आठवण, असुदे, राहुदे, नंतर टाकू हे आता बास झाले. उचला आणि गोष्टी फेका. किती पसारा ठेवणार आहात तुम्ही? मनाला बजावले. अडगळीच्या खोल्या होत्या हे सर्व सामान ठेवायला. पण आता १० वर्षांनी जागा सोडून दुसरीकडे जात आहोत त्यामुळे त्या न वापरात असलेल्या गोष्टी दुसरीकडे वाहून नेण्यात काहीच अर्थ नाही. फेकून देववत नाहीत कारण त्या गोष्टींमागे काही आठवणी असतात हे ठीक आहे पण आता नको हं !




क्लेम्सनला राहत असताना पहिलावहिला आणलेला डेस्कटॉप आणि त्याला जोडून असलेला सीपीयु, त्याबरोबर त्याच्या अनेक वायरी होत्या. डेस्कटॉप मध्ये व्हायरस शिरल्याने तो बंद झाला होता. तो फेकून दिला. एकेक करत बऱ्याच गोष्टी फेकून दिल्या. नंतर घेतलेला गेटवेचा लॅपटॉपही बंद झाल्याने तो होता, तोही टाकला. वेबकॅमचे किती कौतुक होते सुरवातीला. तो काही दिवस वापरला. ऑनलाईन झालेल्या मित्रमैत्रिणींना या वेबकॅम मधूनच बघितले होते. तो फेकून दिला. अगदी सुरवातीला अमेरिकेत आलो तेव्हा कळाले की डॅलसवरून २४ तास हिंदी गाणी प्रसारित होतात. त्यामुळे वाल मार्ट मधून घेतलेला पहिलावहिला टु-इन-वन तो बिघडला होता. तो टाकला. त्याचबरोबर पहिलावहिला घेतलेला टील्लू टिव्ही पण फेकला. भारतावरून आणलेल्या हिंदी सिनेमांच्या गाण्यांच्या कॅसेट सुरवातीला या टु-इन-वन वर ऐकत होतो. शिवाय रेडिओवर प्रसारित होणारी हिंदी गाणी पण मी खूपच एनजॉय केलेली होती. तो टु-इन-वन फेकून दिला पण हिंदी गाण्यांच्या कॅसेट मात्र अजूनही आहेत. त्या फेकवत नाहीत. नंतर डिव्हिडी प्लेअर, सीडी प्लेअर फेकले. डिव्हीडी प्लेअर वर पूर्वी १ डॉलर ला एक सिनेमाची कॅसेट मिळायची. किती कौतुक होते त्यावेळेला. नंतर सीडी प्लेअर आणला होता त्यावर सीडी आणून हिंदी सिनेमा बघत असू. काही विकत घेतल्या होत्या. एका मित्राने त्याच्याकडे असलेल्या काही डिव्हिडी कॅसेट दिल्या होत्या. त्या खूपच जुन्या होत्या. त्या फेकल्या. डिव्हीडीवर एका विद्यार्थ्याने आम्हाला ४ त ५ सिनेमे रेकॉर्ड करून दिले होते. त्यातल्या फक्त २ आठवण म्हणून ठेवल्या आहेत. एक चुपके चुपके आणि छोटीसी बात.




एका मित्राने त्याच्याकडे असलेला एक सिंगल बेड आम्हाला दिला होता. मास्टर बेड आम्ही विकत घेतलाच होता. पण तो म्हणाला हा सिंगल बेड मी बॅचलर होतो तेव्हा घेतलेला आहे आणि तो तसाच पडून आहे. चांगला आहे. तो घेऊन जा. तुझ्याकडे कुणी आले तर उपयोगी पडेल आणि तसा त्याचा उपयोग झाला पण. क्लेम्सन मधल्या २ विद्यार्थिनी आमच्याकडे रहायला आल्या होत्या. त्यांना झोपण्यासाठी उपयोग झाला. वरदा आली होती. तिलाही झोपण्यासाठी उपयोग झाला. नंतर तो बेड माझाच होऊन गेला. कारण की दुसऱ्या बेडरूम मध्ये हा बेड होता आणि मी त्यावर बसून काही ना काही लिहीत असे. दुपारची वामकुक्षी इथेच होत असे. १० वर्षे वापरला
आणि खराब झाल्याने तो टाकून दिला. जिन्यावरून आम्ही दोघांनी खूप जड असलेली गादी आणि त्याखालचा बेस धरून हळू हळू करत थोडा रस्त्यावरून हळूहळू करत कचऱ्यापेटीच्या इथे ठेवून दिला. नंतर खांदे मान हात खूपच दुखायला लागले. इथे कुठले आलेत हमाल. इथे आपणच ऑल इन वन असतो.




फूड प्रोसेसर आणला होता. त्यात कणीक भिजवायचे. तोही एकदा मोडला. लगेच अडगळीच्या खोलीत टाकला. आणि नंतर शेवटी कचरापेटीत टाकून दिला. क्लेम्सन मधल्या एका विद्यार्थीनीने तिच्याकडचा छोटा मायक्रोवेव्ह दिला होता. तोही मोडला आणि नंतर दुसरा नवीन विकत घेतला. तोही असाच अडगळीच्या खोली पडून होता तोही टाकला. लगच्यालगेच टाकणे होत नाही. टाकवत नाही. हल्ली जगभरच वस्तू मोडल्या की फेकून देण्याशिवाय दुसरा मार्ग नसतो. इथे तर नसतोच. इथे रिपेअर ही भानगड नाहीच. अगदी पूर्वी आपण चपला तुटल्या तरी त्या चांभाराकडून दुरूस्त करून वापरायचो. आता वापरा आणि फेका. तसेच अन्नाचेही आहे.
फ्रोजन फूड आणा. खा आणि फेका. जमाना बदल गया है. काही वेळेला वाटते हे सर्व मी उगाचच फेकून दिले. कालांतराने याच गोष्टी म्हणजे डेस्क टॉप - लॅप टॉप, डिव्हीडी कॅसेट, ऑडिओ कॅसेट आणि बरच काही जतन करून ठेवायला पाहिजे. म्हणजे पुढील येणाऱ्या पिढ्यांना हे दाखवता येईल. ते विचारतील हे काय आहे ? तेव्हा आपण सांगू की या ऐतिहासिक गोष्टी आहेत. :D आता तर स्मार्ट फोनमुळे सर्व जग हातात आले आहे.




युट्युबमुळे फुकटची गाणी सर्व भाषांमधलीअनेक वेळा बघता येतात. अनेक वेबसाईटवरून गाणी ऐकता येतात त्यामुळे काही इलेक्ट्रॉनिकच्या गोष्टी आता काळाच्या आड गेल्या आहेत. खरे तर मला टिव्ही पण टाकून द्यावासा वाटत होता कारण की इंटरनेट मुळे कॅंपुटर वर आम्ही जास्त वेळ घालवत होतो. म्हणजे लेखन वाचन, गाणी ऐकणे. वगैरे. आपली मराठीवर मालिका बघणे. शिवाय युट्युबवर सिनेमे बघणे इ. इ. विल्मिंग्टन मध्ये आल्यावर जेव्हा मोठा टिव्ही घेतला तेव्हा डिश घेतली होती व त्यावर इंडियन ३ चॅनल घेतले होते. इंग्रजी फूड चॅनल, वेदर चॅनल, हिस्ट्री आणि इएसपीएन या चॅनलवर बरेच काही बघत होतो. इंग्रजी सिनेमे केबल वर पाहिले होते. केबल मुळे काही महिने चांगले वाटते. पण नंतर तेचतेच चालू राहते. त्यामुळे काही वर्षांनी आम्ही फक्त बेसिक चॅनलच ठेवले होते. उगाच केबलचे पैसे भरत बसायचे. पण विनू म्हणाला की बेसिक चॅनल पुरता टिव्ही असू दे. मुख्य म्हणजे वेदर कळते त्यामुळे असू दे. ट्रेड मिल घेतली होती ती पण मला नको होती. ट्रेड मिल घेण्याच्या मी विरूद्ध होते पण विनू म्हणाला की हिवाळ्यात बाहेर फिरता येत नाही तर निदान यावर तरी चालू. सुरवातीला तो चालत होता. पळतही होता. पण काही महिनेच केले गेले. नंतर त्याची पाठ दुखायला लागली. मी पण त्यावर थोडी चालले. पण माझी तर लगेचच पाठ दुखायला लागली. मी त्यावर नंतर कधीच चालले नाही. पळणे तर अशक्य आहे. मला मशीनवर व्यायाम करायला आवडत नाही.









मी विनुला म्हणाले की आपण व्यायाम तर करतोच ना आणि चालतोही. हिवाळ्यात फक्त चालायचे नाही.
इथे आल्यापासून जे १, जे २, विसा आणि एच १, एच ४ विसा चे कागदपत्र ते अगदी ग्रीन कार्डासाठी जमवलेली कागदपत्रे आणि त्याच्या झेरॉक्स कॉपीज असे अनेकाअनेक कागद मी फाडून फेकून दिले. फक्त युएससीआयएस कडून आलेली कागदपत्रे फाडली नाहीत. तीही फाडली असती तर काहीच बिघडणार नव्हते. पण एक आठवण म्हणून ती ठेवली आहेत. अजून काही गोष्टी मात्र मी कधीच फेकू शकणार नाही. त्या मी मरेपर्यंत ठेवणार आहे. पहिलावहिला कॅमेरा, नंतर दुसरा, नंतरचा पहिलावहिला डिजिटल कॅमेरा, दुसरा डिजिटल कॅमेरा. शिवाय अगदी पहिल्यांदा फोटोग्राफीला सुरवात केली की ज्या छायाचित्रांच्या प्रिंट काढायला लागायच्या त्या निगेटिव्ह प्रिंट त्या फेकणार नाहीत. बरेच फोटोही फाडून फेकून दिले जे चांगले आले नव्हते. मोजकेच फोटोज ठेवले. २ विकत घेतलेले फोटो अल्बम ठेवले आणि १० ते १५ , १०० पानी वह्या आहेत की ज्यामध्ये मी लिहिलेले आहे माझ्या हस्ताक्षरात ते कधीही टाकणार नाही. पॅरालीगल डिप्लोमा करता २ सेमेस्टर मी कॉलेज मध्ये गेले होते तिथे झालेल्या असाईनमेंटच्या प्रिंटचे कागद आणि परीक्षेचे पेपर्स ज्यावर मार्क दिलेले आहेत ते कधीही फेकणार नाही. नवीन शहरामधल्या कॉलेजमध्ये हा डिप्लोमा नाही त्यामुळे हा कोर्स अर्धवट राहिला पण एक कायमची आठवण राहिली ती माझ्यापुरती पुरेशी आहे. सोफ्याबरोबर एक आरामदायी खुर्ची घेतली होती ती टाकून दिली. खरे ती टाकाविशी वाटत नव्हती. पण खूपच खराब झाल्याने टाकण्याशिवाय पर्याय राहिला नाही. ती खुर्ची मात्र आम्ही मूव्हर्स वाल्यांना सांगितले की तुम्ही या खुर्चीचे जे पाहिजे ते करा. आम्हाला नको आहे. या खूर्चीवर मॅट ठेवून मी सर्व रेसिपीजचे फोटो काढलेले आहेत. आणि फोन करताना या खुर्चीवर बसूनच बोलायचो आम्ही. डायनिंग टेबल असूनही मी याच खूर्चीवर बसून जेवायचे. अर्थात खुर्ची गेली तरी तिचा फोटो आहे. कचरा टाकून टाकून दमलो आम्ही दोघेही. :( बाकीचा स्वयंपाकघरातला कचरा तर वेगळाच !




शेवटी शेवटी तर फ्रीज रिकामा करावा लागतो. फ्रीजमधले उरलेसुरले दूध, ज्युस, भाज्या, दही तेही टाकून द्यायला लागते. फ्रीज मधले सर्व काढून तो स्वच्छ करून द्यावा लागतो. शिवाय स्वयंपाक घरातली कपाटे, स्टोव्ह, ओटा, बाथरूम, संडास, सर्वच्या सर्व साफ करून द्यावे लागते. व्यक्युमिंग तर अनेक वेळा करावे लागते. असे करता करता आम्ही सर्व खोक्यात सामान भरून त्यावर चिकटपट्या चिकटवून, त्यावर मार्कर पेनाने बेडरूम. कीचन, हॉल असे लिहिले. प्रत्येक बॉक्सला आकडेही घातले. आमच्या बरोबर न्यायच्या बॅगाही तयार झाल्या. सकाळी ठरल्याप्रमाणे मूव्हर्स आणि पॅकर्सची २ माणसे आणि मोठा ट्रक आला आणि त्यांनी एकेक सामान ट्रकमध्ये भरले. आमचे सर्व फर्निचर त्यांनी प्लॅस्टीकने रॅप केले होते. प्लॅस्टिक रॅपची मोठाली वेटोळी त्यांच्याकडे होती. शिवाय चिकटपट्यांचेही मोठाले वेटोळे होते. प्रत्येक फर्निचला ते प्रदक्षिणा घालून रॅप करायचे. मास्टर बेड सुटा सुटा केला. गाद्यांना एका कपड्यात बांधले. असे करत करत सर्व सामान ट्रक मध्ये जाऊन बसले. आणि आमचे राहते घर रिकामे झाले. त्या रिकाम्या घरात खूपच सुनेसुने वाटायला लागले.





प्रचंड प्रमाणात दमायला झाले होते. १५ दिवसात बऱ्याच घडामोडी घडल्या होत्या. ब्रेव्हार्ड - हँडरसनविल ते परत विल्मिंग्टनला येण्याचा प्रवास १६०० मैल झाला होता. अपार्टमेंटचा त्रासदायक अनुभव आल्यामुळे मानसिकही दमायला झाले होते. ऐनवेळी मिळालेले अपार्टमेंट चांगले होते पण ते खूप मागे आणि आमची जागा मागच्या बाजूला होती की जिथून माणूस दर्शन नाही. कार येता-जाताना दिसत नाही. शिवाय तिसऱ्या मजल्यावर होते. विनू कामावर जाऊन येऊन १२ तास बाहेर असणार त्यामुळे मी एकटीच असणार आहे. त्यामुळे तिथे गेल्यावर माझे कसे होईल ही चिंताही मला होतीच. पण अपार्टमेंट मिळाले हेही सुखदायक होतेच की ! पुढचे पुढे पाहू असे मनाला समजावत होते. कामे करून करून आम्हाला दोघांनाही प्रचंड दमायला झाले होते. निघण्याच्या आधी जेव्हा खाली मांडी घालून बसले तेव्हा डोळ्यासमोरून १० वर्षातल्या सर्व घटना तरळून गेल्या. ट्रक निघाला तसे आम्ही पण दोघे निघालो. मेक्सिकन उपहारगृहात जेवलो आणि नवीन शहरात जाण्यासाठी आमची कार वेगाने धावू लागली. रात्री मोटेल मध्ये आलो आणि दुसऱ्या दिवशी अपार्टमेंटचा ताबा घेतला. काही दिवसांनी रुटीन लागले. विनायकचा ऑफीसला जाण्यासाठीचा रोजचा कारने जाऊन येऊन ५० मैलांचा प्रवासही सुरू झाला. नंतर ३ महिन्यांनी मलाही नोकरी लागली. घरी एकटीने बसून बोअर होण्याची चिंताही मिटली. नोकरीमुळे खूप चपळ झाले. वजनही घटले. त्रासदायक विचारही कमी झाले.




पुढील स्थलांतर साधारण दीड वर्षांनी झाले त्याचे वर्णन लेखाच्या पुढील भागात. :)
क्रमशः ....

Monday, July 23, 2018

आज इथं तर उद्या तिथं .... (११)

अपार्टमेंटचा शोध घ्यायला सुरवात केली पण ब्रेव्हार्ड मध्ये एकच अपार्टमेंट कॉंप्लेक्स सापडले. बाकी सर्व घरे होती. आर्डेन मध्ये जी अपार्टमेंटस होती ती खूप महाग होती. आणि हँडरसनविल मध्येही २ सापडली. ब्रेव्हार्डपासून आर्डेन आणि हँडरसनवील ही जी दोन शहरे होती ती साधारण ३० मैलांच्या अंतरावर होती. आणि विनुला ऑफीसला जाण्यासाठी रोज ६० मैलाचा जाऊन येऊन प्रवास कारने करायला लागला असता. याशिवाय मी पण सबंध दिवस एकटी राहणार होते म्हणजे सकाळी ८ ते रात्री ८ कामावर जाऊन येऊन १२ तास एकटीने काढायचे. विल्मिंग्टन शहरात आम्ही या आधी राहत होतो तिथे विनुचे ऑफीस कारने ५ मिनिटांच्या अंतरावर होते त्यामुळे तो रोज घरी जेवायला येत होता आणि त्यामुळेच मला एकटेपणा आला नाही.




ब्रेव्हार्डच्या अपार्टमेंटवाल्यांना फोन केला आणि अपॉइंटमेंट घेतली. त्यांना सांगितले की आम्ही खूप लांबून येत आहोत त्यामुळे आम्हाला ४ ची वेळ द्या. तशी त्या बाईने वेळ दिली आणि मग लगेचच आम्ही हँडरसन इथे इकोनोलॉज मध्ये एक रूम बुक केली. सकाळी ९ वाजता न्याहरी करून निघालो ते ४ च्या सुमारास पोहोचलो. यावेळी जिपिएस लावले होते. ते अपार्टमेंटचा रस्ता नीट दाखवत नव्हते. शेवटी एके ठिकाणी कार थांबवली आणि रस्त्यावर चालत असलेल्या माणसाला विचारले तर त्यांनी पण धड काही सांगितले नाही. तिथल्या तिथेच फिरत होतो. यामध्ये आम्हाला पोहोचायला थोडा उशीर झाला. आणि तसा टेक्सट मेसेजही त्या बाईला लिहिला. आम्ही पोहोचत आहोत पण आम्हाला पत्ता सापडत नाहीये. तिचे त्यावर उत्तरच आले नाही. मग आम्हीच रस्त्यावरच्या पाट्या वाचून हळूहळू कार चालवत त्याच भागामध्ये इकडून तिकडे फिरलो. सरतेशेवटी अपार्टमेंट कॉंप्लेक्स एकदाचे सापडले. कार थांबवली आणि त्या बाईला फोन केला. फोन उचलायला तयार नाही म्हणून मेसेज लिहिला. की आम्ही आलो आहोत. त्या बाईचा पत्ताच नाही. तिचा मेसेज आला की मी तुमची वाट पाहून गेले पण तुम्हाला अपार्टमेंट पाहता येईल. अमुक एका नंबराचे अपार्टमेंट की जे भाड्याने द्यायचे आहे ते उघडेच आहे वरच्या मजल्यावर आहे ते तुम्ही बघा आणि आवडले तर दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता मला येऊन भेटा.



त्या अपार्टमेंट मध्ये गेलो तर निराशा झाली. एक तर ते अपार्टमेंट कॉंप्लेक्स मुख्य रस्त्याच्या खूप आत होते. आजुबाजूला अजिबात कार जाण्यायेण्याची वर्दळ नाही. २ बेडरूम अपार्टमेंट आम्हाला हवे होते तसे ते होते. रचना पण बरी वाटली. पण स्वयंपाक घरात अंधार वाटला. शिवाय वॉशर आणि ड्रायर्स साठी जे कनेक्शन होते तेही स्वयंपाक घरातच होते. म्हणजे त्या कनेक्शनला आमच्याकडे असलेले वॉशर्स आणि ड्रायर्स लावले असते तर जागा व्यापली असती. स्वयंपाक घराला लागूनच एक मोठी प्रशस्त बाल्कनी होती आणि तिथून मोठमोठाली झाडे दिसत होती. घर खूप जुने वाटत होते. आणि या वरच्या मजल्यावर येण्यासाठी जो जिना होता तो आतून होता आणि तो खूप अरूंद होता. त्या घरात आपले मोठमोठाले फर्निचर आणताना कसा त्रास होईल याची कल्पना येत होती. बेडरूमला लागून ज्या बाल्कन्या होत्या त्याही विचित्र होत्या. उंचीने खूप लहान होत्या. त्यामुळे बाल्कनीत कठड्याला टेकून उभे राहणे शक्य नव्हते. आम्हाला दोघांनाही ती जागा अजिबात आवडली नाही. ही जागा ऑफिसच्या जवळ म्हणजे कारने १० मिनिटांच्या अंतरावर होती. घरी जेवण्यासाठी येता येईल हा विचार होताच पण तरीही या अश्या जुनाट जागेत रहायचे? विचार चालूच होता. ती बाई पण म्हणाली की उद्या येऊन भेटा त्यामुळे आम्ही मोटेलवर गेलो.



डोके भणभणायला लागले होते. एक तर त्या बाईचा खूप राग आला होता. मेसेजला उत्तर नाही. जागा बघायला आलो तर ही बया जागा दाखवणासाठी थांबली नव्हती. मोटेलवर गेलो आणि काय करायचे असा प्रश्न सारखा सतावत होता. बाकीच्या अपार्टमेंटचे फोन नंबर घेऊन ठेवले होते. हँडरसनविल शहरात २ अपार्टमेंट कॉंपेक्सचा फोन नंबर होता. पण आयत्यावेळी जागा उपलब्ध असतील का आणि नसल्या तर काय करायचे. एकूणच सर्व विचारांनी डोके दुखायला लागले होते. बाहेर जाऊन पिझ्झा खाल्ला आणि झोपलो . झोपेत पण ती जागा येत होती आणि या जागेत आपण रहायचे या विचाराने निराशाही येत होती. सकाळी उठल्यावर अजून एका माणसाचा फोन आला की आमच्याकडे एक जागा आहे. म्हणजे त्या आवारात दुसरीकडे एक जागा होती त्याच अपार्टमेंट कॉप्लेक्स मध्ये.तर विचार केला आता एक जागा पाहिली आहे दुसरी पण पाहू. ती बरी वाटली तर दोन पैकी कोणती जागा फिक्स करायची ते ठरवू. आणि सुरवातीला ६ महिन्याच्या लीजवर घेऊ. वेळ इतका काही कमी होता की जागा बुक करूनच निघायला हवे होते. कारण की ५ दिवसांनी आम्हाला सर्व सामानासकट इथेच रहायला यायचे होते.



विलमिंग्टन इथल्या राहत्या जागेत सामानाची बांधाबांध करायला सुरवात केली होती. खोकी आणून पडली होती. तिथल्या मॅनेजर बाईला सांगितले होते की आम्ही जागा सोडून जात आहोत. घरात पसारा दिसायला सुरवात झाली होती. जागा बुक करून मग ५ ते ६ दिवसात बरीच कामे करायची होती. सकाळी बरोबर १० वाजता आदल्या दिवशी पाहिलेल्या जागेत आलो. त्या बाईला फोन केला. ही बाई फोन उचलायलाच तयार नाही ! टेक्स्ट मेसेजला उत्तर नाही. दुसऱ्या बुवाला फोन केला तर त्याचाही पत्ता नाही. अरे काय चाललयं काय? यांना खरच जागा भाड्याने द्यायची आहे की नाही?? खूप संताप येत होता. तिथे तासभर थांबलो आणि विनू म्हणाला की आपण कंपनी मध्ये जाऊ आणि तिथल्या लोकांना विचारू की तुम्ही जिथे राहता तिथे जागा आहे का? तिथे २ भारतीय होते. तिथे गेलो आणि त्यातला एक जण म्हणाला की इथे ब्रेव्हार्ड मध्ये जागा मिळणे खूप कठीण आहे. आम्हाला पण असेच अनुभव आलेत. एकाने तर आम्हाला सांगितले की त्या बाईने उत्तर दिले नाही हे चांगलेच आहे. मी तिथे राहत होतो. १५ दिवसात ती जागा सोडून दुसरीकडे रहायला गेलो. तिथे खालच्या मजल्यावर एक बाई राहत होती ती खूप स्मोकिंग करायची त्या धुराच्या वासाने आम्ही ती जागा सोडून दिली.



तिथे एक दुसरा भारतीय होता तो म्हणाला की हँडरसनवील मध्ये २ अपार्टमेंट कॉंप्लेक्स आहेत मी तिथल्या एका जागेत राहिलो आहे. जागा छान आहे. हीच ती जागा की जिथे आम्ही आता राहतो. आणि माझे कामावर जाण्याचे ठिकाण इथून १० मिनिटांच्या अंतरावर आहे. अर्थात तिथे आम्हाला त्यावेळी अपार्टमेंट उपलब्ध नसल्याने मिळाली नाही. या जागेच्या ५० मिनिटांच्या चालण्याच्या अंतरावर एक अपार्टमेंट कॉंप्लेक्स होते तिथे फोन केला तर ती बाई म्हणाली की तुम्ही या. एक जागा उपलब्ध आहे. कंपनीतल्या २ भारतीय मित्रांचे आभार मानून आम्ही जागा बघण्यासाठी ब्रेव्हार्ड मधून परत हँडरसनवीलला आलो. मोटेल सकाळीच सोडले होते. तिथून निघताना न्याहरी केली होती त्यामुळे बरे झाले. दुपारी १ च्या सुमारास आम्ही ब्रिटनी प्लेस मध्ये आलो. तिथे आलो आणि " आहा किती छान" हे शब्द बाहेर पडले. तिथल्या मॅनेजर बाईनी आमची सर्व माहीती विचारली. फॉर्म भरून घेतले. जी जागा उपलब्ध आहे ती ४ दिवसांनी खाली होणार आहे त्यामुळे ती जागा दाखवता येणार नाही. पण तुम्हाला दुसरी जागा दाखवते. जी जागा दाखवली ती आम्हाला आवडली. पण आम्हाला जी जागा मिळणार होती ती तिसऱ्या मजल्यावर होती आणि तिथल्या आवाराच्या बरीच मागे होती आणि त्यातुनाही ती मागच्या बाजूला होती की जिथून फक्त झाडेच दिसतील. ही जागा आवडली. फक्त एक होते की रेल्वेच्या डब्यासारखे हॉल - बाजूला किचन आणि हॉलला लागूनच एकाला एक लागून २ बेडरूम होत्या. एकच बाल्कनी होती आणि त्या बाल्कनीला एक मोठे दार होते. ते दिवसा उघडे ठेवता येणार होते. रात्री मात्र ते दार बंद करावे लागणार होते. त्यामुळे बंद डब्यासारखेच हे अपार्टमेंट होते. अर्थात दोन्ही बेडरूमना खिडक्या होत्या.पण आमच्याकरता वेळेला जागा मिळणे हे अगदी अत्यावश्यक होते. अपार्टमेंट बुक केले आणि तिथून निघालो. जागेचे सर्व सोप्सकार होईपर्यंत ३ वाजायला आले होते आणि प्रचंड प्रमाणात भूक लागली होती.




पेट्रोल संपायला आले म्हणून त्याकरता एक एक्झीट घेतली आणि तिथेच पिझ्झा इन ची पाटी दिसली. इथल्या पिझ्झाने एक सुखद धक्का दिला. सलाडही खूप छान होते. पिझझाही खूप छान होता. कोक बरोबर सलाड आणि पिझ्झा खाऊन आत्मा तृप्त झाला होता आणि अपार्टमेंट मिळाल्याने भणभणारे डोकेही शांत झाले. घरी पोहोचायला रात्रीचे ११ वाजले. एका त्रासदायक अनुभवाची भर पडली होती. विनायकने कंपनीचा राजिनामा दिलाच होता त्यामुळे आफीसमध्ये जाऊन उरलेले काम फक्त मार्गी लावायचे होते. मूव्हर्सला फोन करून झालेला होता त्यामुळे त्यांना निश्चित तारीख सांगितली. ते म्हणाले आम्ही त्या तारखेला सकाळी १० ला येतो तोपर्यंत तुम्ही तुमचे इतर सामान खोक्यात भरून आणि त्याला चिकटपट्या चिकटवून तयार ठेवा. त्या मूव्हर्स वाल्यांनी पण आम्हाला वेगवेगळ्या साईजची खोकी आणून दिली. घरात अर्धवट भरलेली काही खोकी होतीच. घराचा परत एकदा मोठाच्या मोठा पसारा आवरायचा होता.तो पसारा कसा आवरला, सामानाची बांधाबांध कशी केली, कोणकोणते सामान टाकून दिले हे सर्व या लेखाच्या पुढील भागात लिहिते. :) Rohini Gore

क्रमश : ...





Sunday, July 22, 2018

आज इथं तर उद्या तिथं ... (१०)

विनायकला प्रत्यक्ष मुलाखतीकरता बोलावले ते सुद्धा अगदी अचानकपणे. फोन आला आणि सांगितले की तू उद्या मुलाखतीला ये आणि त्याकरता तुझे आम्ही हॉलीडे इन मध्ये रूम बुक केली आहे. हा फोन आला विनायकच्या ऑफीसमध्ये दुपारी ३ वाजता. ४ वाजता निघायलाच हवे होते म्हणजे आम्ही रात्री १० ते ११ च्या सुमारास ब्रेव्हार्ड मध्ये पोहोचणार होतो. अतिजलद वेगाने मी आणि विनुने ब्रेव्हार्ड ला जाण्याची तयारी केली. शर्ट पॅटला इस्त्री केली. कोट आणि टाय आठवणीने बॅगेत टाकला. बाकीचे एका रात्रीचे दोघांचे कपडेबॅगेत भरले. मी पण त्याच्याबरोबर गेले होते. घरी एकटी बसून काय करु? आणि समजा कंपनीने ऑफर दिली तर येताना अपार्टमेंटही पाहू असे ठरवले.



बाकीच्या गोष्टी म्हणजे रात्रीची पोळी भाजी, पाणी पिण्याची बाटली, थोडी फळे, कूकीज आणि बटाटा चिप्स घेतले. जिपिएस, याहूमॅप, लॅपटॉप, फोन इ. इ. सर्व घेतले आणि कारमध्ये बसलो. कार सुरू झाली आणि ७४ रस्त्यावरून नंतर महामर्ग ९५, २०, आणि २६ असे वेगवेगळे महामार्ग ओलांडले आणि काही वेळाने बाहेर पाहिले तर उंच उंच डोगर आणि दऱ्या दिसायला लागल्या. वळणावळणाचे रस्ते दिसायला लागले. घाटात कारचा गिअरही बदलावा लागला. पोहोचेपर्यंत ठार अंधार झाला होता. वाहतुक तुरळक होत गेली. एखादीच कार किंवा एखादाच ट्रक दिसत होता. या रस्त्यावर आम्ही आधी म्हणजे साधारण वर्षापूर्वी आलो होतो चिमनी रॉक पहायला. उंच डोंगरावरचा विश्रांती थांबाही माहीती होता. तिथे थांबलो. रात्र झाल्याने आणि इथला सर्वच भाग डोंगराळ आणि घनदाट झाडीचा असल्यानेे काजवे चमकताना दिसले. रातकीड्यांचा आवाज घुमत होता. थंडगार वाटत होते. थांब्यावर थांबून तिथे कॉफी प्यायलो आणि निघालो. आता तर रस्त्यावरची चढण खूपच जाणवत होती. काही वेळाने आम्हाला वेगळ्या रस्त्यावर जाणारी एक्झीट घ्यायची होती ती घेतली. आणि नंतर थोडाफार सरळ रस्ता लागला. निघताना खूपच घाईघाईने आवरायला लागल्याने दमायला झाले होते. कार धावत होती.



आता थोडा कारचा वेग मुद्दामच हळू केला आणि रस्त्यावर हॉलीडे इन ची पाटी कुठे दिसते का ते बघत होतो. जिपीएस लावले नव्हते. गुगलमॅप बघूनच कार चालवत होतो. काही वेळाने पाटी दिसली आणि हॉटेलमध्ये बुक केलेल्या रुमचा ताबा घेतला. बरोबर पोळी भाजी घेतल्याने खूपच चांगले झाले होते. जेवण केले. हात पाय तोंड धुतले आणि विनायकने प्रेझेंटेशनची थोडी तयारी केली. झोपायला १ वाजून गेला. झोप अजिबात लागत नव्हती. पाठीला आराम म्हणून कॉटवर पडलो होतो इतकेच. सकाळी अंघोळी पांघोळी आणि न्याहरी करून कंपनीत गेलो.



ब्रेव्हार्ड मधली कंपनी चहूबाजूने वेढलेल्या डोंगराच्या कुशीत होती. कंपनीच्या आवाराच्या बाजूलाच सफरचंदाची काही झाडे आहेत. त्या झाडांच्या फांद्या वाकून त्या कंपनीच्या आवारात आल्या होत्या. तिथे एक बाकडे होते त्या बाकड्यावर मी बसून राहिले. बरीच सफरचंद बाकड्याच्या आजुबाजूला असणाऱ्या हिरवळीवर पडली होती. त्याचे लगेच फोटोही काढले. अधून मधून कंपनीत असलेल्या एका डेस्क टॉपवर मी टाईमपास करायला जात होते. विनुची मुलाखत आणि प्रेझेंटेशन खूपच छान झाले. नंतर कंपनीचे दोन मालक आणि आम्ही दोघे एका मेक्सिकन उपहारगृहात जेवलो. त्यांनी माझी पण चोकशी केली. जेवणे झाल्यावर आम्ही एकमेकांना हास्तादोंलन केले आणि परतीच्या प्रवासाला निघालो. स्वच्छ सुंदर सूर्यप्रकाशात रस्ता तर छान दिसत होताच पण आजुबाजूला असलेल्या डोंगरातून ढग खाली उतरलेले दिसत होते. अतिशय नयनरम्य दृश्य होते. ६ ते ७ तासांचा प्रवास करून घरी आलो. २ दिवसांनी कंपनीच्या मालकाचा फोन विनुला आला आणि लवकरात लवकर कधी कामावर रूजू होतोस हे विचारले. तेव्हा विनू म्हणाला मला कंपनीत १५ दिवसाची नोटीस द्यायला लागेल त्यामुळे मी अमुक एका तारखेला रूजू होईन. असे सांगितल्यावर ब्रेव्हार्ड मधल्या कंपनीने लगेचच अपॉईंटमेंट लेटर काढले.



आता मात्र कामांची नुसती रांग लागली. पहिले काम म्हणजे गूगल मध्ये शोधण्याचे काम. गुगल शोधामध्ये मुव्हर्स आणि पॅकर्सचे पत्ते, फोन नंबर शोधणे. अपार्टमेंटच्या शोध कार्यासाठी गुगलची मदत घेणे. आणि शोध घेऊन फोन करणे, अपार्टमेंट बघायला येण्यासाठीची अपॉइंटमेंट घेणे. शिवाय घराच्या आवरा आवरीमध्ये खोकी आणणे, चिकटपट्या आणणे. तिथल्या राहत्या अपार्टमेंटच्या मॅनेजरला सांगणे की आम्ही चाललो आहोत. परत एकदा खोक्यात सामान भरा, पोतीच्या पोती कचरा फेका., अपार्टमेंट साफ करा , इलेक्ट्रिक कंपनीला कळवा. पोस्ट ऑफीस मध्ये जाऊन पत्ता बदललेला सांगा. एकेक करत बरीच कामे मार्गी लावायची होती आणि त्यात भर म्हणजे ब्रेव्हार्ड मध्ये अपार्टमेंट बघायला परत एकदा जाऊन येऊन ८०० मैलांचा प्रवासही करायचा होता. यामध्ये आफीसच्या जवळ अपार्टमेंट असणे याला आम्ही जास्त प्राधान्य देत होतो. शिवाय ब्रेव्हार्ड पासून २५ ते ३० मैलाच्या अंतरावर आर्डेन आणि हँडरसनविल ही छोटी शहरे होती तिथल्या अपार्टमेंटचा पण गुगल शोध घेऊन एकूणच अपार्टमेंटची भाडी किती आहेत आणि ते उपलब्ध आहे का याची चौकशी पण करणार होतो. सर्व कामाची यादी एका वहीत मी लिहून काढली. विनुला सांगितले की तू मला खोकी आणून दे म्हणजे जे काही सामान अजिबातच लागणारे नाहीये ते मी खोक्यात भरायला सुरवात करते आणि एकीकडे लॅपटॉप वर अपार्टमेंटचा गुगल शोधही घेते. Rohini Gore :)
क्रमश : ....

Saturday, July 21, 2018

आज इथं तर उद्या तिथं ... (९)

"आज इथं तर उद्या तिथं" या लेखमालेत ८ भाग लिहून झाले आहेत. स्थलांतरे अनुक्रमे माझे लग्न झाल्यावर पहिल्यांदा आयायटी पवई, नंतर त्याच आवारात तुलसी ब्लॉक्स मध्ये दुसरे आणि नंतर अनुक्रमे डोंबिवली, अंधेरी, डेंटन - टेक्साज, इथेही तीन वेळा, क्लेम्सन - साऊथ कॅरोलायना, इथेही ४ वेळा आणि नंतर नॉर्थ कॅरोलायना राज्यामधल्या विल्मिंग्टन शहरात. प्रत्येक वेळी स्थलांतराचा अनुभव वेगळा होता. आठवणीही छान होत्या. प्रत्येक स्थलांतराचा प्रकार वेगळा होता. यात ट्रक, विमान, कार अशी वाहने होती. सामान जास्तीचे नव्हतेच मुळी. प्रत्येक वेळी बॉक्सेस आणि बॅगांमध्ये सामान भरायचे आणि निघायचे. रिकाम्या घराकडे बघवायचे नाही. अर्थात घर एकदा का सोडले की मग तिथल्या आठवणींची पुंजी घेऊन नव्या वाटेवर जायला सज्ज असायचो. नवीन घरात परत सामानाची बोचकी उलगडून संसार मांडायला सुरवात करायचो. डोंबिवलीच्या १० वर्षाच्या कालावधी नंतर आता परत विल्मिंग्टनच्या १० वर्षाचा कालावधी संपवून आम्ही परत नव्या शहरी आणि नव्या घरात रहायला जाणार होतो.



विल्मिंग्टन मध्ये रहायला आल्यावर जरूरीपुरते सर्व फर्निचर आम्ही घेतले होते. त्या आधी आमच्याकडे आमचे असे फर्निचर नव्हते आणि त्यामुळेच स्थलांतरे थोडी सोपी होती. अर्थात फर्निचर जरी नसले तरी इतर सामान असतेच. भांडीकुंडी, कपडे, अंथरूणे - पांघरुणे पुस्तके आणि इतर सटर फटर असे कितीतरी. फर्निचर असल्याने यावेळी आम्ही मुव्हर्स आणि पॅकर्सना बोलावले होते. अर्थात बाकीचे सामान मी खोक्यात भरून ठेवलेच होते. त्यामुळे मुव्हर्सना फक्त खोकी आणि इतर फर्निचर उचलायचे होते. लाकडी जड जड फर्निचर तेच उचलू जाणोत बाबा ! काय ताकत असते या लोकांमध्ये. आणि सामान हालवताना किती घामाघूम झाले होते ते ! २ तासात फटाफट सामान खालच्या ट्रकमध्ये भरले त्यांनी ! आयताकृती कॉफी टेबल, ६ जणांचे डायनिंग टेबल आणि त्याच्या खुर्च्या, मोठा सोफा, मोठा बेड, टीव्ही, कपड्यांची २ मोठी कपाटे, आणि एक छोटे कपाट,एक खुर्ची असे सर्व जड जड सामान होते.



सकाळी ११ वाजता २ माणसे आली. आम्ही सामान बांधून तयारच होतो. आम्हाला हँडरसनविलला पोहोचायला रात्र होणार होती ते माहीत होते त्यामुळे मी याच राहत्या घरात पोळी भाजी करून घेतली होती. अंघोळी पांघोळी उरकून न्याहरी पण केली होती. आणि हो नेहमीप्रमाणेच जरूरीच्या सर्व सामानाच्या २ ते ३ बॅगा, लॅपटॉप, प्रिंटर, फोन आम्ही आमच्या कारमधून नेणार होतो. २ वाजता आमचा सामानाचा ट्रक निघाला. निघताना आमचे सामान आम्हाला तुम्ही आम्ही तिथे पोहोचल्यावर आणि अपार्टमेंटचा ताबा घेतल्यावरच आणा असे दोघांना सांगितले. ते म्हणाले तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही तुमचे सामान व्यवस्थित नेतो आणि तुम्हाला अपार्टमेंटचा ताबा मिळाला की आम्हाला फोन करा. ट्रक निघाल्यावर सर्व घरभर एकदा नजर फिरवली. काही राहिले तर नाही ना?
शांतपणे मी रिकाम्या घरात मांडी घालून बसले. विनायक व देसाई बोलत होते." फिर मिलेंगे" असे बोलून देसाई निघाला. यावेळी आम्हाला निरोप द्यायला फक्त तोच होता. बाकी कोणीही नव्हते. या शहरात प्रत्यक्षातली मित्रमंडळी अजिबात नव्हती. त्यामुळे मित्रमंडळींच्या आठवणी नाहीत. याउलट आत्तापर्यंतच्या स्थलांतरामध्ये जी काही मित्रमंडळी होती त्यांच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. माणसांच्या नाही पण निसर्गाच्या आठवणी मात्र आमच्या दोघांच्याही बरोबर होत्या. आता निघायलाच हवे म्हणून मी उठले आणि आम्ही दोघे सगळ्या तयारीनिशी कारमध्ये बसलो. कार सुरू केल्यावर आधी मेक्सिकन उपहारगृहात गेलो आणि जेवलो. नंतर महामार्ग ४० वरून आमची कार वेगाने धाऊ लागली. विल्मिंग्टन ते ब्रेव्हार्ड - हँडरसनवील आम्ही साधारण जाऊन येऊन ४ चकरा मारल्या होत्या म्हणजे जवळजवळ साधारण १६०० मैल प्रवास स्थलांतराच्या आधी झाला होता. नेहमीच स्थलांतरची चक्रे जोराने फिरतात हा आमचा अनुभव आहे. लेखाचा पुढील भाग लवकरच घेऊन येते. :) Rohini Gore
क्रमश : ....

Monday, July 16, 2018

फोटोंच्या आठवणी ... (४)

मी काढलेल्या प्रत्येक फोटोमागे काही ना काही आठवणी दडलेल्या आहेत. आज काही फोटोंची फेसबुकने आठवण करून दिली. त्यादिवशी समुद्रावर गेलो होतो. समुद्रावर हवेत नेहमी आर्द्रता असते पण त्यादिवशी अजिबात नव्हती त्यामुळे समुद्रावर चालणे झाले. चालणे झाले म्हणजे काय की चालतच बसावे, घरी जाऊच नये असे वाटत होते. कितीतरी वेळ चालत होतो आम्ही दोघे समुद्रावर. चालता चालता हळूवार पणे येणाऱ्या वाऱ्याच्या झुळका अंगावर घेत होतो. आता बास ! मागे वळून पाहिले तर खूपच दूरवर आलो होतो. परतीच्या वाटेला लागलो. त्यादिवशी आभाळात ढगांच्या समवेत गुलाबी रंग दिसला. आणि त्या गुलाबी रंगाचे प्रतिबिंब पाण्यात पडले होते. गुलाबी रंगावरून आणि पाण्यात पडलेल्या त्याच्या प्रतिबिंबावरून नजर हालत नव्हती.





Saturday, July 07, 2018

आपला मराठी बिग बॉस

आपला मराठी बिग बॉस बद्दल थोडेसे ....


सई, पुष्कर, मेघा यांचे त्रिकुट मोडले. मेघाने आयत्या वेळेस आस्तादला कॅप्टन पदाबद्दल तिचे मत दिले आणि ती म्हणाली की मला आता कॅप्टन पद नको आहे. बिग बॉसने सांगितले असताना की तुम्ही वेळ घ्या, चर्चा करा आणि मग तुमचा उमेदवार ठरवा. तरी तिने अचानक बाँब गोळा टाकला. हे तिचे वर्तन बघून सई आणि पुष्कर खूपच चिडले. सईचे म्हणणे इतकेच होते की मेघाने आधी त्याबद्दल त्या दोघांशी बोलायला हवे होते. नंतर मेघाने माफी मागितली आणि मी त्याबद्दल आधी तसा विचारच केला नव्हता. मला त्यावेळेला एकदम डोक्यात आले ते मी बोलून दाखवले हे स्पष्टीकरण अजिबातच पटणारे नव्हते. ज्या बाईच्या डोक्यात फक्त टास्क करण्याबाबतच विचार घोळत असतात ती असे एकदम करणे शक्यच नाही. दुसऱ्या टीम बद्दल सहानुभूती दाखवून त्यांच्या टीम मधून मते तिला मिळवायची होती.



आस्ताद साठी कॅप्टन पदासाठी मेघाने तिचे मत दिले. त्यावर आस्ताद आणि रेशला आनंदही झाला. पण त्यावर पुष्करने माती खाल्ली. मेघा आस्तादच्या एका गेम मध्ये त्याच्याविरुद्ध खेळत होती हे त्याने सर्वांसमोर जाहीर केले. त्यामुळे मेघा खूपच दुखावली. त्यामुळे झाले काय की आस्ताद आणि रेशम यांना कोलीतच मिळाले. आणि त्याही पुढे जाऊन जेव्हा नंतरच्या बऱ्याच टास्क नंतर परत कॅप्टन पदासाठी निवडीची वेळ आली तेव्हा मेघा म्हणाली मला पुष्करने सासू - जावई या गेम मध्ये खूप छळले आहे आणि त्यामुळे मी या पदासाठी योग्य आहे हे सांगितले. आणि एकूणच चर्चा सत्र आधीच्या विजयी टीमचे चालू होते. त्यांचा निर्णय होत नव्हता. आवाज खूप वाढत होते. नंतर सगळेच एकत्र झाले आणि मेघावर सगळ्यांनी मिळून तोफा झाडायला सुरवात केली. यात दुसऱ्या टीम मध्ये जाऊन सईने आणि पुष्कर ने चक्क माती खाल्ली आहे. आस्ताद आणि रेशम ही विरूद्ध टीम मेघा आणि सईला नेहमीच पाण्यात बघतात. पण सई आणि पुष्करने गप्प बसावे ना? काहीही झाले तरी मेघाविरूद्ध विरूद्ध टीम मध्ये जाऊन आरडा ओरडा करणे कितपत योग्य आहे? असे केल्याने सई आणि पुष्कर बद्दलचे मत चांगले होत नाहीये हे त्यांना कळायला हवे. पेक्षक बघत आहे. यात काय होणार आहे की मेघालाच जास्त मते मिळणार आहेत. सई बद्दल जितकी आरडाओरड होत आहे तितकी ती नक्कीच वाईट नाहिये.




मेघाने सासू-सून सासू - जावई या टास्क मध्ये मेघाने आधी पुष्करला खुप त्रास दिला. आणि त्याचा बदला म्हणून नंतर पुष्करने ही मेघाला खूप त्रास दिला. अर्थात त्रास देणे असाच टास्क होता आणि त्या त्रासाला कंटाळून गेम मधून बाहेर पडायचे होते. जश्याच तसेच झाले हे निर्विवाद. पण म्हणून लगेच पुढे जाऊन दुसऱ्या टीम मध्ये घुसून त्यांच्या आवाजात आपलाही आवाज मिळवणे हे सई ने आणि पुषकरने अजिबात चांगले केले नाहीये. त्यातूनही सई आणि पुष्करची चांगली फ्रेंडशिप आहे हे चांगलेच आहे पण म्हणून सईने फक्त पुष्करची बाजू घेऊन मेघाला बोलायला नको होते. तिने दोघांनाही समजावून सांगायला हवे होते की जे शर्मिष्ठाने केले. आस्दात तर एक नंबरचा डबल ढोलकी आहे. रेशम तर अजिबात कशात भाग घेत नाही. जशी मेघा टास्क कसा जिंकू याचा विचार करते तसेच सई कडून प्रेक्षकांची छान करमणूकही होते. सई पण सगळ्यांच्या ४० - ५० पोळ्या करते हे उषा नाडकर्णी यांनीच सांगितले आहे.. सई टास्क मध्ये डोकेही लढवते त्याचप्रमाणे ती करमणूकही करते. मेघाकडून करमणूक अजिबातच होत नाही. पुष्करने विचार करून थोडा संयम राखायला हवा होता हे अगदी मनापासून वाटते.
Rohini Gore

Monday, July 02, 2018

फोटोग्राफी

विल्मिंग्टन मध्ये राहत असताना मी वेदर चॅनल वर फोटो पाठवायचे वेदर शॉट ऑफ द डे करिता. ली रिंगर हे पाठवलेले फोटोज दाखवायचा टीव्ही वर. मी पाठवलेले सूर्योदय सूर्यास्ताचे ३० फोटोज त्याने टिव्ही वर दाखवले. नंतर आम्ही शहर बदलले आणि नॉर्थ कॅरोलायनाच्या पश्चिमेकडे रहायला आलो आधी पूर्वेकडे होतो. पश्चिमेकडे रहायला आल्यावर टिव्ही केबलचा झोन बदलला त्यामुळे मी पाठवलेले फोटो दाखवू शकत नाही.
ते फोटोज मी इथे शेअर करत आहे. अर्थात मी पाठवलेले काही फोटोज ली रिंगर त्याच्या पेजवर अपलोड करतो त्यामुळे खूप छान वाटते






https://spectrumlocalnews.com/nc/triangle-sandhills/news/2019/05/22/wednesday-brings-the-most-comfortable-temperatures-of-the-week
https://spectrumlocalnews.com/nc/triangle-sandhills/news/2019/05/22/wednesday-brings-the-most-comfortable-temperatures-of-the-week

सूर्यास्त

view from window before sunset - 27th June 2018 सूर्य जेव्हा म्हणतो चला आता मी भारतात जातो, उद्या भेटू परत , तेव्हा तो त्याचे रंग बदलायला लागतो. पांढरा शुभ्र दिसणारा सूर्य पिवळा होतो आणि नंतर तोच पिवळा रंग काही वेळ स्थिर होऊन तो लालसर रंगाकडे झुकायला लागतो. नंतर लाल चुटूक होतो आणि अंतर्धान पावतो. अंतर्धान पावताना त्याची किरणे आभाळात परावर्तीत होतात. जेव्हा आकाश निरभ्र असेल तेव्हा रंगांची उधळण होत नाही पण जेव्हा ढग असतील तेव्हा त्या ढगांमध्ये रंग घुसतात आणि क्षणाक्षणाला ते बदलत राहतात. काही वेळा हा रंग बदलण्याचा सोहळा खूप देखणा असतो. रंगांची नुसती उधळण असते. भगवा, गुलाबी, सोनेरी. आणि मग काही वेळाने होत्याचे नव्हते होते. रंगांच्या खुणा काळ्या निळ्या ढगांवर राहतात काही वेळ, आम्ही येऊन गेलो होतो असे सांगण्यासाठी.