Tuesday, October 10, 2017

इंगल्स मार्केट ... (६)

२०१४ साली माझा कॉलेजचा पहिला दिवस होता गणेश चतुर्थीच्या दिवशी, आणि नोकरीचा पहिला दिवस होता २०१५ धनत्रयोदशीच्या दिवशी. नोकरीच्या पहिल्याच दिवशी मला चिकन कापायला लागले की जे मी जन्मात पाहिले नव्हते. नोकरीच्या दुसऱ्या दिवशी मला पोर्क पुलींग करायला लागले. ते पाहून मला डचमळायला लागले आणि मी माझ्या सोबत काम करत असलेल्या मैत्रिणींना सांगितले की हे मला जमणार नाही. तसेच हॅम सलाड करायलाही मला जमणार नाही कारण की ते पाहिल्यावर मला पोटात डचमळते आणि उलटी होईल की काय असे वाटते. विकी आणि कार्मेन म्हणाल्या काही हरकत नाही. हे २ पदार्थ आम्ही करू. चिकन कापण्यासाठी ज्या ट्रे मध्ये ते ठेवलेले असते तो ट्रे इतका काही जड असतो की तो काढायला गेले तर तो जागचा हालत देखील नाही. त्यामुळे तो जड ट्रे कार्मेन आणि विकी मला आणून देतात. जश्या त्या मला समजून घेतात तशीच मी पण त्या दोघींना समजून घेते. कार्ट मधून बाकीचे सामान आणायला लागते ते मीआणते. आणि शक्य तितकी मदत करते. आमच्या तिघींच्यातही एक प्रकारचा समजूतदारपणा आहे. आणि आम्ही एकमेकींची काळजीही घेतो.



कामावर गेल्यावर फ्लोअर चेक करून तिथे सँडविचेस आणि सलाड चे डबे ठेवून परत किती शिल्लक आहेत त्याप्रमाणे किती पदार्थ बनवायचे आहेत इथपासून ते मांस ऑर्डर करून, फ्रीजरमधून ब्रेड आणणे, लेबलींग करणे सँडविच सलाड बनवणे इ. इ. सर्व कामे मी शिकले आणि तरबेज झाले. कार्मेन आणि विकी रजेवर असताना सर्व काम मी एकटीने मला दिलेली मदतनीस हिच्या सहाय्याने केली तेव्हा मॅनेजर जेमी माझ्यावर खूप खुष झाली होती असे मला कार्मेन ने सांगितले तेव्हा मला खूप बरे वाटले. खूप कष्ट असलेली ही नोकरी मी पहिल्यांदाच करत आहे आणि मला कष्टाची सवय पण झाली आहे. दमायला खूप होते पण तब्येत ठणठणीत राहते. ८ तास उभे राहून काम करणे आणि फक्त जेवायला टेबल खुर्चीवर बसणे याची सवय झाली आहे. माझे पहिल्यांदा पाय अतोनात दुखायचे तेव्हा कार्मेनने मला सांगितले की तुला तुझे बूट बदलायला हवेत. मला कळेचना की बूट कशाला बदलायचे? ती म्हणाली की तू स्केचर्सचे बूट विकत घे. ते मी विकत घेतले आणि आता मला ८ तास उभे राहून काम करण्याची सवय झाली. नुसते उभे राहणे नाही तर काम करणे आणि ते सुद्धा वेगाने. पटापट हालचाली व्हायला हव्यात. स्टोअर मध्ये चालणेही खूप होते.



आम्हाला जे काही पदार्थ बनवायला लागतात त्याचे सामान आम्ही स्टोअरमधून हिंडूनच आणतो. काही सामान आमच्या बाजूलाच एक कोल्ड रूम आहे तिथे ठेवलेले असते. ज्या पारदर्शक डब्यात आम्ही बनवलेली सँडविचेस आणि सलाड ठेवतो ते डबेही आम्हाला दुसऱ्या एका खोलीतून आणायला लागतात. त्यामुळे चालणे बरेच होते. नुसते चालणे नाही तर हात वर केले जातात. डबे ठेवताना खाली वाकले जाते. फ्रीजर मधून ब्रेड , व्हनिला पुडींग चॉकलेटचे डबे आणताना जड जड उचलून हात आणि खांदे दुखतात आणि हातात ताकद येते. शरीराच्या सर्व प्रकारच्या हालचाली होतात त्यामुळे वेगळा व्यायाम करण्याची गरज नाही. जेव्हा आम्ही चिकन सलाड बनवतो ते बनवताना एक तर आधी चिकन धारदार सुरीने कापावे लागते. मग त्यात कांदे बारीक चिरून घालायचे आणि सेलेरी चिरून घालायची. हे बनवताना मेयोनिज लागते ते १ गॅलन घालावे लागते आणि हे सर्व हाताने कालवायचे. जसे चिखल कालवतोना तसेच. खूप जोर लागतो याला. मेयोनिज इतके काही थंड असते (फ्रीजरमध्ये असल्याने) की हाताला गार चटके बसतात.. हे मी बनवू शकते. बाकी सर्व प्रकारचे सलाड बनवायला मोठमोठाली घमेली लागतात.



डेली-उत्पादन विभागात आम्ही तिघी मिळून खूप प्रकार बनवतो. आम्हाला एका मिनिटाची पण फुरसत मिळत नाही. काम करता करता एकीकडे गप्पा मारतो. मी मांस, चिकन, मासे खात नसल्याने मला तिथले पदार्थ खाता येत नाहीत. पदार्थ बनल्यावर चव घेतात सर्वजणी अर्थात कस्टमरच्या नकळत खायला लागते लपून छपून. मी बिस्किटे आणि फळांच्या फोडी खाते. हे सर्व पदार्थ बनवून आम्ही विक्रीकरता मांडून ठेवतो. ते सर्व इतके आकर्षक दिसतात की माल पटापटा खपतो. काही कस्टमर आम्हाला येऊन सांगतात की तुम्ही खूप छान पदार्थ बनवता आणि बरीच व्हरायटी असते. आम्हाला तुमचे खूप कौतुक वाटते. तसेच स्टोअर मॅनेजरही आमचे कौतुक करतो. आम्ही तिघीही कामावर दांड्या अजिबात मारत नाही. बरे वाटत नसेल तरीही मी कामावर शक्यतोवर जातेच कारण की मी मग कामाचा भार जी कामावर आलेली असेल तिच्यावर पडतो. ही नोकरी लागल्यापासून माझे वजन १० किलो ने कमी झाले त्यामुळे मी खुश आहे.

No comments: