Saturday, September 25, 2010

मराठी माणसं

अमेरिकेत आल्यावर आमच्या अपार्टमेंट मध्ये आमचे बस्तान बसले आणि रोजचे दैनंदिन जीवन सुरू झाले. मी रोज विद्यापिठाच्या ग्रंथालयात जायचे. एकदा असेच जात असताना समोरून एक माणूस येताना दिसला आणि मनात म्हणाले की हा बहुधा मराठी असावा. त्याच्या चेहऱ्यावरचे भावही तसेच होते म्हणजे तोही मनातून असेच म्हणत असावा की ही बाई बहुतेक मराठी वाटत आहे.



आम्ही दोघे एकमेकांकडे बघत बघत चालत होतो. दोघेही समोरासमोर आलो आणि असेच संभ्रमात बघून पुढे गेलो. मी मागे वळून पाहिले व त्याचवेळी त्यानेही पाहिले. मी पटकन तोंड वळवून हासले आणि ग्रंथालयात गेले. आम्ही दोघे भारतीय असूनही एकमेकांकडे बघून हासलो नाही. त्यादिवशी सारखे मनात घोळत राहिले की माणूस बहुतेक मरठीच असणार.



इथे अमेरिकेत निदान विद्यापीठात तरी एकमेकांच्या ओळखी दुकानापासून सुरू होतात. आमच्या सर्व भारतीयांच्या ओळखी दुकानापासूनच झाल्या आहेत. त्यादिवशी असेच झाले आम्ही अमेरिकन दुकानात भाजी, दूध वगैरे खरेदी केले व काउंटर वर येऊन उभे राहिलो तर आमच्या मागे तोच माणूस की जो मला मराठी वाटला होता. मी अगदी हळू आवाजात विनायकला म्हणाले की हाच तो माणूस त्यादिवशी मला दिसला होता. मराठी वाटतोय. विनायक म्हणाला विचार ना मग त्याला तुम्ही मराठी का म्हणून. लगेच त्याला विचारले तुम्ही मराठी का? " हो मी मराठीच" तुम्ही? आम्ही पण मराठी, तुम्ही कुठचे? "मी पुण्याचा" अरे वा! आम्ही पण पुण्याचेच. तेवढ्यात त्याचा रूम मेट ब्रेडचे चार पाच गठ्ठे घेऊन आला. लगेच त्याचीही ओळख झाली. पहिले होते डॉ केंजळे व दुसरा मेहुल बक्षी मुंबईचा.



आम्ही चौघे आमच्या सामानाच्या कार्टसकट दुकानाच्या बाहेर आलो. एकमेकांची ओळख करून घेतली आणि ज्या आमच्या मराठीतून गप्पा सुरू झाल्या त्या तब्बल दोन तास! दुकानाच्या बाहेर उभे राहून मोठमोठ्याने मनसोक्त मराठीतून गप्पा मारत होतो. त्यातून पुणे मुंबईचे कलावंत म्हणल्यावर काय! गप्पांना नुसते उधाण आले होते! गप्पा मारता मारता पोटभरून हासलो. अमेरिकन सर्व दुकानात ये-जा करताना आमच्याकडे बघत होते. चला ११ वाजून गेले! त्यादिवशी शुक्रवार होता. त्या दोघांना जेवणाचे निमंत्रण दिले आणि आम्ही घरी आलो. मला तर त्यादिवशी खूपच बरे वाटले! घडघड मराठीतून बोललो अमेरिकेत आल्यापासून साधारण ३-४ महिन्यांनी. मला हिंदीत बोलायलाही आवडते, पण इंग्रजी... इंग्रजी म्हणल्यावर माझे तोंडच वाकडे होते.



मेहुल बक्षी पंजाबी होता पण जन्मापासून पार्ले येथे राहणारा त्यामुळे मराठी बोलणारा होता. नावाला पंजाबी. दोघे तरूण लोकं येणार म्हणून दोघेही पोटभर जेवतील असाच स्वयंपाक बनवला होता. मराठमोळा स्वयंपाक! पोळी भाजी, भात आमटी, चटणी कोशिंबीर, भजी, दही वगैरे सर्व काही. जेवणानंतर आयस्कीम. नंतर काही दिवसांनी त्या दोघांनी आम्हाला रात्रीच्या जेवणाचे निमंत्रण दिले. त्यांच्या घरी गेलो तर तिथे खूप प्रमाणात कांदे बटाटे व टोमॅटो चिरून ठेवलेले दिसत होते. मी मेहुलला विचारले काय रे अजून कोणाला बोलावले आहेस का? नाही हो! ही सर्व तयारी पुढच्या आठवड्याची आहे. आम्ही आठवड्याची भाजी व आमटी बनवून ठेवतो. फक्त आम्ही दोघे ब्रेड खातो. बाकी दोघे रूममेट साऊथवाले आहेत. ते सतत भात ओरपत असतात. भाताने आमची पोटं नाही भरत. पोळ्यांना पर्याय म्हणून ब्रेड. तुम्हाला जेवायला आम्ही घरी पिझ्झा बनवला आहे. आताच शिकलो. घाबरू नका. चांगला बनवला आहे. नाहीतरी तुम्ही पोळीभाजी रोजच खाता म्हणून हा वेगळा मेनू बनवलाय तुमच्यासाठी.



एके दिवशी असाच एक जण भेटला त्याच अमेरिकन दुकानात. त्या अमेरिकन दुकानाचे नाव सॅक ऍंन्ड सेव्ह. आम्हाला दोघांना मराठी बोलताना पाहून त्याने आमची ओळख करून घेतली. त्याचे नाव सौमित्र गोडबोले. हा मराठी असून त्याला मराठीतून बोलता येत नाही. त्याची आई बंगाली व वडील महाराष्ट्रीयन आहेत. दुकानातून सामान घेऊन बाहेर पडलो आणि चालायला सुरवात केली. आमचे घर चालण्याच्या अंतरावर होते. त्याचे घर खूप लांब होते, तरी तो चालतच सर्व ठिकाणी जात असे. बोलता बोलता त्या दिवशी आमच्या घरी आला. मग मी तिघांना मिळून डाळ तांदुळाची खिचडी केली व त्याला रीतसर जेवणाचे आमंत्रण दिले.



ठरलेल्या दिवशी सौमित्र आमच्या घरी जेवायला आला आणि येताना चक्क तो श्रीखंड घेऊन आला. मी विचारले लगेच त्याला इथे कुठे श्रीखंड मिळते. इंडियन स्टोअर आहे का इथे?! तर म्हणाला मीच बनवले आहे. झटपट श्रीखंड, केशर वेलची घालून केले होते. त्या दिवसापासून आमच्या जेवणावळी सुरू झाल्या. जेव्हा जेवणाचे बेत ठरवायचो तेव्हा तो नेहमी श्रीखंड घेऊन यायचा व मी बाकीचा स्वयंपाक बनवायचे. खावस असल्याने दर जेवणाच्या आधी तो मला दूरध्वनी करायचा व जेवणाचा मेनू आम्ही दोघे मिळून ठरवायचो. माझ्याकडे जर ठरवलेली भाजी नसेल तर आणून द्यायचा. सोबत हिरव्यागार मिरच्या व कोथिंबीरही न चुकता आणायचा. दरवेळी पक्के मराठमोळे जेवण. येताना सदाबहार चित्रपटाची कॅसेट आणून द्यायचा. त्याच्याकडे सदाबहार चित्रपटाच्या काही डिव्हीडीज होत्या त्या तो आम्हाला कॅसेटवर रेकॉर्ड करून द्यायचा. विद्यापीठात ख्रिश्नन धर्माचा प्रसार करण्यासाठी काही विद्यार्थी त्या धर्माची माहिती असलेल्या काही कॅसेट देऊन जायचे. त्या कॅसेट जमा झाल्या होत्या. त्या मी सौमित्रला द्यायचे चित्रपट रेकॉर्ड करण्यासाठी.



एके दिवशी तर खूप धमाल आली. घराबाहेर दणादण बर्फ पडत होता व आम्ही तिघे श्रीखंड पुरी खात होतो. जेवायला आल्यावर नेहमी म्हणायचा की पिछले जनममें मैने कोई पुण्य किया होगा इसलिए आप जैसे लोग मुझे मिले. जेवणानंतर चुपके चुपके पहायला आणि खूप हासलो. चुपके चुपके तर कितीही वेळा पाहिला तरी प्रत्येक वेळी पाहताना तेवढाच चांगला वाटतो. श्रीखंड बनवताना सौमित्र केशर न चुकता घालत असे. त्याला विचारले तुला कसे काय माहीत की श्रीकंडात केशर घालायचे असते ते. मग त्याने केशर गरम कसे करता, मग ते दुधात कसे मिसळून श्रीखंडात घालता ते सांगितले होते. केशराबद्दल अजून एक माहिती त्याने पुरवली की तो कोणत्यातरी एका थायी दुकानात जातो केशर आणायला. तिथे म्हणे ५ किलो बासमती तांदुळ घेतला की एक केशराची डबी फुकट मिळते.



काही दिवसांनी शहर बदलले. तिथेही बरेच दिवस कुणी मराठी माणूस भेटला नाही. एके दिवशी अचानक एक फोन आला. can i talk to Dr Gore please! मी म्हणाले yes! sure! may i know who is speaking? I am sudhir joshi from new york. विनायकने फोन घेतला आणि काही सेकंदातच मराठीतून संभाषण सुरू झाले. एक दोन तास कसे गेले कळलेच नाही. आमच्या गावात सुधीर जोशी रहायला आल्यावर त्यालाही जेवणाचे निमंत्रण दिले. जेवणाच्या नंतर खूप गप्पाही झाल्या. नंतर मी त्याला सणाच्या दिवशी व काही वेळेला रविवारी जेवायला बोलवत असे. एके दिवशी मी मुगडाळ भजी केली होती. त्याने लगेच कृती विचारली. म्हणाला तशी सोपी आहेत. करून पाहीन एकदा. माझ्याकडे मिक्सर आहे. अचानक एके दिवशी त्याने मिश्र डाळींची भजी करून आणली. मलाही आयती भजी खाताना छान वाटले.




एकदा असाच एके दिवशी दुधाचा कॅन घेऊन आला. म्हणाला हा ठेऊन घे. मी म्हणले हे काय दुधाचा कॅन कशासाठी? तर म्हणाला की उद्या कोजागिरी पौर्णिमा आहे. तुमच्या दोघांचा काही दुसरा प्लॅन नसेल तर आपण कोजागिरी साजरी करूया का? अरे वा, तुला बरे लक्षात कोजागिरी वगैरे मी तर पार विसरूनच गेले होते कोजागिरीला! मी म्हणाले हो, करू की साजरी कोजागिरी! आटीव दुधाबरोबर भेळही करू. माझ्याकडे भेळीचे सामान नेहमी असते कारण की भेळ मला खूपच प्रिय आहे.


आत्तापर्यंत आम्हाला अमेरिकेत काही मराठी माणसं भेटली पण मराठी कुटुंब एकही नाही. :(