Tuesday, November 08, 2011

मी अनुभवलेली अमेरिका (६)

यहाँ की खामोशी मुझे पसंद है,, यहाँ बहूत सुकून है,, इधर इतना सेफ है की इंडियामें जानेका मन ही नही करता,, ही सर्व वाक्ये माझ्या मैत्रिणींची आहेत. पाकिस्तानी, तेलगू, तमीळ, श्रीलंकन अशा सर्व मैत्रिणींना अमेरिका आवडते, मराठी मुलींनाही! पण मला अजून तरी कोणी मराठी मुलगी अथवा मराठी जोडपे प्रत्यक्षात भेटलेले नाही. बरेच मराठी मित्रमंडळ ऑनलाईन भेटलेले आहे.या सर्व मैत्रिणींशी गप्पा मारताना त्यांचे विचार मला कळाले. मी मनात म्हणायचे की ह्या सर्वजणी असे का म्हणत आहेत? मलाच फक्त का आठवणी येतात भारतातल्या? या सर्वजणी इथे इतक्या रममाण कशा काय? माझी एक तेलगू मैत्रिण होती ती मात्र माझ्याशी गप्पा मारताना तिच्या हैद्राबादच्या आठवणी सांगायची व मी पण तिला पुणे मुंबईच्या आठवणी सांगायचे. आम्हाला दोघींना एकमेकींचा खूप आधार वाटायचा. ही झाली २००१ ची गोष्ट. नंतर जेव्हा तिच्या नवऱ्याने भारतात नोकरी पक्की केली तेव्हा तिचा पूर्ण मूड ऑफ झाला. मला वाटले की ही इतक्या आठवणी सांगत आहे तर तिला भारतात परत जाण्याचा आनंद होईल, पण तसे झाले नाही.माझी पाकिस्तानी मैत्रिण तर माझ्याच वयाची. तिची व माझी मैत्री झाली २००२ साली. तिचा नवरा तिच्यापेक्षा १५ वर्षाने मोठा व तिला ३ मुले. सर्वजण मेहनती. तिचा नवरा पोस्ट डॉक्टरेट करत होता, अजूनही करतो. माझी अजून एक तेलगू मैत्रिण आहे. तिचा नवऱ्यानेही १० वर्षे पोस्ट डॉक्टरेट केली व आता त्याला नोकरी आहे. हे तेलगू जोडपे सर्वांनाच मदत करायचे. या सर्व मैत्रिणींची व जवळपास सर्व बायकांची अमेरिकेत कायम राहण्याची तयारी आहे. आता ती तयारी का आहे आणि इथे राहण्यासाठी सर्वजण का धडपड करतात त्याचाही विचार मी केला त्याबद्दल नंतरच्या लेखात लिहीन. आमचा अजून एक असाच कुटुंब मित्र आहे तो नेहमी म्हणतो इंडियामें क्या रखा है? मला त्याचा खूप राग येतो, अरे इंडियात तर तुम्ही जन्म घेतलात, तिथले शिक्षण घेतले आणि वर इंडियाला नावे ठेवता? इथे मी काही भारतीय पाहिले आहेत. ते असा काही आव आणतात की त्यांचे हात जणू आभाळाला टेकले. भारतातील भारतीय लोकांना आम्ही अमेरिकेत आहोत याचा टेंभा मिरवतात.
मी म्हणते की तुम्ही भारतात असा किंवा परदेशात असा, ज्याप्रमाणे संधी उपलब्ध होते त्याप्रमाणे सर्वजण नोकरी व आता शिक्षण घेण्यासाठी सर्व देशामध्ये जात असतात. आता नोकऱ्या अस्थिर झाल्या आहेत. पूर्वी तर शक्यतोवर आपले शहर सोडून दुसऱ्या शहरात नोकरीसाठी जावे लागायचे नाही. आणि काहींना त्या शहरात नोकरीसाठी वाव नाही म्हणून पुण्यातून मुंबई शहरात नोकरी करून स्थिरस्थावर व्हायला लागायचे. आम्ही ४० व्या वर्षी भारतातील मोठ्या पगाराची नोकरी सोडून इथे पोस्ट डॉक्टरेट करण्यासाठी आलो त्याचे कारण की तुमच्या कपाळावर जर foreign returned चा शिक्का नसेल तर तुम्हाला प्रमोशन नाही. शिवाय तिथल्या नोकरीत division closed होण्याची चिन्हे दिसत होती. आम्हाला संधी मिळाली आणि इथे आलो. आम्हाला वाटले की आम्हीच फक्त चाळीशीत इथे आलोत, तर तसे नाही आमच्यासारखे काही जण ४० ते ४५ वयाच्या दरम्यान इथे आले आणि इथे नोकरीत स्थिर झाले. मी असाही एक डायलॉग ऐकलेला आहे, "ये बुढे लोग इधर क्या कर रहे है?"
अमेरिकेत तर तुम्ही आलात, पण पुढे काय? याचा थोडक्यात गोषवारा लिहिते. मागील लिखाणात मी लिहिलेले आहेच की अमेरिकेत वेगवेगळ्या कारणासाठी व त्याकरता लागणारा वेगवेगळा व्हीसा घेऊन इथे येतात. प्रत्येक व्हीसाचा कालावधी वेगळा असतो व त्याच्या अटींची पूर्तता करणे हे वेगळेच. शिवाय इथे आल्यावर आपण ज्या व्हीसावर आलो आहोत तो व्हीसा आधी टिकवावा लागतो व हे खूप जिकीरीचे काम आहे. सतत डोक्यावर टांगती तलवार. या व्हीसाच्या कालावधीमध्ये तुम्ही काय काम करता व ते व्हीसा टिकवण्याच्या मध्ये कसे महत्त्वाचे आहे हे विचारात घेतले जाते. विद्यार्थ्यांना ५ वर्षाचा व्हीसा मिळतो. तर आम्ही J1 व्हीसावर आलो त्याचा कालावधी होता फक्त १ वर्षे. नोकरीकरता आला असाल तर h1 व्हीसावर यावे लागते. नोकरीवर आला असाल तर ती नोकरी कायम कशी टिकेल आणि व्हीसाची मुदत कशी वाढवता येईल याकडे लक्ष द्यावे लागते. व्हिसा टिकवायचा प्रयत्न केलात तरी काही कारणाने ज्या कंपनीत तुम्ही काम करता त्या कंपनीचे दिवाळे वाजते किंवा ती कंपनी दुसऱ्या कंपनीत मर्ज होते त्यामुळे ती नोकरी सुटते. दुसऱ्या कंपनीमध्ये नोकरी बघायची असेल तर गुपचूप सर्व करावे लागते. म्हणजे दुसऱ्या कंपनीत अर्ज, इंटरव्हू वगैरे. कंपनीचे दिवाळे वाजले किंवा तुमचे काम पसंत नसेल तर तुमच्या हातावर नारळ ठेवतात आणि उद्यापासून येऊ नका सांगतात. अशा वेळी तातडीने दुसरी नोकरी किंवा दुसरी पोस्ट डॉक मिळवावी लागते. दुसरी नोकरी किंवा पोस्ट डॉक पकडून व्हीसा टिकवायला लागतो. अन्यथा भारतात परतावे लागते. जे एम एस करायला येतात त्यांचेही शिक्षण पूर्ण झाले की नोकरी नाही तर दुसरे शिक्षण यासाठी त्यांना वेगळा व्हीसा घ्यावा लागतो. काही कारणांसाठी हे सर्व जर का झाले नाही तर भारतात परतावे लागते. भारतात भारतभेटीसाठी जाण्यासाठी स्टॅपिंगसाठी जाणे ही तर अजून एक वेगळी कटकट आहे. ९ सप्टेंबरच्या इराकी हल्ल्यानंतर बरेच जणांना स्टॅपिंगसाठी खूप त्रास सहन करावा लागला आहे.
पोस्ट डॉक्टरेट किंवा पिएचडी करताना तुमची publications महत्त्वाची ठरतात. पोस्ट डॉक्टरेट म्हणजे एक प्रकारची कमी पगाराची नोकरी असते. यामध्ये पदवी घेणे व पदवीदान समारंभ नसतो. नवराबायको व एक मुलगा सुखाने नांदू शकतात. पिएचडी मध्ये पदवी असते आणि शिष्यवृत्ती बऱ्यापैकी असते, पण लग्न केले तर शिष्यवृत्ती पुरत नाही. पिएचडी करताना लग्न केले तर खूप कष्टदायक जीवन आहे. पिएचडी करताना बायकोचा जो व्हीसा असतो त्यावर तिला नोकरी करता येत नाही. अशा बायका इथे बेकायदेशीर नोकरी करून संसाराला हातभार लावतात. शिवाय वेळ पण जातो. या बायकांचे कष्ट मी बघितलेले आहेत. त्या सर्वांचे मला खूप कौतुक आहे. ऑरगॅनिक केमिस्ट्रीमध्ये phd काय किंवा post doct काय बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर असेच आहे त्यामुळे हुशारी व मेहनत हे दोन्हीही लागते. विनायकने ३ वर्षे ऑरगॅनिक केमिस्ट्रीमध्ये पोस्ट डॉक्टरेट केली. बरीच publications आली त्यामुळे त्याचा बॉस त्याच्यावर खूप खुश होता. नुसती पोस्ट डॉक केली नाही तर बरोबरीच्या सर्व जणांना संशोधनात मदत केली. शिवाय पिएचडी विद्यार्थ्यांना पण त्यांच्या कामात मदत केली.क्लेम्सन मधल्या ऑरगॅनिक केमिस्ट्रीच्या दुसऱ्या एका डिपार्टमेंटमध्ये एक श्रीलंकन विद्यार्थी होता. त्याचा बॉस खूप खडूस होता त्यामुळे त्याला पिएचडी करायला ६ ते ७ वर्षे लागली. त्याच्या बायकोला तर माझा साष्टांग दंडवत! तिने बेबीसिटींग करून पैसे कमावले व संसाराला हातभार लावला. काही दिवस नोकरी आहे तर काही दिवस नाही. तिची नोकरी खूपच कष्टदायक होति. तिच्या नोकरीत मी मोजून ४ दिवस तिला रजा मिळावी म्हणून काम केले होते. त्या चार दिवसातच मला खूपच दमायला झाले होते. आता तिच्या नवऱ्याला नोकरी आहे, ग्रीन कार्ड आहे, व एक मुलगाही आहे. सर्वाचे सार्थक झाले. माझ्या माहितीमध्ये अजूनही अशी ३-४ पीएचडी करणारी जोडपी होती. त्यांचे सर्वांचेच जीवन खूप कष्टदायक होते.क्रमश:.....

Friday, November 04, 2011

मी अनुभवलेली अमेरिका (5)

आम्ही जेव्हा भारतात भारतभेटीसाठी जातो तेव्हा आमच्या मित्रमंडळांपैकी काहीजण आवर्जून आम्हाला भेटायला येतात. मनमोकळेपणाने गप्पा मारतात. काही आम्हाला भारतातून इथे फोनही करतात तेव्हा खूप छान वाटते. काही जणांना काही कारणानिमित्त भेटणे झाले नाही तरीही राग धरून बसत नाहीत किंवा फोनवर सविस्तरपणे बोलतात.आम्ही एका मित्राकडे असेच गप्पा मारत बसलो होतो तर तिथे एकजण आले आणि आम्हाला विचारले की तुम्ही कुठे असता अमेरिकेत? तर आम्ही त्यांना सांगितले की आम्ही नॉर्थ कॅरोलायना राज्यात राहतो. त्यांचा चेहरा निर्विकार,, म्हणाले आमचा मुलगा न्युयॉर्कला राहतो. बऱ्याच जणांना अमेरिका म्हणजे ठराविक राज्य किंवा शहरे म्हणजेच अमेरिका असे वाटत असावे. उदा. न्युयॉर्क, न्युजर्सी, कॅलिफोर्निया कारण की बरेच भारतीय हे या अशा मोठ्या शहरांमध्येच येतात. अमेरिका देश किती मोठा आहे, त्यात राज्ये किती व त्यात शहरे किती याची माहिती करून घेण्यात स्वारस्य नसते जसे की भारतातही पुणे मुंबई ही शहरे सोडल्यास अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहर हे पण माहीत नसते किंवा स्वारस्य नसते.भारतातील काही जण मात्र आवर्जून आपुलकीने विचारतात तुम्ही वेळ कसा घालवता, भाज्या, फळे, बाजारहाट कसा करता, हवामान वगैरे कसे आहे. हवामानाच्या बाबतीतही बोलायचे झाले तर अमेरिकेत बर्फ पडतो हेच लोकांना माहिती पण इथेही रणरणते उन असते हे माहिती नसते. जसे की टेक्साज राज्यात उन्हाळा खूपच कडक असतो इतका की रात्री फिरायला बाहेर पडावे तरी उष्ण झळा लागतात.


गुळगुळीत रस्ते, कार्स, मोठमोठाली घरे, मोठमोठाले मॉल्स, एक डॉलर गुणिले ५० रुपये, म्हणजेच फक्त अमेरिका आहे असे नाही. अपार्टमेंटसची भाडी, टॅक्सेस, इन्शुरन्स, इथला डॉक्टर, इथे मोलकरीण नसल्याने करावी लागणारी सर्व प्रकारची कामे, काही शहरात भारतीय खूपच कमी, भारतीय उपहारगृह किंवा किराणामालाची दुकाने नाहीत, किंवा खूपच भारतीय आहेत, आणि फक्त होणारे पॉटलक किंवा गरजेनुसार भेटीगाठी अशा प्रकाराने ज्याला खरच अमेरिका जाणून घ्यायची इच्छा आहे त्याला बरेच काही सांगण्यासारखे आहे. भारतातून अनेक प्रकाराने भारतीय इथे येत असतात, त्यामध्ये अगदी सुरवातीला मी लिहिलेले आहे की आम्ही इथे पोस्ट डॉक्टरेट करण्यासाठी आलो. एकूण इथल्या भारतीय लोकसंख्येत विद्यार्थ्यांचे प्रमाण खूप आहे.एम. एस. करणारे, पीएचडी करणारे, त्यातही वर्गवारी आहे की जे इंजिनिअर होऊन लगेच इथे येतात, काही जण नोकरी करून मग ती सोडून इथे शिक्षणासाठी येतात, तर बरेच बडे बाप के बडे बेटे, किंवा अगदीच श्रीमंतच असे नाही तर इथला सर्व शिक्षणाचा, राहण्याचा खाण्यापिण्याचा सर्व खर्च चलनी रुपयांचे डॉलर्स मध्ये रुपांतर करून आईवडील भरतात. इतकेच नाही तर कोणत्याही प्रकारची इथे आबाळ होऊ न देणे, सर्व सणांचे पॅकेटस घरपोच कुरीअर तर्फे पाठवणे असेही आहेत. काही जण एम. एस करून नंतर पिएचडी करणारे व ती संपल्यानंतर पोस्ट डॉक्टरेट करणारेही आहेत. या सर्वात यांचा कालावधी १०-१२ वर्षे जातो.
डॉक्टर्स, मोटेल्सवाले, भारतीय कंपनीतून बी १ व्हीसावर इथे कामानिमित्ताने येणारे किंवा एच १ व्हिसावर थेट इथली नोकरी घेणरेही आहेत. विद्यार्थ्यांप्रमाणेच सॉफ्टवेअर कंपन्यातून येणारे बरेच भारतीय आहेत. सगळ्यात छोटी कम्युनिटी ही पिएचडी किंवा पोस्ट डॉक्टरेट करणाऱ्यांची आहे. प्रत्येकाचा व्हीसा वेगळा, प्रत्येक व्हीसाच्या कटकटी वेगळ्या. ग्रीन कार्डासाठी अर्ज केल्यावर प्रत्येक व्हीसानुसार लागणारा कालावधीही वेगळा. त्यात वकीलांचे अनुभवही प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. इथे नोकरीनिमित्ताने मिळणारा पैसाही कोणाला कमी तर कोणाला जास्त आहे. शिवाय शिष्यवृत्तीही वेगवेगळी आहे. J1, H1, B1, O1, यांच्या डिपेंडंट लोकांचे व्हीसेही वेगळे आणि त्याचा कालावधी, अटीही वेगवेगळ्या. काही डिपेंन्डंट व्हिसावर नोकरी करण्यासाठी वेगळे परवानगी मिळते तर कोणाला नाही. यात H4 व्हिसावर नोकरी करता येत नाही. शिक्षण घेता येते. या व्हिसामध्ये तुम्हाला घरीच बसावे लागते. काही जण इथे बेकायदेशीर नोकरी करून पैसे मिळवतात. नुसते पैसे मिळवणे हा उद्देश्य नसतो तर त्यात वेळ घालवणे हा पण हेतू असतो. शिवाय नोकरी देणारा व घेणारा या दोघांनाही गरज असते. पण अशी बेकायदेशीर नोकरी पकडली गेली तर मात्र तुमची रवानगी थेट भारतात होते. त्यानंतर तुम्हाला कोणत्याही कारणास्तव इथे परत येता येत नाही.


या एच ४ व्हीसावर ज्या बायका असतात त्या काहीतरी मार्ग शोधतात किंवा निवडतात. काही जणी शिक्षण घेतात, तर काही जणी बेकायदेशीर नोकरी वेळ घालवण्यासाठी किंवा थोडाफार पैशाचा हातभार लावण्यासाठी करतात. तर कोणी आपापले छंद जोपासतात. नाहीतर दिवसभर ऑनलाईन जो कोणी दिसेल त्यांच्याशी गप्पागोष्टी करतात. काही जणी वेळ जाण्यासाठी लायब्ररीत जाऊन काम करतात तर काही जण इथे लायब्ररीत मिळणारी पुस्तके वाचून काढतात. काही जणी कार शिकून कार मधून भटकंती करून वेळ घालवतात. इंटरनेट या प्रभावी माध्यमामुळे आजकाल जगाच्या पाठीवर असलेले सर्व मित्रमंडळी, नातेवाईक बोलू शकतात, वेबकॅमवर एकमेकांना बघू शकतात, अर्थात इच्छा असेल तर. नाहीतर वेळ होत नाही असे सांगितले जाते. इथेही प्रत्येकजण काही ना काही करतच असतो. दोघेही नोकरी करून दोन मुले सांभाळणे म्हणजे काही जोक नाही पण भारतातले भारतीय म्हणताना दिसतात की तिथे काय यंत्र आहेत ना कामे करायला,, हो आहेत पण ती चालवायला लागतातच. आपोआप यंत्रे चालून कामे होत नाहीत. इथेही हेक्टीक जीवन आहे फक्त वेगळ्या प्रकारचे. हवामान चांगले असल्याने जास्त दमायला होत नाही पण तितकाच हवामानाचा वाईट परिणामही आहे. जिथे बर्फ पडतो तिथे खूप डिप्रेशन येते. शिवाय दोघेच्या दोघे असल्याने तोच तो पणा येतो. काही ठिकाणी जिथे कोणीही भारतीय नाहीत अशी काही शहरे आहेत. तर काही ठिकाणी बरेच भारतीय असूनही एकटेपणा आहेच. इथे आलागेला प्रकार नाही, तसा तो भारतातही हल्ली कुठे राहिला आहे? हल्ली सर्वच ठिकाणी प्रत्यक्षात न भेटता, किंवा कोणाच्या घरी न भेटता ऑनलाईन, होटेलमध्ये किंवा पार्कात परस्पर येऊन भेटणे झाले आहे. घरी येणे जाणे, किंवा घरी जेवणे हे प्रकार बऱ्याच प्रमाणात कमी झालेले आहेत. सर्व जण चार हात दूरच राहणे पसंत करतात मग तो भारत असो नाही तर परदेस.


क्रमश:....

Tuesday, November 01, 2011

आमचा पहिलावहिला लांब पल्ल्याचा कारप्रवास

अमेरिकेत आल्यावर बरीच वर्षे आम्ही (चारचाकी) गाडी घेतली नव्हती, कारण विद्यापीठातील बससेवा चांगली होती. घराच्या जवळच बसथांबा होता. विद्यापीठात जाणे येणे व इतर सर्व गरजेच्या ठिकाणी बसमधून जाणे सोयीचे होते. दुसरे म्हणजे मुंबईत वाहन चालवायची वेळ कधीच आली नव्हती आणि तसेही ती वेळ कधी येतच नाही.२००१ साली अमेरिकेत आल्यानंतर सुमारे चार वर्षांनी आम्ही गाडी खरेदी केली. विनायकने चारचाकी शिकण्याचे काही धडे घेतले आणि थोडा सरावही सुरू केला. सराव केल्यावर आम्ही आमच्या चारचाकीमधून किराणासामान आणि भाजीपाला आणायला जाऊ लागलो. बराच सराव केल्यावर विनायकने परीक्षा दिली आणि त्याला चारचाकी चालवण्याचा पक्का परवाना मिळाला. काही दिवसातच आम्हाला लांब पल्ल्याच्या मुक्कामी जायची संधी मिळाली. विनायकच्या मित्राने एका समारंभाचे निमंत्रण फोनवर दिले आणि म्हणाला "गाडी असल्याने आता तुम्हाला आमच्याकडे यायला काहीच हरकत नाही. तुम्ही याच. " विनायकने जायचे ठरवले तरी पण मी नाखुष होते. मी म्हणाले "आपण विमानाने जाऊ ना, नाहीतर इथेही काही बससेवा असतीलच की त्या गूगलवर शोधू आणि बसने जाऊ." कार असताना बसने प्रवास करण्याची कल्पना विनायकला खूप हास्यास्पद वाटली. मी नाखूष होते याचे कारण मला गाडी अजिबात आवडत नाही. मला बसने किंवा आगगाडीने प्रवास करायला खूप आवडतो. मला भारतात असताना रिक्षाची खूप सवय होती. मी एक नंबरची घाबरट आणि कोणतेही वाहन चालवण्याची आवड नसल्याने सायकलही खूप उशीराने शिकले. सायकल शिकताना खड्ड्यात पडता पडता वाचले. सराव केला नाही. नंतर स्कूटर शिकले पण सराव केला नाही. एक दिवस मामेभाऊ घरी आला तेव्हा त्याने त्याची एम-५० आणली होती. स्कूटर शिकल्याने जणू काही आता आपल्याला गाडी चालवायला यायला लागली असे समजून त्याला विचारले की एक चक्कर मारू का? त्यावर तो म्हणाला "चालेल पण मी तुझ्या मागच्या सीटवर बसेन. तुझा काही भरवसा नाही." गाडी सुरू केली आणि वेग वाढवला तर तो खूपच वाढला आणि मला ब्रेक कसा मारायचा हे लक्षात न आल्याने स्कूटर वाकडीतिकडी होऊन जमिनीवर जोरात आदळली. नशिबाने मामेभाऊ मागे बसल्याने त्याने कसाबसा ब्रेक मारला. या प्रकाराचा मी चांगलाच धसका घेतला होता.


विनायकला गाडीमधून न जाण्याची बरेच कारणे सांगून झाली. शेवटी विनायकने "आता तुझी नाटके पुरे झाली. याहू नकाशा काढ आणि जायच्या तयारीला लाग." असे सांगितले. मी जाम गंभीर झाले होते. मनात म्हणाले, तुला काय! तू फक्त गाडी व्यवस्थित धावते आहे ना इकडेच पाहणार. मलाच नकाशा वाचून दाखवायचा आहे पोथीसारखा! म्हणजे माझी जबाबदारी जास्त! याहू नकाशा आणि मॅपक्वेस्ट नकाशा असे जाण्यायेण्याचे प्रत्येकी दोन नकाशे शोधले, त्याच्या छापील प्रती काढल्या, व नीट अभ्यास केला. नशिबाने दोन्ही नकाश्यांनी जाण्यायेण्याचे रस्ते एकच दिले होते. फरक इतकाच होता की दोन्हीमध्ये जाण्याचा रस्ता येण्याच्या रस्त्याहून वेगळा होता. मैल किती, रस्तेबदल (एक्झिट्स) किती, सर्व पाहिले. त्यात एकूण सहा रस्तेबदल होते. सर्व तयारीनिशी सकाळी ९ ला बाहेर पडलो. गाडी सुरू केली. गाडीला हातानेच ३-४ वेळेला नमस्कार केला, असा नमस्कार तर मी अजूनही करते! माझ्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव बघून विनायक म्हणाला "काळजी करू नकोस. मी पण नवशिकाच आहे त्यामुळे रस्त्यावर जी कमाल वेगमर्यादा ठरवून दिली आहे त्यापुढे नक्कीच जाणार नाही. आणि तूही नकाश्याचा अभ्यास केला आहेस ना, मग काळजी कसली? मी म्हणाले "अरे हो, पण तरीही पहिलाच प्रवास आहे आणि तोही लांब पल्ल्याचा त्यामुळे मला थोडी भीती वाटत आहे." विनायकने कार सुरू केली. मी गाडीच्या मैलांचा आकडा पाहिला आणि तो कागदावर लिहिला. पहिली एक्झिट किती मैलावर येणार आहे त्यावर माझ्या बेरजा वजाबाक्या सुरू झाल्या.

प्रवास ६- ७ तासांचा, साधारण ३५० मैलांचा (५५० किमीचा) होता. गाडी चालवण्याचा कायमचा परवाना मिळून आठवडाच झाला होता. प्रवासाच्या आधीच्या आठवड्यात महामार्गावर जाऊन येऊन थोडा प्रवास केला. एक चाचणी घेतली. जन्मात कधी गाडी चालवण्याची वेळ आली नव्हती आणि महामार्गावर तर अजिबातच नाही. ही चाचणी घेतल्याने माझी भीड थोडी चेपली, पण तरीही पुढे काय अडचणी येऊ शकतील अशी एक भीतीही मनात होतीच. गाडी सुरू केल्यावर थोड्यावेळाने शहर सोडून महामार्गावर जाण्यासाठी एक एक्झिट लागली. ती एक्झिट लागल्या लागल्या माझी बडबड सुरू झाली. "हळू रे! वेग कमी कर! बापरे! किती मोठी एक्झिट आहे!" पूर्णपणे वर्तुळाकार आणि उंचावरून खाली येणाऱ्या रँपवरून जाताना तर मी माझा श्वास रोखून ठेवला होता. आता महामार्गावरून आमची गाडी जलद धावत होती. म्हणजे कमाल मर्यादेपेक्षा कमीच, पण आम्हाला इतकाही वेग नवीन असल्याने जास्त वाटत होता. मजा वाटत होती. एकाच रांगेतून नुसते धावत सुटायचे. कोणताही अडथळा नाही हे पाहून माझी भीड चेपत होती. अचानक विनायकने उजवी रांग सोडून डाव्या रांगेत गाडी आणली आणि वेगही वाढवला. परत माझी बडबड सुरू. "हे काय? डाव्या रांगेत कशाला? वेग कमी कर." पण मी आता जर काही जास्त बोलले तर दोघांच्या चिडचिडीमध्ये अपघात होईल या भीतीने "चुपचाप" बसले. उजव्या रांगेत जो ट्रक होता त्याला ओलांडून त्याच्यापुढे विनायकने गाडी परत उजव्या रांगेत आणली आणि म्हणाला "आता कळाले का मी डाव्या रांगेत का आलो ते? अगं, अशा धुडांना मागे टाकण्यासाठी असे करावेच लागते, नाहीतर आपल्याला "हळूहळू" करत जायला लागले असते." तसे ते मला पटलेही होते पण डाव्या रांगेतून जेव्हा विनायक कार अतिजलद वेगाने ट्रकच्या पुढे नेत होता तेव्हा तर मी खूप "स्तब्ध" झाले होते! हळूहळू माझा आत्मविश्वास वाढत होता. गाडीच्या वेगाने धावण्याची सवय झाली आणि प्रवासाचा आनंदही वाटायला लागला. सर्व एक्झिटा व्यवस्थित पार केल्या. माझे मैलांचे आणि एक्झिटांचे गणितही अगदी बरोबर चालले होते.

इतका वेळ छान चाललेला प्रवास शेवटी थोडा कंटाळवाणा झाला. प्रवास करून बराच वेळ झाला होता त्यामुळे ७४/७६ जोड महामार्ग कधी एकदा संपतोय आणि विल्मिंग्टन शहराचा चेहरा कधी एकदा पाहतोय असे झाले होते. शेवटी एकदाचे आम्ही विनायकच्या मित्राच्या घरी पोहोचलो. घरी पोहचता पोहचता मी विनायकला म्हणाले,"मी उगाचच घाबरत होते. अमेरिकेत लांब पल्ल्याचा प्रवास इतका अवघड नाही तर! आता खूप छान वाटते आहे." त्यावर विनायक मला म्हणाला "तुझा आताचा चेहरा आणि सकाळचा चेहरा असे दोन वेगळे फोटो काढून ठेवायला पाहिजे होते" त्यावर मी "हाहाहा, आता माझा आत्मविश्वास वाढला आहे", असे सांगितले.


दुसऱ्या दिवशीचा निरोप समारंभ आटोपून निघालो. मित्र म्हणाला "जाताना शार्लोटवरून का नाही जात? एकदम सरळ रस्ता आहे" त्याला म्हणालो "नको पहिलाच मोठा प्रवास आहे. हातात असलेल्या नकाश्यावरूनच जातो" गाडी सुरू करून त्याला टाटा,बाय-बाय केले. परतीच्या प्रवासाला निघताना उलटा सीन होता. माझ्या आत्मविश्वासाने खूप उंची गाठली होती. विनायकच्या चेहऱ्याकडे बघितले तर त्याचाही आत्मविश्वास वाढलेला जाणवत होता. परतीच्या प्रवासाचा नकाशा हातात घेऊन बसले. ज्या रस्त्याने आलो अगदी त्याच रस्त्याने परत असा हा नकाशा नव्हता. थोडा वेगळा होता. महामार्ग ७६ वर १२० मैल जायचे होते, नंतर दुसरा रस्ता पकडायचा होता. आम्ही ७४/७६ जोडमार्गाने निघालो आणि १२० मैल गेल्यावर अपेक्षित दुसरा रस्ता कुठे आहे बघायला लागलो. मैल थोडे मागेपुढे होऊ शकतात म्हणून आणखी २५ - ३० मैल पुढे गेलो तरी अपेक्षित रस्ता दिसेना. दरम्यान अशीही ज्ञानप्राप्ती झाली की ७४/७६ जोडमार्ग जाऊन सध्या फक्त ७४ सुरू आहे म्हणजे महामार्ग ७६ केव्हातरी वेगळा झाला आणि त्याचा फाटा कुठे येतो हे नकाश्यात न सांगितल्याने हा गोंधळ झाला होता. समोर शार्लोट शहर ७० - ८० मैल असल्याचे फलक दिसायला लागले. मित्र म्हणाला तसे शार्लोटवरून जाता आले असते पण बरोबर नकाशा नव्हता.रस्त्यावर कोणीही नव्हते. एखादीच कार धावताना दिसत होती. निर्मनुष्य मोकळा रस्ता मनात भीती निर्माण करत होता. आम्ही दोघेही पेचप्रसंगात पडलो होतो. ऐन थंडीचे दिवस होते त्यामुळे दिवसही लवकर लहान होत होता. हळूहळू सूर्यप्रकाश कमी होत होता. आता काय करायचे? नक्की कुठे जायचे? कोणतीही एक्झिट दिसायला तयार नव्हती. विनायक म्हणाला "आपण उलटे परत फिरू" पण उलटे फिरायला यू टर्नही दिसत नव्हता. मी म्हणाले " छे, उलटे फिरायला नको रे. अंधार पडायला सुरवात झाली आहे. आपण खूप अंतर पुढे आलो आहोत. उलटे फिरून ७६ चा फाटा दिसला नाही तर काय करायचे?" त्यावेळी आमच्याकडे सेल फोन नव्हता. फक्त याहू - मॅपक्वेस्ट नकाश्यांचा आधार होता. मला तर रडू कोसळायच्या बेतात होते. जवळ एकही पेट्रोल पंप दिसत नव्हता. हा काय प्रकार आहे? पेट्रोल म्हणता लक्ष गेले तर तेही संपत आले होते. दोघेही केविलवाणे झालो. तेवढ्यात एक यू टर्न दिसला आणि डाव्या बाजूला एक सरळ जाणारा रस्ताही दिसला. रस्त्याचा चौक असतो तसे काहीतरी वाटले. मी लगेच ओरडले "लवकर घुसव गाडी समोरच्या रस्त्याला. तिथे काहीतरी मिळेल आपल्याला. आता सरळ जाणे नको." डावीकडे जाण्याऱ्या सरळ रस्त्यावर कार नेली खरी पण लगेचच एक यू टर्न घेऊन विनायकने कार परत मुख्य रस्त्यालाच आणली. मी म्हणाले " हे काय?" विनायक म्हणाला "आपण याच रस्त्याने सरळ जाऊ. पुढे आपल्याला शार्लोट नक्की लागेल." मी म्हणाले "आणि नाही लागले तर?" विनायकने रागाने माझ्याकडे पाहिले. माझ्याही लक्षात आले की आता आपणही थोडे धीराने घेतले पाहिजे. त्या ओसाड रस्त्यावरही आम्हाला जंगलात येऊन अडकल्यासारखे वाटत होते.


मी कोणतीही बडबड न करता शांत बसले खरी पण माझ्या मनात वाईट विचारांचे थैमान सुरू झाले. कोणत्याही क्षणी ठप्प अंधार होईल, पेट्रोल संपेल आणि गाडी रस्त्याच्या एका बाजूला लावून मागचे लुकलुकणारे दिवे लावून कोणी दिसते का ते पाहून आणि दिसले तर त्याला हातवारे करून 'मदत करा' असे करावे लागेल. आणि असे केले तरी कोणी मदतीला येईल का? मदतीला येण्याकरता एकही गाडी जाताना दिसत नव्हती. ती सोडा, एखादे चिटपाखरू पण दिसत नव्हते. ९११ पोलिसांचा नंबर मदतीसाठी फिरवावा तर फोनही नाही. आता मात्र मी मनातल्या मनात देवाचा धावा करू लागले. काहीतरी दिसू दे. पेट्रोल पंप नाही तरी एखादे शॉपिंग कॉम्प्लेक्स तरी दिसू दे म्हणजे तिथे कार थांबवून पुढे काय करायचे हे सुचेल. तेवढ्यात शार्लोट शहर काही मैलांवरच आहे असे दर्शवणाऱ्या हिरव्या पाट्या दिसू लागल्या. विनायक म्हणाला, "आता काही मैलांवर शार्लोट येईल. तू फक्त कुठे पेट्रोल पंप दिसतो का यावर लक्ष ठेव." माझा परत धावा सुरू झाला, "देवा देवा, लवकर पेट्रोल पंप दिसू दे." पेट्रोल संपण्याच्या निर्देशकावर माझे लक्ष होतेच. काटा पुढे पुढे सरकत होता आणि तेवढ्यात दूरवर काहीतरी आहे असे दिसले. नशिबाने तो एक छोटा पेट्रोल पंपच होता. पेट्रोल भरले. बाजूच्या दुकानात जाऊन कोकाकोला व पाणी विकत घेतले. थोडे बटाटा चिप्स घेतले. तोंडचे पाणी पार पळाले होते. गाडीमध्ये पेट्रोल भरल्यावर आणि कोरड्या घशात पाणी गेल्यावर बरेच हायसे वाटले. थोडीफार चिंता मिटली होती पण आता कोणाला विचारायचे की हा रस्ता कोणता आणि पुढे कसे जायचे? नशिबाने तिथे दोन चार गाड्या उभ्या असलेल्या दिसल्या. त्यात एक छोटा ट्रक टेम्पो होता. तो निघणार तितक्यात त्या वाहनचालकाला हात दाखवून थांबवले व विचारले " हा आमचा नकाशा. हा रस्ता कोणता आहे आणि क्लेम्सनला कसे जायचे?" त्याने टेम्पोतून कागदी मोठा नकाशा काढला आणि सांगितले "७६ केव्हाच मागे पडला. क्लेम्सनला जायचे तर सरळ जा, शार्लोट लागेल. तिथून महामार्ग ८५ दक्षिण घ्या, एक्झिट १९ बी वरून क्लेम्सनला जाता येईल." विनायकने विचारले "महामार्ग ८५ किती अंतरावर लागेल?" तो म्हणाला "तुमच्या नजरेतून महामार्ग ८५ सुटूच शकत नाही इतका ठळक आहे, तेव्हा तो आला की समजेलच. त्याचे आम्ही अनेकदा आभार मानले व गाडी सुरू केली.


अंधार पडला होता. त्या माणसाने सांगितलेले एक्झिट क्रमांक व महामार्ग क्रमांक मी लिहून घेतले होते. आता मात्र डोळ्यात तेल घालून बघण्याची वेळ आली होती. इथे महामार्गावर दिवे नसतात. आपल्या गाडीच्या पुढच्या दिव्याचा झोत पडेल तितकाच रस्ता दिसतो आणि हिरव्या पाट्या दिसतात ज्यावर कोणते शहर पुढे येणार किंवा कोणती एक्झिट येणार हे दिसते. आता माझे मैलाचे हिशेब संपले. नजर फक्त समोर आणि तीक्ष्ण. पहिल्या प्रवासात अंधारात गाडी चालवण्याचेही नशिबात लिहिले होते. आता शार्लोट शहरातून जात असल्याने झगमगाट, दुकाने, मोठ्या इमारती दिसायला लागल्याने थोडे माणसांत आल्यासारखे वाटले. अर्थात शहरातून गर्दीमुळे, कमी वेगमर्यादेमुळे, शहरातल्या रस्त्यांची नीट कल्पना नसल्याने आणि महामार्ग ८५ केव्हा येणार याबद्दलच्या अनिश्चिततेने गाडी हळूहळू चालवत होतो. महामार्ग ८५ एक्झिटची पाटी दिसली आणि आम्ही दोघेही अतिदक्ष झालो. तेवढ्यात महामार्ग ८५ दक्षिणची एक्झिट डावीकडे असल्याची खूण दिसली आणि एक्झिट उजवीकडे येईल या अपेक्षेने आमची गाडी अगदी उजव्या रांगेत. मधल्या तीन - चार रांगा पार करून एक्झिट घेणार कशी? माझा परत आरडाओरडा सुरू. विनायकला म्हणाले, " विनायक, एक्झिट डावीकडे आहे. तू एकदम डाव्या रांगेत जाऊ नकोस. खूप गाड्या येत आहेत आणि त्याही खूप जोरात! " डावीकडे जायचा सिग्नल दिला होता आणि काही सेकंदांसाठी आम्ही चक्क आमची गाडी थांबवली. आमचा नवशिकेपणा जाणवून बाजूच्या रांगेतल्या गाड्याही काही सेकंदांकरता थांबल्या व आम्ही डावीकडे झटकन गेलो व एक्झिट घेतली. एक्झिट घेऊन ८५ दक्षिण महामार्गाला लागल्यावर एक सुटकेचा निःश्वास टाकला! मी म्हणाले, "बापरे! काय हा भयंकर अनुभव!" विनायक म्हणाला, "चालायचेच. सर्वांना काही ना काही अनुभव येत असतात, आपल्यालाच असे वाटते की आपणच दिव्यातून जात आहोत." मी म्हणाले, " तेही खरे आहेच. फक्त बाकीचे त्यांचे अनुभव उघडपणे सांगत नाहीत. बाकीच्यांचे अनुभव आपल्यापेक्षाही खतरनाक असतील."आता आम्ही महामार्गावर मधल्या रांगेतून जात होतो. नुकत्याच आलेल्या अनुभवामुळे एक्झिट आता कुठेही येऊ शकते त्यामुळे मधल्या रांगेत असलेले चांगले म्हणजे एक्झिट पाहून झटपट हालचाल करता येईल. माझी नजर आता चौफेर भिरभिरू लागली. क्लेम्सनची एक्झिट चुकता कामा नये कारण आता परत सव्यापसव्य करायची ताकद उरलेली नव्हती. कधी एकदा आपले घर येते असे झाले होते. काही वेळाने क्लेम्सनला जाण्यासाठीची एक्झिट १९बी दिसली आणि जीव भांड्यात पडला. पुढे अर्ध्या तासात घरी पोचलो. आश्चर्य म्हणजे इतके सगळे नाटक होऊनही अगदी सात तासांमध्ये सुखरूप पोचलो होतो. ऐन हिवाळ्याचे दिवस असल्याने थंडी प्रचंड पडली होती. घरात गेलो आणि हीटर चालू केला आणि गरमागरम चहा करायला टाकला. घरात आल्यावर उबदारही वाटत होते आणि सुरक्षितही! चारचाकीच्या आमच्या पहिल्यावहिल्या अनुभवामध्ये मोलाची भर पडली होती!