Thursday, June 27, 2013

Art Photography


















बदके


























आज इथं तर उद्या तिथं .... (६)

मोठाल्या बॅगा घेऊन आम्ही मोटेलच्या रूममध्ये प्रवेश केला. प्राध्यापक डीटर यांनी आमच्यासाठी एका मोटेलमध्ये रूम बुक करून ठेवली होती. त्यांनी सांगितले की इथे जवळच सब-वे आहे. त्यांनी विचारले की तुमचे मित्र आहेत तर त्यांना तुम्ही इथल्या अपार्टमेंटबद्दल काही विचारले आहे का? नसेल तर मी त्यांच्याशी बोलून बघतो. एवढे सांगून त्यांनी आम्हाला टाटा केला.






खूप दमायला झाले होते. एक तर आधी पॅकींग, घराची साफसफाई करून दमायला झाले होते आणि त्यात भर म्हणजे गोंधळात गोंधळ झाल्यामुळे आम्ही बुक केलेली आमची थेट फ्लाईट चुकली होती. त्यानंतर सव्यापसव्य करून एकदाचे आम्ही क्लेम्सनात पोहोचलो होतो. बेड वर पडलो आणि जी झोप लागली ते एकदम सकाळी उशिरानेच जाग आली. विनायक माझ्या आधीच उठला होता आणि मला म्हणाला रोहिणी, उठ, बाहेर बघ किती छान दिसत आहे, छान आहे क्लेम्सन ! मी मात्र हंऽऽऽऽ नको. जाउ देत, मला खूप झोप येत आहे, उठवतच नाहीये असे म्हणून परत डोळे मिटले. तितक्यात दारावर थाप ऐकू आली. दारावर मोटेलचे मालक उभे होते. ते म्हणाले की मी तुम्हाला आमच्या घरून गरम चहा पाठवतो. आम्ही सर्वांना देत नाही. पण तुम्ही भारतीय आहात आणि खूप दमलेलेही दिसत आहात म्हणून चहा पाठवत आहे. मोटेलचे मालक गुजराथी होते. चहा पाठवत आहे म्हणल्यावर मला उठायलाच लागले!







ब्रश करून आम्ही दोघेही मोटेलच्या बाहेर आलो तर स्वच्छ सुंदर सकाळ अनुभवायला मिळाली. हवेत सुखद गारवा होता. गरमगरम चहा प्यायल्यावर जरा तरररी आली. अंघोळपांघोळ झाल्यावर विनायक म्हणाला चला, आता पुढच्या तयारीला लागले पाहिजे. प्राधापकांना विनायकने फोन लावला तर ते म्हणाले की मी तुमच्या मित्राशी बोलून ठेवले आहे आणि ते तुमची काही दिवस तुम्हाला तुमची जागा मिळेपर्यंत त्यांच्याकडे राहण्याची सोय करत आहेत तर तुम्ही मोटेल सोडा आणि विद्यापीठात या. मी तुम्हाला घ्यायला येत आहे. तासाभरात तयार रहा.






बाकीचे सर्व आवरून प्रवासात घेतलेल्या काही कूकीज व बटाटा चिप्स खाऊन घेतले आणि प्राध्यापकांची वाट पाहत उभे राहिलो. त्यांचा वेळ मोडू नये म्हणून चेक आऊट करून आमच्या सर्व बॅगा आणि इतर सामानही बाहेर काढून ठेवले होते. ठरलेल्या वेळेला प्राध्यापक आम्हाला नेण्याकरता हजर झाले आणि आम्ही आमच्या सामानासकट विद्यापीठात येऊन पोहोचलो. आम्ही दोघे त्यांच्याबरोबर लॅबमध्ये गेलो. तिथून दुसऱ्या ऑफीसमध्ये चालत गेलो आणि व्हीसा आणि इतर काही कागदपत्रांची सह्यांसकट पूर्तता केली. विद्यापीठाचा परिसर खूपच मोठा असल्याने इकडून तिकडे व तिकडून इतके चालत गेल्याने खूप दमायला झाले. भूकही खूप लागली होती. कुठेतरी एकदाचे स्थिरस्थावर झाल्याशिवाय चैन पडत नव्हते. हे मूव्हींग खूपच भारी पडले होते. विद्यापीठातली कामे संपली आणि प्राध्यापक म्हणाले इथल्या विद्यापीठाच्या परिसरातच एक चांगले कॅटीन आहे. तिथे तुम्ही जेवून घ्या. मग मी तुम्हाला तुमच्या मित्राकडे कारने सोडतो. जेवेपर्यंत दुपारचे तीन वाजत आले होते. कॅटीनमध्ये ब्रेड, सॅलड आणि कॉफी घेतली. हेच जेवण होते पण भूक इतकी काही लागलेली होती की जीव नसल्यागत झाले होते त्यामुळे ते जेवणही चविष्ट लागले. पोटभर जेवलो तेव्हा कुठे जीवात जीव आला.







ज्या मित्राकडे प्राध्यापकांनी आम्हाला सोडले होते तो मित्र एका उंच डोंगरावर राहत होता. क्लेम्सन शहर हे असेच उंचसखल भागात विभागलेले आहे. काही घर डोंगरावर तर काही खाली पायथ्याला तर काही दुसऱ्या बाजूच्या पठारावर विसावलेली आहेत. येमुल सुनिताला आम्ही आधी ओळखत नव्हतो. त्यांच्या मित्रांनी आम्हाला अडीअडचणीकरता त्यांचा पत्ता दिला होता. घरी सुनिता व तिचा मुलगा प्रथमेश होता. तिने आमचे हसतमुखाने स्वागत केले आणि विचारले काही खायला करू का? तर आम्ही म्हणालो नको. आमचे आताच खूप उशिराने जेवण झाले आहे. चहापाणी झाले व आमच्या गप्पा सुरू झाल्या. तिचा मुलगा खेळकर असल्याने त्याच्याशी खेळण्यात पण वेळ गेला. थोड्यावेळाने येमुल आला आणि परत आमच्या गप्पा सुरू झाल्या. येमुल तलगू आणि सुनिता मराठी आहे. तीही पुण्याचीच असल्याने अधिकच छान झाले होते.







त्यांच्याकडे आम्ही साधारण एक आठवडा होतो. पोस्टाने पाठवलेली आमची खोकी त्यांच्या घरी आधीच येवून पडली होती. पोस्डॉकच्या लोकांकरता वेगळी अपार्टमेंट होती पण त्यातले एकही शिल्लक नव्हते. विनायक रोज उठून चालत चालत डोंगर उतरून व चढून लॅबमध्ये येजा करत होता. मी सुनिताला सांगितले की मी रोज पोळ्या करीन. भाजी चिरून देईन. आमची छान गट्टी जमून गेली होती. उन्हाळा चालू झाला होता पण त्यांचा कूलर बिघडल्याने रात्रभर उकाड्याने आम्हाला झोप लागायची नाही. मी दुपारी झोप काढायचे पण विनायकला रोजच्या रोज लॅबमध्ये जावे लागत असल्याने त्याला नीट विश्रांती मिळत नव्हती. शिवाय त्यांच्या घरापासून कपडे धुलाईचे दुकानही खूप लांब होते. तिथे धुणे घेऊन चालत जाणे शक्यच नव्हते. त्यांच्याकडे कार होती पण ते कार फक्त किराणामाल आणि भाजी आणण्याकरताच बाहेर काढत होते. मी रोजच्या रोज विनायकचे व माझे कपडे अंघोळ करण्याच्या टबात धूवत होते. कपडे धुण्यामुळे तर माझे कंबरडे पार मोडून गेले होते. दुपारी सुनिता चहा करायची व आम्ही दोघी प्रथमेशला घेऊन तिच्या घराजवळच असलेल्या पार्कमध्ये जायचो. त्यांच्या घराच्या आजूबाजूचा परिसर खूप छान होता. टेकाडावरून खालचा वाहता रस्ता दिसायचा. रात्री जेवणे झाल्यावर आम्ही दोघे चक्कर मारून यायचो. काळाकुट्ट अंधार असायचा आणि खाली जायचा रस्ता उतारावर होता. परत येताना ही मोठी चढणच चढण. परत रस्ता चुकायची भीती ! पण तरीही आम्ही पाय मोकळे करण्याकरता बाहेर पडायचो. क्वचित प्रथमेशला बरोबर न्यायचो. काळ्याकुटा अंधारातही चांदणे असल्याने छान वाटायचे. एकूण त्यांच्या घरातले दिवस खूप छान गेले!







क्लेम्सनला अपार्टमेंट मिळता मिळता खूपच वांदे झाले होते. एक तर सर्व अपार्टमेंट ३ ते ४ बेडरूमची होती आणि कोणतीही खाली नव्हती. शेवटी एक विद्यार्थी त्याचे शिक्षण पूर्ण करून ती जागा सोडून निघून चालला होता, तर त्याची जागा आम्हाला मिळाली आणि तीही फक्त ३ महिन्यांकरता ! जी जागा मिळाली आहे ती पदरात पाडून घ्या, पुढचे पुढे बघता येईल असा विचार करून आम्ही ती जागा घेतली. कधी एकदा आमच्या घरात रहायला जात आहोत असे आम्हाला झाले होते. असे अधांतरी लटकत किती दिवस रहायचे ना ! ही जागा ३ बेडरूमची मोठी होती. हॉल आणि किचन कॉमन होते. खाली झालेल्या एका बेडरूममध्ये आम्ही शिफ्ट झालो. दुसऱ्या २ बेडरूम होत्या पण त्यात विद्यार्थी राहत होते पण ते सर्व उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या म्हणून गावी गेले होते. जागेमध्ये बेड, सोफा, टी पाय, धुलाई मशीन, मायक्रोवेव्ह असे सर्व काही होते. दैनंदिन जीवनात लागणाऱ्या सर्व गोष्टीची परत एकदा नव्याने खरेदी केली. भारतीय किराणामाल खोक्यातून आलाच होता. थोड्या भाज्याही घेतल्या.








परत एकदा आमच्या सर्व सामानाची आवरा आवर झाली आणि आम्ही येमुल सुनिताचा निरोप घेऊन निघालो. यावेळीही प्राध्यापक डीटर यांनी आमच्या सामानासकट आम्हाला आमच्या नवीन जागेत पोहोचते केले. सुनिताही त्या शहरात नवीनच होती. ती निघताना मला म्हणाली बरे झाले तुम्ही आलात ते. मला एक बोलायला मैत्रिण मिळाली. मलाही अगदी तसेच वाटत होते. आमचे घर मध्यवर्ती ठिकाणावर होते. या अपार्टमेंट कॉप्लेक्समध्ये कोणीही भारतीय राहत नव्हता. विनायक सकाळी ८ लाच लॅबमध्ये जायला निघायचा ते रात्री ८ ला घरी परतायचा. जाताना तो जेवणाचा डबा नेत होता. जेवण सकाळीच बनल्यामुळे मला दिवसभर रिकामाच असायचा. माझेही रूटीन हळू हळू बसले. हे अपाटमेंट खूप छान होते. धुलाई मशीन घरातच होते. विद्यापीठात व इतर ठिकाणी किराणामाल व भाजी आणण्याकरता आम्ही बसनेच जात होतो. बसथांबाही घराजवळच होता. ही घरे क्लेम्सनमध्ये विद्यापीठाच्या दुसऱ्या बाजुला लांबवर पठारावर वसलेली होती. मी घरी दिवसभर एकटी असल्याने मी रोज अपार्टमेंटच्या शोधात बाहेर पडायचे. हो ना, कारण की ३ महिन्यानंतर कुठेतरी कायमस्वरूपी २ वर्षाकरता रहायला जागा ही हवीच ना !







आत्तापर्यंतच्या मूव्हींगच्या लेखनात मी जिथे जिथे राहिले आणि जे काही अनुभव आले त्याचे वेगळे लेखन केले आहे. ते अनुक्रमे, आयायटी - पवई, अमेरिकेत पाऊल पडल्यावर, गोंधळात गोंधळ, एक सुखद आठवण, खेड्यामधले घर कौलारू आणि ते तीन महिने ! या सर्व लेखांना मी मूव्हींग असे नव्याने लेबल चिकटवले आहे. त्या सदरात तुम्हाला ते वाचायाला सापडतील.




क्लेम्सनमधले तिसरे मुव्हींग आणि क्लेम्सन सोडतानाचे मूव्हींग, अनुभवांची शिदोरी घेऊन लवकरच येते हं !! तोपर्यंत वाचत रहा.

क्रमश : ...

Thursday, June 20, 2013

आज इथं तर उद्या तिथं! ...(५)

कसे असेल क्लेम्सन? असा विचार करत असतानाच नॅन्सीचा फोन आला. नॅन्सीला कळाले होते की आम्ही डेंटनवरून दुसऱ्या शहरात जाणार आहोत. तिने विचारले शहर कोणते? तर मी तिला क्लेम्सन असे सांगितले होते. ती म्हणाली काही काळजी करू नकोस. क्लेम्सन हे अतिशय सुंदर शहर आहे. निसर्गाने नटलेले आहे. हे ऐकताच मला थोडा उत्साह आला. पण तरीही तिथे गेल्यावर कसे होईल, मित्रमंडळी चांगली भेटतील का नाही, तिथली घरे कशी असतील, सामान कसे हालवायचे असे एक ना अनेक प्रश्न माझ्या डोक्यात घोळत होते.






विनायकने ६ महिन्यानंतर दुसरी पोस्डॉक बघायला सुरवात केली. तो म्हणाला की इथे जास्त दिवस राहण्यात अर्ध नाही. प्राध्यापक मर्चंड यांनाच संशोधनात काही स्वारस्य नाही तर इथे राहून काहीही उपयोग नाही. विनायकला ४ विद्यापीठातून संशोधनासाठी बोलावणे आले होते तर त्याने साऊथ कॅरोलायनामधले क्लेम्सन हे शहर निवडले होते. आमचे क्लेम्सन विद्यापीठात २ वर्षाच्या व्हीसावर post doctorate करण्याचे निश्चित झाले. प्राध्यापक डीटर यांनी आम्हाला अपार्टमेंट फाईंडर व क्लेम्सन शहरात मध्ये धावत असणाऱ्या बसचे वेळापत्रक पोस्टाने पाठवले. अपार्टमेंट फाईंडर मध्ये पाहिले तर सर्वच्या सर्व जागा ३ ते ४ बेडरूमच्या होत्या. काही अपार्टमेंटच्या लिजिंग ऑफीसला फोन करून घराच्या भाड्याची साधारण कल्पना घेतली. विनायकच्या लॅबमध्ये पवनकुमार नावाचा एक भारतीय होता तो म्हणाला तुला तिथे गेल्यावर काही अडचण आली तर मी तुला माझ्या मित्राचा ईमेल आयडी देतो. विनायकने ईमेल आयडी घेतला आणि त्याला एक मेल लिहिली. त्याचेही ओके असे उत्तर आले. त्याचे नाव येमुल.






डेंटनवरून क्लेम्सनला विमानानेच जावे लागणार होते इतके ते लांब होते. प्रविणा व तिचा नवरा श्रीनिवास यांनी आम्हाला कशा प्रकारे मूव्हींग करायचे हे सांगितले. श्रीनिवास म्हणाला तुम्ही काही काळजी करू नका. मी तुम्हाला पॅकिंग कसे करायचे ते सांगतो. तुम्ही फक्त एक करा मला ५ ते ६ खोकी आणून द्या. त्यादिवशी संध्याकाळी ते दोघे आमच्या घरी आले. गप्पा मारत होते. अधुनमधून मी चहा करत होते. केव्हा जाणार, कोणत्या विमानाने जाणार, तुम्हाला इथले तुमचे अपार्टमेंट कसे स्वच्छ करून द्यावे लागेल अशी सर्व इत्यंभूत माहीती त्यांनी आम्हाला दिली. आम्ही खोकी आणली आणि एकेक करत आमचे सामान पॅक होऊ लागले. खोकी भरायला श्रीनिवासने आम्हाला मदत केली. सर्व पुस्तके आणि काही सामान पॅक केले. आमचा पहिलावहिला खरेदी केलेला टिल्लू टिव्ही पण खोक्यात गेला. टेप रेकॉर्डर कम रेडिओ पण एका खोक्यात गेला. टोस्टर आणि इतर बरेच सटर फटर सामान खोक्यात जात होते. ही सर्व खोकी आम्ही युएसपीएसने पाठवणार होतो. खोक्यांना चिकटपट्या चिकटवल्या. त्यावर पत्ताही लिहीला. हा पत्ता आम्ही पवनकुमारच्या मित्राचा दिला. ईमेलने त्याला विचारले आम्ही आमचे काही सामान पोस्टाने तुझ्या पत्यावर पाठवत आहोत, चालेल ना?






आमच्या चार बॅगा परत एकदा नव्याने पद्धतशीरपणे लावल्या. एका वर्षात आमचे सामान थोडे वाढले होते. श्रीनिवासने असे सुचवले की त्या शहरात तुम्ही नवीन आहात तर माझा असा सल्ला आहे की तुम्ही थोडेफार भारतीय किराणामलाची पण खोकी तयार करा. त्याकरता तो आम्हाला त्याच्या कारने भारतीय किराणामालाच्या दुकानात घेऊन गेला. काही मसाले, डाळी आणि थोडी कणिक असे परत पॅकीग झाले. मि तिथे राहत असताना एक डिनर सेट घेतला होता. त्यात मोठ्या डिश, छोट्या डिश, बाऊल, चहाचे कप असे सर्व काही होते. तो डिनर सेट खूप जड होता. मी प्रविणाला म्हणाले की हा डिनर सेट तुझ्याकडेच राहू देत. तर मला म्हणाली की नको तूच घेऊन जा. तुला तिथे गेल्यावर परत नवीन घ्यायला नको. आता डिनर सेट पोस्टाने किंवा फेडेक्सने पाठवायचा म्हणजे सत्यानाशच होणार पण बरोबर तरी कसे न्यायचे? श्रीनिवासन म्हणाला की तुमचे ओरिजिनल पॅकींमधले पुठ्ठे आहते का? तर मी हो म्हणाले. आणि एक चेक इन बॅग आहे का? तर तीही होतीच भारतावरून आणलेली. त्याने आम्हाला त्या बॅगेत आमचा डिनर सेट इतका काही छान पॅक करून दिला की विश्वासच बसेना की यामध्ये डिनर सेट आहे. अर्थात ही बॅग खूपच जड झाली होती. पण विमानात तर बसायचे होते त्यामुळे तो उचलण्याचा प्रश्न नव्हता.






इथल्या आणि भारतातल्या मूव्हींगमध्ये बराच फरक आहे. प्रत्येक मूव्हींगच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. जसे की अंतर जर लांब असेल तर विनानाने जावे लागते. काहीजण २० तासाचा प्रवास असला तरीही तो कारनेच करतात. काही जणU-Haul ट्रक कारच्या मागे जोडून प्रवास करतात. या ट्रकमध्ये सर्व सामान बसवता येते. हा ट्रक भाड्याने मिळतो. खूप फर्निचर असेल की जे आपल्याला उचलणे अशक्य कोटीतील गोष्ट आहे अशामध्ये मुव्हर्स आणि पॅकर्स बोलावतात. आणि आता आम्ही जे मूव्हींग करणार होतो ते विमानने जाऊन करणार होतो आणि बाकी सर्व गोष्टी पोस्टाने पोहोचवल्या जाणार होत्या. सर्वात मुख्य म्हणजे इथल्या मूव्हींगमध्ये आपल्यालाच सर्व काही करावे लागते. राहते घरही स्वच्छ करून द्यावे लागते. कामांची नुसती रीघ लागलेली असते. भारतातून येताना ज्या बॅगा आणलेल्या असतात त्याही परत नव्याने लावायच्या म्हणजे डोकेदुखी असते. थोडेफार कपडेही वाढलेले असतात. थंडी असल्याने कोट, टोप्या, चपला बुटे हे पण वाढलेले असते. उन्हाळ्याच्या कपड्यांची पण थोडी भर पडलेली असते. शिवाय जे सामान पोस्टाने अथवा फेडेक्सने पाठवायचे असेल त्या खोक्यांची पण रांग लागलेली असते. त्यावर चिकटपट्या चिकटवून टाईप केलेले पत्ते यांच्या प्रिंटस चिकटवणे व सर्व खोकी एकेक करत उचलून, घर वरच्या मजल्यावर असेल तर खाली आणून परत ती कोणाच्या मदतीने ज्याच्याकडे कार असेल त्याच्या सोयीनुसार त्यात टाकून ती न्यावी लागतात. आम्हाला ही सर्व मदत श्रीनिवासने केली होती. अशा एक ना अनेक भानगडी असतात.






इलेक्ट्रीसिटी कंपनीला फोन करून ती अमूक दिवशी तोडून टाका. आता आम्ही इथे राहत नाही हे कळवावे लागते. टेलिफोन कंपनीलाही तसे कळवावे लागते. हे कळवले नाही तर आपल्या नावाची बिले त्या पत्यावर येत राहतात आणि फुकटचा भुर्दंड बसतो. निघण्याच्या आधी चार पाच दिवस तर हे करू की ते करू असे नुसते होऊन जाते. सामानाच्या आवरा आवरीत बराच कचरा साठलेला असतो तो टाकायला बऱ्याच चकरा होतात. शिवाय सामान जास्तीचे आणून चालत नाही. याउलट एकेक करून घरातले सामानच संपवण्याच्या मार्गावर न्यायचे असते. पूर्ण फ्रीज रिकामा करून जरुरीपुरत्याच भाज्या आणायला लागतात. फ्रीज रिकामा करून तो साफ करायला लागतो. बाथरूम, कमोड, सिंक हे साफ करायला लागते. व्हॅक्युमिंग तर अनेक वेळा करावे लागते. पासपोर्ट, जरूरीचे कागदपत्र आठवणीने एका बॅगेत भरावी लागतात. सगळीकडे पसाराच पसारा असतो. कपडे पण लॉंड्रीतून बरेच वेळा धुवून आणायला लागतात. कारण की आता लॉंड्री बॅगेत कपडे धुण्यासाठी साठवायचे नसतात. एक दिवस आधिचे कपडे तर तसेच पारोसे घ्यावे लागतात नाहीतर हातानेच धुवून, पिळून ते हँगरवर लटकावून वाळवावे लागतात. आपली अवस्था हमालाच्याही वरताण होऊन जाते. कामे करता करता पिंजरारलेले केस, स्वच्छता करता करता अंगावरच्या कपड्याला पुसलेले हात, त्या अवतारातच मैत्रिणींचे येणार कॉल्स, असे सतत चालूच राहाते. पोटात कावळे कोकलत असतात पण तरीही त्याकडे जास्त लक्ष न देता पटापट कामे हातावेगळी करावी लागतात. स्वयंपाकघर तर स्वच्छ करून खूपच दमायला होते. तिथली सगळी कपाटे आवरून, त्यातले काही जे अगदी थोडे थोडे उरले असेल तर याचे काय करायचे? रागाने ते ही कचऱ्यात फेकून दिले जाते. इलेक्ट्रीक शेगड्या साफ करणे, कुठेही कोणताही कचरा, धूळ, घाण दिसत नाही ना हे बघावे लागते. हे सर्व करण्याचे कारण की आपण ज्या जागेकरता डिपॉझिट भरलेले असते ते जास्तीत जास्त परत मिळावे म्हणून. तरी सुद्धा थोडेफार पैसे कापूनच अपार्टमेंटवाले आपले पैसे आपल्याला परत करतात.






घराची होता होईल तितकी साफसफाई केली. श्रीनिवास व रवी आम्हाला विमानतळावर त्यांच्या कारने सोडायला येणार होते. दोन बॅगा घेऊन मी श्रिनिवासच्या कारमध्ये बसणार होते तर विनायक दोन बॅगा घेऊन रवीच्या कारमध्ये बसणार होता. माधवी-रवि, प्रविणा-श्रीनिवास, कविता- पवनमुकार असा आमचा छान ग्रूप झाला होता. शिवाय रेशमी व सौमित्र गोडबोले हे विद्यार्थी मित्र झाले होते. रेशमी बंगाली होती व बाकीचे सर्व तेलगू होते. गोडबोले नावाचाच मराठी होता. त्याला मराठी बोलता येत नव्हते. त्याची आई बंगाली होती. प्रविणाने आम्हाला एका डब्यात पोळी भाजी मध्ये वाटेत खाण्याकरता बांधून दिली होती. आमचे जेव्हा जाण्याचे ठरले त्याच्या आधी प्रविणा, कविता व माधवीने आम्हाला दोघांना जेवायला बोलावले. मी पण सर्वाना आमच्या घरी जेवायला बोलावले होते पण ते सर्व म्हणाले की आता जेवायचा घाट घालू नकोस. या आधी आम्ही तुमच्याकडे बऱ्याचदा जेवलो आहोत. तरी पण मी एके दिवशी सगळ्यांना चहासाठी बोलावले. उपमा व चहा केला.






माधवी आदल्या दिवशी आली आणि म्हणाली मी आता कोणाशी बोलु? आमच्या दोघींची चांगली घट्ट मैत्री झाली होती. मी व तिने मिळून बऱ्याच गोष्टी केल्या होत्या. फोटोग्राफी, मॉलमध्ये भटकणे, एकमेकींकडे जाऊन गप्पा व काहीतरी खाणे, एकत्र गाणी ऐकणे, फोनवर तर किती बोललो असू कोणास ठाऊक. आम्ही दोघींनी आदल्या दिवशी खूप गप्पा मारल्या. प्रविणाही अधुनमधून तिच्या मुलाला घेऊन येत होती. तिच्या मुलामुळे तिला आमच्याकडे बसून गप्पा मारता येत नव्हत्या. रेशमी पण मला भेटायला आली. हीच ती रेशमी आहे की आम्ही दोघींनी आमच्या मूव्हींगच्या स्टोऱ्या एकमेकींना ऐकवल्या होत्या. सौमित्रही भेटायला आला आणि म्हणाला की आता मी तुमच्याकडे फ्लाय करून जेवायला येईन. तुमच्या हातचे चविष्ट जेवण मी खूपच मिस करेन. कविता गरोदर होती ती म्हणाली की सकाळी उठवले नाही तर मी तुला आताच बाय करून ठेवत. तिचे डोहाळेजेवण जे आम्ही सर्वांनी मिळून केले होते ते खूपच मस्त होते. मी जाणार म्हणून मला फक्त कोल्ड ड्रिंक आणि काही कागदी डिश आणायला सांगितल्या होत्या. विनायक लॅबमध्ये रात्रीपर्यंत काम करत होता. पॅकींग व साफसफाई करून जीव नुसता मेटाकुटीला आला होता. त्याहीपेक्षा सर्व मित्रमंडळींना सोडून जाणार याचे खूप दुःख होत होते.






सकाळी उठून आवरले. त्या जागेतला शेवटचा चहा केला आणि उरलेले दूध प्रविणाला दिले. अजूनही काही नुकत्याच आणलेल्या भाज्याही दिल्या. प्रविणाने केलेली पोळी भाजी एका प्लस्टीकच्या डब्यात बांधून घेतली. पूर्ण सामानाची बांधाबांध झाली होती. एकेक करत सर्व बॅगा खाली उतरत होत्या. सर्वजण आम्हाला भेटायला खाली जमा झाले होते. मला आतून खूप गदगदत होते. घरातल्या प्रत्येक खोलीत जाऊन मी पूर्ण घराला डोळे भरून पाहत होते. प्रत्येक खोलीत जाऊन नमस्कार करून म्हणत होते "या घरातील आमचे वास्तव्य छान झाले. मी या घराला कधीही विसरणार नाही. आता या घरात परत येणे नाही" काही राहिले तर नाही ना याची खात्री करून घेतली आणि कुलूप लावून मी खाली आले. सर्वांना आम्ही टाटा करत होतो. आणि कारमध्ये बसताना घराला शेवटचे पाहून घेतले. टाटा करताना काही वेळाने सर्व दिसेनासे झाले आणि आमच्या मित्रांच्या दोन कारने हायवे वरून धावायला सुरवात केली. डॅलस विमानतळावर रवी व श्रीनिवासने आम्हाला सोडले. त्यांनाही टाटा करून काही वेळाने विमानात बसलो.






विमानाने आकाशात उड्डाण केले आणि मला थोडी डुलकी लागली. डुलकीतून मी जागी झाले आणि असे वाटून गेले की विमानात असेच डोळे मिटून पडून राहावे. कुणे जाणे नको नि कुठे येणे नको. विमानातच थोडीफार विश्रांती मिळत होती. खूप दमायला झाले होते तरी सुद्धा माझे मन त्या घराच्या आठवणीत गुंतले होते. किती आठवणी होत्या त्या घराच्या ! या घरातच मी माझ्या आयुष्यातला पहिला बर्फ पाहिला होता. या घरातच बऱ्याच जेवणावळीही झाल्या होत्या. मी व माधवी किती अगणित बोललो होतो फोनवर ! या घरात असतानाच मी कशी २४ तास डॅलसवरून प्रसारित होणारी हिंदी गाणी ऐकली होती. याच घरात ७० ते ८० बटाटेवडे आणि सामोसेही कसे तळले होते आणि स्मोक डिटेक्टर कसा वाजायला लागला होता. याच घरात आईबाबा व बहिणीची आठवण होऊन किती वेळा रडले होते ! एक ना अनेक आठवणी !






ग्रीनव्हीलच्या विमानतळावर उतरलो. हा छोटासा विमानतळ आम्हाला दोघांनाही खूप आवडून गेला. विमानतळाच्या बाहेर येताक्षणी प्राध्यापक डीटर आम्हाला दिसले. आमच्या दोघांच्या फोटोच्या प्रिंटवरून त्यांनी मला आधी ओळखले! हो, यावेळीही आम्ही आमचे फोटो स्कॅन करून त्यांना ओळख पटण्यासाठी पाठवले होते. त्यांच्याशी हास्तांदोलन करून आमच्या बॅगांसकट आम्ही त्यांच्या कारमध्ये बसलो त्यावेळी रात्रीचे बारा वाजत आले होते. थेट फ्लाईट असूनही आम्ही इतक्या उशिराने का पोहोचलो ते नंतरच्या लेखात लिहीनच. कार रस्त्यावरून धावू लागली. त्या काळ्याकुट्ट अंधारातही उंच उंच झाडे दिसत होती. रस्ताही सुंदर असावा असा अंदाज येत होता. ग्रीनव्हीलवरून क्लेम्सन जवळ जवळ येत होते. उंचसखल वळणे घेत कार जात असतानाच मनामध्ये नवीन शरहाबद्दल उत्सुकता जगृत होत होती आणि असे जाणवत होते की क्लेम्सन चांगलेच असणार. परत उत्साहाचे वारे अंगात वहायला लागले!!

क्रमशः ....


Tuesday, June 18, 2013

Art Photography