Wednesday, December 31, 2014

दोन हजार पंधरा



सर्वांना २०१५ च्या हार्दिक शुभेच्छा!! नूतन वर्ष तुम्हां सर्वांना आनंदाचे व उत्साहाचे जावो ही सदिच्छा !


सजावट:  सफरचंदाची साल वापरली आहे.

Tuesday, December 30, 2014

पूर्वेपासून पश्चिमेकडे ...(१)



पूर्वकिनाऱ्यापासून पश्चिम किनाऱ्याकडे जायला निघालो. दुपारचे विमान उड्डाण होते. लॉस एंजलिसला जाण्यासाठी विमानाचा एक थांबा लास वेगासला होता. विल्मिंग्टन ते लास वेगास ४ तासाचा प्रवास होत आला होता. प्रचंड भूक लागली होती कारण लवकर जेवून निघालो होतो. प्रवासात काही कोरडे पदार्थ करून घेतले होते, पण ते पुढे उपयोगात येतील म्हणून विमानात विकणारे काही पदार्थ बघितले. त्यात प्रिंजल्सचे  पोटॅटो चिप्स होते. या चिप्सची किंमत दुकानात दीड डॉलर्स आहे पण इथे विमानात ते ४ डॉलर्सला होते.  चिप्सचे २ डबे घेतले व सोबत कॉफी घेतली. हे चिप्स मला खूपच आवडतात ! भूकेच्या वेळेला विमानान बसून चिप्स खाताना मस्तच वाटत होते !




काही वेळातच विमान लास वेगासच्या विमानतळाच्या एका गेटवर थांबले. विमानतळावर प्रवेश केल्यावर दुसऱ्या देशात आल्यासारखे वाटले. अस्वच्छता खूप होती. चिनी लोक खूप दिसायला लागले. पूर्ण विमानतळावर कॅसिनो लावले होते. इथे दोन तासांची विश्रांती होती. आता रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती. एकेक सँडविच व कॉफी घेतली. झाले जेवण ! पूर्व व पश्चिम किनाऱ्यांमध्ये तीन तासांचा फरक आहे. आम्ही पूर्वेचे लोक आधी जागे होणारे ! आता इथपासून वेळेच गणित बिघडणार होते. वेळीअवेळी खाणेपिणे आणि झोपणे सुरू झाले. लास वेगास ते लॉस अँजलिसच्या विमान उड्डाणाचा अवधी साधारण दीड तासाचा होता. जिथे अँजली लॉस झाली तिथे उतरलो व बॅगा काढण्यासाठी पुढे सरसावलो. एकीकडे चिनी टूर्सच्या गाईडला फोन लावला. तो म्हणाला बाहेर येऊन फुटपाथवर थांबा. मी येतोच. त्याने त्याच्या गाडीचा नंबरही दिला. विमानतळावरून बाहेर पडलो आणि आम्हाला मुंबईत आल्यासारखेच वाटले.





हवाही गरम होती. ड्राईव्हरने आम्हाला क्वालिटी इनच्या होॅटेलमध्ये सोडले व "उद्या सकाळी बरोबर ९ वाजता तयार रहा. आपल्याला उद्या लास वेगासला जायचे आहे" असे सांगितले. हॉटेलमध्ये गाद्यांवर आडवे झालो. बॅगा उघडून फक्त जरूरीपुरते कपडे बाहेर काढून ठेवले. सकाळी उठून पटापट आवरून नाश्त्यासाठी हॉटेलच्या लॉबीमध्ये आलो. नाश्ता छानच होता. उकडलेली अंडी, ब्रेड, केक, कॉफी, फळे, ज्युस, सेरेयल. लास वेगासला जाणारी टूरची मोठी बस आली. त्यात चढलो. आम्हाला पुढची जागा दिली होती आणि आमचा ७ दिवसाचा प्रवास सुरू झाला. आहाहा! खूप छान वाटत होते. बसण्यासाठी प्रशस्त जागा, मोठमोठाल्या संपूर्ण काच असलेल्या खिडक्या आणि त्यातूनही आम्हाला पुढच्या सीटा बसण्यासाठी मिळाल्याने पुढचा रस्ता, रस्त्यावरची इतर वाहतूक, सर्व काही छान दिसत होते. सुरवातीचा प्रदेश डोंगराळ होता. दूरवर कुठेतरी डोंगरावर बर्फ पडलेले दिसत होते. नेवाड्यात शिरलो आणि सपाट व वाळवंटी प्रदेश सुरू झाला. एकही झाड नाही. डोंगरही दाढी केलेल्या माणसासारखे गुळगुळीत दिसत होते. डोळ्याना सपाट व वाळवंटी प्रदेश जास्त छान वाटत होता. कारण की पूर्वेकडे रस्त्याने जाताना खूप झाडी लागतात. सर्वत्र हिरवेगार दिसते. पण इथल्या वेगळ्या रुपामुळे थोडा वेगळेपणा व त्यामुळे उत्साह आला होता. गाईडने माहिती सांगायला सुरवात केली. आमच्या बसमध्ये आम्ही सोडून सर्व चिनी लोक होते. त्यामुळे गाईड चॉव म्यॉव बोलायला लागला. इंग्रजीतून थोडेसेच बोलायचा. परत मूळ पदावर याची गाडी सुरू. चोम छोम छमा छम चम छम हाहा! कानाला वेगळी भाषा असल्याने त्याचा त्रास होत न्हवता तर चांगले वाटते होते.






लॉस अँजलिस ते लास वेगास हा एकूण ६ तासाचा प्रवास होता. त्यात जेवणासाठी एक थांबा घेऊन हॉटेलमध्ये उतरणार होतो. आधीचा १० तासाचा विमानप्रवास व आता हा ६ तासाचा प्रवास होता. जसजसे लास वेगास जवळ येऊ लागले तस तसे पोटात काव काव कावळे ओरडायला सुरवात झाली. एका एशियन बफेट उपहारगृहात सगळे शिरलो. सर्व जण आपापली डिश भरण्यात मग्न होऊन गेली. आम्ही पण शाकाहारी पदार्थ डिशमध्ये भरून घेतले. त्यात नूडल्स, फ्राईड राईस, सलाड, उकडलेले कणीस, उकडलेले बीन्स, व्हेजिटेबल रोल्स असे सर्व घेतले. एकही शब्द न बोलता तोंड आणि हात याचीच मिळवणी करत होतो. अधुनमधून डाएट कोकचा एकेक घोट जात होता. नंतर परत एक डिश भरून घेतली. त्यात फळफळावळ, आईस्क्रिम, केक्स घेतले. पोटभर जेवळ्याने चांगलीच तरतरी आली ! बसमध्ये बसलो व परत प्रवासाला सुरवात झाली. लास वेगास हॉटेलमध्ये आल्यावर साधारण दीड ते २ तासाची विश्रांती घेऊन झगमगाट व चकचकाट अशा नाईटलाईफला सुरवात होणार होती. हॉटेलमध्ये उतरल्यावर बॅगा टाकल्या, फ्रेश झालो. जरा आडवे होतो न होतो तोच लगेचच उठावे लागले. एका छोट्या पिशवीत पाण्याची बाटली, चिप्स, केक व थोडी बिस्किटे घेतली. हॉटेलच्या लॉबीमध्ये येऊन थांबलो. बसमध्ये बसलो आणि आमच्या नाईटलाईफला सुरवात झाली. मोठमोठाली ४ ते ५ हॉटेल्स पाहिली व त्याला लागूनच मोठमोठाले मॉल्स पाहिले. त्यात काही छोटे शोज होते तेही पाहिले. सर्वजण फोटो काढण्यात मग्न होऊन गेली होती. आता आम्ही ज्या हॉटेलमध्ये जाणार होतो तिथे जो शो होता तो होता ऍडल्ट शो ! गाईड म्हणाला "कोणाची लहान मुले असतील त्यांचे बेबी सिटिंग मी करीन. तुम्ही काळजी करू नका. शो एंज्यॉय करा !






हा शो दीड तासांचा होता. हा दीड तास कसा निघून गेला ते कळालेच नाही ! सर्वजण एका लयीत व तालबद्ध नाचत होते. काही गात होते. नाचणाऱ्या मुली कमनीय बांध्याच्या व त्यांची वेशभूषा व केशभूषा अवर्णनीय होती! शोमधले सीन पटापट बदलत होते. या शोचे एक वैशिष्ठ म्हणजे काही मुली टॉपलेस होत्या ! पण कुठेही अश्लीलता नाही. सर्व मुले व मुली कलात्मकरित्या नाचत होते. गात होते. गाण्यामध्ये व नाचण्यामध्ये आजुबाजूला, मागे पुढे व वर खाली होणारे भव्य व दिव्य सेट होते. तेही पटापट बदलत होते. हे सर्व काही नेत्रसुखद होते ! या शो चा रेट होता ९० डॉलर्स एका माणसासाठी. पैसे पुरेपूर वसूल झाले होते ! इथे फोटो व विडिओ काढण्यास सक्त मनाई होती.






झगमगाटी लास वेगासचे दर्शन खूपच सुंदर झाले होते ! या शो नंतर आम्हाला सर्वांना डाऊन टाऊन मध्ये सोडण्यात आले. इथे तर बरीच गर्दी होती. काही जण नाचत होते. काही जण गात होते. फोटो काढत होते. इथेही पूर्ण रस्ताभर झगमगाट पहायला मिळाला. नंतर आम्हाला हॉटेलवर सोडले. गाईडला विचारले आता जेवणाची सोय काय आहे? तर तो म्हणाला हॉटेलच्या दुसऱ्या लॉबीमध्ये बरीच उपहारगृहे आहेत तिथे तुम्हाला जे हवे ते मिळेल. तिथे गेलो तर एक भारतीय उपहारगृह दिसले. ते पाहून तर खूपच आनंद झाला. तिथे नवरतन कुर्मा आणि नान घेतले. खूपच चविष्ट होते. परत हॉटेलकडे रवाना झालो. दुसऱ्या दिवशी पहाटे ५ ला हॉटेल लॉबीमध्ये हजर रहायला सांगितले होते. हॉटेलमध्ये आल्यावर दुसऱ्यादिवशीचे कपडे बाहेर काढून बॅगा बंद केल्या. झोप कुठली यायला ! एकतर पहाटे उठायचे म्हणून त्या धसक्याने झोप नाही आणि शिवाय डोळे मिटले की टॉपलेस गर्ल्स डोळ्यासमोर येत होत्या ! हाहाहा ! दुसऱ्या दिवशी ग्रँड कॅनियनकडे - ऍरिझोना राज्यात प्रवेश करणार होतो !

 क्रमश : ------



Wednesday, December 17, 2014

Thursday, December 11, 2014

Art Photography